‘सुंदर मठ’ रामदास पठार - शिवकालीन शिवथर प्रांत

Submitted by Kadamahesh on 25 March, 2017 - 12:10

‘सुंदर मठ’ रामदास पठार - शिवकालीन शिवथर प्रांत

समर्थ रामदासस्वामी यांनी संपूर्ण भारत खंड पाहिल्यानंतर आपल्या आनंदवनभुवनी स्फुट काव्यात सुंदरमठ परिसराचे वर्णन करतात. हा सुंदर मठ म्हणजेच आनंदवनभुवनी. संपूर्ण भारत वर्षात समर्थांचे जेवढे मठ होते त्या सर्व मठांचा 'सुंदरमठ रामदास पठार' हा मुख्य मठ होता. ह्या मठाचे दोन भाग आहेत. त्यापैकी एक 'सुंदरमठ रामदास पठार' असून दुसरी संशोधित शिवकालीन शिवथरप्रांतातील 'शिवथर घळ' आहे.ह्या जागेच समर्थानी वर्णन केलेल स्थानमाहात्म्य

वेद तो मंद जाणावा | सिध्द आनंदवनभुवनी |आतुळ महिमा तेथे |आनंदवनभुवनी ||५२ ||
येथूनी वाचती सर्वै | ते ते सर्वत्र देखती | सामर्थ्य काय बोलावे | आनंदवनभुवनी ||५४ ||
उदंड ठेविली नामे | आपस्तुतीच मांडिली |ऐसे हे बोलणे नाही | आनंदवनभुवनी ||५५ ||
महिमा तो वर्णवेना | विशेष बहुतांपरी | विद्यापीठ ते आहे | आनंदवनभुवनी || ५८ ||
सर्व सद्या कला विद्या | न भूतो न भविष्यती |वैराग्य जाहले सर्वै |आनंदवनभुवनी ||५९ ||

॥' इति श्रीवनभुवनी नाम मान प्रथम '॥

समर्थानी वर्णन केलेली शिवकालीन शिवथर प्रांतातील हि जागा रामदासी सांप्रदायात समर्थांच्या मागे अपरिचित होती. त्या जागेच ऐतिहासिक पुराव्यासोबत संशोधनाचे कार्य श्री अरविंदनाथजी महाराज - आळंदी (देव) यांनी केलें आहे. त्याची माहीती व पुरावे ह्या सदर लेखात त्यांच्यावतीने व परवानगीने देत आहे.

'आनंदवनभुवनी ' हे धृपद असलेल्या या एकोणसाठ कडव्याच्या काव्यात प्रत्येक कडव्याचा अर्थाचा संदर्भ समर्थांच्या जीवनातील वेगवेगळ्या घटनांशी जोडलेला आहे. ह्या घटना समर्थांनी जन्मगाव "जांब" सोडल्यापासून ते सज्जनगडावर जाईपर्यंतच्या काळाचा उल्लेख आहे. तसेच समर्थांच्या भारतभ्रमणाच्या काही घटना हि यात आहेत. ज्या ठिकाणी समर्थ राहतात ती शिवकालीन शिवथर प्रांतातील “शिवथरची घळ” हा सुंदरमठाचाच एक हिस्सा आहे तरीदेखील हे स्वतंत्र दोन मठ आहेत असे लक्षात येते. .

आनंदवनभुवनी ह्या शब्दाची गुंफण सोडविण्याकरिता समर्थलिखित या दोन स्फुटकाव्यांची मदत होते.

कळहो होऊनि तुटला ।आनंद आनंदी मिसळला ।
नुस्ता भक्त ची उरला देव कोठे ।।९।।
हद जाली सीमा जाली । प्रचित प्रचितीसी आली ।।
कैसी आनंदवेळ वाहिली। सुंदर मठी।१०।।
दोनी मठ एक चि जाले दोन्ही मठीं एक चि चाले
मननशीळ निवाले। येणेशब्दे ।।११।।
भक्त सकळासी आहे मान्य । आंतरनिष्ठ परम धन्य ।।
दास म्हणे अनन्य। कोणासी असो ।।१२।।
(समर्थकृत स्फुट काव्य श्रीसांप्रदायिक विविध विषय पान क्र १४४)

सुंदर मूर्ती सुंदर गुण । सुंदर कीर्ती सुंदर लक्षण ।।
सुंदर मठी देव आपण। वास केला ।।१२।।
गिरिकंदरी सुंदर वन। सुंदर वाहती जीवन ।
त्यामध्ये सुंदर भुवन । रघुनाथाचे ।।१३।।
सुंदर पाहोनि वास केला । दास संनिध ठेविला ।
अवघा प्रांतची पावन केला। कृपाळूपणे ।।१४।।
बावी पोखरणी झरे। टांकी विशाल सुंदरे ।
ठांई ठांई मनोहरे । स्थळे निर्मिली ।१५।।
कडे कपाटे दरे दरकुटे। पाहो जाता भय ची वाटे ।
ऐसे स्थळी वैभव दाटे । देणे रघुनाथाचे ।।१६।।
अन्तर्निष्ट अखंडध्यानी ।संनिध वरदायनी ।
विश्वमाता त्रैलोक्यजननी। मूळमाया ।।१७।।
(समर्थकृत स्फुट काव्य श्रीसांप्रदायिक विविध विषय पान क्र १३८)

