एक होता विदूषक- मला आवडलेला मराठी सिनेमा - नंदिनी

Submitted by नंदिनी on 3 March, 2017 - 05:19

लक्ष्याची कहाणी- एक होता विदूषक

बर्यांचदा मराठी सिनेमांचा विषय आला की, “ह्या! आपल्याला ते लक्ष्याचे चित्रपट अजिबात आवड्त नाहीत हां” असं म्हणणारा हटकून एकतरी सापडतोच. लक्ष्याचे चित्रपट असा जॉनरच तयार होऊन बसला, इतका या अभिनेत्याचा बॉक्स ऑफिसवर दबदबा होता. साधारण नव्वदचं दशक लक्ष्या आणि अशोकनं खरंच गाजवलं होतं. महेश कोठारे, सचिन पिळगांवकर या दिग्दर्शकांनी या जोडगोळीच्या लोकप्रियतेचा पुरेपूर फायदा करवून घेतला. आज हे चित्रपट कितीही बालिश वाटले तरीही त्याकाळी याच चित्रपटांनी तुफान यश मिळवलं होतं हे विसरून चालणार नाही. पण अशोक्-लक्ष्या या जोडगोळीनं त्या काळामध्ये अनेक हिट चित्रपट देतानाच स्वत:च्या अभिनयालादेखील मर्यादा घालून घेतल्या. त्यातही अशोक सराफनं थोड्याफार गंभीर आणि खलनायकी भूमिका केल्या, पण लक्ष्या मात्र त्याच एकसुरी भूमिकेमध्ये अडकून पडला. लक्ष्या वाईट अभिनेता कधीच नव्हता, पण त्यानं चाकोरीबाहेर जाण्याचा प्रयत्न फारसा केला नाही. पण जे प्रयत्न केले ते मात्र अफलातून होते. असाच एक प्रयत्न म्हणजे डॉ. जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केलेला एक नितांतसुंदर सिनेमा - एक होता विदूषक.

हा सिनेमा खरंतर लक्ष्याचीच शोकांतिका म्हणायला हवी. तमाशा कलावंतांपासून ते राजकारण्याच्या हातातलं प्यादं होणारा अबुराव काय आणि प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत असतानादेखील वेगळं काहीच न करायला मिळालेला त्याच त्याच साच्यामध्ये अडकून वैतागलेला लक्ष्या काय... दोघंही एकाप्रकारे कलाकाराची शोकांतिका आहेत. १९९२ साली आलेल्या या एन एफ़ डी सीमार्फत बनवलेल्या चित्रपटामध्ये लक्ष्यानं त्याला जर संधी आणि भूमिका मिळाल्या असत्या तर किती काय करून दाखवलं असतं याची एक चुणूकच दाखवली आहे. ही केवळ एका आबुरावाची कहाणी नाही. ही कहाणी आहे ती एका अस्सल कलावंताची. या कलावंताला कलेच्या बदल्यात यश मिळतं, पैसा मिळतो, त्याचबरोबर येतो तो धूर्तपणा, विकाऊपणा आणि बाजारूपणा. विदूषकाचा मुखवटा चढवला की, लोकांना फक्त त्याचे आनंदी रंग दिसतात. त्याच्या डोळ्यांतले अश्रू कधी दिसतच नाहीत. लोकांना प्रचंड हसवणारा विदूषक कधीतरी मनामधून प्रचंड दु:खी असू शकतो, त्याच्या दु:खावर औषध अस्तं ते म्हणजे केवळ इतरांना देणारं निर्व्याज हसू. आपल्याच या देणगीची जाणीव जेव्हा त्या विदूषकाला होते, तेव्हाच त्याच्यामधला कलाकार सुखावतो, समाधान पावतो.

