हळद

Submitted by संतोष वाटपाडे on 8 March, 2017 - 01:56

घोड्यावरती बसुन येइल तिला न्यायला दारी गं
लाजलाजरी नवरीबाई हवी दिसाया गोरी गं
गालावरती भाळावरती अन कानाच्या खाली गं
हळूच लावा हळद सयांनो करा जराशी ओली गं..

नाजुकसाजुक हातामधला चुडा का बरे बावरला
कसली घाई कसली धांदल कुण्या भितीने घाबरला
दोन खणांची सजलीधजली वाट पाहते खोली गं
हळूच लावा हळद सयांनो करा जराशी ओली गं..

हळदीने माखुनी चमकते पैंजण पिवळे पायाचे
मेंदीच्या हातावर दिसते नाव कोरले रायाचे
कुडकुडत्या पिवळ्या देहाची कळते आहे बोली गं
हळूच लावा हळद सयांनो करा जराशी ओली गं..

वाजंत्री चौघडे वाजती स्वप्न चिंब पापणीवरी
हळदीच्या हाताने गाली चिमटा काढा कुणीतरी
चिडका बिब्बा असूनसुद्धा खुले मोगरा गाली गं
हळूच लावा हळद सयांनो करा जराशी ओली गं...

नको तिथे गुदगुल्या थांबवा नका सतावू नवरीला
वरमाईची स्वारी आली डोलत ठुमकत हळदीला
तिच्यामागुनी ननंद नकटी.. आली आवरा... आली गं
लवकर लावा हळद सयांनो वेळ पुजेची झाली गं

-- संतोष वाटपाडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users