हरवलेली कविता

Submitted by सई केसकर on 4 March, 2017 - 02:26

माझ्या लेखनाची सुरुवात कवितांनी झाली. मी तेव्हा पाचवीत होते. नुकतीच माझी शाळा बदलली होती. आणि नवीन शाळेत मला कुणीच जवळचं असं नव्हतं. ना मैत्रिणी, ना आवडत्या बाई (किंवा ज्यांची मी लाडकी असीन अशा बाई), ना आवडणारं एखादं बाक किंवा एखादी कोपऱ्यातली डबा खायची जागा. माझ्या सवयीचं आणि आवडीचं असं नव्या शाळेत काहीच नव्हतं. दर सोमवारी सकाळी, अंथरुणातच माझ्या छातीवर एक मोठ्ठा, काळा ढग येऊन बसायचा. आता उठून आवरून परत त्या रुक्ष इमारतीत जायचं, या विचारानी डोळे उघडायच्या आतच त्यात काठोकाठ पाणी भरायचं. ते वर्ष माझ्यासाठी खूप कठीण होतं. आणि कदाचित त्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी मी कविता करू लागले. लिहिल्यावर आपल्याला बरं वाटतं, हे मला तेव्हा कळायला लागलं. आणि मनात आलेले सगळे विचार लिहून ठेवण्यापेक्षा, ते असे छान कवितेत गोंडस बनवून ठेवले की कंटाळवाणे वाटायचे नाहीत.

सुरुवातीला बरेच महिने मी नुसतीच कविता वहीत लिहून ठेवायचे. मग काही आई बाबांना खूप आवडलेल्या कविता, कोल्हापूरला आजीला पाठवायचे. त्यावर तिचे, तिच्या सुवाच्य मोत्यासारख्या अक्षरात, अभिप्राय आणि कौतुक यायचे. तोच माझा आधार होता. मग शाळेतल्या मराठीच्या बाईंना एकदा भीत भीत मी माझी वही दिली. ती द्यायच्या आधी, कितीतरी दिवस मी ती कशी द्यायची याचा आरशासमोर उभी राहून सराव केला होता. मराठीच्या इनामदार बाई फटकळ आणि रागीट म्हणून प्रसिद्ध होत्या. पण मी मराठीतच कविता करत असल्यामुळे त्यांनाच "माझ्या साहित्याची" पारख करता येणार असा ठाम विश्वास मला कुठूनतरी आला होता. त्यांचा मूड चांगला असलेल्या तासानंतर मी त्यांच्यामागून पळत पळत बाहेर गेले आणि त्यांच्या हातात माझी वही टिकवली. "या वहीत मी केलेल्या कविता आहेत. तुम्ही त्या वाचाल का?", एवढी दोनच वाक्य म्हणताना माझा आवाज आणि पाय दोन्ही थरथरत होते. लठ्ठ चष्म्यातून माझी वही न्याहाळत, त्यांनी, "हो वाचीन की!", असे गोड उत्तर दिले, आणि त्या वही घेऊन गेल्या.

चार पाच दिवस मराठीचे तास झाले. माझ्या वाहीबद्दल काहीच अभिप्राय आला नाही. आणि वहीदेखील आली नाही. त्या कुठेतरी वही विसरल्या असतील का अशी शंका मनात येऊन गेली. पण मला त्या सगळ्या पाठ असल्यामुळे तसं होण्यामुळे फारसं वाईट वाटलं नसतं. धास्ती होती ती काहीच अभिप्राय न येण्याची. किंवा विसरलं जाण्याची. शाळेत माझी आठवण ठेवेल असे कुणीच नव्हते. मोजक्या मैत्रिणी, आणि त्याही एकमेकींच्या पट्टमैत्रिणी. पण पाच दिवसांनी बाईंनी वर्गातच वही परत दिली. सगळ्यांसमोर, "सई, ही तुझी वही", एवढेच बोलून ती त्यांनी पुढे केली. आणि माझ्या बाकापासून त्यांच्या टेबलपर्यंत चालत जाताना मला आपण अदृश्य का नाही झालो असे सारखे वाटत राहिले. बाईंनी मी जशी त्यांना बाहेर वही नेऊन दिली तशीच परत द्यायला हवी होती असे सारखे वाटत राहिले. घरी येऊन मी वही उघडली. प्रत्येक कविता वाचून त्यातल्या शुद्धलेखनाच्या चुका बाईंनी दुरुस्त केल्या होत्या. आणि काही काही कवितांच्या खाली शाब्बास असा शेरा दिला होता. ती वही मी पुन्हा पुन्हा बघितली. आणि त्यानंतर माझ्या थोड्या कविता लिहून झाल्या की मी अभिमानाने ती वही सगळ्यांसमोर बाईंना नेऊन द्यायचे.

