अस्पर्श हिमाचल - भाग १

Submitted by वर्षू. on 7 April, 2017 - 04:58

अस्पर्श हिमाचल भाग २ http://www.maayboli.com/node/62271

अस्पर्श हिमाचल

मागच्या वर्षी यंदाप्रमाणेच मार्च पासूनच मुंबई च्या आगामी उन्हाळ्याची झलक मिळायला सुरुवात झाली होती. त्यामुळे आम्ही दीड दोन महिने कुठल्यातरी थंड हवामान असलेल्या ठिकाणांच्या शोधात होतो. भारताच्या उत्तरेस काश्मीर सोडल्यास

काहीच पाहिले नव्हते. कुल्लू मनाली ऐकलेले होते, पण तिथे जायचा विचार फारच टिपिकल वाटत होता कारण
पर्यटकां चा सुळसुळाट असणारी ठिकाणं आम्ही नेहमीच टाळत आलोय.
मन अश्या कोंडीत सापडल्याने काही ठरता ठरत नव्हतं.

पण एक दिवस , हिमाचल ला वीसेक वर्षांपासून स्थायिक झालेल्या अगदी जवळच्या मित्राचा फोन आला.
बोलता बोलता त्याने आम्हाला त्याच्या घरी येऊन राहायचा अगदी आग्रहच केला शिवाय इतका दीर्घ काळ तिथे राहून ही
अजिबात कंटाळा येणार नाही , याबद्दल आमची खात्रीसुद्धा पटवून दिली.

या मित्राबद्दल थोडेसे काही. त्याचे नाव प्रकाश. मूळचा कोकणी पण मुंबईत राहून बँकेत नोकरी करणारा. आम्ही मुंबईत असताना त्याच्याशी इतर मित्रांमुळे ओळख झाली. पुढे ही ओळख , घट्ट मैत्रीत रुपांतरित झाली.
हा आजन्म ब्रह्मचारी दिलाने अतीशय उदार, अगदी अनोळखी लोकांवरही पटकन विश्वास टाकणारा, स्वतःचा विचार न करता नेहमी दुसर्‍यांना मदती करता सदैव सरसावणारा असा आहे. त्याचे पाकिट मारणार्‍या चोराबद्दल ही त्याला करुणा वाटते .राग्,लोभ्,मत्सर या गोष्टी त्याच्यापासून लांबच राहतात.

एकदा वडिलांच्या मालमत्ते वर संपूर्ण कब्जा मागणार्‍या सख्ख्या भावाच्या स्वार्थीपणा ला कंटाळून , भावाला आपलाही हिस्सा देऊन टाकून सरळ हिमाचल ची बदली मागून घेतली आणी तिथलाच झाला. कधी सिमला,मनाली तर कधी मंडी असं फिरत शेवटी कुल्लू ला स्थायिक झाला आणी तिथेच आपले निवृत्त जीवन शांत पणे जगत आहे.

या काळात त्याने पुष्कळसे स्थानिक मित्र जोडले. हे सगळे मित्र त्याच्यापेक्षा १२,१५ वर्षांनी लहानच आहेत.
त्यांना बाहेर ची दुनिया पाहायला मिळावी म्हणून त्यांना स्वखर्चाने मुंबई ला घेऊन येई. १९८० च्या दरम्यान आम्ही मुंबईतच राहात होतो. त्यामुळे प्रकाश बरोबर या तरुणांशी ही आमची चांगली ओळख झाली.
हे सर्व तरूण
आम्हाला हिमाचल मधे भेटले आणी ते अजून ही पूर्वी सारखेच साधे, भाबडे , अदबशीर आहेत हे पाहून भरून आलं
अगदी!!

तर अश्या प्रकाश च्या आग्रहावरून आम्ही कुल्लू ला जायचा बेत पक्का केला आणी १४ एप्रिल ला सकाळी सहा च्या विमानाने मुंबई हून दिल्ली ला येऊन पोचलो. इथे तीन तास थांबून धरमसाला ला जायच्या विमानात बसलो.
त्या फक्त दीड तासाच्या प्रवासात संपूर्ण नजाराच बदलून गेला. खाली हिमालयन श्रेणी ,त्यांची बर्फाच्छादित शिखरं पाहून मन प्रसन्न झालं.

