अस्पर्श हिमाचल - भाग २

Submitted by वर्षू. on 7 April, 2017 - 05:04

अस्पर्श हिमाचल - भाग १ http://www.maayboli.com/node/62270

दुसर्‍या आठवड्यात एका हिमाचली मित्राच्या लग्नाचं आग्रहाचं आमंत्रण होतं. ते कोण्या एका दूरवरच्या खेड्यात होतं.

हिमाचल ला येऊन इथल्या लोकांमधे मिसळून त्यांचे जीवन जवळून बघण्याची खूप इच्छा होती. ती संधी या आमंत्रणा मुळे आयतीच चालून आलेली होती. ज्याचं लग्न होतं तो किशोरी, त्याचे मित्र, चुलत भावंडं सगळ्यांना आम्ही ही पूर्वीपासून ओळखत होतोच .

आठवड्याची तयारी बॅगेत भरून टॅक्सी ने शिलीबागी या खेड्या ला जायला निघालो. पण तिथे डायरेक्ट न जाता वाटेतल्या दोनेक खेडेगांवात थांबून तिथे राहणार्‍या पोरां ना भेटायचे होते.वीसेक वर्षांनी आमची पुनर्भेट होणार होती. आणी तेंव्हाची २०, २२ वर्षांची पोरे आता कशी दिसत असतील याबद्दल आम्हालाही खूप उत्सुकता होती.

कुल्लू हून दहा वाजता निघून दोन तासांनी पंडोह या गावात जेवणाकरता थांबलो. आलू पराठे ,मलका दाल ,राजमा
हे जेवण इथे खूपच लोकप्रिय आहे. मलका दाल म्हंजे मसूरीची लाल डाळ. संपूर्ण हिमाचलात तुरी ची डाळ आधिकांश लोकांनी ऐकली/ पाहिली ही नसते.
तिथून अडीच तासांनी दुनी च्या आतेबहिणी कडे बगसियाड खेडेगावी पोचलो. बहीण बगसियाड च्या बाहेर च्या बाजूला राहात होती. इथे येऊन खरा खुरा हिमाचल जाणवू लागला होता. समुद्र सपाटी पासून ७००० फूट उंच वसलेल्या या खेड्याला जायचा रस्ता जेमतेम एकावेळी एक गाडी जाऊ शकेल असा अरुंद आणी वरून खडबडीत होता.पण या रस्त्यावरून चक्क बसेस, मालवाहू ट्रक बिनदिक्कत जात येत होते. ते समोरून आल्यास त्यांना साईड द्यायला आमच्या गाडी चा चालक , गाडी रिवर्स मधे घेऊन एखाद्या किंचीत रुंदी जास्त असलेल्या वळणावर अंग चोरून उभे राहावे तशी उभी करीत असे. एकीकडे उंचचउंच पहाडी आणी दुसरी कडे , जिचा तळ ही दिसत नाही अशी देवदार वृक्षांनी गच्च भरलेली दरी, मधूनच दरीच्या खोलातून वाहणारी कुठलीशी नदी दिसत होती.

पुढच्या प्रवासात लक्षात आलं की हे असले रस्ते तर हिमाचला तील सिग्नेचर रस्ते आहेत.
दुनी च्या बहिणी चं घर डोंगराच्या टोकावर होतं. तेथून पुढे रस्ताच संपला होता.यांना दोनेक किलोमीटर खाली , वेडी वाकडी वळणं असलेली कच्ची पायवाट उतरून गेल्यावरच सर्वात जवळ च्या शेजार्‍याकडे जाता येते. रात्री बेरात्री, पावसा पाण्याचं कोणाची तब्येत बिघडली तर काय करत असतील ही लोकं असा विचार आमच्या शहरी डोक्यात आल्यावाचून राहिला नाही. चिमुकली चक्षु च रोजचे दोन तीन किलोमीटर चे अंतर
उतरून शाळेत जाते. संपूर्ण हिवाळ्याचे दिवस हे लोकं घरी बसून काढतात. कारण इतका बर्फ पडतो कि बाहेर जाण्याचे सर्वच मार्ग खुंटलेले असतात.
पुढे ज्या खेड्यांना आम्ही भेट दिली तिथे ही हिवाळ्यात हाच प्रकार असतो असे कळले. वरून बर्फाचा जोरदार मारा झाला ( आणी तो होतोच) कि वीजेच्या तारा, खांब , बर्फाच्या ओझ्यामुळे उन्मळून पडतात, मग दोन दोन महिने तिथला वीज पुरवठा ही ठप्प होतो.
या कारणामुळे प्रत्येक खेड्यातील प्रत्येक घरात सर्पणाचा साठा वर्षभर पुरेल इतका भरून ठेवलेला असतो.आताशी बर्‍यापैकी सधन असलेल्या शेतकर्‍यांकडे गॅस चा सिलेंडर आलाय पण लाकडाशिवाय त्यांच्या चुली अधुर्‍याच .

पायवाटे सारख्या रस्त्यावर धापा टाकत गाडी कशी बशी वर चढली पण थेट घरापर्यन्त चढायला पायच लागत होते. पण तिच्या घराच्या मोकळ्या , खुल्या गॅलरीवजा व्हरांड्यात पोचलो मात्र समोर पसरलेला निसर्ग पाहून डोळे , मन तृप्त झाले.
समोरच्या डोंगरा च्या उतारावर नजर जाईल तिथपर्यन्त बहिणी च्या मालकी च्या सफरचंदा च्या बागाच बागा दिसत होत्या. सगळी झाडं पांढर्‍या शुभ्र फुलांनी डंवरून गेली होती, हिरवं पान नावाला सुद्धा शिल्लक नव्हतं. आकस्मिक पडणार्‍या गारांपासून बचाव करण्याकरता सर्व झाडांवर प्लास्टिक ची आवरणे लावण्यात आली होती.
हे प्रकरण बरंच महागडंये असं समजलं. लहान सहान शेतकर्‍यांना ही प्लास्टिक आवरणं परवडणारी नसतात त्यामुळे त्यांना फक्त निसर्गा च्या कृपेचाच आधार असतो.
दुनी च्या बहिणी आणी मेहुण्याने खूप अगत्याने आणी हसतमुखाने आमचे स्वागत केले. चहापानाबरोबर बिस्किटं, फळं आणी मुगभज्यांसारखी भजी पेश केली. थोडं खाऊन, स्वर्गीय चहा पिऊन, मी , त्यांचे आणी त्यांच्या अगदी युरोपिअन वाटणार्‍या चार वर्षा च्या गोडुल्या पोरी चे ,'चक्षु' चे भरपूर फोटो काढले.
आता पुन्हा डोंगरावरून जवळ जवळ घसरत, खड्डे, दगड गोट्यांवरून खडबडत खालच्या रस्त्याला लागलो. आता बगसियाड खेड्या च्या आत जायचे होते.
बगसियाड , अगदीच चिमुकलं खेडं, चार,पाचशे लोकवस्तीचं, पण खेड्याच्या चारही बाजूला पसरलेल्या
डोंगरावर ही पुष्कळ घरं दिसत होती, ती ही एकमेकांपासून लांब लांब विखुरलेली. मधे सफरचंदा च्या बागा , हॉर्टी कल्चर तंत्रज्ञान वापरून तयार केलेली शेती दिसत होती. या ग्रीन हाऊसेस मधून मोठ्या प्रमाणात फुलांचे, मशरूम्स चे पीक घेण्यात इथला शिकलेला तरूण वर्ग आघाडीवर दिसला. येथील शिकलेल्या तरुणांना आपल्या शेतात ,मजुरांबरोबर काम करण्यात अजिबात कमीपणा वाटत नाही. येथील बँके चा मॅनेजर असलेला ,' राजा' आमच्या जुन्या ओळखीतला. त्यानेच आधीपासून बुकिंग करून ठेवलेल्या सरकारी
गेस्ट हाऊस मधे आम्हाला ड्रायवर ने सोडले. इथे हरियाणा सी एम करता राखून ठेवण्यात आलेल्या दोन खोल्यांपैकी एक आम्हाला देण्यात आली, तर प्रकाश ची व्यवस्था पहिल्या मजल्यावर करण्यात आली.
चहा, नाश्ता, जेवण बनवण्याकरता खानसामा होता पण तो सुट्टीवर होता. आम्हाला नुस्ता चहा करून देणारा कर्मचारी ,टिपिकली आळशी आणी कामचोर होता. थोड्या वेळाने राजा आणी त्याचे इतर लोकल मित्र आम्हाला भेटायला आले. इथे येताना बरोबर शिधासामुग्री घेऊन आले कारण इतक्यात कुणी वीआयपी येणार नसल्याने इथे काहीच तयारी नव्हती. थोड्याच वेळात राजा बरोबर आलेले सर्वच तरूण लगबगीने स्वैपाक बनवण्याच्या कामात गुंतले. थोड्याच वेळात त्यांनी स्वादिष्ट मटन, दाल, भात, पोळ्या, सलाद , बटाट्या ची भाजी बनवली.

