भय इथले संपत नाही.. एक रसग्रहण

Submitted by अश्विनीमावशी on 29 March, 2017 - 06:53

कवी ग्रेसांच्या प्रतिभेला नमस्कार करून त्यांच्या अमर कवितेचे माझ्या द्रूष्टिकोणातून रसग्रहण, अर्थान्वयन करायचा प्रयत्न करते आहे. ह्यात फारसे गोड काही नाही पण जीवघेणे मात्र आहे. मला ही कविता ब्लॅक ह्युमर सारखी डार्क पोएट्री वाट्ते. गोड व लाडीक रस्त्यावरून दूर जाउन
एका खडतर मार्गावरून ही कविता आपल्याला फरपटत घेउन जाते. अंतःकरणात दाबून लपवून ठेवलेल्या भीती व एकटेपणाचा सामना करायला लावते त्याच वेळी त्या प्रत्यक्ष घटनेतले नाट्य व अंतिम सौंदर्य पण अधोरेखित करते.

कवितेचे नायक नायिका ही एक मेकांवर जिवापाड प्रेम करणारी, एका जोडप्याचा भाग असलेली अशी एक मन दोन शरीर ह्या भावनेने जीवन जगणारी, हळूवार व्यक्तिमत्वे आहेत. कवी त्यांच्या नात्याच्या अगदी खोलवर जातो व तिथे होणार्‍या घडामोडी निर्मम पणे तपासून बघतो व मांडतो. ह्या दोघांपैकी एक जण मृत्यू पावला आहे. व त्याच्या/ तिच्या भौतिक शरिराला जाळायचा विधी चालू आहे. किंवा थोड्याच वेळात होणार आहे. तत्प्रसंगी एक गेलेली व्यक्ती व एक त्याचे जाणे सर्व जिवित पातळ्यांवर अनुभव णारी, त्यावर निस्सीम प्रेम केल्याने आता पूर्ण रीती झालेली व्यक्ती ह्या दोघांमधला हा एक अमूर्त संवाद आहे. नेणिवेत झालेला.

भय इथले संपत नाही. मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते.

कधीही न संपणारे पृथ्वीतलावरचे भय म्ह णजे स्वतःच्या मृत्यूचे. सर्व प्राणिमात्रांना ते कायमच असते.
हे उमजून जोडप्यातला उरलेला गेलेल्याने शिक विलेली, कधी क्वचित दोघांनी मिळून म्हटलेली गाणी गुणगुणत आहे. गेलेल्या जोडिदाराला आठवणीतून जिवंत करून आभासात रमण्याची निकड सर्वात जास्त केव्हा भासणार. ती कायमची गेल्यावरच.

हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया

एकाचा भौतिक अर्थी मृत्यू झाला आहे व दुसरा त्यामुळे जिवंतपणे गेल्यागतच आहे. त्या भावविभोर नात्याचा ही अंत झाला आहे आणि आता धरती म्हणजे एक भगवी मायाच. एक कधी न विझणारा वणवा आता जगायचा आहे. अनुरक्त ते विरक्त हा प्रवास एका क्षणात झाला आहे. ते नाते आता एका फुल झाडाच्या पायाशी पुरले आहे. त्यातून नवी झाडे फुले येतील पण ते न्यू नॉर्मल असेल. जुने झरे अंतर्धान पावले आहेत एका जादूच्या राज्यात.

त्या वेळी नाजुक भोळ्या, वार्‍यास हसवुनी पळती
क्षितिजांचे तोरण घेउन दारावर आली भरती.

एकत्र घालवलेले ते नाजूक हसरे क्षण इतके अलवार की खोडकर वार्‍याला देखिल हसवून पळून गेले. किती हळवे गोड ते नाते, ते एकत्र
असल्याचे रेशमी बंध आता तुटले. दूर असलेली क्षितिजे आता तोरणासम जवळ आली आहेत. श्वास कोंडून संपवणारी काळाची भरती
माझ्या घरापर्यंत येउन ठेपली आहे. आता पुढे फक्त शेवट चा श्वास घ्यायचा व ह्या कालसागरात बुडून जायचे. अस्तित्व संपवणारी ही भरती आहे. ( हे जाणार्‍याचे विचार आहेत. पूर्ण कविता कधी त्याचे विचार तर कधी तिचे कधी गेलेल्याचे तर कधी मागे राहिलेल्याचे अशी लिहीली आहे. अमेझिंग इज द ओन्ली वर्ड.)

तो बोल हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू... राघव शेला.

