अनवट किल्ले: गंभीरगडाची सफर

Submitted by दुर्गविहारी on 14 April, 2017 - 11:18

बहुतेक ट्रेकर किल्ले फिरायचे ठरविले कि पुणे, रायगड, नगर , नाशिक, सातारा किंवा कोल्हापुर या जिल्ह्यातले किल्ले फिरतात. पण प्रंचड आडव्या
तिडव्या पसरलेल्या या महाराष्ट्रात बाकीच्या जिल्ह्यातही तितकेच प्रेक्षणीय किल्ले आहेत, त्यांची ओळख या लेखमालेतून आपण करुन घेउ.
आजचा पहिला किल्ला जो आपण पाहणार आहोत तो आहे, ठाणे जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातिल गंभिरगड. तसा महाराष्ट्राच्या एका कोपर्यात असलेला हा गड भेटीत अतिश्य आनंद देउन जातो. गंभीरगड, कोहोज आणि अशेरी अशी दुर्ग त्रिकुटाची यात्रा करण्यासठी मी व माझा मामे भाउ संकेत डहाणू गावात दाखल झालो. ईथून मुंबई- अहमदाबाद हायवेवरील चारोटी नाक्यावर जाण्यासाठी बस पकडली. चारोटी नाक्यावर लॉज, दुकानांची गजबज आहे. काही खरेदी करायची असल्यास ती इथेच करता येते. डहाणूवरुन चारोटी कडे येताना "आशागड" नावाचे
गाव लागते. इथे कोणताहि किल्ला नाही, परंतु जव्हार संस्थानाच्या राणी आशादेवी याच्यांसाठी बांधलेला वाडा आहे. चारोटीहुन पुढे अहमदाबादच्या दिशेने गेल्यास महालक्ष्मी सुळक्याकडे तसेच सेगवाह, कण्हेरी व बल्लालगड हे किल्ले पहाता येतात, त्यांच्याविषयी परत कधीतरी.
गंभीरगडला जाण्यासाठी चारोटीहुन प्रथम पुर्वेला असलेल्या कासा या गावी जावे लागते. फक्त दोन कि.मी. वर हे गाव आहे. यानंतर जायचे आहे, "सायवन" या गावी. नशिबात असेल तर बस नाहीतर खाजगी जीप आहेतच. पाउण तासात आपण २० कि.मी. वरच्या सायवन गावात दाखल होतो. इथून समोरच गंभीरगड दिसत असतो, पण अदयाप ५ कि.मी. वरच्या पायथ्याच्या व्याहाळी( पाटीलपाडा) गावी जायचे असते.
आम्ही सरळ रिक्क्शा केली. रिक्शा ड्रायवरने आम्हाला काही माहिती दिली, त्यानुसार गंभीरगडाच्या विकासासाठी २ कोटि मंजूर झालेत असे कळले, बघूया आता गंभीरगडाचे अच्छे दिन येताहेत का?
पायथ्याच्या व्याहाळी गावात उतरलो, हा अदिवासी पाडा आहे, मुक्कामाला अजिबात सोयीचा नाही. गडावरही मुक्कामा योग्य जागा नाही, तेव्हा त्या द्रुष्टीनेच हा ट्रेक प्लान करवा. फारतर कासा किंवा चारोटीला मुक्काम करता येइल. व्याहाळी हे लहान घरांचे आणि ताडीच्या झाडानी वेढलेल गाव आहे.
पाड्यावरुन थेट समोर गंभीरगड दिसत असतो. गडाच्या दिशेने निघाल्यावर एका शिळेवर पावले कोरलेली दिसतात, गावकरी ती सितेची पावले आहेत असे सांगतात. बहुतेक कोणाची तरी सतिशीळा असावी.
Gambhirgad from base
जवळ पास एक कि.मी. ची वाट्चाल केल्यानंतर गडाची चढण सुरु झाली. सुरवातीचा भाग झाडी भरला आहे, मात्र दोन त्रुतीयांश चढण संपक्यानंतर उजाड भाग आहे. एव्हाना माथा जवळ दिसू लागतो.
Top of Gambhirgad
माथ्याआधी अतिअल्प तटबंदीचे अवशेष दिसू लागतात.
Fortification
