पण, लक्षात कोण घेतो!!!

Submitted by विद्या चिकणे-मांढरे on 17 March, 2017 - 08:22

परवा ऑफिसला जाताना बालगंधर्वच्या चौकात आले अन सिग्नल लाल झाला, म्हणून मग गाडी बंद करून सिग्नल पुन्हा हिरवा होण्याची वाट बघत उभी राहिले. तेव्हढ्यात साधारण अठरा-एकोणीस वर्षांची मुलगी गर्दीतून वाट काढत, सिग्नलवर थांबलेल्या काही निवडक लोकांना भेटून त्यांच्याशी काहीतरी बोलून त्यांना हातातल्या पुड्यातून एक-एक चॉकलेट काढून देताना दिसली. माझ्यासकट सगळेच 'ती नक्की काय बोलतीये आणि चॉकलेट्स का वाटतीये' या उत्सुकतेने तिच्याकडे बघत होते. अलीकडेच POK मध्ये मोदींनी घडवून आणलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर त्यांच्या समर्थकांनी चौकाचौकात वाटलेली साखर आठवली आणि आजही असंच काहीतरी घडलंय कि काय, म्हणून उत्सुकता अजूनच वाढली. त्या दिवशी साखर वाटणार्यांनी प्रत्येकाला साखर दिली होती पण आजची चॉकलेट्स मात्र काही निवडक लोकांच्याच हातात पडत होती. काय भानगड आहे हे कळायला काहीच मार्ग नव्हता. हळूहळू ती माझ्याजवळ आली आणि हातातल्या पिशवीतून एक चॉकलेट काढून देत मला म्हणाली, 'thank you mam for wearing a helmet.' तिच्या हातातून चॉकलेट घेत तिच्याइतकीच मोठी स्माईल देत मी म्हणाले, 'i wear it for my own safety'. तिने माझ्याकडे पाहून डोळे मिचकावले अन 'but many wont understand' असं म्हणत पुढच्या हेल्मेटधारकाला चॉकलेट द्यायला निघून गेली. घ्या! म्हणजे स्वतःच्या सुरक्षेसाठी तुम्ही हेल्मेट वापरा हेही सांगावं लागतं लोकांना. हेल्मेट नं घालण्याची अनेक भन्नाट कारणं असतात बरं का या लोकांकडे, जसं कि आजूबाजूचे आवाज येत नाहीत, डोकं जड होतं, डोकं दुखायला लागतं, सगळ्यात भारी म्हणजे हेअरस्टाईल खराब होते! अरे, पण डोकंच शाबूत नाही राहिलं तर कसली हेअरस्टाईल अन कसलं काय. सर सलामत तो पगडी पचास, 'पण लक्षात कोण घेतो?'
याआधीही मी बर्याचदा वेगवेगळ्या एन जी वो च्या मुलामुलींनी सिग्नल वर बघितलंय, 'Thank You' नोट्स घेऊन उभे असतात बिचारे उन्हातान्हात. कधी सिग्नल पाळलात म्हणून थँक यु, तर कधी झेब्रा क्रॉसिंगच्या मागे थांबलात म्हणून थँक यु. आणि आज हेल्मेट घातल्याबद्दल थँक यु! बघा, म्हणजे या एन जी वो च्या निस्वार्थी पोरा-टोरांपासून लाच घेणाऱ्या अन नं घेणाऱ्या म्हणजे पावती फाडणाऱ्या पोलिसांपर्यंत सगळेच वेगवेगळ्या पद्धतीने वाहतुकीचे नियम शिकवत असतात, पण 'साम दाम दंड' यातली कुठलीच भाषा नं समजणारे किंवा समजून नं घेणारे महाभाग आहेतच. आणि हो पुण्याच्या नावाखाली सगळे नियम धाब्यावर बसवणारेही कमी नाहीत. एकीकडे कट्टयावर बसून पुण्यातले लोक कसे नियम पाळत नाहीत याची तासंतास चर्चासत्रं रंगवायची आणि दुसरीकडे स्वतः गाडी चालवताना पुण्यात चालतं म्हणत सगळ्या नियमांची ऐशी-तैशी करायची. smile emoticon:)
असो, या नियम नं पाळणाऱ्या लोकांमध्ये अजून एक मजेशीर प्रकार आहे बरं का, तो न्हणजे 'सदैव घाईत असलेले'. समोर चक्क लाल सिग्नल लागलेला असतानाही हे लोक बऱ्याचदा प्य्या-प्य्या करून हॉर्न वाजवतात. पुढे उभे राहिलेल्यांनी सिग्नल मोडून यांचा रस्ता मोकळा करावा किंवा बाजूला सरकून यांना जायला रस्ता द्यावा अशी काहीतरी अजिबो-गरीब अपेक्षा असते बहुदा या लोकांची. मी अशा लोकांच्या हॉर्नकडे मुळीच लक्ष देत नाही, बहिरीचं होते म्हणा ना. ऍम्ब्युलन्स असेल तरंच बाजूला होऊन रस्ता देते. मी सिग्नल पाळते आणि कमीत कमी अशा दहा-पाच जणांना पाळायलाही लावते smile emoticon:). बरं, आता एवढे हॉर्न वाजवूनही हि हालत नाहीये म्हणल्यावर गप्प बसावे कि नाही, तर नाही सिग्नल हिरवा व्हायच्या पाच-दहा सेकंद आधीच पुन्हा हॉर्न वाजवायला लागतात, जणू काही पुढच्या रांगेत उभे राहिलेल्यांना रंगआंधळेपणा आहे आणि हिरवा झालेला सिग्नल त्यांना दिसणारच नाहीये. बरं एवढं करून थांबत नाहीत बरं का हे लोक, सिग्नल सुटल्यावर निघून जाताना अस्सा लूक देतात, जणू अर्धा मिनिट सिग्नलवर उभं रहायला लागल्यामुळे यांचं एखादं ऑस्कर किंवा नोबेल पारितोषिक हुकलं आहे. हे लोक असा लूक देतात ना तेव्हा मला फार भारी वाटतं, अगदीच गुदगुल्या होतात म्हणा ना. आणि नकळत का होईना आपण या लोक्कांना सिग्नल पाळायला लावला म्हणून वेगळाच आनंद होतो. मला एक गोष्ट कळत नाही, कि या लोकांना एवढं महत्त्वाचं काम असतं तर हे लोक वेळेवर का निघत नाहीत घरातून?
हेल्मेट वापरावं, वेळेवर निघावं म्हणजे घाई होणार नाही आणि बरेच अपघातहि टळतील या सगळ्या साध्या आणि स्वहिताच्या गोष्टी, "पण लक्षात कोण घेतो?"
विद्या चिकणे ( मांढरे )

