क्रिस्टल बॉल.... आयुष्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन!!

Submitted by चिन्गुडी on 10 April, 2017 - 09:57

रोज सकाळी नुसतं उठायचा सुद्धा कंटाळा करणारी मी, प्रवासाला जायचं म्हंटल्यावर, ट्रेकला जायचं म्हंटल्यावर अगदी पहाटे चारला सुद्धा खुशीनं जागी होते. पहाटे पाचपासून संध्याकाळी पाचपर्यंत सुद्धा आनंदानी गाडी चालवते. तो आनंद खरंतर ठराविक ठिकाणी पोहोचण्यापेक्षा त्या प्रवासाचा असतो, त्या गाडी चालवण्याचा असतो. असं वाटतं फक्त पुढे पुढे जात राहावं, डेस्टिनेशन पन्नास किलोमीटरच्या आत आलं असं दाखवणारा माइलस्टोन मला वाकुल्या दाखवणाऱ्या लहान मुलासारखा वाटतो. खासकरून तेव्हा, जेव्हा पुणे पन्नास किलोमीटर चा बोर्ड दिसतो. अगदी लहान असल्यापासूनचा हाच अनुभव आहे. लहानपणी म्हणजे जेव्हा अंक अक्षर असलं काही कळत नव्हतं तेव्हापासूनच! कोल्हापूर मध्ये होते तेव्हा; ताराराणीचा पुतळा दिसला की माझं रडणं सुरु व्हायचं. आई कशीबशी समजूत घालून घरी न्यायची! दुसऱ्या दिवशी सकाळपासून माझी भुणभुण सुरु व्हायची कधी ट्रिपला जायचंय? आता काश्मीरला जायचं हं आपण! हाच गुण माझ्या लेकीमध्ये पण आलेला आहे. वय वर्ष चार, सगळे सिम्पटम्स हेच. आई आई आज गोव्याला जाऊया, आज महाबळेश्वरला , उद्या इकडे, परवा तिकडे ... घरी परततानाच दुःख पण तेच. अगं, राहूया ना अजून इथेच थोडे दिवस, एवढ्यात कशी काय ट्रिप संपली? लगेच काई परत जायचं? फार मजेशीर असतं हे घर सोडून जाणं आणि परतणं! त्या एवढ्याश्या जीवाला काय समजावून सांगायचं आता?

what next ? च्या क्रिस्टल बॉलमधून जग बघते मी! हे झालं कि पुढे काय? याचं उत्तर मिळालं कि झालं ..मी खुश! एकच गोष्ट मी फार काळ मी करू शकत नाही. माझ्या या क्रिस्टल बॉल मधून सगळं १८० डिग्री मध्ये उलटं दिसतं.सगळं नवीन, एखाद्या गोष्टीकडे बघायचा संपूर्ण अँगल, त्याच गोष्टीकडे बघायचा, त्याच व्यक्तीकडे बघायचा, त्याच परिस्थितीकडे बघायचा!यातून सगळंच क्रिस्टल क्लीअर दिसतं. सगळंच छान, सगळंच आपलंसं , जणूकाही माझाच एक भाग बनून राहिल्यात या सगळ्या गोष्टी, व्यक्ती. या जगातली प्रत्येक गोष्ट, प्रत्येक व्यक्ती आपलीच आहे, जसं काही हक्कच आहे माझा त्यांच्यावर. सगळ्यांवर भरभरून प्रेम करायला लावणारी, सगळंच कसं भरभरून जगायला लावणारी अनुभूती!