माथा इंग्लिश सी आकाराचा आहे. माथ्याचे खडक विदारीत म्हणजेच ठिसूळ असल्याने थेट माथ्याखाली मुक्काम योग्य नाही, तसेच माथ्यावरही बिल्कूल सपाटी नाही. डाव्या कोपर्यात खडकात कोरून काढलेल पाण्याचे टाके आहे, त्यासाठि थोडे प्रस्तरारोहन करत टाक्यावर चढावे लागते, तसेच पाणी खोल असल्याने पोहरा आवश्यक आहे. अर्थात गावकर्यानी तिथे एक पोहरा ठेवलेला आहेच, तरी तो नसेल हे ग्रुहीत धरून जाताना लांब दोरी नेली तर पाण्याची गैरसोय होणार नाही.
Water kristen
आत्तापर्यंतच्या दोन तासाच्या चढाइने थकलेलो आम्ही दोघे वरच्या भर्राट वार्याने सुखावलो. माथा विलक्षण खडकाळ आहे, अजिबात सपाटी नाही, त्यामुळे वास्तुंचे अवशेष बघायला मिळत नाहीत. माथ्यावर फक्त हे आदिवासींच्या देवीचे, जाखमातेचे मंदिर पहाण्यास मिळते.
gh
बाकी उत्तर टोकाकडे असणारे मनोर्यासारखे हे सुळके जबर्दस्त आहेत.
gnh
वरून उत्तरेला गुजरात मधील वापी मधला मधुबन तलाव व त्याच्या मधोमध असणारा बेटावरचा वेताळगड किल्ला दिसतो. पश्चिमेला सेगवाह व कन्हेरा हे किल्ले तसेच महालक्श्मी सुळका दिसतो. पुर्वेला जव्हार,मोखाड्याचा परिसर दिसतो. तसेच हर्षगड दिसतो. वायव्येला डहाणू, उबंरगाव, संजाण पंर्यतची समुद्राची किनार तर दुर दक्षीणेला अशेरी, अडसुळ यांची कातरलेली डोंगररांग दिसते.
uuu
या शिवाय माथ्यावर पाण्याची कोरीव तीन टाकी व दोन तोफा दिसतात. पाणी अर्थाततच खराब आहे.
gambir
पुर्वेकडून गिरीथड या गावातून देखील या किल्ल्यावर येता येते. आजुबाजूला असलेले जंगल व त्यात पट्टेरी वाघ, बिबट्या, कोल्हे अश्या वन्यप्राण्यांचा वावर, एकूण अनवट निसर्ग आहे.
h
या किल्ल्याच्या माथ्यावर एक भुयारही दिसते, त्याचा संबध गावकरी इतिहासाशी जोडतात. शिवाजी महाराज पहिल्या सुरत स्वारीहुन जव्हार मार्गे परत येताना, मोगंल फौजा पाठलाग करताहेत अशी त्याना खबर लागली तेव्हा जास्तीची संपत्ती त्यानी या भुयारात लपविली असे मानले जाते. त्यानंतर बरेच जण संपत्तीच्या शोधात, या विवरात उतरले , पन ते कधीच परत आले नाहीत.
शिवाजीराजानंतर संभाजीराजानी इ.स. १६८३ मधे उत्तर कोकणवर स्वारी केली, त्यात तारापूर, अशेरी यासह गंभीरगडही जिंकुन घेतला. इ.स. १७३७-३९ च्या चिमाजी अप्पाच्या उत्तर कोकण मोहिमेत गंभीरगड जिंकल्याची नोंद आहे.
ghg
गंभीरगडावर याशिवाय तलासरीहून नाशीकरोडने उधवा नाक्याकडे येताना दापसरीहुन येता येते. इथे धरण आहे आणी बॅकवॉटरमधे पक्षांची जत्रा भरलेली असते. एकूणच एक रम्य परिसरातला दिवस कारणी लागतो.
सदर्भ ग्रंथः-
१ ) दुर्गसंपदा ठाण्याची- सदाशिव टेटविलकर
२ ) शिवछत्रपतीच्या दुर्गाचां शोध - सतीश गुरुसिध्द अक्कलकोट
३ ) ठाणे जिल्हा गॅझेटिअर
४ ) सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो ट्रेकर्स
५ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट
६ ) डोगंरयात्रा- आनंद पाळंदे

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण प्रंचड आडव्या तिडव्या पसरलेल्या या महाराष्ट्रात बाकीच्या जिल्ह्यातही तितकेच प्रेक्षणीय किल्ले आहेत, त्यांची ओळख या लेखमालेतून आपण करुन घेउ. लेख आवडलाच पण अनवट किल्ले परिचयाची संकल्पनाही आवडली