पोटभर जेवण आणी दिवसभराच्या प्रवासा चा शीण , पटकन झोप लागली सुद्धा.

दुसर्‍या दिवशी सकाळी ९ वाजता चहा नाश्ता आटपून , बगसियाडहून आणखी वर हजार फुट रस्ता चढून ,' काला कमलेश्वर' मंदिरात जायला निघालो. रस्ता नेहमीसारखाच खडबडित आणी अरुंद होता. त्यावरून आमची छोटी शी आल्टो टुकूटुकू चढत होती. काही ठिकाणी चढ आणी उतार भलतेच धारदार होते. तितक्यात त्या देवळातील देवी ची पालखी येतांना दिसली. राजा म्हणाला हा फारच शुभशकुन आहे , तुम्हाला भेटायला देवी अर्धा रस्ता पार करून आलीये. वाजत गाजत ,पालखी घेऊन लोकं, नवीन नियुक्त झालेल्या पुजार्‍या च्या घरी खाली गावात चालले होते. तिथे पोचल्यावर पुजार्‍याच्या अंगणात बकर्‍यांचा बळी दिला जाणार होता आणी नंतर गावजेवण होतं.

देवीचं , गाडीतूनच दर्शन घेऊन आम्ही वर देवळात पोचलो. देवी चा गाभारा आता रिकामा होता. मागच्या बाजूला कोंबड्यांचा बळी दिलेला दिसत होता. रक्ताचा सडा अजून तिथेच होता. देवळात गणपती ची अतिशय सुरेख , काळ्या पाषाणात घडवलेली मूर्ती होती. हाच काला कमलेश्वर असावा. देऊळ मात्र संपूर्ण लाकडी असून सबंध देवळात कोरीव काम केलेलं होतं. छत तोलून धरणारे खांब एकसंध लाकडांपासून बनवलेले होते. त्यांवर असतील नसतील तितक्या सर्व देवांच्या मूर्ती कोरलेल्या होत्या . त्या अतिशय सुंदर व रेखीव होत्या.

पुढच्या प्रवासात अनेकदा विभिन्न देवतांच्या पालख्या दृष्टीस पडल्या. त्या पाहून एकतर हिमाचली अत्यंत भाविक असावेत किंवा हे मनोरंजना चे अथवा हे सोशलायझिंग चे साधन असावे असे वाटले. इथे नेहमी च्या देवांच्या बरोबरीने अगणित ग्राम देवता आणी कुलदेवता आहेत. उगाच नाही हिमाचल चे दुसरे नांव ,' देवभूमी' आहे.

दुपारी जेऊन, राजा चा निरोप घेऊन अजून वर उंचावर स्थित असलेल्य\,' थूनाग" खेडेगावाचा रस्ता धरला. येथील रस्त्यांना ,' रस्ता' का म्हणायचं हे कोडंच पडलं होतं आता. सपाट , गुळगुळीत रस्ता जर चुकून माकून इथे दिसला असता तर आम्हीच त्या धक्क्याने पडण्याची शक्यता होती. इथे मिल्की या जुन्या मित्राला भेटायचं होतं .
राजा, मिल्की, दुनी आणी भेटलेले इतर तरूण ,ही सगळी शेतकरी कुटुंबातील पोरं. सधन नसली तरी खाऊन पिऊन सुखी. प्रत्येकाच्या घरी सफरचंद्,गहू,तांदूळ्,मका,भाज्या,बार्ली, बटाटा, क्वचित अंजीर्,अक्रोड इ. चं पीक येतं.
निसर्गाची कृपा झाली तर लहान प्रमाणात काही पीकं विकता ही येतात . घरी असलेल्या एखाद गाई मुळे दुधा तुपाची
त्यांच्यापुरती सोय ही होते.
हिमाचलात शैक्षणिक संस्थांचं पीक आल्यामुळे प्रत्येक खेड्यात शाळा आहे. ही सर्व मुलं शिकलेली आहेत. काही उच्च शिक्षणाकरता चंदीगढ, सिमला, सोलन इ. ठिकाणी जातात. आजची तरूण पीढी १००% शिक्षीत आहे असं म्हणंण अतिशयोक्तीचं ठरणार नाही. कंपनीत, बँकेत कार्यरत या सुशि़क्षित तरूणां ना शेतांत शारीरिक मेहनत करण्यात स्वारस्य उरले नाहीये.त्यांच्या घरच्या शेती ची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आईवडिलांवर आहे. सर्वांचे आई वडिल सकाळपासून संध्याकाळ पर्यंत शेतांत काबाडकष्ट करतात.
गेल्या दोन पिढ्यांपासून मुली ही शिक्षणात आघाडी वर आहेत.कमीतकमी ग्रॅजुएट होण्याकडे सर्वांचा कल दिसला.पण राहत्या खेड्यांतून बाहेर पडून नोकरी करणार्‍या मुलींची संख्या नगण्यच आहे. १८ वर्षाची मुलगी झाली कि लगेच तिचे लग्न करून टाकतात. जिचे ठरण्यास वेळ लागत असेल , ती लग्न होईस्तोवर शिकत बसते.
लग्न झाल्यावर जर नवरा दुसर्‍या गावात नोकरी करत असेल तर तिला शेती च्या कामांत हातभार लावायला इतर कुटुंबियांबरोबर सासरीच राहावे लागते. इथे एकत्र कुटुंब पद्धतीच प्रचलित आहे. लग्न झाल्यावर वेगळी चूल वगैरे
लाड इथे नाहीत.
पण एक गोष्ट मात्र खटकली इतकं शिक्षण झाल्यावरही येथील मुलांना हिमाचल सोडून इतर कोणत्याच प्रांतात जाऊन नोकरी करण्यात रस दिसला नाही. बाहेर पडण्याची इच्छा नसल्याने बाहेर च्या जगात काय चालले आहे या बाबतीत त्यांचे ज्ञान नगण्य आहे, साधं वर्तमान पत्र ही कुणी वाचत नाही, अवांतर वाचन तर सोडाच.
राजा बँकेत मॅनेजर च्या पोस्ट वर असला तरी तो राहत्या खेड्यापासून फार लांब जायला तयार नाही. गेल्या वर्षी त्याची २० वर्षांची तरूण मुलगी झाडावरून पडून प्राणाला मुकली . तर आता त्याची दुसरी मुलगी ग्रॅजुएट होऊन बी एड करून घरातच बसलीये. तिला राजा नोकरी करायला परवानगी देत नाहीच, पण लौकरात लौकर तिचं लग्न करू इच्छितो. ते ही राहत्या खेड्यातलाच जावई हवाय त्याला.
मिल्की च्या बायको ने डिप्रेशन मुळे सहा महिन्यांपूर्वी घरीच विष घेऊन आत्महत्या केली. थूनाग खेड्यात मिल्की हायस्कूल मधे अर्थशास्त्र शिकवतो. आता त्याच्या वर त्याची दहा वर्षांची पोर ,'प्रिया'आणी ८ वर्षाच्या मुलाचा सांभाळ करण्याची जबाबदारी येऊन पडलेली आहे. सकाळी स्वैपाक, धुणं, केरकचरा आटपून मुलांना शाळेत सोडून मग नोकरीवर जातो. मिल्की ला मुंबई ला भेटलो तेंव्हा हा गोरापान, लांब केस वाला पोरगा अंतोनिया बंदेरा या हॉलीवुड आर्टिस्ट सारखा दिसायचा. आता बिचारा दु:खाच्या ओझ्याखाली दबून गेलेला वाटला. तरी आम्हाला पाहून खूप आनंदला . मनभरून त्याच्याशी गप्पा केल्या.
आमच्याबरोबर भरपूर वेळ मिळावा म्हणून त्याने मुलांना त्याने वर्‍हाडाबरोबर लग्नघरी पाठवून दिले होते.