यातून लांब पळून जाणं शक्यच नाही अशी अदृश्य शक्ती! घरातल्या चार कोपऱ्यात... छत... जमिनीत आपल्याला जपून, सांभाळून ठेवणाऱ्या त्या सुरक्षित भावनेपेक्षा, घराबाहेर पडून निसर्गातुन मिळणारी बिंधास्तपणाची, आहे त्या परिस्थितीत स्वतः:ला acclimatize करायला लावणारी... फुल्ल ऑफ सरप्राइझेस असणारी, हुरहूर लावणारी असुरक्षितता आवडते मला. थोडं बेधडक व्हायला काय हरकत आहे, थोडी रिस्क हरकत आहे? फक्त आलेल्या प्रश्नांना, समस्यांना सामोरं जायची तयारी हवी. थोडं आवडीचं, थोडं नावडीचं सगळं सगळं अनुभवता यायला हवं. तुडुंब काय रोजच जेवतो, कधीतरी उपाशी राहिल्यावर पोटात कशी गुडगुड होते, कसं वाटतं? गाडीतून नेहमीच फिरतो, पायी फिरताना छोटे मोठे खडे टोचल्यावर, जमिनीच्या खाचा खळग्यातून , उंचवट्यावरून चालताना ठेच लागल्यावर कसं वाटतं? डोंगर, दऱ्या, पाऊस, वारा, ऊन, सावली, घाम, चिकट कपडे, धूळ या सगळ्या सगळ्यां मध्ये भरून राहता आलं पाहिजे. चेहेऱ्यावर वाऱ्याची झुळूक घेताना ती डोंगर माथ्यावर वेगळा आणि समुद्र किनारी वेगळा अनुभव देते, यातला फरक शोधता यायला हवा. अनुभव डोळे मिटून घेतला तर काय सांगावं? समुद्र किनारी वाळूत फतकल मारून बसणं आणि मावळणाऱ्या सूर्याला बघत राहणं हा अनुभव शब्दात सांगणं निव्वळ अशक्य! ते एखाद्याला जबरदस्ती शेजारी बसवून अनुभवायला लावणं म्हणजे मूर्खपणा ठरेल! हे पुण्य ज्याचं त्यांनीच कमवावं.

पाणी म्हणजे नदी, समुद्र, जलाशय, तलाव, धबधबा अगदी स्विमिंग पूल सुध्दा! या सगळ्यांचं आणि माझं नातं तेवढंच गहिरं आहे, जेवढं माझं आणि डोंगर दऱ्यांचं, झाडांचं. त्यात मी कुठेही भेदभाव करत नाही. मी करणारा प्रत्येक प्रवास हा समुद्राकडे नेणारा किंवा कुठेही जाणारा पण डोंगर दऱ्या झाडाझाडातून नेणारा आवडतो. हायवेवरून सुसाट जाण्यापेक्षा मला वळणावळणांचा घाट रस्ता जास्त सुखावतो! दिसणारा प्रत्येक डोंगर भराभर चढून जावा आणि त्याच्या डोक्यावर ऊभं राहून बघावं! कसं दिसत असेल सगळं त्याच्या नजरेतून? तिथे एकदा का माथ्यावर पोहोचला कि वाटतं, आपण, आपली दुःख, सुखं, निवारा, रुटीन, पोटाची खळगी भरण्याची आपण आखून साधनं, बंध, पाश, नाती, गरजा सगळं सगळं किती खुज आहे या निसर्गापुढे! तो सगळ्यांनाच समानतेनं वागवतो, त्याला फरक नाही पडत कि तुम्ही BMW मधून ब्रँडेड ट्रेकिंगचे कपडे घालून, फोटोग्राफी/ ट्रेकिंग करायला आला आहात कि आखूड धोतर घालून मेंढपाळ म्हणून मेंढ्या चरायला घेऊन आलेला आहेत. तुम्ही कोणीही असला तुम्हालाल तो आहे तसाच भेटतो, कुठेच दुजाभाव नाही. त्याला तुम्ही VIP पास घेऊन नाही भेऊं शकत आणि ना ही तो तुम्हाला तसं वागवू शकतो. एखाद्या प्रेमळ बापासारखा तो तुम्हाला कुशीत घेतो, ओंजारतो गोंजारतो, दुखलं खुपलं विचारतो, आणि फक्त "मी आहे" एवढा दिलासा देणारा हात आपल्या डोक्यावर ठेवतो. आपल्यासाठी कोणीतरी आहे, ही कल्पनाच केवढी शक्ती देणारी आहे. आत्मभान देणारा असतो हा प्रवास! फक्त डोळे उघडे ठेऊन तुम्हाला ते घेता आलं पाहिजे. प्रवासात नजर बाहेर पाहिजे, ते चिप्सच्या पाकिटात गुरफटली कि आपण काय मिस करत आहोत हे सुद्धा भान राहणं अशक्य! आपण आपल्याला घट्ट मिठी मारल्याचा हा अनुभव आपल्याला घेताच आला पाहिजे असा आग्रह नाही माझा पण, करून बघा तर खरं! हरकत काय आहे?

