ससुल्याची गंमत

Submitted by रमा. on 22 March, 2017 - 10:50

चुकूनसुद्धा त्या माणसांच्या हद्दीत जायचं नाही
ससोबा होते सांगत पण, ससुल्या ऐकतोय कुठे खुळा

अंधार पडत आलेला, आणि जोर्रात सुटला वारा
ससुल्या घुसला शेतामध्ये, शोधत शोधत मुळा

बघतो तर काय दिसली त्याला ताजी ताजी भाजी
उकरू लागताच तिथे अचानक आली मालकीण आजी

ससुल्याची जाम टरकली, आता काही नाही खरे
घाबराघुबरा होऊन तो पडला एकदम लुळा

आजी बाई थबकली, ससा पाहून हबकली
म्हणाली, "काय रे तुला, भाऊ आहे का जुळा"

घरातून घेऊन आली ससा एक बाहेर
आणि ससुल्यासोबत त्यालाही दिला चांगला आहेर

करकरीत मुळा, आणि गोड, गोड गाजरं
म्हणाली करा आता यावरच साजरं

शेतमालक यायच्या आधी तुम्ही आता निघा
पटकन जा आपापल्या घरी, जा..जा.. पळा.. पळा...

Group content visibility: 
Use group defaults