थूनाग खेड्याच्या वेशीवरच मिल्की आमची वाट पाहात उभा होता. मग आमच्यात गाडीत बसून आम्हाला खेड्यात घेऊन आला. हे बगसियाड पेक्षा जरासे मोठे खेडेगाव होतं. आम्ही येण्यापूर्वीच सगळ्या गावाला माहित झाले असावे.
बाजारभरातील लोकं आमच्याकडे कुतुहलाने पाहात उभे होते. बाजारात लायनीनी दागिन्यांची, कपड्यांची, शालींची दुकाने होती. खूप खरेदीविक्री चाललेली होती. तेथील एका बाकडीवजा लाकडी दुकानात चहा घेत आजूबाजू ला चाललेली घाईगर्दी टिपत होतो.
त्या दुकानात बसलेल्या दोन वृद्ध गिर्‍हाईकांनी आमची आपुलकीने चौकशी केली आणी शिकारी माते च्या देवळात जाऊन यायला सांगितले. आत्तापर्यन्त हे नाव आम्ही ऐकलेलंच नव्हतं त्यामुले उत्सुकतेने आम्ही अजून माहिती विचारत होतो. त्यावर इतर लोकांनी माहिती पुरवली कि १०,००० फुट उंचीवर असलेल्या या मंदिराकडे जाण्याचा रस्ता अजून खुला नाही झालाय. रस्त्यावर प्रचंड प्रमाणात अजूनही बर्फाचे थर आहेत. ते ऐकून थोडं हिरमुसायला झालं.

पण इलाज नव्हता. मिल्की ने आमच्या उतरण्याची सोय तेथील सरकारी गेस्ट हाऊस मधे करून ठेवलीच होती.
हे गेस्ट हाऊस ही अतिशय उत्तम अवस्थेत होतं . सभोवार तीच देवदारांची गर्द झाडं, चारी बाजूने बर्फाच्छादित शिखरांच्या पर्वत रांगा. येथील म्हातारा खानसामा अत्यंत अदबशीर आणी सेवातत्पर होता. इथे दुपारच्या जेवणात सॅलड, दाल, भात आणी लोणचं असा साधा पण चविष्ट बेत होता.
जेवण झाल्यावर जरी शिकारी माते च्या मंदिरात जाता येणार नव्हते पण कुठेतरी फिरायला न्यायचं म्हणून मिल्की आम्हाला सात हजार फूट उंचीवर असलेली जिंजैहली
दरी दाखवायला निघाला. तिथून निसर्ग अतिशय सुंदर दिसतो म्हणे. रस्ता अगदीच वाईट होता. भरमसाठ बर्फ पडून गेल्याने कल्पनेबाहेर खराब झाला होता. इतक्यात एक चमत्कार घडला. अर्ध्या रस्त्यावर पोचतो न पोचतो तो वरच्या भागातून येणार्‍या गाडीतील लोकांनी गाडी थांबवून आवर्जून सांगितले कि,' शिकारी माता का रस्ता खुल गया है, जाऊन अवश्य दर्शन करून या' हे ऐकताच आमची कळी खुलली. खूप आनंद झाला. इतक्या लांब ( कि वर?) येऊन या पौराणिक मंदिराला भेट द्यायची इच्छा पूर्ण होणार होती तर!! आमच्यापेक्षाही मिल्की ला जास्त आनंद झाला . त्याच्या मते ही ,' मातारानी की कृपा' च झाली होती आमच्यावर. शिकारी माते चं मंदिर १०,००० फुट उंचावर होतं. त्या अती खडबडित रस्त्यावरून वर चढताना खरोखरच तंतरली होती.जागोजागी साचलेला बर्फ आता वितळत होता त्यामुळे रस्ताभर चिखल झाला होता. पाचेक हजार फूट उंचीवर
आसपासचं सगळं दृष्य च बदलून गेलं पार. खिडकीतून उजवीकडे नुस्ती नजर खाली टाकली तर एका बाजूला हजारो फूट खोल दरी, देवदारांचे जंगल, आणी उतारावर साचलेला मैलोगणती बर्फ दिसत होता, तर डावी कडे सहा फुटा पेक्षा जास्त जाडी असलेली लांब ची लांब आणी उंच च उंच बर्फाची लादी दिसत होती. बर्फामुळे रस्ता बंद होता म्हंजे काय होता याचा अर्थ आम्हाला आता नीटच समजला होता.
शेवटी ज्या डोंगर माथ्यावर ही देवी विराजमान होती , त्या डोंगराच्या पायथ्याशी येऊन पोचलो. इथे गाडी तून उतरून , पुढचं ४०० मीटर चं अंतर, ५०० सरळसोट पायर्‍या चढून पार करायचं होतं.
नवर्‍याच्या पाठी ची झालेली सर्जरी आणी प्रकाश ला होणारा श्वासाचा त्रास ,त्यामुळे दोघांना ही शेवटची चढण, चढणं अशक्यप्राय होते. त्यांनी गाडीतच बसून राहण्याचा निर्णय घेतला.
मी, मिल्की आणी ड्रायवर असे तिघंच वर निघालो. त्यांना असले चढ उतार म्हंजे किस झाड की पत्ती. माझी मात्र
अर्ध्या वाटेत पोचेपर्यन्त दमछाक झाली होती. पण आता माघार घ्यायची नाही म्हणून जिद्दी ने चढतच राहीले. आजूबाजूला त्याच खोल दर्‍या दिसत होत्या. साचलेला बर्फ हाताशी आला होता. एका ढिगार्‍यात बोट खुपसून पाहिले , ते खोलवर गेले. आता बर्फ वितळायच्या मार्गावर असल्याने भुसभुशीत झाला होता.
शेवटच्या टप्प्यात पायर्‍या बांधण्याचा कंटाळा आला बहुतेक, तिथे नुस्ता उभा चढ होता. तो मात्र मिल्की चा आधार घेऊनच चढावा लागला. इथे सुसाट बर्फाळ वारा झोंबत होता. थंडीमुळे दात वाजत होते.
देवाकडे जायची वाट खरोखर कठीण असते अशी खात्रीच पटली. . मंदिराच्या प्रांगणात पोचले आणी तेथील स्वर्गीय दृष्य पाहून मंत्रमुग्ध होऊन दोन मिनिटं तशीच उभी राहिले.
चारही बाजूला अवाढव्य पसरलेले बर्फाचे डोंगर हे असे हाताशी, प्रांगणाच्या मधोमध असलेल्या दगडी चबुतर्‍या
वर स्थापन केलेल्या काळ्याभोर शिळेत कोरलेल्या गणेश आणी इतर देवांच्या मूर्त्या. मधोमध शिकारी मातेची दगडी मूर्ती आदिवासी कलेचा नमुना वाटत होती. चबुतर्‍याच्या भोवती तीनेक फुटी लाल निळ्या रंगाने रंगवलेली
भिंत, मधे घंटा लटकावलेले छोटेसे प्रवेश द्वार. बास इतकेच आहे हे बिन छपराचे, उघडेच देऊळ. या देवळावर पूर्वी छप्पर घालण्याचे अनेक वेळा प्रयत्न झालेत, पण दरवेळी घातलेल्या छपरावर वीज पडून ते नष्ट होते.

हे प्राचीन देऊळ, पांडवा च्या वेळचे आहे असे मानतात. नंतर च्या काळात , शिकारी या जंगलांमधे शिकार करायला आले क आधी या देवीला चांगली शिकार मिळावी म्हणून नवस बोलायचे . त्यावरूनच हिचे नांव शिकारी माता पडले.
या देवळा बद्दल अजूनही एक अनोखी गोष्ट समजली कि हिवाळ्यात आजूबाजूला अगदी दहा फुटी बर्फ वृष्टी झाली तरी या देवळावर कधीच बर्फ राहात नाही.
देवीचे दर्शन बाहेरूनच घ्यायचा नियम आहे. तिच्या गाभार्‍यात जाऊन तिला स्पर्श करण्याची अनुमती नाही.
देवळाबाहेर च्या उतारावर एखाद स्टॉल वाला नवसाच्या लाल चुनर्‍या, पूजेचे सामान विकत होता. बाजूला एका तंबूत
दगडी चुलीवर चहा उकळत होता. आजच नुकताच रस्ता खुला झाल्यामुळे भाविकांची गर्दी नव्हती. बर्फाळ, तुफान वार्‍या त, गोडमिट्टं ,गर्मागरम चहाचा ग्लास हातात धरून धन्य धन्य झालं.