आपण का नाही वागू शकत निसर्गासारखं? का नाही प्रत्येक व्यक्तीला स्वीकारू शकत? अदगी ती आहे तशीच्या तशी.. कोणत्याही बदलाशिवाय! का आपल्याला फक्त व्यक्ती, गोष्टी, परिस्थिती मधले दोषच किंवा कमतरता दिसते? त्यातले जे काही गुण आहेत ते नाही दिसू शकत? का नजर फक्त एखादी गोष्ट किंवा व्यक्तीला परफेक्ट बनवायच्या मागे असते? या सगळ्या गडबडीत आपण मनमोकळेपणानी कौतुक करणं विसरत चाललो आहोत. कॉफीचा पहिला घोट घेतला कि तोंड घाण! साखरच कमी आहे, एखादं पेन्टिंग पाहिलं, डोळे एवढे काही छान नाही वाटतं, कविता ऐकली कि छे शब्द जुळलेच नाहीयेत नीट, सिनेमा पाहिला ...त्यात दोष ..... मान्य आहे काहीतरी उणीव असेल त्यात पण त्या व्यक्तीची व्यक्त होण्याची ती पद्धत असेल हे मान्यच नाही आपल्याला! सगळं कसं एकदम परफेक्ट हवं. .... ! तुम्हाला नाही पटलं म्हणजे ती गोष्ट टाकाऊ आहे आणि त्यामागे असलेल्या व्यक्तीचे प्रयत्न, कष्ट , कला सगळ्याचा आपण किती मोठा हिरमोड करत असतो याचं आपल्याला बरेचदा घेणंदेणंही नसतं. जेव्हा आपण मोठ्या पण अस्तित्वात नसणाऱ्या गोष्टींपेक्षा, छोट्या छोट्या "अस्तित्वात असणाऱ्या" गोष्टीनां दाद द्यायला शिकू तेव्हा कदाचित या निसर्गाकडून आपण एकमेकांना आहे तसं स्वीकारायला शिकू. हे शिकणं हा पण एक प्रवासच आहे. जसं एखाद्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचणं आनंददायक असतं, तसाच हा प्रवास पण मला तेवढाच आवडतो. प्रत्येक प्रवासात येणारे नवीन अनुभव, नवीन लोक, जागा, खाणं, अगदी पिण्याचं पाणीसुद्धा... या सगळ्यांशी जोडण्याचा माझा प्रयत्न नेहमीच असतो. मुद्दाम अगदी ठराविक रूट घेऊन त्याच रस्त्यानी जायचं असा आग्रह मी धरत नाही. दहा ठिकाणी पत्ता विचारण्याच्या बहाण्यानी दहा नवीन गोष्टी कळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सकाळच्या वेळी एखाद्या चहाच्या टपरीवर माकडटोपी घालून बसलेल्या मामांना रस्ता विचारला कि अजून दहा गोष्टी ते आणि त्यांच्या मामी आपुलकीनी सांगतात. गाडीत लहान मुलं असतील तर मग तर काय विचारायलाच नको. नाव विचारण्यापासून ते चार कौतुक शब्द ते थेट एखादं चॉकलेट किंवा एखाद्या बिस्कीट पुडा सुद्धा पोरांच्या हातावर ठेवणार. हे लोक नक्कीच असं काहीतरी करू शकतात. अगदी आपली लेकचं नातवंडांना घेऊन चालल्यासारखा concern दाखवू शकतात. काही लोकांना हा भोचकपणा वाटू शकतो पण, ही माणुसकी गावातले लोक अजून जपून आहेत आणि आपण? न बोललेलंच बरं! या सगळ्याच्या बदल्यात अपेक्षा काहीच नाही, आयुष्यात परत भेट होईल नाही होईल माहित नाही पण, तरी करणार. ती भावना आतून आलेली असते, अगदी निरागस आणि निष्पाप ! कधी कधी आपल्यासारखी सुखवस्तू लोकं सुद्धा एखादी गोष्ट देताना दहादा विचार करतील. शेवटी ऐपत असेल तरी दानत असेल कि याची खात्री देता येणार नाही. अश्या ठिकाणी अजून लहान मुलं खेळत असतील तर माझी लेकही तिच्या खाऊ मधला एक पुडा अगदी न सांगता त्या मुलांना काढून देणार म्हणजे देणार!कधीच तिला सांगायची वेळ येत नाही. वय वर्ष ४! ही संवेदनशीलता पण नकळत घडणाऱ्या अनेक चांगल्या संस्कारांपैकी एक! अभिमान वाटतो मला अशा वेळेस. कोणत्याही माणसाशी कनेकट होणं आणि ते उत्तम जमणं हा पण फार मोठा गुण आहे.