मग हळू हळू इंग्रजीमध्ये सुद्धा असे छोटे छोटे लेखनाचे उपक्रम मी चालू केले. आणि सातवीत, म्हणजे शाळा बदलून दोन वर्षं होताना, एका सहामाईत इंग्रजीच्या बाईंनी माझा पावसावरचा निबंध सगळ्या वर्गाला वाचून दाखवला. त्या दिवशी मी पोट दुखतंय अशी थाप मारून घरीच बसले होते. कारण मला माझ्या गणिताच्या मार्कांची प्रचंड काळजी वाटत होती. गणिताचे पेपरसुद्धा वाटले गेले. आणि त्यात मला पन्नास पैकी फक्त बत्तीस मार्क पडले होते. पण दुसऱ्या दिवशी मात्र, सगळ्या वर्गात मी इंग्रजीची निबंधवाली म्हणून प्रसिद्ध झाले होते. तरीसुद्धा बत्तीस मार्कांचे दुःख हलके झाल्यासारखे काही वाटले नाही. त्या दिवसानंतर दहावीपर्यंत, मला आयुष्यभर टिकून राहणारे मित्र मैत्रिणी मिळाले. आणि आजही, ही मैत्री सुरु कशी झाली, हा विचार केला की मला इंग्रजीचा तो निबंध आठवतो.

भारतातून ऑस्ट्रेलियात स्थित्यंतर करताना पुन्हा मला कवितांनी सावरले. तसेच पुन्हा अमेरिकेत गेल्यावरही कवितांचा आधार घ्यावा लागला. आणि दोन्ही वेळच्या स्थित्यंतरांमध्ये, पुन्हा एकदा युनिफॉर्ममधल्या वही पाठीमागे लपवलेल्या सईची भेट झाली. पण वही आणि बाई यांची जागा वेगवेगळ्या माध्यमांनी घेतली होती.
या सगळ्या (सेंटी) आठवणी लिहिण्याचे कारण असे, की हल्ली मला कविता फक्त माझ्या मुलाच्या बडबडगीतांमध्ये भेटते. आणि आपण कविता का करत नाही, किंवा हल्ली आपण बरे वाटण्यासाठी कवितेचा आधार का घेत नाही असा विचार केल्यावर लक्षात येते ते असे, की हल्ली अशा टोकदार भावनाच मनात येत नाहीत.

प्रेमं करताना आणि प्रेमभंग होताना, कविता फार जवळची वाटते. पण प्रेम करण्यातला आणि लग्न होण्यातल्या फरक देखील ही कविता आहे. प्रेम कविता आहे. आणि लग्न? लग्न झाल्यावर कवितेचे रूपांतर इंस्ट्रक्शन मॅन्युअलमध्ये होते. अगदीच असे रुक्ष नसले, तरी असे म्हणता येईल की लग्नातली कविता शोधायला, प्रेमात असताना वाटत असलेल्या प्रेमापेक्षा, कितीतरी अधिक प्रेमाची आणि संयमाची गरज असते. तसे होईपर्यंत कदाचित लग्नासाठी कविता सुचत नसावी.

एकूणच आयुष्यातले मानसिक स्थैर्य आणि ऐहिक सुबत्ता कवितेला लाभत नसावी. किंवा कदाचित या सगळ्याला सामावून घेऊन तीक्ष्ण राहणारी प्रतिभा फक्त साहित्यिकांकडेच असावी. माझ्या सारखे "बरं वाटण्यासाठी" लिहिणारे लोक, बरं वाटायला लागलं की बंद पडत असावेत. इंजिनियरिंगचा अभ्यास करताना ग्रेडिएंट हा शब्द कायम यायचा. दोन टोकांमध्ये असलेला फरक, ज्यामुळे प्रवाह एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जातो, त्याला ग्रेडिएंट म्हणतात. प्रवाहासाठी अशा अस्थिरतेची गरज असते. आणि जेव्हा अशी अस्थिरता नसते, तेव्हा प्रवाहदेखील थांबतो.

यालाच रायटर्स ब्लॉक म्हणत असावेत. ज्यांना लेखन करायला आवडते अशा लोकांचे लेखन कधी वेळ कमी पडतो या सबबीने बंद होत नाही. कारण लेखन आवडणारे नेहमी लेखनाला प्राधान्य देतात. आणि कितीही काम असले तरी लेखनासाठी वेळ काढतात. पण जेव्हा लेखकाकडे काहीतरी छान लिहिण्यासाठी लागणारे मानसिक द्वंद नसते, तेव्हा त्याचा प्रवाह थांबत असावा. गद्य लेखन ठरवून करता येते. जर मनाचे असे काही जमत नसेल तर एखाद्या सामाजिक घडामोडीवर आपले विचार व्यक्त करता येतात. पण कवितेसाठी मात्र विचार आणि भावना दोन्हींची गरज लागते.