आजूबाजूचे स्वर्गीय सौंदर्य डोळ्यात साठवून घेत परतीच्या मार्गाला लागलो. निसरडा उतार, उतरायला आधिकच कठीण वाटत होते. पण अंधार पडायच्या आत थूनाग ला परतायचे होते, म्हणून जरा भरभर उतरलो.
पुन्हा त्या प्राण कंठाशी आणणार्‍या रस्त्या वरून दोन तासा त थूनाग ला पोचलो.

रात्री ९ वाजता गरमागरम चपाती,भाजी खाऊन गुडूप झोपून गेलो.
दुसर्‍या दिवशी सकाळपासून गेस्ट हाऊस मधे लोकांची गडबड सुरु होती. गाड्यांची जा ये चालू होती. बी जे पी नेता जयराम, मीटींग करता येणार होतेसं समजलं. जयराम यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे च, हिमाचल मधे खेडोपाडी सुव्यवस्थित गेस्ट हाऊसेस बांधली गेलीयेत.
आज इथे गर्दी म्हणून खानसाम्या ने भराभरा आमचे जेवण करून आम्हाला खोलीतच सर्व केले. आम्हीही जेवण झाल्यावर लगेच ,'शिलीबागी' या खेड्यास जायला निघणार होतो. ज्याच्या लग्नाकरता आम्ही खास ही ट्रिप आखली होती, तो ,' किशोरी' , मिल्की च्या लहान भावाचाच मुलगा होता.

शिलीबागी कडे जायचा रस्ताही तसाच वळणा वळणांचा आणी खडबडीत !!!

शिलीबागी हे अत्यंत चिमुकले , जेमतेम चारपाचशे वस्ती असलेले ,खोल दरीत वसलेले खेडेगाव आहे. बहुतेक हिमाचला च्या नकाशात शोधून ही न सापडणारे. रस्त्या पासून जरा वरच्या भागात असलेल्य टेकडी वर बांधलेले हे गेस्ट हाऊस अगदीच यथातथा होते. तिथली व्यवस्था पाहणारा ही साजेसा च होता. अत्यंत आळशी वाटत होता. काही काम सांगितले कि त्याला लगेच तात्पुरते बहिरेपण ही येत होते.
इथे चहापाण्याची सुद्धा सोय दिसत नव्हती. खालच्या रस्त्यावरचे एकुलते एक दुकान फळ्या मारून बंद केलेले होते.
शेवटी मिल्की ने खोल दरीत असलेल्या त्याच्या घरी जाऊन ( हे लगीन घर ही होते.) दूध, चहा,साखर अश्या सर्व वस्तू आणल्या. चहा झाल्यावर आमची वरात लगीनघरी जायला निघालो. इथे गाडी बिडी तून जायचं काम नाही.खाली रस्त्यावर येऊन, सरळ सोट खाली जाणार्‍या पायवाटे वरून हळू हळू , सांभाळून जाऊ लागलो. कच्च्या रस्त्यावर कधी चढ तर कधी उतार लागत होते. गर्द देवदार आणी पाईन च्या दाट जंगलातून अगदी अरुंद वाटे वरून चालताना आपण कोणत्या तरी ट्रेकिंग ला आल्या सारखं वाटत होतं. दरीत दीडेक किलोमीटर अंतर उतरल्यावर मिल्की च्या मालकी चे सफरचंदा चे मळे लागले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला शुभ्र फुलांनी डंवरलेली सुमारे दोन तीनशे सफरचंदा ची झाडे दिमाखाने उभी होती. काही फुलांच्या जागी आलेल्या इतकुश्या सफरचंदांना हात लावून पाहिला. अजून खाली उतरलो तर बार्ली, गव्हा ची हिरवीगार शेते
कोवळी कणसे मिरवत होती. निसर्ग रूपी स्वर्ग आता दोन बोटे न उरता , हातातच आला होता.
इकडे तिकडे असलेल्या घरांतून राहात असलेले खेडूत आमच्याकडे बघत होते. सर्वांच्या चेहर्‍यावर मोकळे, नि:शंक
हास्य होते. १८९९ पासून वापरात असलेल्या काठखुनी शैलीत बांधलेली येथील घरं संपूर्ण लाकडीच होती. क्वचित एखादं दगडी भिंत असलेलं घर दिसलं. घरां च्या उतरत्या छपरांवर पाटी सारख्या पातळ , चपट्या, मजबूत दगडी स्लॅब्स टाकलेल्या होत्या. अश्या प्रकार ची छप्परे तीन चारशे वर्षं सहज टिकतात असं मिल्की ने सांगितले.
बोलत बोलत पोचलो लग्नघरी . घराचं प्रथम दर्शनच अचंभ्यात पाडणारे होते. नुसत्या लाकडी खांबांवर टेकलेलं लांबच लांब,इंग्रजी एल च्या आकारात बांधलेलं दोन मजली लाकडी घर. समोर बिना कुंपणाचं कच्चं अंगण. अंगणा च्या खडबडीत , तुटक्या किनारी. त्या किनार्‍यांवर उभे राहून पाहिले तर खाल च्या जमिनी च्या वेगवेगळ्या लेवल्स वर असणारी भाजी ची शेती. कडा नसलेल्या अंगणातून कोणी कोलमडले तर सहज ५,६ फूट खाली गडगडतच जाईल.
घराच्या खालच्या मजल्यावर आगगाडी च्या डब्यांसारख्या खोल्या. प्रत्येक खोलीला वेगळे दार . शेवटच्या खोली ला लागून लाकूडफाटा ठेवण्याची जागा. एका बाजूला वरच्या मजल्यावर जायला लाकडी जिना. जिन्यावरून वर गेलं कि
लांबचलांब , केवळ छत असलेली बाल्कनी . बाल्कनी ला ही कठडा नाहीच.ति च्या कडेने खालच्या प्रमाणेच ओळी ने खोल्या. या खोल्यांना मात्र प्रत्येकी आत आणी बाहेरच्या बाजूला अशी दोन दोन दारे होती. बाहेर् ची दारे बंद असली तरी आतल्या आत
एका खोली तून दुसर्‍या खोलीत जाता येत होते.

अंगणात मोठाल्या चार स्पीकर्स वर ढणाणा पंजाबी आणी हिमाचली संगीत चालू होतं. घरचे आणी गावातील पुरुष मंडळी लोकल दारू पिऊन तुफान नाचत होती. पण त्यांनाही त्या तुटक्या किनारी चा अंगणाचं भान असावं , पडलं बिडलं कुणी नाही. वरच्या बाल्कनीत लहान पोरं मजेत पाय लटकावून बसली होती. गावातील बायका गर्दी करून नाच बघत होत्या.
मी पटकिनी मिल्की च्या दुसर्‍या वहिनी शी आणी तिच्या ( ग्रॅजुएट ) सुनेशी गट्टी जमवली आणी त्यांचं घर आतून पाहण्याची हौस पुरी करून घेतली. वरच्या मजल्या वर च्या मधल्या खोलीत देवक बसवलेले होते. तिथे वराला नवीन कपडे आणी फेटा बांधून बसवले होते. कुणी त्याच्या हातावर मेहंदी काढत होती तर कुणी इतर महिलांना मेहंदी लावून देत होती. मग गावातील आणी नात्यातील एकेक बाई येऊन वराला लग्नाप्रित्यर्थ प्रेझेंट म्हणून द्यायची रक्कम देत होती. ही रक्कम इथे फुलांच्या किंवा जिलेटिन पेपर च्या फुलांपासून घरीच तयार केलेल्या हारांमधे गुंफून तो हार वराच्या गळ्यात घालायची पद्धत आहे.