वरील स्फुटकाव्यात समर्थ सुंदर मठ येथील वास्तव्यात व्यतीत केलेल्या क्षणांना त्यांच्या आयुष्यातील "आनंदवेळ " असं म्हणत आहेत. गिरीकंदरी सुंदर वनात असलेल्या सुंदर भुवनाचा उल्लेख केला आहे. ह्या स्थानाला समर्थ आनंदवनभुवनी (आनंद+वन+भुवनी ) असं हि संबोधतात. ह्या भुवनाचा आणि प्रांताचा असा स्वतंत्र उल्लेख येतो.
आनंदवनभुवनी या काव्यात ह्या वरील स्फुट काव्यातील सुंदर भुवन (घळ), सुंदर वाहती जीवन (धबधबा ) , प्रचित प्रचितीसी आले,आनंद आनंदी मिसळला,आनंदवेळ, सीमा जाली ,संनिध वरदायनी. नुस्ता भक्तची उरला देव कोठे ह्याचे उल्लेख तंतोतंत मिळतात. या शिवाय समर्थानी दासबोधात लिहिलेल्या गुरु शिष्यांच्या संवादाचा आणि त्याच्या लिखाणाचा संदर्भ मिळतो.

सकळ देवांचिये साक्षी। गुप्त उदंड भुवने। सौख्यासि पावणे जाणें। आनंदवनभुवनी ||१५||
स्वर्गीची लोटली तेथे |रामगंगा महानदी |तीर्थासी तुळणा नाही | आनंदवनभुवनी ||१३ ||
मानसी प्रचीत आली | शब्दी विश्वास वाटला |कामना पुरती सर्वै | आनंदवनभुवनी ||५३ ||
लिहिला प्रत्ययो आला | मोठा आनंद जाहाला |चढता वाढता प्रेमा |आनंदवनभुवनी ||३८ ||
सामर्थ्ये यशकीर्तीची | प्रतापे सांडिली सीमा |ब्रीदेंची दिधली सर्वे | आनंदवनभुवनी ||४७ ||
आरोग्य जाहाली काया | वैभवे सांडिली सीमा |सार सर्वस्व देवाचे | आनंदवनभुवनी ||४४ ||
रामवरदायीनी माता |गर्द घेउनी उठिली | मर्दिले पूर्वीचे पापी | आनंदवनभुवनी ||४१||
वेद शास्त्र धर्म चर्चा |पुराणे महात्में किती |कवित्वे नूतने जीर्णे | आनंदवनभुवनी ||५० ||

समर्थांनी आनंदवनभुवनी या काव्यात ज्या जागेच्या स्थानमाहात्माच वर्णन केलें आहे ती जागा म्हणजे "सुंदर मठ" शिवथर घळ.

समर्थ ह्या मठावर वास्तव्यास चाफळ ह्या ठिकाणी श्रीरामाच्या मूर्ती स्थापन केल्यानंतर (सन १६४८) आले.

समर्थे चाफळ आधिष्ठानीं श्रीराम संस्थापिले । मग सुंदरमठी समर्थांचे रहवे जालें ।
नाना गिरीकंधरी दास विहरे निर्मिले । नाना मठ करविले लोकोद्धारा ।।२ ।। (समर्थ प्रताप समास ७ )

हा "सुंदर मठ रामदास पठार" शिवकालीन शिवथर प्रांतात आहे व ह्याच सुंदर मठावर शिवाजी महाराज यांची दक्षिण दिग्विजयाला जाण्यापूर्वी समर्थांची भेट झाली होती अशी माहिती दत्ताजी त्रिमल यांनी दिवाकर गोसावी यांना लिहिलेल्या पत्रात मिळते. त्यावेळेस बिरवाडी हा स्वतंत्र तर्फ होता तो शिवथर प्रांतात येत नसल्याने बिरवाडी व सिवथर प्रांत असे स्वतंत्र उल्लेख केला आहे असं समजते. बिरवाडी हा स्वतंत्र तर्फ होता ह्याच उल्लेख आणखी एका ऐतिहासिक कागदात पहावयास मिळतो. त्यात अशी नोंद आहे की सध्या असलेले महाड तालुक्यातील शिवथर गाव जेथे "चंद्रराव " बाजी यशवंतराव मोरे यांचा वाडा आहे तो शिवकालीन बिरवाडी तर्फमध्ये (तालुक्यात ) होता. (संदर्भ कोंढवी परगण्याचा करीना ऐतिहासिक टिपणे लेखांक १ )

राजश्रीं छत्रपती यजमान कर्नाटकातुन स्वारी करून श्री च्या दर्शनास सज्जनगडासी आले ते समई श्री स प्रार्थनायुक्त विनंती केली की श्री नी पूर्वी बिरवाडीचे मुकामी श्री सिवथरी प्रांती असता मधे माहानदी माहापूर आणि अकस्मात रात्री पलंगापासी येऊन चमत्काररूपे दर्शन दिल्हे कितेक चित्ती होतें ते चि आसीर्वाद दिल्हे. दुसरे दिवसी सिवथर प्रांती सुंदर मठी भेट जालीं तेथे………………... . (संदर्भ श्रीसंप्रदायाची कागदपत्रे लेखांक २६).

सदर घटनेची नोंद गिरिधरस्वामी यांनी सुद्धा केली आहे

शिवराजे शिवतरी चमत्कार देखिले।
करतळस्फोटक स्मरणे तात्काळ शमले।
स्वप्नी प्रसाद देउनी गेले। महानदी उतरुनियां ।।६५।। (समर्थ प्रताप समास ३ )

ह्या वेळी नळ संवत्सर होता व सुंदर मठावरील या भेटीत समर्थांना तेव्हा शिवाजी राजांनि अठरा शस्त्रे समर्पिली व राजांना कित्येक आशीर्वादवचने समर्थांकडून प्राप्त झाली. असे समर्थांचा काळ संनिध आले असता संभाजी राजा आणि समर्थांच्या संवादातील नोंदीत आला आहे. (संदर्भ श्रीसंप्रदायाची कागदपत्रे लेखांक ४३)

दक्षिण दिग्विजयाला जाण्यापूर्वी समर्थ भेटी साठी महाराज जेव्हा सुंदरमठी आपला संपूर्ण राजश्री लवाजमा घेऊन येतात त्या घटनेचें वर्णन समर्थानी आपल्या आनंदवनभुवनी या काव्यात करतात.

