हसले नाही

Submitted by निशिकांत on 24 March, 2017 - 01:27

पहिले रडणे ऐकून कोणी हसले नाही
जन्मा येउन काय मिळवले कळले नाही

कन्या होणे पाप जगी का इतके असते?
पाप धुवाया गंगाजलही पुरले नाही

नार नवेली आली गेली पेटून मेली
षंढ पडोसी पेटून कोणी उठले नाही

तार सतारीची तुटल्यासम जीवन होते
झंकारावे आतुन ऐसे घडले नाही

कष्ट करावे पोट भरावे रीत जगाची
दुय्यम दर्जा कोणा असणे रुचले नाही

पडवीमध्ये पणती मिणमिण तेवत आहे
गरजेनंतर ज्योत विझवणे पटले नाही

अक्रोशाने पेटून सारे भस्म करावे
भान जगाचे मजला आता उरले नाही

हार जयांची झाली त्यांना हार मिळाले
विजयाची मज नोंद कराया जमले नाही

"निशिकांता" मज आज उमगले सत्य कटू हे
कोणाचेही माझ्या वाचून अडले नाही

निशिकांत देशपांडे मो न ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users