अजून आतल्या भागातील एका अंधार्‍या खोलीत कोठीघर होते. या कोठीघरातून जाणार्‍या अतिशय अरूद जिन्यावरून मला स्वैपाक घरात नेण्यात आले. छप्पर आणी दुसर्‍या मजल्या च्या एका खोली च्या मधे स्थित जवळ जवळ वळचणीतलं ते स्वैपाक घर पाहून खूपच गम्मत वाटली.
इथली जमीन सारवलेली होती. मधोमध जमिनीमधे लहानसा चौकोनी, बैठा तंदूर पुरलेला होता.
बाजूला गॅस ची शेगडी ही होती. समोरच्या फडताळात दोन चार डबे होते.
या अनोख्या दुनिये ला कल्पनेत सामावून घेण्यात गुंग झाले होते , इतक्यात मिल्की च्या वहिनीने स्वतः विणलेला लोकरी डट्टू आणून प्रेमाने माझ्या डोक्यावर बांधला. हे पाहून भरून आलं अगदी मला.
प्रत्येक विवाहित हिमाचली स्त्री ला डोक्याला डट्टू बांधणे आवश्यक असते.

हिमाचलात , तीन तीन दिवस लग्नं चालतात. लग्नातली सर्व बारीक सारीक कामांपासून स्वैपाका पर्यंत गावातल्या
लोकांचा सहभाग असतो. शहरातील श्रीमंतां च्या मोठाल्या बंगल्यांत सोडून संपूर्ण हिमाचलात गडी किंवा कामवाली बाई दिसून आले नाहीत. इथे ही एका छोट्या खोलीत गावातील बायका मुली जमून , पाहुण्यांच्या स्वागता करता कागदी फुलांचे हार करत बसल्या होत्या.
आजचा मेहंदी चा कार्यक्रम आटपल्यावर , जेऊन खाऊन अंधार पडायच्या आत आम्ही वर गेस्ट हाऊस मधे पोचलो.
रात्री मिल्की, दुनी आणी गावातील दोन चार तरूण आमच्याकरता घरून गरम जेवण घेऊन आले. मटन, चवळी आणी फ्लॉवर ची भाजी, राजमा, पोळ्या . जेवण फार रुचकर होतं. इथल्या भाज्या, डाळींना भलताच स्वाद होता.
अंधारात ,बाहेर जाऊन दुनी आणी त्याचा मित्र आसपास असलेल्या पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोता मधून अखंड वाहणारे स्वच्छ, शुद्ध , थंडगार पाणी घेऊन आले. या प्रवासात असंख्य ठिकाणी डोंगरातून अविरत वाहणारे पाण्याचे स्त्रोत दिसले. हे असं उघड्यावरचं पाणी पिताना सुरुवातीला मन फारच शंकाग्रस्त झालं होतं. पण स्थानिकांनी या पाण्या च्या शुद्धते ची खात्रीच पटवून दिली आणी खरंच संपूर्ण प्रवासात, पोटाचा एकदाही काही त्रास झाला नाही.
इथे ८,१०,००० फुट उंचीवर वसलेल्या खेड्यांतून अजूनच उंचावरून येणारे नैसर्गिक पाणी ,सिंचन विभागाने ,पाईप्स मधून स्वच्छ करून, टाकी मधे न साठवता ,नळाद्वारे तर पोचवले आहेच, पण येथील डोंगरातून सतत वाहणार्‍या पाण्या करता कुंड बांधलेले आहेत. या पाण्याला शुद्धीकरणाची गरज पडत नाही. मात्र कुल्लू, मंडी आदि मोठ्या शहरात हा धोका कुणी पत्करत नाही.
आम्हाला खाऊपिऊ घालून, सगळी भांडी लक्ख घासून, पोरं गडद अंधारातच , झपझप दरी उतरून लग्नघरी
गेली सुद्धा.

दुसर्‍या दिवशी पहाटेच , वराकडली मंडळी , वधू च्या गावी जायला निघणार होती. वधू चे घर
अजून कित्येक किलोमीटर खोल दरीत होते. परती ची चढण लंबरेषेत होती. म्हंजे मान वर करून काटकोनात
चढायचं .. तीन तास तर उतरायलाच लागणार होते . मिल्की च्या सल्ल्यानुसार ही कठीण वाट आम्हाला झेपणारी नव्हती.
हे ऐकून आम्ही लग्नाला जायचा विचार रद्द केला. सकाळी आरामात चहा बरोबर उकडलेली अंडी खाऊन , सर्व सामान सुमान आवरून बसलो. ११ वाजता मिल्की, आम्हाला पुन्हा लगीन घरी घेऊन गेला. आज अंगणात अजूनच धूम होती. कानठळ्या बसवणार्‍या गाण्यांचा आवाज आजूबाजूच्या पाचपन्नास खेड्यांत सहज ऐकू यावा अशी सोय केलेली होती.
लग्न उरकल्यावर बरचंस वर्‍हाड परतलं होतं. संगीताच्या तालावर बायका , न पिता आणी पुरुष मंडळी तर्र होऊन नाचत होती.
अंगणाच्या मधोमध स्थानिक कलाकार मंडळी, हिमाचली टोपी व पेहराव करून ढोलकी,सनई,झांजा , सनई सारखे पण पुरुषभर लांब नळी असलेले आणी टोकाशी भला मोठा कर्णा असलेले कर्गाळ' इ. खास हिमाचली वाद्यवृंद घेऊन ,सरसावून बसले होते.

माझ्या हात कॅमेरा पाहून उपस्थित प्रत्येक पाहुण्याने त्यांचे फोटो काढायचा आग्रह केला. मी होकार देताच आपापल्या मुला,कुटंबाला , मित्रांना, नातेवाईकांना ओरडून गोळा करू लागले. . मी ही उत्साहाने त्या सर्वांचे भरपूर फोटो काढले. हे फोटो आपल्याला बघायला तरी मिळतील का कधी, या गोष्टी ची त्यांना अजिबात पर्वा नव्हती. हा विचार मनात येऊन मलाच हसू आलं.
इतक्यात मिल्की ची पोरगी,'प्रिया' आली. आणी तिने मला घट्ट मिठी मारली . जणू काही आमची फार पूर्वीपासूनची ओळख होती. तिने आल्या आल्या मला विचारलं,' आपको पता है नं मेरी मम्मी ने क्या किया?'.. मी पटकन विषय
बदलला आणी तिच्या शी इतर गप्पा मारायला सुरुवात केली. आई च्या अचानक, अश्या प्रकाराने निघून जाण्या ने दहा वर्षीय प्रिया च्या कोवळ्या चेहर्‍यावर अकाली प्रौढत्व आलं होतं. ती रातोरात अवखळपणा विसरून गंभीर आणी समजूतदार झाली होती. जितका वेळ आम्ही तिथे होतो, ती मला चिकटून होती.
माझी चिमुकली गाईड बनून मला हाताला धरून इकडे तिकडे फिरवत होती. घरा च्या खालच्या बाजूला गोठ्यात बांधलेल्या
गाई, बकरी ला नुकतेच झालेले कोकरू, बकरे कापायची जागा.. आज गावजेवण असल्याने सकाळीच पाच बकरे तिथे कापण्यात आले होते. आता मात्र जागा स्वच्छ केलेली होती.
अजून खाली उतरल्यावर मोकळ्या पण अरुंद , माती च्या खडबडीत अंगणात जुन्या चादरी, पोती, ताडपट्ट्या टाकून
धाम सुरु ही झाला होता. लग्नाच्या किंवा इतर धार्मिक उत्सवात आयोजित केलेल्या भोजन समारंभाला ,'धाम' म्हणतात. धाम चा स्वैपाक रांधण्याचे काम फक्त ब्राह्मणच करतात. शुद्ध तांब्यांच्या मोठाल्या भांड्यामधून बोकडा चे मांस, भात, राजमा, मुगाचे वरण शिजवलेले होते. गोड म्हणून गुलाब जाम होते.
पंगती च्या पंगती उठत होत्या. अंदाजे १२०० लोकं जेवायला होते. वाढणारे ,वेताच्या टोपल्यांमधून हातानेच पानांत भाताचे डोंगर वाढत होते.

इतक्यात खालच्या उतारावर उभारलेल्या आणी पताकांनी सजवलेल्या कमानी जवळ एकच गडबड सुरू झाली.
वर वधू घराजवळ येऊन पोचले होते. त्यांच्याबरोबर आलेल्या दोन्ही कडील मंडळी चे स्वागत त्यांच्या गळ्यात हार घालून करण्यात आले. दोन्ही कडच्या मामा, काका,भावांनी एकमेकांना मिठ्या मारून नवीन नात्याचे बंध घट्ट केले.