सोपे लिखाण करणे खूप अवघड असते. हे देखील मला माझ्या मुलासाठी पुस्तके शोधताना आणि वाचताना जाणवले. जी पुस्तके माझ्या (२ वर्षांच्या) मुलाला पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात ती सगळी पुस्तके मला तो व्हायचा आधी खूप आवडलेली अशी होती. त्यात माधुरी (पुरंदरे) ताईंचे लिखाण पहिल्या क्रमांकावर आहे. खूप वेळा ती पुस्तके वाचून दाखवावी लागल्यामुळे ती एवढी हिट्ट का आहेत याच्यावर साहजिकच विचार झाला. ती सोप्या, आणि नेहमीच्या भाषेत लिहिली आहेत हे पहिले कारण. पण त्यापलीकडे जाऊन त्यातील प्रसंग हे कुठल्याही लहान मुलाच्या आयुष्यात घडणारे प्रसंग असतात. पण पट्टीच्या लेखिकेलाच असे खोलवर निरीक्षण आणि मांडणी (चित्रातूनही) जमू शकते. लहान मुलाला आवडण्यासाठी काही गुण अंगात असावे लागतात. आनंदी लोक लहान मुलांना आवडतात. पण अजून एक खूप महत्वाचा गुण म्हणजे संनवेदनशीलता. सातत्याने चांगले लिखाण करणारे लेखक संवेदनशील असावेत. आणि त्यामुळे ते आजूबाजूच्या जगाकडे सहानुभूतीने बघू शकतात. या सहानुभूतीतूनच, ते एकाच गोष्टीतील विविध पात्रांचे अंतरंग रेखाटू शकतात. सोपे लिखाण हे असेच दुसऱ्याच्या डोळ्यातून जग बघण्याने येत असावे.

कवितेत मात्र, रूपकांच्या साहाय्याने आपल्यलाला कसे वाटते आहे हे वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा जो प्रयत्न असतो, त्यासाठी आपण अनुभवत असलेली भावना पूर्णपणे अनुभवायचे धाडस असावे लागते. आणि ती लिहून वाचकांपुढे मांडण्याचे देखील धाडसच म्हणावे लागेल. कारण गद्य लिखाणाला जेवढा मान मिळतो तेवढा कवितेला मिळत नाही. आणि हल्ली शंब्दांपेक्षा आकड्यांचे वजन जास्ती आहे, हे देखील एक सत्य. पण या सगळ्याकडे दुर्लक्ष करून कविता करत राहणाऱ्यांच्या मात्र आता मला अगदी हेवा वाटतो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंयस. Happy

>>> एकूणच आयुष्यातले मानसिक स्थैर्य आणि ऐहिक सुबत्ता कवितेला लाभत नसावी.
मानसिक स्थैर्यापुरता माझाही तसाच अनुभव आणि मत आहे.

अवांतरः
कुठल्याही निर्मितीमागे अस्थिरता, असंतोष असं काहीतरी असतंच. थोडा 'गॉड कॉम्प्लेक्स'ही असतो - माझ्या भवतालचं काहीतरी मला रुचत नाहीये ना, मग मी माझ्या कलेतून विश्वामित्रासारखी प्रतिसृष्टी निर्माण करायचा प्रयत्न करते.

मला या संदर्भात नेहमी नटराजाच्या मूर्तीचं उदाहरण आठवतं. एका पायावर तोल सांभाळत लयबद्ध निर्मितीत रमून गेलेली ती त्याची मुद्रा हे त्या अस्थिरतेचंच (इम्बॅलन्स) प्रतीक वाटतं मला. दोन्ही पाय टेकवून तो स्थिर झाला तर निर्मिती होईल? Happy

स्वाती, मलाही अगदी हेच उदाहरण आठवलं, आणि तेही तूच मला दिलं होतंस काही वर्षांपूर्वी! ग्रेट! Happy
सई, लेख आवडला. मीही ५वी-६वीत कविता करायचे. चांगल्या करत असेन कारण आई एरवी कधी कौतुक करत नसे, पण तिलाही त्या आवडत. मग सगळं मागे पडलं. आता गोष्टी रचते लेकीसाठी. बाकी मनातलं कागदावर उतरायच्या आधीच काहीतरी बिघाड होतो आणि लिहिलंच जात नाही हल्ली.