कांगडाच्या चिंगुल्या, बैठ्या इमारतीवजा विमानतळावर उतरताना गम्मत वाटली. विमान ही चिमुकलेच होते म्हणा!! टूरिस्ट सीझन अजून सुरु न झाल्यामुळे विमानातही आम्ही दोघच पर्यटक होतो ,इतर सगळे तिथलेच रहिवासी दिसत होते.

विमानाला बाहेरून जोडण्यात आलेल्या तीन पायर्‍यांचा जिना उतरून पायीच एअर पोर्ट च्या आत गेलो. सामान ही लगेच आले. या विमानतळावर दिवसातून एक सकाळी आणी एक दुपारी अशी दोनच विमानं येत असल्याने शुकशुकाट होता.

बाहेर पडताच , प्रकाश ने पाठवलेला ड्रायवर 'लकी' ने आम्हाला लगेच ओळखले आणी हसतमुखाने आमचे स्वागत करत सामान उचलून गाडीत ठेवले. विमानतळा ला लागून ओळीने दुतर्फा दोन हातांच्या ओंजळीत मावू शकतील इतके मोठे गुलाब भरून लागलेले होते. इतक्या तेजस्वी रंगांची फुलं प्रथमच पाहात असल्याने लगेच क्लिकक्लिकाटाला सुरुवात केली.
ऐसपैस इनोवा मधून छान पैकी आरामदायक प्रवास सुरु झाला. आम्हाला धरमसाला ते कुल्लू पर्यंत असा लांबचा पल्ला गाठायला सहा तास लागले. डावी ,उजवी कडून , समोरून हिरवीगार पर्वत राजी खुणावत होती. त्यांच्या
बर्फाळ टोप्या भूल घालत होत्या. अगदी लहान लहान खेडी पटापट येऊन मागे पडत होती. इतक्या लहानश्या खेड्यांतून ही विद्या बालन की सोच पोचलेली दिसली. सर्वत्र सुलभ शौचालये नीट बांधलेली होती. त्यावर दिमाखाने .' अच्छी शोच वहाँ , शौचालय हो जहाँ' असे शब्द रंगवलेले होते . हिमाचली,' स' चा उच्चार ,'श' असा करत असल्याने जो शाब्दिक विनोद निर्माण झाला होता तो त्यांच्या गावी ही नव्हता.
लकी जम्मू हून गाडी चालवत आला होता. त्याला भूक लागली होती. पण आम्ही जेवल्या शिवाय तो जेवायला तयार नव्हता. शेवटी रस्त्या वरच्या एका बर्‍यापैकी रेस्टॉरेंट मधे गाडी थांबवून जेवण घेतले. तिथल्या किमती मुंबई च्या पंचतारांकित हॉटेल्स च्या तोडीच्या पाहून आश्चर्य वाटलं . खर्‍या टूरिस्ट सीझन मधे होणार्‍या उकळाउकळी ची
कल्पना आली.
धरमसाला हून मंडी या जराश्या मोठ्या शहरात पोचल्यावर लगेच जाणवले. समुद्र सपाटी हून ३४२५ फुटावर असले तरी रस्ते धूळ भरले होते, गाड्यां ची, लोकांची संख्या जास्त असल्याने हवेत प्रदूषण, उकाडा जाणवत होता.
आतापर्यन्त रस्ता चांगला आणी बर्‍यापैकी सरळ सोट होता. मंडी पासून कुल्लू पर्यन्त च्या रस्त्यावर इतकी लहान लहान वळणे होती कि बसल्याजागी आपल्या शरीराचे ,'ळ' अक्षरात रुपांतर होतेय कि काय असं वाटू लागलं.
मधेच एका उंचचउंच डोंगराच्या शिखरावर घरे दिसली. इतक्या उंचावर राहणार्‍या लोकांनी सामान वाहून न्यायला
त्यांच्या घरांपासून रस्त्यांपर्यन्त तारा बांधल्या होत्या. त्यांवर मोठमोठ्या , मजबूत टोपल्या ही बांधलेल्या होत्या.
त्या टोपल्यांत बसून हाताने पुली ओढत एका टोका पासून दुसर्‍या टोकापर्यन्त सहजपणे जा ये करत होते.
बिना विजेची उघडी केबल कारच जणू . दळण वळणाचे हे अजब साधन पाहून आम्ही नुस्ते गार पडलो.
मंडी पासून व्यास नदी , अखंड खळखळाट करत सोबत येऊ लागली.आत्ता नदीत पाणी अगदी कमीच होतं त्यामुळे नदीतील लहान सहान नाही तर चांगले शिळा, खडक रूपी पांढरे शुभ्र दगड दिसत होते.
लकी ने माहिती पुरवली कि जून २०१४ , मधे हैद्राबाद चे २४ इंजिनिअर विद्यार्थी याच जागी , धरणाचं पाणी
कोणतीही आगाऊ सूचना न देता अचानक सोडल्यामुळे केवळ दीड मिनिटात पाण्याच्या अजस्त्र लोंढ्यात वाहून गेले होते. .. आत्ता या क्षणी मात्र पाणी, शिळा अगदी निरुपद्रवी , शांत वाटत होत्या. पण आता त्यांच्याकडे पाहून एक प्रकारची अनामिक भीती दाटून आली होती.