वरवधू अंगणात आल्यावर, वादकांनी सनई आणी इतर वाद्ये वाजवायला सुरुवात केली.इतक्यात ,'नाटी ' या स्थानिक नृत्या करता लोकांनी एकच गर्दी केली. मला ही आग्रह करून वरवधूच्या बाजूला उभे करण्यात आले. नाटी शिवाय वधू चा गृहप्रवेश अशक्यच!!
आम्ही सर्वांनी एकमेकांच्या कमरेत हात घालून अर्धवर्तुळात उभे राहून नाटी करायला सुरुवात केली. गायकाच्या तारस्वरात चाललेल्या गाण्या च्या संगतीत , इतर वाद्यांच्या ठेक्यावर इतरांची पावले तालबद्ध पडू लागली. मी ही अडखळत थोडावेळ साथ दिली. नवर्‍यामुला च्या म्हातार्‍या काकांनी मन लावून मला तालावर पावले टाकायला शिकवले. कालपर्यन्त साधी तोंडओळख ही नसणार्‍या माणसांनी आम्हाला त्यांच्यात इतक्या आपुलकीने सामावून घेतले ना, त्या सर्वांच्या प्रेमळ वागणुकीने, अगत्यशील आदरातिथ्याने , साध्याभोळ्या स्वभावाने
आम्ही भारावून गेलो होतो अगदी!!

लग्नाची गम्मत जम्मत पाहून , गेस्ट हाऊस मधे परतलो. सामान घेऊन गाडीतून निघालो. पुन्हा एकदा अगदी अनोळख्या प्रवासाकरता. आज दुनी च्या गावी ,' चेत' ला जायचे होते. आतापर्यंत आम्ही समुद्र सपाटी पासून ७,८००० फूट ऊंचीवर होतो, आज अजून वर जायचे होते.
बरोबर दुनी चे वडील, दोन चुलत भाऊ ही येणार असल्याने आज जरा मोठी वॅन केली होती. निघायला तसा उशीरच झाला होता. इथले रस्ते लक्षात घेता अंधार पडायच्या आत ठिकाणावर पोचू कि नाही अशी कुशंका मनात येत होती.
आणी तसेच झाले. अर्ध्या रस्त्यावर पोचता पोचता अंधार पडला. दर्‍याखोर्‍या, पहाड,पर्वत ,रस्ते काहीच दिसत नव्हते. हे कमी कि काय म्हणून थोड्याच वेळात तुफानी वार्‍याबरोबर करंगळी एव्हढ्या पावसाच्या धारा कोसळू लागल्या. एव्हढ्यात गाडी च्या टपावर खाड खाड आवाज करीत मोठाल्या गारा ही पडू लागल्या. निसर्गाच्या थैमानाचे वर्णन आतापर्यन्त पुस्तकांतून वाचलेले किंवा टीवी वर पाहिलेले होते. हे थैमान पाहून आमची बोबडी वळलेली होती. कुणीच कुणाशी बोलत नव्हते. . एरवी टॅक्सीज,वॅन्स, बसेस्, रस्त्याकाठच्या लहान देवळांतून ठार बहिर्‍या ला ही ऐकू जावे इतक्या जोरात लावलेली गाणी ऐकून वीट आला होता, पण आज वॅन मधे लावलेले संगीत धूम वाजत होते. न कळणारे ते ठणाणा सूर आज मनाला धीर देऊन जात होते. आपण जिवंत आहोत याची जाणीव करून देत होते बहुतेक!!!
जसजसे वर जात होतो ,तसतसे गाडी च्या हेड लाईट्स मधे एका बाजूला आणी समोर सलग पांढरी शुभ्र बर्फाची चादर पांघरून बसलेले डोंगर दिसत होते. मधेच वीज सरर्कन चमकली कि खालची पांढरीशुभ्र दरी ची झलक दिसत होती. आता बर्फ , रोमँटिक वगैरे मुळीच भासत नव्हता. याउलट लहानपणी पाहिलेल्या ड्रॅक्युला चे सिनेमे नको तेंव्हा आठवले मेले. तश्याच अंधारलेल्या रस्त्यांवरून मुसळधार पावसात वाट चुकून आम्ही सरळ ड्रॅक्युला च्या हवेली शी पोचतोय की काय असे वाटू लागले. कधी एकदा हा जीवघेणा रस्ता संपतोय असं झालेलं होतं. खाचा खळग्यांतून हळू हळू सरकत गाडी एकदाची एका गावात शिरली. हे खेडं, चेत नसून ,' चिउनि"
होतं. बर्फाचा तुफानी मारा झाल्यामुळे ड्रायवर ने अजून वरच्या चेत गावी जाण्याचा विचार बदलला होता. ,' अब बहुत बर्फ गिरा है वहाँपर, और रस्ता और भी खराब हो गया है', बरफ मे गाडी 'स्किट'' मारती है'
त्याने असे म्हटल्याबरोबर आमचे उरले सुरले अवसान गळालेच. उंचावरून मागे घसरत जाणारी वॅन कल्पना करूनच शहारे आले. नशिबाने चिउनी गावात दुनी च्या मामा चं घर होतं.
गावात पोचलो तर तुफान गार्‍यांच्या मार्‍यामुळे नेहमीप्रमाणे वीज गेलेली होती. चारही बाजूला अंधाराचं साम्राज्य अजूनच गडद झालं होतं. नशिबाने गारा पडायच्या थांबल्या होत्या पण पावसाचा जोर तसाच होता.
बिचारा दुनी पटकन उतरून अंधारात कुठेसा पळत गेला, येताना दोन मोठ्या छत्र्या घेऊन आला. आम्ही सर्व भिजत, कुडकुडत, टॉर्च च्या मिणमिणत्या प्रकाशात जिने चढून वर गेलो.
घराच्या दिवाणखान्यात आम्हाला बसवलं. तिथे टेबलावर ठेवलेले दोन इटुकले इमर्जंसी लाईट्स डोळे मिचकावत
आमच्याकडे पाहात होते. घर छान ऊबदार होतं. एका जागी बसून इतर घराचा काहीच अंदाज येत नव्हता.
रात्रीचे साडे आठ वाजलेले होते. दुनी च्या मामी ने आम्हाला लवंग, वेलदोडे आणी ओवा घालून तयार केलेला दुधाळ चहा दिला. तो पिऊन खूप बरं वाटलं. त्यांची झोपायची वेळ झाल्यामुळे दुनी ची आजी, मामी झोपायला आपापल्या खोलीत निघून गेल्या.
बायकांवर शेतीत दिवसभर राबण्यापासून , गाई गोठ्याची, लहान मुलांची आणी घरातील इतर कामांची बरीच जबाबदारी असते. त्यांच्या मेहनती ची जाणीव ठेवून इथला पुरुषवर्ग स्वैपाकाचे काम अतिशय आनंदाने अंगावर घेतो.
आता दुनी, त्याचे वडील, आणी चुलत भावंडं स्वैपाक करायच्या कामी लागले. उबे साठी स्वैपाक घरात
तंदूर पेटवून घेतला
..
गॅस च्या शेगडी वर पटापटा बटाट्या चा रस्सा आणी दाल मलका बनवली. बरोबर भात पोळ्या ही केल्या. त्यांचा उरक पाहून थक्क व्हायला झालं. तासाभरात आमच्यासमोर गरम जेवणाच्या थाळ्या आल्या.
जेवण झाल्यावर आम्हाला आमच्या खोल्या दाखवण्यात आल्या. चांगली ऐसपैस खोलीत ऐसपैस पलंग होता. स्वच्छ पांढरा शुभ्र पलंगपोस घातलेला होता. तशाच शुभ्र दोन जाडजूड रजया होत्या. त्या इतक्या जड होत्या कि दोन हातांनाही पेलवत नव्हत्या. पण रजईत शिरल्याबरोबर मिनिटाभरात अशी काही ऊब आली कि पटकन झोप लागली.

सकाळी उठलो तेंव्हा घराचं खरं रूप दिसलं . आम्हाला पहिल्या मजल्यावर खोली दिली होती , त्या मजल्यावर दिवाणखाना आणिक तीन खोल्या अजून होत्या. एक स्वैपाक घर होते. एकच स्नानघर आणी एकच शौचालय होते.
बाहेर वेगळ्या बेसिन वगैरेची सोय नव्हती. कुणी आंघोळी ला गेले असल्यास तो बाहेर येईस्तोवर हात धुवायला किंवा दात घासायला खोळंबाव लागतं.
प्रत्येक खोलीला दोन दारे होती. पैकी मागच्या दारातून मागच्या कॉमन बाल्कनीत जाता येत होतं. इथून खाली एक नदी वाहात होती,पण तिथे आसपास राहणार्‍यांनी इतका कचरा टाकला होता कि तिला नाल्याचे स्वरूप आले होते.
या घरात ही कुठेही कचरा टाकण्याकरता डबे नव्हतेच्,कोणत्याही प्रकारचा कचरा मागच्या बाल्कनीतून बिनदिक्कत खाली भिरकवत होते.