आबुरावाला “हशीव लेकरा हशीव” म्हणणारा इनामदार बापागत वाटतो ते याचमुळे. आपलं लेकरू कधीच हसत नाही, तिला हसवणं हे आपलं बाप म्हणून कर्तव्य आहे, ते आबुरावाला वाटतं ते याचमुळे. हसणं आणि हसवणं हा तर विदूषकाचा स्थायीभाव. जब्बार पटेलांनी संपूर्ण सिनेमा कुठंही बटबटीत न करता तमाशा, लावण्या, बतावणी, सिनेमाचे शूटिंगचे प्रसंग यातून हा सिनेमा पुढे नेला आहे.

या सिनेमाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तब्बल चार दशकांच्या अंतरानंतर पु. ल. देशपांडे यांनी लिहिलेली पटकथा आणि संवाद. लेखक एखादा सिनेमा लेखणीमधून कसा उतरवू शकतो आणि उत्तम दिग्दर्शक त्या कथेचं किती सुंदर सोनं करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे एक होता विदूषक. अर्थात इतक्या वर्षांमध्ये सिनेमानिर्मिती, तंत्रामध्ये प्रचंड बदल झाले, पण तरीही पटकथा हा सिनेमाचा आत्मा असतो, निर्मीतीतंत्र नव्हे, हे पुन्हा एकदा पटतं. राजकारणी आणि त्यांचा दांभिकपणा हा पुलंचा एरव्हीही अतिशय आवडता विषय. तमाशामधल्या बतावणी आणि गवळणींसारख्या लोककलाप्रकारांचा वापर करत पुलंनी काही फ़र्मास प्रसंग लिहिले आहेत. राजकारण्यांचं बेधुंद वागणं, त्यांची दांभिकता, दुट्टप्पीपणा असं सर्व काही हसत हसत कोपरखळ्या मारल्यासारखं भासवत समोर मांडत जातात. आज जवळजवळ वीस पंचवीस वर्षांनी त्यामधला दांभिकपणा दहापटीनं वाढला आहेच. पण शंभरपटीनं त्यातली दाहकता वाढली आहे. आज बतावणीमधले कृष्ण आणि कंसाचे विनोद म्हणजे “आमच्या भावना दुखावल्या” म्हणत राडे करणार्यांकना आयतं कोलीत!!!

विनोदी अभिनेता म्हणजे वाईट नसतं, किंबहुना तेच अतिशय कठिण अस्तं. लोकांच्या डोळ्यांत बोटं घालून रडवणं फार सोपं असतं, पण कोपरखळ्या मारत गुदगुल्या करून हसवणं तितकंच कठिण. विनोदामधून आपल्या जगाचे इतर आयाम काय आहेत, आणि आपल्या खाम्द्यावरून जर बहुसंख्यत्वाचं आणि शक्यतांचं ओझं दूर केलं तर जग कसे असू शकेल हे लख्ख समजू शकतं. विनोद माणसाला नुसता हसवत नाही, तर जे आहे ते नसेल तर काय होइल याच्या अनेकविध शक्यता मांडून त्यामधली विसंगती दर्शवत जातो ही विसंगती म्हणजेच आपलं आयुष्य. विदूषक या सर्व विसंगतींवर एक रंगीत मुलामा चढवतो. त्याच्या मुखवट्याआड सर्व हीडीस गोष्टी लपवतो आणि आपल्याला रूचेल पटेल आणि भावेल अशा स्वरूपात आपल्याला पेश करतो. आपल्याला हसू येतं ते याच खुबीनं पेश केलेल्या विसंगतीचं. गमतीची गोष्ट अशी की, खुद्द आपण आणि विदूषक देखील जगामधल्या याच विसंगतींचा एक भाग आहोत, आणि ही गोष्ट विदूषक कधीच विसरत नाही.

