कसे मी उजळवू आता तुझे अंधारलेले जग

Submitted by बेफ़िकीर on 15 April, 2017 - 03:54

हवे होते तुला माझ्याविना शाकारलेले जग
कसे मी उजळवू आता तुझे अंधारलेले जग

कसे लाभेल आम्हाला अशी झालीस मोठी तर
सुरील्या किलबिलाटाने तुझ्या झंकारलेले जग

हजारो जन्मही परिघास उल्लंघू न शकलेले
पछाडे न्यूनगंडाने मला विस्तारलेले जग

नको आमंत्रणे धाडूस केसांच्या सुगंधाने
जिव्हारी लागले आहे तुझे शृंगारलेले जग

मनाच्या आत माझ्या, यायची आलीच संधी तर
बघा यारो, जगावाचून मी साकारलेले जग

फरक दोन्हीतला समजेल तेव्हा हो बरे माझी?
तुला स्वीकारणारे जग नि तू स्वीकारलेले जग

तुम्हाला वेगळे ह्याहून कोणी भेटते का हो?
तुम्हा नाकारणारे जग, तुम्ही नाकारलेले जग

निघाले 'बेफिकिर' साले, खुळी आशा मनी होती
मला गोंजारण्या येईल मी गोंजारलेले जग

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनेक दिवसांनी मायबोलीवर आलो आणि
ही गझल आणि विशेषत:

"हवे होते तुला माझ्याविना शाकारलेले जग
कसे मी उजळवू आता तुझे अंधारलेले जग

फरक दोन्हीतला समजेल तेव्हा हो बरे माझी?
तुला स्वीकारणारे जग नि तू स्वीकारलेले जग"

हे शेर वाचून आल्याचे सार्थक झाले असे वाटले.

मी मायबोलीवर नवीन आहे. जसजसा वेळ मिळतो, पूर्वीचं लिखाण वाचते.

हजारो जन्मही परिघास उल्लंघू न शकलेले..... पछाडे न्यूनगंडाने मला विस्तारलेले जग
नको आमंत्रणे धाडूस केसांच्या सुगंधाने ...... जिव्हारी लागले आहे तुझे शृंगारलेले जग

फरक दोन्हीतला समजेल तेव्हा हो बरे माझी? ...... तुला स्वीकारणारे जग नि तू स्वीकारलेले जग ..... ह्या ओळी मला विशेष भावल्या

कसे लाभेल आम्हाला अशी झालीस मोठी तर
सुरील्या किलबिलाटाने तुझ्या झंकारलेले जग

फारच सुरेख शेर सरजी

सुरेख झालीय गझलं, आवडली !

फरक दोन्हीतला समजेल तेव्हा हो बरे माझी?
तुला स्वीकारणारे जग नि तू स्वीकारलेले जग

तुम्हाला वेगळे ह्याहून कोणी भेटते का हो?
तुम्हा नाकारणारे जग, तुम्ही नाकारलेले जग
>>>>> व्वा क्या बात है!!!