घराच्या पुढच्या अरुंद बाल्कनी रूपी पॅसेज मधे ओळीने चार खोल्या होत्या. या खोल्यांतून काल रात्री इतर पाहुण्यांची सोय करण्यात आली होती. पॅसेज च्या टोकाशी असलेल्या जिन्यावरून वर गेले कि दुसर्‍या मजल्यावर तसाच पॅसेज आणी तश्याच चार खोल्या होत्या. या खोल्या मात्र भाड्यावर दिलेल्या होत्या. तिसर्‍या मजल्यावर गच्ची होती. गच्चीवर पाण्याच्या टाक्या आणी सर्पण साठवण्याची खोली होती.

दुनी चे मामा चांगलेच गब्बर वाटले. ६०० लोकवस्ती असलेल्या या चिमुकल्या खेड्यात त्यांचे किराणा मालाचे भलेमोठे दुकान होते, शिवाय सफरचंदा चे मळे आणी गव्हाची शेते होती. संपूर्ण गावात हेच एक घर पक्के दिसत होते.
पुढच्या बाल्कनीतून काल रात्री निसर्गाने घातलेल्या थैमानाचा अंश दिसत होता. समोरच्या पर्वतांवर चा बर्फ अजून मोठ्या प्रमाणात शिल्लक होता, रस्त्यां वरच्या गारा मात्र सूर्याच्या कोवळ्या उन्हात वितळल्या होत्या. रस्त्यावरची अनाथ सफरचंदांची झाडे फुलांचा बहर गमवून बसली होती.
इतक्यात दुनी ची आई , खास आम्हाला भेटायला , चेत गावाहून तीन, चार तास पायी ,बर्फातून चालत येऊन पोचली होती. येताच मला घट्ट मिठी मारून तिने आपला आनंद व्यक्त केला.ती माझ्याकरता चांगले एक दीड किलोभर घरच्या गाई चे तूप घेऊन आली होती. खास हिमाचली टोन मधलं तिचं हिंदी कानाला गोड वाटत होतं. आम्ही खूप जुन्या मैत्रीणी असल्यासारख्या भरभरून बोलत राहिलो. तिच्याबरोबर मी गाव पाहायला म्हणून बाहेर पडले. खूपच छोटुसं खेडं होतं. रस्त्यात भेटणार्‍या प्रत्येक वयस्कर मनुष्याच्या पाया पडत होती दुनी ची आई. तिचा जन्मच इथला असल्याने सर्व लोकं ओळखीचेच होते.
इथे कुणीही वडीलधारी मंडळी दिसली कि लहानांनी त्यांच्या पाया पडण्याची पद्धतच आहे.
१५,२० मिनिटात चालत चालत खेड्या पासून जरा दूरवर आलो. इथे गावातील गरीब लोकांची मटर आणी इतर भाज्यांची लहान लहान शेतं होती. पण आता ती सर्व लहान बटाट्यांएव्हढ्या गारां च्या आवरणात झाकली गेली होती. कोवळ्या शेंगा, गारांच्या तीन साडेतीन इंच थराच्या ओझ्याने तुटून पडल्या होत्या. अख्ख्या उभ्या पिकाचं नुकसान झालं होतं. ते दृष्य पाहून फारच वाईट वाटलं. येथील गरिबांना यावर्षी उपासमार घडणार होती.

येथील निसर्गाच्या केव्हाही फिरणार्‍या वक्रदृष्टी ची इकडल्या लोकांना इतकी सवय आहे कि पिकं नष्ट झाली कि,' क्या होगा, अबकी भूखे मरेंगे और क्या' असं म्हणण्याचा आणी निसर्गा चा अन्याय स्वीकारण्याचा त्यांच्यात बेदरकारपणा आहे.

दुनी च्या आई ने एका रस्त्याच्या वळणावर नेऊन दूर उंचावर वसलेले चेत खेडं दाखवलं.
घराकडे परतताना ,चेत ला घेऊन जायला गाडीवाला येऊन थांबलेला दिसला. सर्व सामान घेऊन आणी जीव मुठीत धरून आम्ही गाडीत बसलो. पुन्हा तसाच प्रवास सुरु झाला. बर्फ वितळून रस्त्यावर चिखल झाला होता.नुसतेच सुटे दगट ,गोटे भरलेला हा खडकाळ रस्ता आतापर्यन्त अनुभवलेल्या रस्त्यांपैकी सर्वात वाईट होता. दुनी च्या आई वडलांचे मन मोडवेना म्हणून हा प्रवास करणं भागच होतं.
सुमारे तासाभराने त्याच्या घरी पोचलो. इथे ही लाकडी , दोन मजली घरं होती. घरांच्या समोर आणी मागच्या बाजूला
सफरचंदांच्या बागा व इतर शेती होती. अमाप नैसर्गिक सौंदर्य लाभलेले हे खेडेगाव आहे. बर्फाच्छादित पर्वत राजी ने
खेड्याच्या सभोवताली फेरच धरला आहे जणू. शुद्ध ,मोकळी हवा भरभरून येथून घेऊन जावसं वाटत होतं.
घरी स्वैपाक तयारच होता. आजूबाजूला घरं असलेले दुनी चे काका, चुलत भाऊ, त्यांच्या बायका सर्व भेटायला आले. पैकी एकांच्या घरी एक शौचालय घरा च्या अंगणात होते, म्हणून आमच्या राहण्याची सोय तिकडे करण्यात आली.
दिवसभर पायी फिरून खेडं पाहिलं. सूर्य लपायला आला तेंव्हा थंडी बरीच वाढली होती. वीज ही गेल्यामुळे लाकडी शेकोटी पेटवण्यात आली. राजमा, पोळ्या,भात खाऊन निमूटपणे झोपायला गेलो. पहिल्या मजल्यावर खोली दिल्याने सकाळ होईस्तो बाहेर आलो नाही. मिट्ट अंधारात कठडे नसलेल्या पॅसेज मधे कोणाला जायचं होतं!!!
सकाळी उठून भराभरा आवरलं. तरी दहा वाजलेच. दुनी च्या आई ने दाल मलका आणी ताजा भात बनवून तयार ठेवला होता. तो खाऊन कुल्लू ला जायच्या वाटेवर लागलो.
इकडल्या लोकां च्या निर्व्याज प्रेमाने ऊर भरून आला होता. गाडीत बसल्यावर निरोपाचे हात हलवताना पुन्हा कधी या सर्वांची भेट होईल का , या विचाराने , डोळे ही भरून आल्याची जाणीव झाली.
कुल्लू ला परत आल्यावर काही दिवस विश्राम केला. एका रविवारी प्रकाश च्या आग्रहावरून मनिकरण हॉट स्प्रिंग ला जायला निघालो. वाटेत ४२ किलोमीटर अंतरावर कासोल खेडं लागलं, अचानक इथे रस्त्या च्या दोन्ही बाजूला छोटेखानी कॅफेज, बार्स आणी चित्रविचित्र, तोकड्या कपड्यांची दुकानं दिसू लागली, मजा म्हंजे सर्व दुकानांवर इंग्लिश आणी हिब्रू भाषेतल्या पाट्या होत्या. छोटुकल्या बाजाराच्या चिंचोळ्या पट्टीत अस्त्याव्यस्त सोनेरी केस
असलेली डोकीचडोकी दिसू लागली. उत्सुकता वाढल्याने आम्ही तिथेच थांबून जेवण घ्यायचा निश्चय केला. तसंही राजमा, चवळ्या आणी मसूर डाळ खाऊन जर्रा कंटाळाच आला होता.
इथे कॅफेज मधे इजरायली, रशियन पदार्थ मिळत होते. दुनी च्या ओळखी च्या दुकानदारा ने
दिलेल्या माहितीप्रमाणे कासोल च्या सुरक्षित स्वर्गात, मोठ्या प्रमाणात इजरायली आणी रशिअन्स येण्यामागे येथील अस्पर्श निसर्गाचे आकर्षण तर आहेच ,त्याशिवाय अमली पदार्थांचा अबाधित प्रवाह , सेक्स ही कारणे ही मुख्य आहेत. इथे खूप मोठ्या प्रमाणात इजरायली, इटालिअन ,रशियन आणी नायजेरिअन माफिया कार्यरत आहे. यांच्यात आपसात सलोखा आहे . इथे ड्रग रिलेटेड गुन्हे ,हे लोकं घडू देत नाहीत. काही इजरायली लोकांनी इथल्या युवतींशी विवाह केलाय . हे लोकं अमली पदार्थांची शेती करतात. इथून अमली पदार्थ , छुप्या रीतीने गोव्यात आणी पुढे गोव्याहून इतर देशांत पाठवले जातात. स्थानिक लोक फळं, भाजी वगैरे लावतात आणी विकतात. पण तिथे ड्रग्स शोधत पोचणारे पर्यटक आणी माफिया यांच्यामधे कडी ची भूमिका बजावतात.
देवभूमी हिमाचलात, अपरिमित निसर्ग सौंदर्याने नटलेल्या, हिमाच्छादित डोंगराच्या पाहार्‍यात उन्मुक्त पणे वाहणार्‍या पार्वती नदीच्या कुशीत वसलेल्या या गावाला कुणीबरं हे गालबोट लावलं??
आता जास्त वेळ इथे थांबवेना. पटकन पुढे मनिकरण करता निघालो.