आज या जगाला हसत हसत सत्य सांगणार्याक विदूषकाची गरज नाहीये, आज या जगाला मसीहाचा मुखवटा धारण करून असत्य सांगणारे नेते हवे आहेत. विदूषक आता लोकांना हसवू शकत नाही, कारण लोकांना हसायचंच नाही, त्यांना केवळ भडकायचं आहे आणि दुसर्यानच्या उरावर बसायचं आहे. येणार्याय उद्याच्या भविष्याच्या स्वप्नांपेक्षा आम्हाला गतकाळच्या दंतकथांमधल्या वैभवाच्या खुणा अधिक भावतात. आताचे राजकारणी केवळ खोटी आश्वासनं देत पैसे खायचे स्वत:च्या तुंबड्या भरणे इतकेच काम करत नाहीत तर गोष्टीमधल्या माकडासारखे दोन बोक्यांमध्ये भांडनं लावून त्यांच्या टाळूवरचं लोणी खायचं काम इमाने इतबारे करतात. कदाचित या प्रेक्षकांना आता कुठलाच विदूषक हसवू शकत नाही!

एका तमासगीराच्या मुलाची ही कथा. बिनबापाचा म्हणून वाढलेला हा मुलगा. मालकाचा अचानक मृत्यू झाल्यावर उघड्यावर पडलेली त्याची आई तमाशाच्या पालामध्ये येते. इथून पुढे चालू होतो त्याचा जीवनप्रवास. अबुराव शाळा सोडतो, आणी तमाशामध्ये सोंगाड्या म्हणून उभा राहतो. लोकांना अह्सवता हसवता नकला करत करत अंतर्मुख करणारे असं बरंच काही तो सांगू पाहतो. तमाशामध्येच नचणार्याा एका सुभद्रेच्या प्रेमात तो पडलाय. पण त्याचं नशीब पालट्तं ते गुणा आणि मेनकाच्या येण्यानं.. गुणा त्याचा शाळकरी मित्र. सध्या आमदार आणि लवकरच मुख्यमंत्री व्हायच्या तयरीत असलेला. गुणा आबुरावला स्वत:चा तमाशा काढायचं सुचवतो. त्याच तमाशाच्या पाचशेव्या शोला प्रमुख पाहुणी म्ह्णून सिनेस्टार मेनका येते. मेनका त्याला सिनेसृष्टीत घेऊन जाते. एकदा प्रेमात होरपळलेली मेनका आबुरावच्या सच्च्या आणि नि:स्वार्थी प्रेमात पडते, ते दोघं लग्न अक्रतात. पण या विजोड जोडीचं वैवाहिक आयुष्य काही सुखासमाधानाचं जात नाही. मेनकाच्या जुन्या प्रियकरामुळे दोघांमध्ये कडवेपणा वाढीला लागतो, मेनका नकळत कबूल करते की तिला आबुराव या व्यक्तीपेक्षा त्यानं चढवलेला सोंगाड्याचा मुखवटा आव्डतो, कारण हा मुखवटा तिला तिची दु:ख विसरायला लावतो. आबुरावाच्या वैयक्तिक पडझडीला इथूनच सुरूवात होते, पुढं सुभद्रेपासून झालेली जाई त्याच्या आयुष्यात येते. जाईच्या येण्यानं संतापलेली मेनका रवीकडे परत निघून जाते, तर दुसरीकडे गुणाच्या सोबतीनं आबुराव राजकारणामध्ये ओढला जातो. इतके दिवस ज्या राजकारण्यांची वस्त्रं तो बतावणीच्या आडून फेडत होता, आज तोच आबुराव तसलाच एक दुटप्पी राजकारणी बनतो. अर्थात, या राजकारण्यांचे हात त्याहून जास्त पोचलेले आहेत. निवडणुकीच्या रॅलीमध्ये गुणा आबुरावला नशा करून भाषणासाठी उभा करतो, ते आबुरावच्जा तब्बेतीला झेपत नाही, आणि त्याला हार्ट ऍटॅक येतो. प्रेक्षकांत बसलेली जाई दिसताच अबुराव भाषणाऐवजी बतावणी सुरू करतो आणि जाई पहिल्यांदा हसते. “हशीव लेकरा हशीव” म्हणणारा इनामदार जणू आबुरावला पुन्हा एकदा दिसतो. आपल्या स्वत:च्या सुखदु:खापेक्षा दुसर्यालकडं हसवायची असलेली आपली ताकद आबुरावच्या लक्षात येते, आणि सिनेमा त्याच्या आणि जाईच्या निर्व्याज स्मितहास्यावर संपतो.