त्रैलोक्य चालिल्या फौजा | सौख्य बंदविमोचने |मोहीम मांडली मोठी | आनंदवनभुवनी ||१८ ||
सुरेश उठिला आंगे |सुरसेना परोपरी |विकटे कर्कशे याने |आनंदवनभुवनी ||१९ ||
देव देव बहु देव |नाना देव परोपरी |दाटणी जाहाली मोठी |आनंदवनभुवनी ||२०||
दिग्पती चालिले सर्वै |नाना सेना परोपरी |वेष्टित चालिले सकळी| आनंदवनभुवनी ||२१ ||
मंगळ वाजती वाद्ये |माहांगणा समागमे |आरंभी चालीला पुढे | आनंदवनभुवनी ||२२||
राश्भे राखिली मागे |तेणे रागेची चालिल्या |सर्वत्र पाठीसी फौजा |आनंदवनभुवनी ||२३ ||
आनेक वाजती वाद्ये | ध्वनीकल्लोळ उठिला |छबीने डोलती ढाला | आनंदवनभुवनी ||२४ ||

समर्थांचं येथील वास्तव्य सन १६७६ पर्यंत म्हणजे अठ्ठावीस वर्षे होते हि माहिती छत्रपती शिवाजी महाराज यांनी सज्जनगडाला आणि महिपत गड कील्ल्यावरील हवालदारास लिहिलेल्या आज्ञापत्रात मिळते. सज्जनगडला तसें पाहता चाफळ हे जवळच स्थान आहे परंतु तरीही महाराज समर्थांची ओळख सांगताना सिवतरी राहतात असे सांगितल्याने समर्थांच्या शिवथर प्रांतातील दीर्घ वास्तव्याची ओळख पटते.

श्री रामदास गोसावी सिवतरी राहतात सांप्रतकाही दिवस गडावरी राहावया किलेयास येतील त्यांस तुम्ही गडावरी घेणे घर जागा बारा करून देणे जे लोक याचे सेवेचे बा। असतील ते देखील गडावर घेणे असतील तोवरी हरयेकविसी खबर घेत जाणे यास सेवेसी अंतर पडो नेदणे उतरू म्हणतील तेव्हा उतरून देणे. (संदर्भ श्रीसंप्रदायाची कागदपत्रे लेखांक १५ व १६)

ह्या अठ्ठावीस वर्षातील सुरवातीचे दहा वर्षे दासबोधाच्या जन्म काळात कोठेही बाहेर न जाता समर्थ 'शिवथरघळ' येथे सलग दहा वर्षांपर्यंत राहिले (सन १६५८ पर्यंत). त्यांसोबत तेव्हा कल्याण स्वामी, चिमणाबाई अक्का आणि अनंत कवी असे निस्पृह शिष्य होते. व समर्थांच्या अनुपस्थित संप्रदायाचा चाफळ येथील कारभार दिवाकर गोसावी आणि भास्कर गोसावी पाहात होते. असे आपल्याला समर्थ शिष्य दिवाकर गोसावी यांनी बहिरंभट यांस लिहिलेल्या पत्रातून समजतें.

तुम्ही आम्हांस येण्याविषयी लिहीले तर श्री समर्थ दहा संवत्सरपर्यंत कोठे न जाता सर्व ग्रंथास आरंम्भ केला. आणि सांगितले की श्रीकडील हरयेकविशी बोभाट येऊ नये म्हणून आम्हा सांगितले.आणि सर्व मंडळीस आज्ञा की तुम्ही श्री चे उत्सवाची (भिक्षा) करून आमचे स्वाधीन करावी. म्हणून सर्वांस सांगितल्या प्रमाणे सर्व मंडळी निघून गेली आणि आपण व कल्याण गोा व चिमणाबाईअक्का व अनंतकवी यांस बरोबर घेऊन एकांत स्थानी शिवथरचे घळीत जाऊन बसले. तुम्ही श्री महाबळेश्वराचे देवालयाचे काम चांगले रितीने करवावे.भास्कर गोा आले म्हणजे मी येक दिवसाचे अवकाशे येतो हे आशीर्वाद.
(शिवकालीन पत्रसार संग्रह पान नंबर २७७)

समर्थांचा हा शिवकालीन शिवथर प्रांताची सुंदर मठाची जागा म्हणजे " रामदास पठार " व "शिवथर घळ" ह्याची सत्यता सिद्ध करणारे ऐतिहासिक पत्र. हा कौलनामा खुद्द महाराष्ट्राचे दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिला आहे. ह्या कौलनाम्यात समर्थ वास्तव्याचा पत्ता सांगितला आहे. संपूर्ण पत्र मोडी लिपीतील आणि भाषांतरित यांची छायाचित्र सोबत जोडली आहे.