मनिकरण च्या गुरुद्वार्‍यात जाऊन थोडं शांत वाटलं. तेथील गरम , उकळत्या पाण्या च्या नैसर्गिक झर्‍यात माती च्या मडक्यांतून राजमा, भात, चणे , बटाटे मस्तपैकी शिजायला ठेवले होते. येथील रोजचा प्रसाद याच पद्धतीने शिजवला जातो. दर्शन करून लगेच कुल्लू ला घरी परतलो.
वाटेत पुन्हा कासोल गाव लागले, यावेळी मात्र त्याच्याकडे पाहावसंसुद्धा वाटलं नाही.

हिमाचलाच्या अस्पर्श भागांत फिरताना एक दीड महिना कसा संपला ते कळलं सुद्धा नाही.
हृदयात अगणित आठवणी आणी डोळ्यात अपूर्व निसर्ग दृष्यं भरून परतलो खरं , पण मन अजून तिथेच रेंगाळतंय. अजून खूप खूप पाहायचं राहून गेलंय.
पुन्हा एकदा तरी तिथे परतावं लागणारच आहे, तेही लौकरात लौकर !!!

या लिंक्स ओपन झाल्या तर अजून फोटो पाहू शकाल..

https://goo.gl/photos/K6CmsbhQfaefsHEX9

https://goo.gl/photos/PrdkfSVpzmVGDmrM7

समाप्त!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

खूप सुंदर अनुभव
आमच्या पर्यंत पोहोचवल्याबद्दल धन्यवाद.

धन्यवाद हर्पेन.. लिहिताना ऑलमोस्ट एपिकच झालंय जणू.. पण सर्व डीटेल्स लिहिताना हरवून गेल्याने झालं तसं .. Happy

यावर्षी अजून वेगळे अनुभव घ्यायला पुढच्याच आठवड्यात परत जात आहोत...हिमाचलाचं आतलं , खोल स्वरूप पाहायला.. अनुभवायला!!!

खुप सुंदर..
असेच सविस्तर लेखन हवे होते मला.. वाट बघायला लावलीस खरी.. पण त्याची भरपाई करुन टाकलीस !!!

आणि आता परत जातेस तर तेव्हाही असेच अनोखे जग आणि माणसे बघून ये आणि आम्हालाही असेच दर्शन घडव !

आणि आता परत जातेस तर तेव्हाही असेच अनोखे जग आणि माणसे बघून ये आणि आम्हालाही असेच दर्शन घडव ! =१

आणि एक सांगायचे राहिले म्हणजे (मला तरी) फोटो नाहीयेत हेच बरे वाटते आहे एका परीने Happy

@ हर्पेन.. तुमचे जी मेल अकाउंट असेल तर दिस्तील फोटो..इमेजेस लहान करून माबो वरची सुविधा वापरून अपलोड करण्याचा प्रयत्न करते

यावर्षी अजून वेगळे अनुभव घ्यायला पुढच्याच आठवड्यात परत जात आहोत >> तिथल पण साग्रसंगीत वर्णन पाहिजेच
फोटोंची उणीव भासली. खूप छान लिहिलं आहेस Happy

हो मी कॉमेंट टाकली आणि फोटो दिसायला लागले. मी कॉमेंट टाकली तेव्हा दिसत नव्हते
मागच्या भागात पण दुसरा भाग पाहिजे म्हटलं आणि लगेच दुसरा भाग दिसला तसच Wink
खूप मोठ्ठा भाग झालाय पण वाचताना मजा आली . तुला लिहिताना दमछाक झाली असेल ना ? म्हणजे असं वाटत Happy

क्या बात है... अफलातून सुंदर वर्णन .. हिमाचलच सौंदर्य आणि त्या भयानक रस्त्यां वरचा थरार अनुभवल्याचा फिल आला.

पुढल्या ट्रिप साठी शुभेच्छा!

ते लाल स्वेटर मधल सफरचंद कसलं गोड आहे.

किती मस्त लिहिलं आहे. मी तर तुझ्या बरोबर फिरत होते. अगदी drakula ची गाडी पण दिसली मला.

लिंक वर फोटो पाहते, लाल डट्टू बांधून नाचणारी वर्षु राणी गोड्डूली दिसतेय।

छान वर्णन केले आहे. मगाशी मोबाईलवरूनच वाचलेले, आता प्रतिसाद देतोय.
फोटो वेगळेच म्हणजे फोटोग्राफी स्किल दाखवायच्या भानगडीत न पडणारे अगदी जिवंत आलेत Happy

वर्षुताई, वर्णन अगदी ओघवते, चित्रदर्शी शैलीतले झाले आहे. हिमाचली लोकांची घरे, राहणी सगळं डोळ्यासमोर उभं राहात आहे. मस्त.

कसोलची माहिती वाचून आठवणी जाग्या झाल्या. युथ हॉस्टेलच्या 'सार पास' ह्या ट्रेकचा बेस कँप कसोलला असतो. मी त्या ट्रेकला गेले होते, तेव्हा त्या गावातल्या हिब्रू भाषेतल्या पाट्या, तिथे उपलब्ध असलेले फिरंगी खाद्यपदार्थ, बुलेट किंवा तत्सम मोटारसायकली भाड्याने देणारी दुकाने बघून खूप आश्चर्य वाटलं होतं. इस्रायेल कुठे आणि कसोल कुठे! कशी काय ही कनेक्शन्स तयार होत असतील कोण जाणे?

इस्रायली सरकारने तिथे 'छबाड हाऊस' सुरु केले आहे. इस्रायली मुलांचे समुपदेशन करून त्यांना मायदेशी पाठवण्यासाठी तिथे काम चालते, असे युथ हॉस्टेलच्या सरांनी सांगितले होते. कोणास ठाऊक काय ते?

मस्तच जमलेत गे दोन्ही भाग...
मला दिसताहेत फोटो.. मला मीपन तिकडे फिरत असल्याचा भास झाला वाचताना.. तुझे आणखी फटू बघायला आवडेल..
आधी लेखात दिलेल्या लिंक मधे बघते कुठले कुठले फटू आहे ते..

वाह खरोखर अस्पर्श हिमाचल , खुप मस्त व्हर्च्युअल सहल घडली. फोटोजही खुप आवडले.
खुप नशीबवान आहात इतका हिमाचलचा जवळुन अनुभव मिळाला तुम्हाला.

खुप नशीबवान आहात इतका हिमाचलचा जवळुन अनुभव मिळाला तुम्हाला. << +११ निसर्गाचा आणि तिथल्या लोकांचाही!
६ व्या फोटोत काय आहे?

खूप दिवसांनी माबो वर आले आणि भारी मेजवानी मिळाली,दोन्ही भाग अधाश्या सारखे वाचून काढले. लिखाण तर छान आहेच फोटो सुद्धा मस्त Happy

Pages