प्रेयसी/प्रियकराचे जीवनातले एक आनंद निधान् म्हणजे त्यांच्यासाठी खास उच्चारलेले प्रेमाचे काळजीचे शब्द, जेवलास का? लागलं का? ठीक आहेस ना? नीट पोहोचलीस का घरी? असले साधे अन छोटे पण त्यानेच जीवनाला एक सोनेरी अर्थ येतो. वनवास तर सीतेचा आहेच पण त्यात आता फक्त हा राघवशेला उरला आहे. आठवणींचा. त्या जणू नंतर तीन रिकाम्या जागा आहेत. तिथे काय शब्द योजावा असे कवीला वाटले असेल? तर तो उरला
तुझ्या साध्या गोड मनापासूनच्या शब्दांनीच माझ्या करंट्या जीवनावर पांघरूण घातले आहे. आता आलेले सीतेसारखे वन वासी कराल एकटेपण ह्या शेल्याला पांघरून सुसह्य होईल कदाचित.

देउळ पलिकडे तरिही तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबुळापाशी मी उरला सुरला थेंब...

गेलेल्या प्रेयसीचे/ प्रियकराचे अस्थिविसर्जन आहे. नदीचा घाट उदास देउळ अशी ही विषण्ण जागा. मन आता दु:ख करायच्या पलिकडे गेले आहे. ओंजळीने अर्घ्य देताना तुला आधीच कसला तरी आधार घ्यावा लागत आहे. ( जुन्या देवळाचा एखादा अलिकडला खांब) रडून सर्व अश्रू संपलेत आता तरी एक थेंब माझ्या नावाचा तुझ्या डोळ्यात उरला आहे. आहेच.

आता कवीने सर्वात भयानक रचना केली आहे. बॅक अँड फोर्थ जाण्यामुळे आपण आता जात्या जिवाच्या मनोगता कडे परत येतो आहोत.
जर तो जीव चितेवर पडून विचार करू शकला असता. ( जर विचार करू शकला असता तर तो तिथे नसता पर्यायाने कविताही नसती पण हे त्याचे विचार आहेत.

संध्येतिल कमलफुलासम मी नटलो श्रुंगाराने
देहाच्या भवती रिंगण घालती निळाइत राने

संध्याकाळच्या वेळी सूर्यकिरणांत चमकणार्‍या कमळासारखा मी सजविला गेलो आहे नटलो आहे नव्या कोर्‍या कपड्यात. चितेवर पडून मला आकाशाची निळाई दिसते आहे व त्यात कडेला स्मशान भूमिच्या आजुबाजूची राने. कवितेत जो व्ह्यू कवीने कल्पिला आहे तो फिश आय लेन्सने काढलेल्या फोटो सारखा आहे. आपल्याच क्रियेला बघणारा त्रयस्थ आत्मा घोर निळ्या आकाशाखाली वार्‍याने डोलणार्‍या रानांना बघतो आहे.

स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे

त्या देहा भोवती आता कोणीतरी स्त्रोत्रे म्हणत प्रदक्षिणा घालते आहे. ती आता अग्नीत भस्म होउ पाहणारी इंद्रिये कसले दु:ख गात असतील? ज्या शरीराने असंख्य सुखे भोगली ते त्यागताना कसले दु:ख होत असेल नेमके? पण मागे उरलेल्याला त्या गेलेल्या शरीर वमनाने दिलेल्या अनंत आठवणी सोबत उरलेले क्षण कंठायचे आहेत. ते चांदणे कधी संपणारे नाही. त्याच्या शेवटच्या श्वासा पर्यंत. मग एक प्रेमकहाणीच तिथे पूर्ण विराम घेइल.

चितेवर देह जळताना उरलेल्यांनी एका क्षणा पर्यंत थांबायचे असते ही अभद्र रूढी उरलेल्याला सहन होत नाही. अचानक वाताव रणात
संध्याकाळचा हाडापर्यंत पोहोचणारा गारवा पसरला आहे. धुके डोळ्यात मनात येउन पोहोचते व कदाचित तो धूरही असेल. पण त्याला आता परत जायची एकदम घाई होते. तिथे त्याचे कोणीच नाही. जगात कोणी नाही. अंधार येउ घातला आहे. पानगळीचे देखिल वैभव झिड्कारून झाडे कोरडी अलिप्त उभी आहेत. तो परत जायचे पाउल पुढे टाकतो.
तेव्हा जिवलगाचा आत्मा त्याला एक हाक देतो

ते धुके अवेळी होते की परतायाची घाई
मेंदूतुन ढळली माझ्या निष्पर्ण तरुंची राई.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमा, सुरेख रसग्रहण.बर्‍याच आधी वाचले होते,पण का कोण जाणे प्रतिसाद द्यायचा राहून गेला.