कुणी अक्षरशः त्या राक्षसी शिळांवर आपटले तर कुणी मोठाल्या दगडांखाली चिरडले गेले. महिन्याभरानंतर ज्यांची शरीरे आढळली, त्यांच्यात माश्यांनी घरं केलेली होती. या घटनेचे लकी ने स्वतः काढलेले फोटो त्याच्या
मोबाईल वर होते आणी तो आम्हाला ते दाखवू पाहात होता. सुन्न मनाने आम्ही त्याला नकार दिला.
जे ऐकूनच शहारे आले होते, ते फोटो अजिबात पाहावेसे वाटले नाहीत.
मनावर त्या दुर्दैवी घटने चे दगडासारखे ओझे घेऊन पुढे दोन तासाचा प्रवास केला आणी कुल्लू ला प्रकाश च्या घरी
येऊन पोचलो.

कुल्लू जिल्ह्याच्या बदाह खेडेगावात प्रकाश चं घर होतं. आजूबाजूला एक किराण्या मालाचं दुकान तर दोनेक लहान लहान भाजी, फळांची दुकानं होती. पण औषधं, लाँड्री , सिनेमाघर किंवा इतर खरेदी करता जवळच्या (?) अडीच किलोमीटर अंतरावर
असलेल्या ढालपुर शहरात जावे लागते. घरावरून जाणार्‍या कोणत्याही मिनीबसेस हात दाखवला कि थांबत , आत जितके लोकं मावतील तितके कोंबून , वळणदार अरुंद रस्त्यांवरून, रस्त्या पासून बर्‍याच खोलवर असलेल्या दरीतून वाहणार्‍या व्यास नदी बरोबर शर्यत करत सुसाट धावत जात.