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्यावर मोठं चर्चासत्र घडलेलं आहे मायबोलीवर. हेल्मेट वापरणं हे आपल्याच फायद्याचं आहे हे ही लक्षात न घेता नुसते वाद घालत बसायचं.

http://www.maayboli.com/node/51542

हेल्मेट तर खरोखरच आवश्यक आहे पण त्याने टू व्हीलर चालवणारा सेफ होतोच असे खुप वेळी घडलेल्या अपघातात दिसून येते नाहीये.
Speed matters ...

मायबोलीवर emoticons मराठीतूनच द्यायची सोय आहे. जसे
डोळा मारा --- : डोमा: --> Wink ( फक्त : आणि डो मधे स्पेस नको)
स्मित -- : स्मित: --> Happy
इथे पहा
http://www.maayboli.com/filter/tips#filter-smiley

सहमत आहे. रिक्षावाले तर कमीतकमी वेळात जास्तीत जास्त धण्दा व्हावा म्हणून नियमाची ऐशीतैशी करायलाच टपलेले असतात.

@सायो, तुमच्या रोखठोक प्रतिक्रियेबद्दल आभार! तुम्ही पूर्ण लेख न वाचताच प्रतिक्रिया नोंदवलेली दिसते, कारण हेल्मेट हा फक्त अनेक मुद्द्यांमधला एक मुद्दा आहे, हेल्मेटव्यतिरिक्त इतर गोष्टीही नोंदवल्या आहेत. असो, मी फक्त मला आलेला अनुभव आणि त्यावरचे माझे मत मांडले. त्यावर वाद किंवा चर्चासत्र भरवण्याचा माझा अजिबात हेतू नाहीये. Happy

या विषयावर मी भरपूर डोकेफोड करून घेतली आहे, त्यामुळे ज्यांना वापरायचे आहे ते कुठलेही कारण न देता वापरतात आणि ज्यांना नाही ते काय वाट्टेल ते कारण सांगून नाही वापरत.