अर्थात काही कडव्यांचे अर्थ मला वेगळेच ऊमजलेत. असो. >>>>>> शाली,जरूर लिहा.

अमा, ग्रेसांच्या कविता आवडतातच, पण हि विशेष आवडते...
त्यातुन तुम्हि केलेले रसग्रहण फारच अन्तर्मुख करायला लावणारे आहे.
आणि आता हे प्रत्यक्ष जगत असल्या मुळे जास्तच रिलेट होते आहे. :-(:-(

वाह अमा सुंदर

किती सहज सांगितलंस. मला अजिबात अर्थ लागत नव्हता.
एकदा एका मित्राने सांगितला पण त्याच्या सांगण्यात इतकं समजत नाही हा भाव होता म्हणून पुन्हा कोणाला विचारायच धाडस नाही केलं.

ग्रेस यांच्या कवितेचे रसग्रहण करणे म्हणजे मुंगीने मेरू पर्वत उचलण्यासारखं आहे.. तरीही तुम्ही छान प्रयन्त केला आहेत
पण हि त्यांची कविता आईसाठी आहे असे मी वाचलेले स्मरते

आई शप्पथ, अमा ताई मी अत्ता काहीही बोलू शकत नाहीये. एकच सांगतो कसबसं
भय इथले संपत नाही हे गाणं ऐकल्यावर ओळीओळीला जी अस्वस्थता, पोळल्याची जाणीव(फक्त मेंदुला कळत नाहीये आत्मा पोळलाय का मन पोळलय) आली नव्हे जी अस्वस्थता येते. एकवेळ ऐका नाहीतर अनादी काळापर्यंत ऐका!!
तीच अस्वस्थता, तेच पोळाल्यानंतरचं चरचररणं तुमचं रसग्रहण वाचून आलीय!!
माहीत नाही आता किती काळ चरचरेल...

Rock on peeps.

मी जॉब ला असताना actually पहिला जॉब होता..आमचे boss धार्मिक होते रोज सकाळी केबिन ला आल्यावर सब staff सोबत देवपूजा करायचे आणि नंतर ही कविता लावून द्यायचे मी पहिल्यांदा तेथेच ऐकलेली
..पहिल्यांदा ऐकून खूप रडले ..रोजचे routine होते त्यांचे same.. ते ऐकताना रोज जीवनातले मनात दडून असलेले प्रसंग आठवून रडायला यायचे..
तेव्हा पासून मनात कोरली गेलीय ही कविता।।

कुठल्याश्या एका कार्यक्रमात हृदयनाथ मंगेशकरांच्या तोंडून अस ऐकलं होतं की हे गाणं कवी ग्रेस ह्यांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असताना सुचलं होत ... आणि त्यांनी ते पंडितजींना पत्राने लिहून पाठवलं होत ... ते चेष्टेने बोलले होते का ठाऊक नाही .... आणि हे गाणं आईला समर्पित वाटत .... प्रत्येक वाचकाला ह्या गाण्याची स्वतंत्र अनुभूती येते ..... हीच ह्या गाण्याची जादू आहे .

अप्रतिम रसग्रहण अमा!
"संध्येतिल कमलफुलासम मी नटलो श्रुंगाराने" ह्यात कमळाची अग्निला दिलेली उपमा वाटतेय.

झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया हे तर जबरदस्त आहे. कोकणात कोणाला आत्म्याने झपाटलेल असेल तर त्या झपाटलेल्याला (देहाला) झाड म्हणतात. हे वाक्य द्व्यर्थी आहे. एक वर तुम्ही लिहिले तसे तर दुसर्या अर्थाने शाब्दिक कोटी पण.

फुटलेला खांब हा पृथ्वीवरच्या आयुष्याचा अंत सुचित करतो. हे कडव अजुन कोणी म्हटले आहे सांगणे कठिण आहे. प्रेत पण म्हणु शकते की माझे अस्तित्व आता संपले. देउळ दुर असले तरि मी आता फक्त बुबुळाशी उरलेला थेंब आहे. पण फुटलेला खांब हे वैधव्याचे प्रतिकही आहे म्हणुन तुम्ही वर लिहिले तसेच असावे.

Pages