कोड नलवडा मौजे पारमाची ता।सिवतर येथे श्री येऊन राहिलियाउपवरी रामनगर पेठ वसवावयाची आज्ञा केली आणि बारा वर्षे पावेतो दिवाणास हासील माफ म्हणून कौल देवीला (संदर्भ श्रीसंप्रदायाची कागदपत्रे लेखांक १३)

ह्या ठिकाणी समर्थांचे वास्तव्य झाल्या कारणाने शिवाजी राजांनी तेथे रामनगर पेठ वसवण्याची आज्ञा आणि १२ वर्ष तेथे व्यापार करणाऱ्या लोकांना महसूल कर न भरण्याची सूट दिली यावरुन समर्थांच्या किती वर्ष वास्तव्य झाल असेल याचा अंदाज करता येईल. दुसर म्हणजे समर्थ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संबंध हि समजता येईल. हे पत्र अस्सल असून यावर शिवाजी महाराजांच्या राजमुद्राचा
प्रतिपच्चंद्रलेखेव‬ ‪वर्धिष्णुर्विश्ववंदि‬ता सहसूनो‬: ‪शिवस्यैषा‬ ‪मुद्रा‬ ‪भद्राय‬ ‪‎राजते‬ ।।, श्री शिवचरणी तत्पर त्रयंबक मोरेश्वर, मर्यादेय विराजते असे शिक्के व परवानगी हुजूर आणि मोर्तब सूद हि अक्षरे आहेत. हे पत्र अस्सल असून साधनचिकित्सा ह्यातील ऐतिहासिक पत्राची सत्यता तपासण्याचे सर्व आधार पूर्ण करत. इतिहास संशोधक श्री गजानन मेहेंदळे यांनी ही आपल्या श्री राजा शिवछत्रपती या पुस्तकात हे पत्र अस्सल असल्याचा तळटीपांत दिल आहे.

ह्या रामनगर पेठेबद्दल आणखी एका सांप्रदायिक कागदात नोंद होते ती अशी कि समर्थ रामदास स्वामी यांनी आपला अवतार कार्य सम्पूर्ण होण्याचा प्रसंग जवळ आल्याचे जाणून छत्रपती संभाजी महाराजांशी केलेला शेवटचा संवाद. ( सांगितलेली कृपापूर्वक वचने).

ह्यातील ११ अंकाच्या वचनात म्हणजे बोललेल्या वचनांपैकी शेवटचे वचन अस आहे की
श्री चे पेठेचे पत्र दुश्य करावे कार्येकर्ते नीती वंदावी । श्री कार्याशी अति तत्पर ऐशा पुरुषाच्या योगे धर्मवृद्धी आहे । धर्म वृद्धीने राज्यवृद्धी आहे. ।।११।। (संदर्भ श्रीसंप्रदायाची कागदपत्रे लेखांक ४३)
ह्यातील श्रीचे पेठ हा उल्लेख म्हणजे समर्थ वास्तव्य झाल्याकारणाने खुद्द छत्रपति शिवाजी महाराजांचा रामनगर पेठ वसवण्याचा कौलनामा असे स्पष्ट होते.

दुसरं पत्र हे समर्थांचे निस्पृह शिष्य श्री योगीराज कल्याण स्वामी यांनी दिवाकर गोसावी यांना लिहिलेल आहे.

अकरा गाई व अकरा वछे देविली ती सिरगावी नेऊन ठेवली आणि श्री च्या दर्शनास पारमाचीस सिवथरप्रांती नवलवाडियाचा कोड तेथे जाभंळीच्या चउथरीयावर श्री संतोषरूप बैसले होते. (संदर्भ श्रीसंप्रदायाची कागदपत्रे लेखांक ५०)

ह्या पत्रामागे कारण असे होते कि समर्थांच्या पश्च्यात श्री चा पारिपात्याचा अधिकार कोणी सांभाळावा यावरून दिवाकर गोसावी आणि उद्धव गोसावी यांमध्ये कलह झाला होता. त्यावर कल्याण गोसावी यांनी आपलं मत सांगताना शिवथर प्रांतातील समर्थ वास्तव्यात असताना समर्थांनी केलेल्या आज्ञेचा आधार घेतात.
समर्थ शिवथर प्रांती असताना १६७६ ला शिवाजी राजे साताऱ्यात आजारी होते तेव्हा समर्थांनी कल्याणस्वामींना महाराजांची तब्येतीची विचारणा करण्यासाठी आणि श्री प्रसाद देण्यासाठी पाठवलं होत. प्रसाद देऊन येताना महाराजांकडून कल्याणस्वामी यांनी अकरा गाई व अकरा वछे आणून सिरगावला ठेवली . कल्याणस्वामींनी या प्रसंगी शिवाजीराजांकडून काही मागंण हे समर्थांना आवडलं नाही. समर्थानी त्यांना राजे आजारी असल्यामुळे राजांच्या तब्येतीची विचारणा करण्यासाठी साठी पाठवल असताना त्यांकडे श्री कार्यभागासाठी काही मागणे हा उचित प्रसंग नव्हता. त्यावेळेस समर्थानी त्यांना सांगितलं कि तुम्ही निस्पृह आहात हे कार्य तुम्हाला सांगितलं नाही. श्री चा कार्यभाग राजदरबारहून संपादून घेणे हि कला दिवाकर यांना चांगली अवगत आहे . “आर्जव वृत्तीने मागणे हा निस्पृहाचा धर्म नव्हे” अशी आज्ञा नळ संवत्सरी कार्तिक वद्य प्रतिपदेला समर्थानी कल्याण स्वामीना केली.व म्हटले तुम्ही निस्पृह व आणिक कोणी या प्रयोजनात मन न घालणे. ह्या समर्थांच्या आज्ञेच पालन म्हणून कल्याणस्वामी यांनी श्री चा कार्यभागासाठी राज्यदरबारी येणंजाणं बंद केले. व श्री चा कार्यभाग देवद्वारीं आणि राज्यगृही हा दिवाकर गोसावी यांनी सांभाळावा असं आपलं मत लिहून सांगितलं.
वरील दोन्ही पत्रातील उल्लेख समर्थांचा शिवकालीन शिवथर प्रातांतील वास्तव्याचे ठिकाण स्पष्ट करतात. नवलवाडियाचा कोड वा कोड नलवडा म्हणजेच श्री क्षेत्र रामदास पठार. हि जागा म्हणजेच शिवथर प्रांतातील सुंदर मठ वा समर्थांच्या वास्तव्याची जागा हे निश्चित.