प्रकाश चं घर, घर कसलं, चार मजली बंगलाच होता तो. घरमालक नेपाळ ला राहायला असतो. इथल्या इतर घरांप्रमाणे हे घर ही चार पातळ्यांमधे बांधलेले होते. रस्त्या वर असलेल्या लेवल च्या मुख्य प्रवेश द्वारातून आत शिरले कि आधी प्रशस्त गॅरेज लागतं, तिथे घरमालकाच्या दोन गाड्या ऐसपैस पणे पार्क केलेल्या होत्या. गॅरेज च्या लेवल ला एक गच्ची होती. त्या गच्चीतून सरळ पुढे गेले कि चार खोल्या, स्वैपाक घर , चार बाथरूम्स होत्या. यांना लागून या संपूर्ण भागाला कवेत घेणारी सर्क्युलर बाल्कनी होती. गॅरेज मधून एक एल आकाराचा
जिना खाली तळघराकडे जात होता. या भागातही वरच्या सारख्या खोल्या, हॉल, डायनिंग रूम ,तीन बाथरूम्स आणी स्वैपाक घर शिवाय मागच्या बाजूला एक भले मोठे अंगण , लाँड्री रूम इ. होते. या अंगणात आडू, सफरचंद, गुलाब आणी इतर फुलांची झाडं होती.
प्रत्येक खोलीचं दार अंगणात उघडत होतं त्यामुळे भरपूर प्रकाश , हवा पूर्ण घरात खेळत होती.
याचप्रकारे तिसर्‍या मजल्यावर च्या खोल्या आणी चौथ्या मजल्यावरची भली मोठी गच्चीघरमालकाच्या ताब्यात होती . पण आम्हाला संपूर्ण घरभर फिरायची मोकळीक होती.
सकाळच्या कोवळ्या थंडीत आणी कोवळ्या उन्हात अंगणात बसून हिमालयन बुलबुलांची चिव चिव ऐकत आणी इतर अनोळखी पक्ष्यांची भिरभिर पाहात , बसल्या जागेतून दिसणार्‍या खालच्या दरी तून अखंड वाहात असलेल्या व्यास नदीचा खळखळाट ऐकत लवंगा, वेलदोडे घालून केलेला गरमागरम चहा प्यायला मिळणे यासारखे सुख नव्हते. स्वर्ग अजून दुसरा असतो काय???

प्रकाश बरोबर राहणारा,'दुनी' हा प्रकाश ने जवळ जवळ दत्तकच घेतलेला हिमाचली पोरगा आहे. तो दहा बारा वर्षांचा असताना तो त्याला बरोबर घेऊन आमच्या जकार्ता च्या आणी चीन च्या घरी आला होता त्यामुळे दुनी शी आमची ही गट्टी जमलेली होतीच. दुनी आणी सर्वच हिमाचली पोरं स्वैपाक करण्यात पटाईत आहेत. सकाळी पटापटा स्वैपाक आवरून तो ढालपुर च्या युनिवर्सिटीत शिकायला जातो. यंदा त्याच्या ग्रॅजुएशन चे शेवटले वर्ष आहे. आम्ही त्याचबरोबर पहिल्यांदा ढालपुर ला मिनी बस ने गेलो. त्या साहसिक प्रवासानंतर आम्ही बरेच निर्ढावलो आणी नंतर नंतर एकटेच जावू लागलो. कोणत्याही देशात तेथील लोकल ट्रांसपोर्ट ने इकडे तिकडे फिरले कि तेथील सामान्य जनजीवन खूप चांगल्या रीतीने अनुभवता येते.
ढालपुर शहर शाळा , युनिवर्सिटी , बाजार, थिएटर या सर्व गोष्टीं मुळे गजबजलेले आहे. रस्त्या च्या कडेने खाली खाली जाणार्‍या बोळीवजा रस्त्या च्या दोन्ही बाजूला कपडे, भांडी, खेळणी इ. ची लहान लहान दुकानं दाटीवाटीने उभी होती. मधूनच तिबेटी मोमोज, थुप्का(नूडल्स सूप) ची बाकडी डोकावत होती. खाली उतरता उतरता परिचित खळखळाट कानावर पडला.. व्यास पाण्याने भरभरून घाई घाईने कुठेतरी निघाली होती. आजूबाजूला पडलेल्या मानवनिर्मीत कचर्‍यामुळे इथे तिचं रूप स्वर्गीय न वाटता शहरी दिसत होतं. तिच्यावर असलेल्या अरूंद पुलावर भाज्या, फळे विकायला होत्या. पण आत्ता सीझन नसल्याने निस्तेज वाटत होत्या. मधेच गाड्यांवर मोठाल्या परातींतून मसाला लावलेल्या माश्यांच्या तुकड्या, कसल्या तरी मसाल्यात घोळवून तळलेली अंडी झालच तर त्याच ठेल्यावर जिलेब्यां चे ढीग ही विकायला होते. तिथली स्वच्छता (?) पाहून काहीही विकत न घेता त्या गर्दीतून बाहेर पडलो.
एक मात्र गोष्ट इथली आवडलीच. संपूर्ण हिमाचलभर प्लॅस्टिक च्या पिशव्यांना बंदी आहे आणी हा नियम अगदी खेडोपाड्यांतूनही काटेकोरपणे पाळला जातो. अगदी धान्यापासून प्रत्येक वस्तू इथे कागदाच्या पुड्यांतून दिली जाते. जुन्या वह्या, कॅलेंडर्स, वर्तमान पत्रे सही सहीर्रिसायकल होतात. हातात प्लॅस्टिक ची पिशवी घेऊन फिरणे ही
दंडनीय अपराध आहे.

