खांडववनदाह, महाभारतातील हत्याकांडाचे एक आकलन - १

Submitted by अतुल ठाकुर on 15 April, 2017 - 20:58

1200px-Krishnarjunas_fight_with_Gods.jpg

महाभारतातील कथानक अत्यंत गुंतागुंतीचे, अनेक पदरी आणि मानवी मनाचे निरनिराळे कंगोरे दाखवणारे आहे असे म्हटले जाते. महाभारत हे नुसतेच काव्य नसून इतिहासदेखील आहेत त्यामुळे यातील पात्रे व घटना खर्‍या आहेत अशी समजूत आहे. या प्राचिन काळी घडालेल्या कौरवपांडव युद्धाशी निगडीत अशा व्यासांच्या मूळ "जय" नावाच्या इतिहासात अनेक शतके प्रक्षेप होत होत आज लक्षावधी श्लोकांचा महाभारत ग्रंथ आपल्यासमोर आला आहे. पुण्याच्या भांडारकर संशोधन संस्थेने डॉ. सुखटणकरांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून त्यातील प्रक्षेप बाजुला सारुन महाभारताची संशोधित आवृत्ती समोर ठेवण्याचे काम स्वातंत्र्यपूर्वकाळापासून सुर केले जे अनेक दशके चालून पूर्ण झाले. अनेक चमत्कारिक घटना या चिकित्सक आवृत्तीने नाकारल्या. मात्र चिकित्सक आवृत्ती ही महाभारताची साधारणपणे सन १००० च्या आसपासची आवृत्ती आपल्या समोर उभी करते. त्याआधी महाभारत कशा स्वरुपाचे होते याबद्दल कसलिही अटकळ बांधता येत नाही. शिवाय चिकित्सक आवृत्ती म्हणजे महाभारतातील घटनाक्रमावरचे भाष्य नव्हे.

त्यामुळे महाभारताचा अर्थ लावताना नरेटॉलॉजी किंवा कथनशास्त्राचे महत्त्व अपार आहे म्हणावेसे वाटते. समोर आलेल्या कथानकातून निरनिराळे किती तर्‍हांचे अर्थ निघु शकतात, त्या कथेचे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक स्तरांवर स्पष्टीकरण कसा तर्‍हेने केले जाऊ शकते, त्या कथेचे स्थल, कालानूसार काय वैशिष्ट्य सांगता येईल, त्या कथेतील अद्भुततेचा नक्की अर्थ काय अशा अनेक महत्वाच्या बाबींवर कथनशास्त्र प्रकाश टाकते. त्यामुळे असे म्हणण्यास प्रत्यवाय नसावा की कथनशास्त्राच्या सहाय्याने महाभारतातील दोन ओळींच्या मध्ये जे भाष्य केले गेले आहे किंवा घटनांच्या वरवरच्या अर्थामागे जो गुढ अर्थ दडला आहे तो अर्थ मोकळा करण्यासाठी कथनशास्त्राचा उपयोग एखाद्या अंधार्‍या गुहेत विजेरी वापरावी त्याप्रमाणे करता येतो. महाभारतातील अशाच एका वादग्रस्त कथानकाचा कथनशास्त्राच्या दृष्टीने येथे परामर्ष घ्यायचा आहे.

महाभारतातील खांडववनदाह हे एक वादग्रस्त कथानक. ते वादग्रस्त अशासाठी की ही भीषण संहाराची कथा आहे. आणि यात ज्यांचा ज्या तर्‍हेने संहार केला गेला आहे तो पाहता त्यांचा नक्की दोष काय होता याचे आकल्न होत नाही. त्यामुळे ही एका अन्यायाची कथा वाटते. खुद्द महाभारतकारांना त्यात फारसे लपवावे असे काही वाटलेले दिसत नाही. ज्याप्रमाणे आजच्या काळात चमत्कारिक वाटेल अशी नियोगप्रथा महाभारत स्वच्छपणे समोर ठेवते तशीच खांडववनाची कथादेखील महाभारताने कसलाही आडपडदा न घेता सांगितली आहे. याचं एक कारण बहुधा श्रीकृष्णाला खुद्द महाभारतकाळात देवत्व प्राप्त झालेलं नसावं हे असण्याची शक्यता आहे. अतिशय पराक्रमी, मुत्सद्दी, धुरंधर राजकारणी, ऐश्वर्यवान परंतू संपूर्णपणे मानवी अशी श्रीकृष्णाची प्रतिमा जर समोर आणली तर मूळ महाभारतातील खांडववनाची कथा समजणे आणि पचवणे देखील फारसे जड जात नाही.

मात्र श्रीकृष्णाला भगवान म्हणून पाहायला लागल्यावर अनेक अडचणी येऊ लागतात. या अडचणी दूर करण्याचा कृष्णभक्तांचा एक मार्ग म्हणजे ही कथा संपूर्ण वेगळ्या स्वरुपात लोकांसमोर आणणे जे रामानंद सागर यांनी आपल्या श्रीकृष्ण मालिकेत करून दाखवले आहे. दुसरा मार्ग म्हणजे या घटनेवर फारसे भाष्य न करता पुढे जाणे. एखाद्या जमातीचे संपूर्ण उच्चाटन करण्याचा प्रयत्न म्हणजे एखादी किरकोळ घटना असल्याप्रमाणे बी. आर चोप्रांच्या मालिकेतील "समय" दोनतीन ओळीत ही घटना सांगून पुढे जातो. याचा परामर्ष पुढे येईलच. सारी भगवंताची लीला आहे आणि ती संपूर्ण समजणे आपल्या आवाक्याबाहेरचे आहे असे मानणे हा तिसरा मार्ग असु शकतो जो एखाद्या समर्पित भक्ताने अंगिकारलेला असेल. मात्र कथनशास्त्र आपल्याला साधने पुरवते ज्यामुळे वस्तुनिष्ठ असे या घटनेचे स्पष्टीकरण समोर येते जे श्रीकृष्णाचे देवत्व बाजुला सारून त्याची मानवी बाजु समोर आणते. कथनशास्त्रातील अशाच काही साधनांचे सहाय्य घेत महाभारतातील खांडववन दाह घटनेचे कशा तर्‍हेने स्पष्टीकरण करता येईल हे येथे आपल्याला पाहायचे आहे. यासाठी सर्वप्रथम मूळ कथानक जाणून घेणे इष्ट होईल.
(क्रमशः)

अतुल ठाकुर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Nice

सुरवात छान आहे. मला महाभारत कायम गूढ वाटत आले आहे. त्यातल्या पात्रांचे देवत्व आणि अमानवी शक्ती बाजूला ठेवले तर चित्र कसे दिसेल ह्याचे कुतूहल कायम वाटत राहिलंय. खांडववन दहनावर फारसे काही वाचनात आले नाही. त्यामुळे तुमचे विवेचन वाचायची उत्सुकता दाटून आलीय. पुढचे भाग भराभर टाका.

वावे, पर्व वाचलेय. पण आता सगळेच आठवत नाहीय. त्यातले युद्ध आणि कृष्णाची द्वारका फक्त आठवतेय. परत वाचायला हवे.

हा भाग छोटा झालाय.. पुढच्या भागांची वाट बघतोय. मला भैरपांचे विवेचन आवडले, पण त्यातलाही काही भाग पटत नाही.

Interesting...... आवडेल ह्यावर वाचायला. महाभारताबद्द्ल जेवढे वाचू तेवढे अधिक प्रश्न समोर येतात.
लवकर टाका पुढचा भाग.

छान .
पुढील भाग वाचण्यास उत्सुक..>+२