सई खूपच छान, हे लेखन वाचताना मध्ये मध्ये माझ्या डोळ्यासमोर मी उभी राहिले Happy
कवितेसाठी मला वाटते टोकाची टोकदार भावना हवी ती असेल दु:खाची किंवा खूप मलमली अशी ,
माझी ही कविता अशीच रुसून बसलीय माझ्यावर Happy

फारच सुंदर लिहिलं आहेस! आवडलंच Happy
एलदुगो मधल्या कुहूच्या भाषेत सांगायचं तर कविता लिहिली जात नाही, 'कविता होते'! आणि तू लिहीलंयस तसं आत कुठेतरी काहीतरी' नॉर्मल' नसतं ना तेव्हाच ती होते! माझ्या ही काही कविता आहेत (आता बऱ्याच दिवसांत काहीच कागदावर उतरलेलं नाहीए ही गोष्ट अलाहिदा) पण दरवेळी नव्या कवितेकडे बघताना मला मी एक माध्यम आहे असं वाटतं. एका अदृश्य स्रोताला आणि हातातल्या कागदाला जोडणारा दुवा! ती कविता माझी असतेही आणि नसतेही!
पण सुख माझ्या कवितेला मानवत नसावे! त्यामुळे नेमाने कविता करणाऱ्यांचा मला हेवा वाटत नाही!

छान लिहिलंय.. आवडला लेख..

बाकी लिखाणासारखा तर आनंद नाही जगात .. आपण आयुष्यातील आनंदाच्या क्षणांचे फोटो काढून ठेवतो, आठवण म्हणून, पण त्यालाही मर्यादा असतात .. लिहून आठवणी जपण्याला त्या मर्यादा नसतात, कुठल्याही आठवणी जपता येतात, शेअर करता येतात, व्यक्त होता येते आणि बरेच काही..

लेख आवडला. अगदी मनापासून लिहिलाय. Happy
आज देवनागरी कीबोर्ड हाताशी आहे, तर मी ही थोडं लिहून घेते.

कवितांचं मला फारसं कळत नाही, पण एकुणच कुठलीही कलानिर्मिती करण्यासाठी इन्टेन्स, टोकदार भावना हव्यात, हे खरं असावं. सतत काहीतरी टोकदार वाटणं, हे तसं बघता त्रासदायकच आहे. त्यामुळे सध्या तुला तसं वाटत नसेल, तर चांगलंच आहे.

मला आजकाल एकुणच काहीही लिहायचा आणि थोड्या प्रमाणात वाचायचाही कंटाळा यायला लागला आहे. आपल्या मनात एक काहीतरी स्टेशन लागलं असतं आणि आपण लिहिताना तेवढंच, त्यासंबंधीच लिहितो. मला तरी रिसर्च पेपर किंवा निबंध लिहिल्यासार्खे सगळे दृष्तीकोन मांडणारे लिखाण करता येत नाही अन त्याची गरजही वाटत नाही. त्यामुळे ते वाचल्यावर ज्याच्या मनात भलतंच काही स्टेशन लागलं असतं, तो अतिशय अनपेक्षित-चमत्कारिक प्रतिक्रिया देतो. हे नैसर्गिक आहे, पण सोशल मिडियामध्ये लिहिल्याने त्या प्रतिक्रिया लगेच आपल्यापर्यंत पोचतात. आणि फास्ट लेनमध्ये चाललेल्या कारला ब्रेक मारल्यासारख्या वाटतात. ते नको वाटतं. सोशल मिडियावरच्या लिखाणाविषयीच नाही तर एकुणच ब्लॉग-कविता वगैरे लिहून फार व्हल्नरेबल वाटतं. म्हणजे का असं इतक्या इझीली कुणाला इतक्या जवळ येण्याची परवानगी द्यायची? हा मला पडणारा प्रश्न आहे, त्यामुळे मी त्या वाटेला जातच नाही. काहीही लिहिलं की थोड्याच वेळात मला ते किती निरर्थक आहे किंवा किती पर्सनल आहे, ते जाणवतं. इथेही मी बरेचदा माझ्या प्रतिक्रिया डिलिट करुन टाकत असते, ते त्यामुळेच. आय कान्ट गिव्ह अवे अ पीस ऑफ मायसेल्फ सो इझीली. कदाचित ही प्रतिक्रिया ही डिलिट करेन नंतर.
त्यापेक्षा रंग आणि रेषा, चिकटकाम असे प्रकार फार रिलॅक्सिंग वाटतात. माझ्याकडे रंगिबेरंगी कागद, हँडमेड कागद, रंग, ग्लिटर, निरनिराळे रंगीत पेनं, मॉड पॉज, ग्लुज, वेगवेगळे ब्रश असं काय काय सतत असतं. रंग-रेषा-क्राफ्ट फार डिसेप्टिव्ह असतात. इतक्या सहज तुमच्या भावना समोरच्यापर्यंत पोचवत नाहीत. सो दे वर्क फॉर मी.