हे पत्र इतिहास संशोधक श्री सेतू माधव पगडी यांनी आपल्या समर्थ आणि समर्थ संप्रदाय या पुस्तकात आणि लोकसत्ता मध्ये समर्थांचा दिव्य संदेश ह्या लेखात प्रसिद्ध केलं होत.

श्री शंकर श्रीकृष्ण देव समर्थ सांप्रदायाचे गाढे अभ्यासक आणि संकलक यांचे हे अपूर्ण राहिलेल काम संशोधक श्री अरविंदनाथजी महाराज यांनी पूर्णत्वास नेलं. " शिवथर हा पूर्वीचा तालुका होता. ह्या तालुक्यात हि घळ होती म्हणून ह्या घळीस "शिवथरची घळ म्हणत हे संशोधनातं स्पष्ट केलं.

समर्थांनी आनंदवनभुवनी या काव्यात वर्णन केलेलया स्थान माहात्म्य ची जागा संपूर्ण जगतास गुप्त असलेली तिचा प्रगट होण्याचा काळ येता ती प्रगट झाली. संतांच्या वास्तव्याने "सिद्ध " असलेली हि जागा प्रगट करण्यास हि त्याच अधिकार असलेली थोर व्यक्ती लागते. जस संत ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीच्या "सिद्ध" ठिकाणाच संशोधन ३५० वर्षानंतर संत एकनाथ महाराजांनी संत नामदेव यांच्या अभंगाचा आधार घेऊन केला व ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ सर्व जगतास भेट दिला. येथे संतांच्या वाङ्मयाचा अर्थ संतच जाणतात हे समजलं . त्याच प्रमाणे समर्थ वास्तव्याने "सिध्द" असलेली हि जागा काळाच्या ओघात गुप्त असलेल हे स्थान आज ३३३ वर्षांनी सदगुरु अरविन्दनाथ महाराज यांनी सर्वांसाठी प्रगट केलं आहे. व हीच खरी शिवकालीन शिवथरप्रांतातील शिवथर घळ असे प्रगट गुह्य बोले ह्याची प्रचिती आपणास येते. हा शोध लागण्यापूर्वीपासून सद्गुरू सदगुरुअरविंदनाथ महाराज व त्यांमागील सहा पिढ्या (अनुक्रमे सदगुरु दर्यानाथ, सागरनाथ,भगवाननाथ, रघुनाथ , राजारामनाथ , गणेशनाथ , अरविंदनाथ महाराज समर्थांच्या ह्या पावन भूमीत रामदास पठार येथे परमार्थ सेवेत अविरत कार्यरत आहेत . त्या सर्व महापुरुषांच्या तपाच्या सामर्थ्याने हे संशोधन घडून आलं असं म्हणावं लागेल.

तुका म्हणे येथे न चाले तातडी। प्राप्तकाळघडी आल्यावीण।

संपूर्ण भारत वर्षात समर्थांचे जेवढे मठ होते त्या सर्व मठांचा 'सुंदरमठ रामदास पठार' हा मुख्य मठ होता. ह्या मठाचे दोन भाग आहेत. त्यापैकी एक 'सुंदरमठ रामदास पठार' असून दुसरी संशोधित 'शिवथर घळ' आहे.हि 'शिवथरची घळ' या 'सुंदर मठ रामदास पठार' चा हिस्सा असून दक्षिणाभिमुख आहे. येथून प्रताप गडाच्या पायथ्याशी असणारी श्रीरामवरदायिनी देवी घळीच्या समर्थांच्या आसनासमोर दिसते. (संदर्भ सन्निध राम वरदायिनी )

संपूर्ण भारत भ्रमण करताना समर्थांनी मोगलांपासून धोकादायक असणारा कृष्णा आणि गोदावरीचा परिसर वगळून समर्थ 'सुंदर मठ रामदास पठार' संशोधित 'शिवथर घळ' वास्तव्यास आले.
समर्थांनी हि जागा निवडण्याचं कारण तेव्हाच्या परिस्थितीत सुरक्षितेच्या दृष्टीने हि योग्य होती. येथे चारही बाजूने खंदक आहेत मध्ये गड नाही आहे. इकडे येणाऱ्यास एकाच बाजूने मार्ग आहे तो म्हणजे पारमाची. हे स्थान पठारावर आहे म्हणून त्याला गडासारखा कडा नाही.पण कड्याचे संरक्षण असणारे डोंगर चतुरस्त्र आहेत. कडा असेल तर त्यावर लक्ष ठेवता येत. म्हणून समर्थांच्या हालचाली कोणाला टिपता येत नव्हत्या.

