खेळ ती खेळून गेली

Submitted by निशिकांत on 16 March, 2017 - 04:17

भावनांशी खेळ ती खेळून गेली
त्या निमित्ताने घरी येवून गेली

मी सुगंधी फूल देता, हासली ती
आपुला दरवळ इथे सोडून गेली

भेटल्या नजरेस नजरा त्या क्षणाला
काळजावर ती छबी गोंदून गेली

थरेथरे तृण पेलुनी ओझे दवांचे
आठवांचा भार ती सोडून गेली

जीवनाच्या सांजवेळी का अचानक?
रामप्रहराची बिजे पेरून गेली

जाणतो वाटा जरी दाही दिशांच्या
आकरावी ती दिशा दावून गेली

ना कधी श्रावण बरसला अंगणी पण
मृत्तिकेला गंध ती देवून गेली

पाहुनी अंधार माझ्या भोवताली
आठवांचे काजवे ठेवून गेली

शांतशा "निशिकांत"च्या ती जीवनी का?
भावनांची वादळे उठवून गेली

निशिकांत देशपांडे. मो. क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कावेरी,
अजून स्वतंत्र कार्यक्रम केला नाही. पण एक तासाचा गझल आणि कव्यवाचनाचा कार्यक्रम घेऊ शकतो.

>>>थरेथरे तृण पेलुनी ओझे दवांचे
आठवांचा भार ती सोडून गेली

पाहुनी अंधार माझ्या भोवताली
आठवांचे काजवे ठेवून गेली>>>क्या बात!