मी बैरागी

Submitted by संतोष वाटपाडे on 29 March, 2017 - 05:12

तू एक उगवता तारा मी मावळतीच्या जागी
प्रेमात जखडला आहे जन्माचा हळवा रोगी
घेऊन हिंडतो हाती तव आठवणींची झोळी
मी बैरागी बैरागी... मी थकलेला बैरागी...

मंदिरी मनाच्या जपतो मी तुझ्या नावच्या माळा
गर्दीत नभाच्या उडतो मी पक्षी एक निराळा
संन्यस्त भटकते काया स्पर्शांची आस विरागी
मी बैरागी बैरागी... मी थकलेला बैरागी...

शोधतो तुला भासांनी मौनातुन देतो हाळी
दारात तमाच्या बसतो रडवेल्या सायंकाळी
आक्रोश दूर ठेवाया मी नाही इतका त्यागी
मी बैरागी बैरागी... मी थकलेला बैरागी...

हृदयाचे सलते मंथन देहाचे अलख निरंजन
अनुराग मुक्या शब्दांच्या, स्वप्नांचा जाळ चिरंतन
पापणीत सुकला आहे विरहाचा पूर अभागी
मी बैरागी बैरागी... मी थकलेला बैरागी...

-- संतोष वाटपाडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर!

जन्माचा हळवा रोगी, स्पर्शांची आस विरागी, हृदयाचे सलते मंथन > वाह!!

सुंदर लयबद्धता आणि विषय!