छत्रपती शिवाजी महाराज व कल्याण स्वामी यांचे पत्रांवरून समर्थ रामदास स्वामी यांचे वास्तव्य सुंदर मठ-रामदास पठार या गावात झाले हे समजले . संशोधक श्री अरविंदनाथजी महाराज यांच्या संशोधनातील शिक्कामोर्तब करणारी दुसरी पायरी म्हणजे या गावातील जागांचे पूर्वापार नोंदी असलेली महसूल विभागातील नाव . ते पाहता असे आढळून आले कि रामदासपठार या गावातील मंदिराची जागा जी साधारणत: तीन गुंठे आकाराच्या पायाच्या बांधकामासह अस्तित्वात आहे. या जागेस ब्रिटीश काळापासून 'टॅक्स फ्री' स्वरूप आहे म्हणजेच कायमस्वरूपी धारामाफी देण्यात आली आहे. आणि महसूल विभागाच्या सातबारा उता-यात ह्या जागेचा मठाचा माळ असा उल्लेख आढळतो. शिवाय येथे जांभळीच्या चौथरियावर या उल्लेखानुसार जांभळीचा माळ असा उल्लेख असलेला आणि त्यावर जांभळीची झाडे साडेतीनशेहून अधिक वर्षांपूर्वी एका रेषेत बाग केल्याप्रमाणे लावल्याचे आढळून आले आहे.

व संशोधित शिवथर घळ ह्या जागेस हि भटाचा माळ आणि घळीलगत असलेल्या धबधबाच मठाचा माळ असा उल्लेख आहे. विचार करण्याची गोष्ट आहे एका वनातील डोंगरातल्या गुहेच्या बाजूवरील धबधब्याला मठाचा माळ का उल्लेख असेल आणि तो मठ कोणाचा असेल हे शिवाजी महाराजांच्या पत्रावरून आणि समर्थाच्या स्फुट काव्यावरून स्पष्ट होत. संशोधित 'शिवथर घळ' आणि 'सुंदर मठ' रामदास पठार दोन्ही मिळून एकच मठ होता.मौजे पारमाची, रामदास पठार,पडवी पठार मिळून या मठाचे एकूण क्षेत्रफळ सुमारे हजारो एकर इतके होऊ शकेल. या संशोधित 'शिवथर घळीच्या भौगोलिक चतुःसिमा देखील समर्थ वाड्मयात आढळतात.

खनाळाच्या रचनेची माहिती.

घळीचे प्रवेशद्वार हे दक्षिणमुखी असून साडे चार बाय नऊ फूट उंच आहे. प्रवेशद्वाराची भिंत तीन फूट रुंदीची असून एकूण लांबी २२ फूट आहे . ह्या भिंतीत समोरील बाजूस दोन खिडक्या व दोन देवळी कोनाडे आहेत. घळईत एकूण चार दालन आहेत त्यातील दोन चौकोनी मोठे हॉल तर दोन लहान खोल्या आहेत. व त्यांच्या मधील भिंती हि पाच फूट उंच आहेत. प्रवेशद्वारातून आत प्रवेश करता १५ फुटावर समर्थच्या बसण्याच सिहासन साडे तीन फूट रुंदीचे आहे. दुसऱ्या दालनात देवतार्चनाची जागा आहे. त्याच्या बाजूला दिवा ठेवण्यासाठी कोनाडे आहेत. घळीच्या आतील आकार रामधनुष्याप्रमाणे आहे. व आतील उंची ९ फूट आहे. या घळीचे आतील चटई क्षेत्रफळ ११०० चौरस फूट आहे.

या हजारो एकरात समर्थांनी संशोधित 'शिवथर घळ' वरंध कुंभारकोंड आणि 'सुंदर मठ' रामदास पठार या स्थानावर वास्तव्य केलेल्याच्या सर्व महसुली खुणा, चतुःसीमा व तेथील शेतकऱ्यांचा शेतींचा सातबारा आणि फेरफार हा तहसिल कार्यालयात पहावयास मिळतो.
खणाळा मध्ये जाउनी राहे। तेथे कोणीच नाही पाहे।। सर्वत्रांची चिंता वाहे। सर्वकाळ।।
(संदर्भ दासबोध १५ x २ x २३) किंवा
समर्थे पर्वती केले एक गुप्त सदन। प्रसंगे ठेवावया देवार्चन।।
सूर्य प्रकाश उदक सन्निध उर्ध्व गमन। मार्ग सोपान करून जावे।।
(संदर्भ समर्थ प्रताप ग्रंथात (७ x ४))
समर्थ रामदास स्वामींच्या या सदनाचे वर्णन केले आहे. हे सदन पर्वतावर आहे, गुप्त आहे, तेथे प्रसंगी देवार्चन म्हणजेच देवघर ठेवता येते, सूर्यप्रकाश सन्निध आहे, म्हणजेच या गुप्तसदनाचे द्वार दक्षिणमुखी पूर्व-पश्चिमेचा उगवतीचा व मावळतीचा सूर्यप्रकाश समोर आहे, उदक म्हणजे या जलप्रपातास समोर ठेऊन उर्ध्वगमन म्हणजेच उर्ध्व दिशेने जावे आणि यासाठी मार्ग सोपा करून सोपान म्हणजे शिडीसारखे चढून जावे, अशी वर्णनानुरूप परिस्थिती आढळते