हा सिनेमा जितका आबुरावाचा तितकाच त्याच्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांचादेखील. सिनेमामधली ही आबुरावची आई केवळ एकटी “सिंगल मदर” नाही. मंजुळाची बहिण इतकंच काय आबुरावची प्रेयसीदेखील. गंमत बघा हं, आबुराव “बिनबापाचा” असल्यानं आपण त्याला सहानुभूती देतो, तोच आबुराव नंतर पुढं आपल्या प्रेयसीला पूर्ण विसरून निघून जातो आणि त्याची प्रेयसीदेखील “सिंगल मदर” म्हणूनच पुढे आयुष्य कंठते. अर्थात, त्या मुलीच्या संगोपनाची जबाबदारी मात्र आबुराववर येतेच.

आबुरावाच्या आयुष्यात आलेली अजून एक स्त्री म्हणजे मेनका. ती त्याला सिनेसृष्टीच्या मोहमायेत घेऊन येते. इथल्या पैसाप्रसिद्धी आणि ग्लॅमरमध्ये आबुराव वाहवत जातो. यामधून बाहेर पडायला त्याला रस्ता मिळत नाही—म्हणून तो स्वत: दिग्दर्शनामध्ये उतरायचं ठरवतो. त्याचा पहिला सिनेमादेखील तमाशावर आधारित आहे. अख्खं आयुष्य तमाशाच्या फडामध्ये काढलेल्या लावणीवरचे फिल्मी नाच पटत नाहीत, रूचत नाहीत. मेनकाच्या आणि आबुरावच्या नात्यामध्ये इथून ठिणगी पडते. आबुराव नाचण्यासाठी दुसरी कलाकार आणतो. अर्थात लावणीशी इमान राखणारी कलाकार.

एक होता विदूषक या सिनेमाबद्दल बोलायचं आणि त्यामधल्या गाण्यांबद्दल बोलायचं नाही, असं म्हटलं तर तो घोर अन्याय ठरेल. आनंद मोडकांचं संगीत, ना. धों महानोरांची गीतं आणि रविंद्र साठे, आशाभोसले यांचा दमदार आवाज हे सर्व कॉंबिनेशनच खतरनाक आहे. त्यातही भर तारूण्याचा मळा, भरलं आभाळ पावसाळी पाहूणा सारख्या लावण्या चित्रपटाची जान आहेत. वैशिष्ट्य हे की, इथं गाणी यायची म्हणून येत नाही. हलके हलके कथेला पुढे घेऊन जातात. लाल पैठणी रंग माझ्या चोळीचा सारखी लावणी आबुरावाचं तमाशाबद्दल, कलेबद्दलचं वाढत जाणारं पॅशन दाखवते, तर तुम्ही जाऊ नका हो रामा ही लावणी अशा वेळी येते जेव्हा आबुराव सिनेमासृष्टीत निघाला आहे.