हेल्मेट घालणे न घालणे यात स्वत:चा जीव धोक्यात घालणे न घालणे आले. हा बेसिकली ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. एखाद्याला आपल्या कम्फर्टसाठी हेल्मेट न वापरण्याची रिस्क घ्यायची असेल तर आपण त्यावर जबरदस्ती करणारे कोण? मात्र वाहतुकीचे जे नियम न पाळल्याने दुसरयाचा जीव धोक्यात येईल अश्यांना कडाडून विरोध केलाच पाहिजे.

विद्या, हेल्मेट वगैरे ठिक आहे, पण असे रस्त्यावर कुणाकडूनही चॉकलेट घेणे ( आणि ते खाणे ) मला सुरक्षित वाटत नाही.
एखादा बिल्ला वगैरे ठिक आहे, पण खायची वस्तू नकोच.
आणि तशीही सेवाभावी संस्थांना करण्याजोगी इतरही बरीच विधायक कामे आहेत.

विद्या, लेख वाचला पण हेल्मेट ह्या मुद्द्यावरुन इथे घनघोर चर्चा झाल्याचं आठवलं म्हणून लिंक दिली. त्या चर्चेत बाकी मुद्देही आले असू शकतील, कल्पना नाही.

हे सगळे वाचून, निदान मायबोलीवर येणारे "सुशिक्षित" लोक तरी स्वतःच्या व आजूबाजूच्या जनतेच्या सुरक्षिततेसाठी केलेले कायदे पाळतील अशी आशा आहे.

जुन्या व नवीन चर्चा वाचल्यावर कळते की हेल्मेटमुळे सुरक्षितता येतेच असे नाही असे काही लोकांचे मत आहे. अश्या लोकांच्या डोक्यावर आधीच काही आघात झाला असल्यास माहित नाही, किंवा कधीपण डोक्याला अपघात होणे शक्य नाही असे त्यांना वाटत असेल. किंवा एका हेल्मेटने होणारे सर्व अपघात टळत नसतील तर त्याचा काय उपयोग असे त्यांना म्हणायचे असेल. मला माहित नाही.

मला एव्हढे बरेचदा ऐकीवात आले आहे की हेल्मेट घातल्याने अपघातात डोक्याला जबरी जखम व त्यातून उद्भवणारे इतर प्रॉब्लेम्स टळले असे बर्‍याच डॉक्टरांनी सांगितले. तीच गोष्ट चार चाकी तल्या सीट बेल्ट्स ची. गाडीतून समोरच्या काचेतून किंवा दरवाजातून बाहेर फेकल्या जाऊन इतर गाड्यांखाली येऊन जास्त वाईट परिस्थिती होऊ नये किंवा चालकाचा गाडीवरील ताबा सुटू नये व त्यामुळे गाडी भलतीकडेच जाऊन निरपराध लोकांना अपघात होऊ नये, या साठी सीट बेल्ट्सचा उपयोग झाल्याच्या घटना आहेत.
अपवाद असतातच - पण साधारणपणे फायदा जास्त की तूट याचा हिशेब करता सीट बेल्ट्स व हेल्मेट आवश्यक आहे असे दिसते.

सगळे काही मानण्यावर आहे. धडधडीत समोर दिसणार्‍या पुराव्यावर शंका घेऊन तर्क चालवून ते खरे नाही असे म्हणणारे अनेक शूर व हुषार लोक असतात. त्यांच्याशी वाद घालून उपयोग नाही.
कित्येकांना तर मी कायदा पाळत नाही किंवा पकडल्या गेलो तरी लाच देऊन सुटका करून घेऊ शकतो यातच शूरत्व, मोठेपणा व हुषारी आहे असे वाटते.
बाकी हॉर्न देऊन परिस्थिती किंवा समोरचा दिवा कसा लवकर बदलतो याचे काही अनुभव कुणाला आले आहेत का?
ही सगळीकडे गरज नसताना सुद्धा मोठमोठ्याने वारंवार हॉर्न देण्याची पद्धत भारतात जेव्हढी पाहिली तेव्हढी इंग्लंड, अमेरिका किंवा ऑस्ट्रेलियामधे दिसली नाही.

खरंच.. माझ्या सोबतचे काही आहेत जे हेल्मेट असल्यामुळे वाचले.. हेल्मेट नसता त्यावेळी तर त्या अपघातानंतर आज ते सोबत नसते.

अत्यावश्यक आणि जाणीवपूर्वक हेल्मेट वापरले पाहिजे Happy