संशोधित 'शिवथर घळ व सुंदर मठ रामदास पठार चा उल्लेख केलेला हाच तो निश्चित असणारा दासबोधाची संशोधित जन्मभूमी शिवथरघळीचा पत्ता आपणास आढळून येतो. या हजारो एकराच्या परिसरात आपणांस समर्थानी बांधलेले रस्ते, संशोधित शिवथर घळीच्या बाहेर खडकात कोरलेल्या पायऱ्या आणि पिण्याच्या पाण्याच्या टाक्या (बावी), पोखर्णी झरे (गुप्तगंगा ) देवार्चना साठी देवघर, मठाची शेती, डोंगर (देवगिरी), दऱ्या (घळीच्या दरा) संरक्षणासाठीच्या चौक्या (पारमाची , गोविंद माची ) परिसराची प्रचलित नावे, अनुष्ठानाच्या जागा (जप तप अनुष्ठाने आनंदवनभुवनी), फळबागा (बोरीचा माळ, जांभळीचा माळ, उंबराचा माळ, फणसीचा माळ), पहिला सार्वजनिक गणेशोत्सवासाठी जो मंडप केला होता (तो मंडपाचा माळ ) , औषधी वनसंपदा, घळीच्या शेजारील ११ एकर वन (धावड्याच्या डिंकाचे वन ), जुन्या वेशींची ठिकाणे (धारमंडप ) छत्रपती शिवाजीराजे समर्थांच्या भेटीस ज्या रस्त्याने आले तो राजमार्ग (घोडेउडान) समर्थांकरिता छत्रपती शिवाजीराजांनी हुकूम देऊन वसवलेली 'राम नगर' बाजार पेठ (संदर्भ - राजांचे अस्सल पत्र भाद्रपद व।।. ८ सन १६७५ ) आणि उघड्या डोळ्यांनी पाहिले असता आणखी बरेच काही आपणांस आढळून येते.

'आनंदवनभुवनी' या काव्यातच संशोधित 'शिवथर घळ' आणि 'सुंदर मठ' रामदास पठार वरील समर्थांच्या वास्तव्याच्या तंतोतंत सर्व खुणा जश्याच्यातश्या आजही आढळून येतात. 'आनंदवनभुवनी' या काव्याचे धृपद म्हणजेच वरंध कुंभारकोंड येथील संशोधित 'शिवथरघळ' आणि 'सुंदर मठ' रामदास पठार हे ठिकाण आहे असे प्रत्यक्ष त्या ठिकाणी अनुभवास येते

‘सार्वजनिक गणेशोत्सव’

समर्थ संप्रदायाच्या ग्रंथराज दासबोधाचा आणि समर्थ रचित सुखकर्ता दुःखहर्ता ' वार्ता विघ्नाची' या आरतीसह समर्थांच्या सर्व ग्रंथांचा जन्म इथे झाला. अफजल खान छत्रपती शिवाजीराजांना मारण्याकरिता विजापूरहून निघाला (सन १६५८) ह्या विघ्नाच्या वार्तेचा संदर्भ या आरतीमध्ये सुरवातीस आला आहे. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची! नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची आणि संकटी पावावे अशी आर्त प्रार्थना छत्रपती शिवाजीराजांकरिता समर्थ रामदास स्वामी या आरतीच्या अखेरीस करताना आढळतात. दास रामाचा वाट पाहे सदना ! संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना! हि आरती म्हणजे समर्थांचा शिवाजीराजांच्या जीवावरील संकट दूर होण्याकरिता गणपतीला केलेली आर्त होती.

अफजलखान विजापूरहून निघाला तेव्हा आलेलं स्वराज्यावरील संकट या घटनेचा समर्थ आनंदवनभुवनी या काव्यात सुद्धा उल्लेख करतात

विजापूरहून प्रतापगड पर्यंत येताना हिंदवी स्वराज्यावर केलेला अत्याचार

स्वधर्मा आड जे विघ्ने |ते ते सर्वत्र उठिली | लाटीलीं कुटीली देवी | दापिली कापिली बहु ||९ ||
विघ्नांच्या उठिल्या फौजा | भीम त्यावरी लोटला | धर्डीली चिरडीली रागे |रडवीली बडविली बळे ||१०||
हाकीली टाकिली तेणे | आनंदवनभुवनी |हांक बोंब बहु झाली | पुढे खतल मांडिले ||११ ||

तो थांबवण्यासाठी खुद्द शिवाजी महाराज सज्ज झाले :

खोळले लोक देवाचे | मुख्य देवची उठिला |कळेना काय होते रे | आनंदवन भुवनी ||१२ ||

स्वराज्यावरील म्हणजेच शिवाजी महाराजांवर आलेलं संकट. आणि या निर्वाणाच्या प्रसंगातून राजांच रक्षण कर. हे संकट पाहून गणपतीस प्रार्थना केली ती म्हणजे सुखकर्ता दुःखहर्ता हि समर्थकृत आरती.

जे साक्ष देखिली दृष्टी |किती कल्लोळ उठीले|विघ्नांना प्रार्थिले गेलो | आनंदवनभुवना ||८ ||

पुढे अफजलखान याला प्रतापगडाच्या पायथ्याशी मारला त्याच वर्णन

रामवरदायीनी माता |गर्द घेउनी उठिली | मर्दिले पूर्वीचे पापी | आनंदवनभुवनी ||४१||
प्रतेक्ष चालिली राया | मूळमाया समागमे |नष्ट चांडाळ ते खाया | आनंदवनभुवनी || ४२ ||
भक्तांसी रक्षिले मागे | आतां ही रक्षिते पहा | भक्तांसी दिधले सर्वै | आनंदवनभुवनी ||४३ ||

तेव्हा समर्थ आनंदवनभुवनी म्हणजे सुंदर मठ- शिवथर घळ या ठिकाणी होते मोरगाव ह्या ठिकाणी नव्हते हे सिद्ध होत.. म्हणून दास रामचा वाट पाहे सदना असे म्हटले आहे. ह्यातील सदन ह्याचे गिरीधर स्वामी यांनी वर्णन मागे पाहिलेलं आहे

छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर (सन १६७४) समर्थांनी 'सुंदर मठ' रामदास पठार वर सार्वजनिक गणेशोत्सव केला. हाच महाराष्ट्रातील मानाचा आणि शिवाजीराजांकरिता केलेल्या नवसाचा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव होता (सन १६७५). महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात ह्या मूळ गणेशोत्सवापासून झाली. या वक्रतुंड नावाच्या गणपतीच्या नवसाची सांगता करण्याकरिता समर्थानी सुंदर मठावर सार्वजनिक गणेशोत्सव केला.छत्रपती शिवाजी महाराजांकडे या सार्वजनिक गणेशोत्सवाकरिता भिक्षा मागितली.