लावणी म्हट्लं की शृंगार आलाच. पण नृत्यदिग्दर्शिका लक्ष्मीबाई कोल्हापूरकर आणि मधु कांबीकर या दोन्ही लावणीसम्राज्ञींनी एकही लावणी “चीप” होऊ दिलेली नाही हे त्यांच्या कलेचं यश. लक्ष्मीबाई कोल्हापुरकर यांना या सिनेमासाठी सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शनाचं पहिलंवहिलं राष्ट्रीय पारितोषिकही मिळालं होतं. मधु कांबीकर या गुणी अभिनेत्रीनं अर्ध्याहून जास्त सिनेमा स्वत: तोलून धरला आहे. लावण्या सादर करताना तिची ग्रेस आणि नृत्यकुशलता यांना दाद द्यायलाच हवी त्याचबरोबर भावुक प्रसंगामध्ये देखील तिचे काम निरतिशय सुंदर आहे. आपल्याला ज्यानं ठेवून घेतलंय, तो रात्रीचा आपल्याकडे आलाय, त्याला हवं ते सुख देताना, त्याच्यासमोर नटून सजून नाचणार्या बाईला पोटच्या पोराचा विसर पडत नाही, नाचताना हलकेच खिडकीमध्ये येऊन बाहेर थंडीवार्या‍मध्ये बसलेल्या लेकराकडे नजर टाकणारी आई म्हणजे कुठल्याही तमाशा कलावंतीणीचं फारसं लोकांसमोर न आलेलं रूप. एकटी आई ते एकाकी आई हा प्रवास मधुने फार सुंदर रंगवला आहे. उतारवयात देखील केवळ लोकांची फर्माईश पूर्वीच्याच ठसक्यात म्हणून “भर तारूण्याचा मळा” सारखी सदाबहार लावणी सादर करणारी मंजूळा देवगांवकर केवळ एक “तमासगरीण” राहत नाही, तर अस्सल दर्जाची कलावंत म्हणूनच मनाला भिडते.

दहाहून अधिक लावण्या असणार्या या सिनेमामधली प्रत्येक लावणी तिच्या परंपरेशी इमान राखते, त्याचवेळी नवीन कलाकृतीचा अस्वाद देते. व्यक्तिश: मला आशाताईंची “भरलं आभाळ पावसाळी पाहुणा” ही लावणी फार आवडते. तिच्या शब्दांमध्ये सूचक शृंगार आहे, प्रियकरासोबत केलेला खेळकरपणा आहे, आशाताईंच्या स्वरामध्ये हे सर्व काही जितक्या अचूकपणे उतरलंय तितकंच अचूकपणे मधुच्या नृत्यामधून उतरलंय “निळ्या मोराची थुई थुई थांबंना” या ओळीला मधुने दाखवलेली अदा तर लाजवाब आहे. आजही तमाशापटांमधल्या उत्कृष्ट सिनेमांमध्ये याचे गणना होते, कारण या अस्सल लावण्याच.

दुर्दैवानं लक्ष्यासारखा सुपरस्टार, सूंदर संगीत आणि सशक्त कथा असूनही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. या चित्रपटाला समीक्षकांनी नावाजलं, राष्ट्रीय पुरस्कारासहित अनेक पुरस्कार मिळाले, पण प्रेक्षक मात्र या सिनेमापासून लांब राहिला. या चित्रपटापासून लक्ष्याला फार अपेक्षा होत्या, त्याच्या करीअरचा हा टर्निंग पॉइंट ठरेल असं त्याला वाटलं होतं, पण तसं घडलं नाही. याहीनंतर लक्ष्मीकांत बेर्डे एक विनोदवीर म्हणूनच चित्रपट करत राहिला. यानंतर त्यानं चित्रपटांमध्ये वेगळ्या भूमिका फारश्या केल्याच नाहीत. पुढं व्यसनांमुळे आणि दीर्घ आजारांमुळे हा लाडका कलाकार फार लवकर हे जग सोडून गेला, तरी आजही मराठी मनांमध्ये त्याचं स्थान अढळ आहे. त्याच्या कित्येक सिनेमांनी आपल्याला मनमुराद हसवलेलं आहे, आणि आजही हसवत असतातच. विनोदी सुपरस्टार असा शिक्का बसला असला तरी लक्ष्या हा एक जातिवंत कलाकार होता. प्रत्येकाला हास्याची थोडीतरी पखरण करणारा हा – एक होता विदूषक.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

"नावात काय आहे" ....
"एक होता विदूशक " या शब्दातूनच निराशा , उदासपणा , कारुण्य या सगळ्या छटा उमटलेल्या आहेत !
नुसत "विदूशक" असे नाव असते तर ? कदाचित वेगळ्या तर्हेची प्रतीमा मनात उभी राहिली असती... न जाणो , हा चित्रपट खूप जास्त लोकान्नी पाहिला असता .........................