आता हळू हळू कुल्लू मधील आमचं कूल रूटीन सेट होत होतं. सकाळी फळांचा नाश्ता, दुपारी जेवण, झोप , संध्याकाळी जवळच्या
नेचर पार्क मधे दोन तास फेरफटका.. रात्री अंगणात चांदण्यात बसून जेवण, गप्पा.. अगदी आराम चालला होता.
एका दिवशी रात्री तीन ला धो धो पाऊस आला. इथे दोनेक दिवस, दिवसाचं तापमान थोडं गरम झालं कि पाऊस पडणारच हे हमखास ठरलेलंच आहे. पाऊस तर आला पण जाता जाता वीजताई ला ही बरोबर घेऊन गेला.
सकाळी उठलो तर सर्वत्र हिरवंगार झालं होतं आणी आम्ही नुस्तेच गारेगार !!! समोरच्या पर्वतावरून उतरून ढग जमिनीपर्यन्त आले होते. ते दृष्य पाहून वादियाँ, पर्वत, बादल , मौसम वर जितकी काही बॉलीवुड ची गाणी असतील ती सर्व आठवली.

खालील लिंक मधे अजून आहेत फोटो..ओपन झाली तर बरं ..

https://goo.gl/photos/A8YNXpeeSCCKEnk3A

क्रमशः..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

अशी जिव्हाळ्याची बेटं हिमाचलात असणं किती खासम खास ! मस्त गारेगार वाटले वाचूनच
पुढील भागाच्या प्रतिक्षेत Happy

वर्षु, मस्त ! मजा येणारे वाचायला फक्त तो चवथा पॅरेग्राफ रिपीट झालाय तेवंढा काढ .... मला प्रचंड आवडतो हिमालय !

सुंदर...

निसर्गासाठी तर आहेच, पण प्रकाशला भेटायलाही जावेसे वाटतेय तिथवर !!

मस्तच वर्षू . प्रकाश चे, त्या बंगल्याचे ,दुनीचे आणि निसर्गाचे सगळ्याचे फोटो पाहिजेत
मजा येणार आहे वाचायला. पुढचे भाग लवकरच येउदेत फोटो सहीत Happy
आलेला दिसतोय पुढचा भाग . आत्ताच बघितला Happy

दोन वेळा बियास शेजारुन प्रवास केलेला असल्याने तु केलेलं हिमाचलच वर्णन अगदी जिवंत वाटलं...

पण प्रकाशला भेटायलाही जावेसे वाटतेय तिथवर !! > +१

मस्त झालाय हा पहिला भाग. वाचायला मज्जा येणार Happy हिमाचल अतिप्रिय आहे

प्रकाश चे, त्या बंगल्याचे ,दुनीचे आणि निसर्गाचे सगळ्याचे फोटो पाहिजेत + १११

भारी..

वाह मस्त लिहिलयं. फोटोज पण मस्त आहेत.
तारांचे फोटोज ४था आणि ६ वा का ? थोडा जवळुन नाहीये का ? की त्या इलेक्ट्रीसिटीच्या ओव्हरहेड लाईन्स आहेत ? Proud

छान वर्णन, फोटो सहित इथे दिल्याबद्दल धन्यवाद. Happy
तुमच्या त्या मित्राला प्रकाशरावांना मानल पाहिजे.... Happy

छान लिहिलयसं वर्षू..
प्रकाशबद्दल आदर वाटतो आणि अचंबापन..
आता जाणारे तेव्हा आणखी असा खजिना घेऊन ये..अनुभवांचा आणि फोटोंचासुद्धा..

Pages