हर्णे बंदरावर मासे आणायला जाणं हा माझा आवडता उद्योग आहे. शेकड्यानं कोळीणी तिकडे येऊन मासे विकतात, खर्या अर्थानं मासळी बाजार भरतो तिकडे. माझ्यासारख्या मासेखाऊसाठी ती मोठी पर्वणी असते. अश्या ठिकाणी छान कपडे, गॉगल घालून गेल्यानंतरही, ठराविक घासाघीस करून हवे ते मासे विकत घेणं, घराच्या, इकडच्या तिकडच्या गप्पा मारत त्या कोळीणीसोबतही मी तासभर आरामात गप्पा मारू शकते. त्या कोळीणीनी माझ्या लेकीच्या चेहेऱ्यावरून हात ओवाळून कानशिलावर मोडलेली बोटं , फार मोठी शाबासकीची थाप वाटते मला. एखाद्याला वाटेल, त्या रबरबाटात, माश्यांच्या घमघमाटात, त्या कर्कश, रुक्ष कोळिणींमध्ये हि बाई टाळ्याबिळ्या देत काय एवढ्या गप्पा मारतेय? लोक त्या वासाला घाबरून, नाकं दाबून फिरताहेत. त्यांच्याकडून वास लागलेली न येऊ नये म्हणून नेमके पैसे देताना मी अनेकदा लोकांना पाहिलय. ज्या ठिकाणी आलो आहोत त्या ठिकाणचं आपल्याला दोन दिवसही होता येऊ नये? यासारखं दुर्दैव ते काय? आपला रुटीन, आपला कम्फर्ट घेऊनच फिरायचं असेल तर मग घरालाच दोन फेऱ्या माराव्या आणि परत घरात जाऊन बसावं. असेच लोक बहुदा पॅरिसमध्ये जाऊन आम्ही आयफेल टॉवर जवळ गरम पुरणपोळी आणि तूप कसं खाल्लं याचे किस्से रसभरीत वर्णन करून सांगत असतात. अश्या लोकांनी टुरिस्टच व्हावं, स्वतः:ला ट्रॅव्हलर म्हणवून घेऊ नये.

अनुभवातून प्रगल्भ होण्यासाठी आयुष्यात मला एकदा तरी एकटं भटकायचंय. ठिकठिकाणी निवांत वेळ घालवायच, तिथेच कामही करायचंय. त्या त्या भागातलं आयुष्य अगदी ग्रास रूटला जाऊन जगायचंय. कधी ट्रेन, कधी बस, कधी कार, तर कधी पायी जस, जेव्हा, जेवढं जमेल तेवढं फिरायचं. खूप वेळ द्यायचाय आयुष्य "जगायला". दोन तीन जोड कपडे, कॅनवास, रंग, कॅमेरा, डायरी, पेन, स्लिपर्स एवढं सामान घ्यावं आणि निघावं भटकंतीला. आयुष्य एक खराखुरा प्रवासी म्हणून जगावं. कदाचित हा शोध किंवा हा प्रवास एका ठराविक ठिकाणी पोहोचण्यासाठी किंवा सेटल होण्यासाठी नसेलच. हे सततचं पुढे पुढे जात राहणं, रोज स्वतः:ला नव्याने शोधात राहणं ही पण आयुष्य जगण्याची निराळी रीतच तर नसेल?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नक्कि जमेल!!
सध्या मुलगी लहान आहे म्हणून जरा लिमिटेशन येतं, पण तुका म्हणे... जसं जमेल तसं..... असे निराळे अनुभव इथे लिहिण्याचा मानस आहे... !! प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

छान लिहिलंय.
खरंच मलाही आवडेल असं जगायला!