समर्थे सुंदर मठीं गणपती केला! दोन्ही पुरुष सिंधुरवर्ण अर्चिला!
सकल प्रांतासी मोहछव दावीला! भाद्रपदमाघ पर्यंत!! (समर्थ प्रताप ८ x २).
शिवराजासी अकरा मुष्टी भिक्षा मागो धाडीली! शिवराज म्हणे माझी परिक्षा!
समर्थे मांडिली!अकरा अकरी खंड्या कोठी पाठविली! हनुमान स्वामी मुष्टी लक्षूनिया!!
(संदर्भ समर्थ प्रताप ८ x ३)

ह्या घळीत सन १७४१ ला दुर्मति संवत्सराचा फाल्गुन वद्य दशमीस समर्थ शिष्य दिवाकर गोसावी यांचे नातू यांनी लिहिलेली अनुभवामृताची पोथी मिळाली. त्यात त्यांनी हि प्रत शिवथरचे घळियेस पूर्ण केली असा स्थळ निर्देश आहे. समर्थानी सन १६७६ साली हि घळ सोडली त्यानंतर तेथील वास्तव्याचा हा शेवटचा उल्लेख मिळतो.

‘ऐतिहासिक नावांची यादी’
हा नवलवाडियाचा कोंड, कोड नलवडा किंवा कोड तसेच ताा. सिवतर, पारमाची ची वाडी.शिवथर प्रान्त, शिवथरी, रामदास पठार, नलवड्यांचे पठार किंवा सुंदर मठ म्हणजेच शिवथरची घळ (श्री सांप्रदायाची कागदपत्रे ) आणि आनंदवनभुवनीं अथवा जाम्भळीचा चौथरा या नावाने या स्थानाचे अर्थात 'सुंदर मठ रामदास पठार' व संशोधित 'शिवथर घळ वरंध कुंभारकोंड' चे वर्णन इतिहासात छत्रपती शिवाजीराजे, रामदास स्वामी आणि कल्याण स्वामी यांनी केले आहे असे ऐतिहासिक कागद शंकर देव धुळे यांच्या समर्थ वाग्देवता मंदिराच्या बाडात पहावयास मिळतात.

‘अशिर्वाद’

हि सिद्धभूमी समर्थ संप्रदायाचा जिवंत इतिहास आहे. येथे हरिभक्त जन्मास येतील असा आशीर्वाद

समर्थांनी रामदास पठार सुंदर मठाच्या हया भूमीस दिला आहे तो प्रचितीला येतो.

कोनेरीपंत मल्लारीपंत भक्त भोळे।
ज्यांहि मूळसाडे टाळ मृदांग वाजवीत आणिले।
समर्थ ऐकोनि भविष्य पुढील बोलले।
येथे हरिभक्त जन्मतील निर्धारे।।
(संदर्भ समर्थ प्रताप ११ x १४ )

संशोधित 'शिवथर घळ आणि 'सुंदर मठ' रामदास पठार चे हे संशोधन म्हणजे महाडकरांनी महराष्ट्राच्या इतिहासातला भारत मातेच्या शिरपेचात सन्मानपूर्वक खोवलेला हा मानाचा मोत्याचा तुरा आहे.चंद्र-सूर्य असे पर्यंत हा तुरा शेषाच्या मस्तकावरिल नागमण्याप्रमाणे चमकत राहील आणि समर्थांच्या चरित्राचे मार्गदर्शन करील.!!

‘उपसंहार’

मागील १०० वर्षातील कोणत्याही समर्थ चरित्रात या 'सुंदर मठ' रामदास पठार व संशोधित 'शिवथर घळ' या संशोधनाच्या स्थानाची संकलित माहिती आढळत नाही. या माहिती पत्रकाचे आणि आम्ही केलेल्या या संशोधनाचे आपण स्वागत कराल व समर्थांच्या दर्शनास संशोधित 'शिवथर घळ' आणि 'सुंदरमठ' रामदास पठार वर याल अशी श्रीरामाचे चरणी प्रार्थना !
सकळ देवांचिये साक्षी। गुप्त उदंड भुवने। सौख्यासि पावणे जाणें। आनंदवनभुवनी ।।१५।।
वरंध घाटातून पारमाचीमार्गे रामदास पठारहुन आणि वरंध गावांतून या ठिकाणी जाण्यास मार्ग आहे.

संदर्भ ग्रंथ

छत्रपती शिवाजी महाराज यांनी रामनगर पेठ वसवण्यासाठी दिलेला कौलनामा.
श्रीमत ग्रंथराज दासबोध
समर्थप्रताप
आनंदवनभुवनी
समर्थकृत स्फुट काव्य
शिवकालीन पत्रसार संग्रह भाग १
श्रीसंप्रदायाचे कागदपत्रे खंड १
श्रीसंप्रदायिक विविध विषय
समर्थ आणि समर्थ संप्रदाय - सेतू माधवराव पगडी
राजा शिवछत्रपती - गजानन मेहेंदळे
साधन चिकित्सा - सी के बेंद्रे
ऐतिहासिक टिपणे

श्री अरविंदनाथजी महाराज
+९१-९४२३८९०४३४

IMG_20150117_090507 (2).jpgIMG_20170328_205227.jpgIMG-20170328-WA0097.jpgSHIVTHAR GHAL-Model1.pdf (40.53 KB)
IMG-20170328-WA0099.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users