चांगली ओळख करून दिली आहेस नंदिनी. माझाही बघायचा राहून गेला आहे हा सिनेमा . धनि म्हणतो तसं जेव्हा आला त्या वयात किती समजला असता ही एक शंकाच आहे पण पिंजरा ह्याहीपेक्षा लहान वयात बघितला होता आणि त्यातली इन्टेइन्सिटी भिडली होती. चित्रपट आला तेव्हा मात्र "मेरा नाम जोकर" ची कॉपी असेल अशी उगीचंच समजूत झाली होती (तो ही बघितलेला नाहीच; तरिही).

आता बघावासा वाटतोय. कुठून डिव्हीडी मिळवता येईल ते मात्र ठाऊक नाही.

(शुधलेखनाच्या बर्‍याच चुका जाणवल्या. ह्यावेळी शुद्धलेखनाचा सपोर्ट अव्हेलेबल नव्हता का ह्या उपक्रमासाठी? तसंच मधला एक राजकारण्यांविषयी चा परिच्छेद थोडा आऊट ऑफ ऑर्डर वाटला).

>>>मला हा सिनेमा खूप उदास करणारा असेल असं वाटायचं म्हणून कधी बघितला नव्हता. --- मलाही. अजुनही पहावासा वाटत नाहीए -- : मला पण. लिखाण मात्र आवडले.

>>>मला हा सिनेमा खूप उदास करणारा असेल असं वाटायचं म्हणून कधी बघितला नव्हता. --- मलाही. अजुनही पहावासा वाटत नाहीए -- : मला पण. लिखाण मात्र आवडले.

छान लिहिलंयस, नंदिनी.
हा सिनेमा माझा बघायला राहिलाय तो अजून राहिलाच आहे!
याची पटकथा पु.ल.नी लिहिली आहे हे मला आज कळतंय... घोर अज्ञान !!!

मस्त झालाय लेख नंदिनी.. आज वाचला.

'एक होता विदुषक' पाहिला आहे. प्रचंड आवडला आहे. तो पाहिला त्याच्या काही दिवस आधीच 'दादा कोंडके' यांचे 'तांबडी माती' हे आत्मचरीत्र वाचल्याने मला दादांच्या आयुष्यात आणि या विदुषकाच्या आयुष्यात बरीच साम्यस्थळं आढळली आणि त्यावेळी कलाकार खर्‍या अर्थाने किती एकटा असतो हे जाणवून गलबललं होतं हे आठवतंय.

किती कळकळीनं लिहिलंयस गं! खूप आवडला लेख.
फार आवडता सिनेमा. लक्षाही भावलेला. पुलं, लक्षा आणि डॉ. पटेल हा त्रिवेणी योग आणि त्यात मधू कांबीकर, महानोर आणि मोडकांचे वेलदोडे, केशर, पिस्ते!

काल पाहिला. वाटलं तेवढं उदास नाही केलं सिनेमाने. लावण्या तर पुन्हा पुन्हा पाहिल्या. मधु कांबीकर एकदम खासच. काय अभिनय, काय नाच! तशी ती मला आधीपासुनच आवडते पण हा चित्रपट पाहुन तर अगदीच फेवरिट.

>>निवडणुकीच्या रॅलीमध्ये गुणा आबुरावला नशा करून भाषणासाठी उभा करतो, ते आबुरावच्जा तब्बेतीला झेपत नाही, आणि त्याला हार्ट ऍटॅक येतो. --
हा संदर्भ बरोबर नाही.आबुरावाला हार्ट अ‍ॅटॅक शुटिंगच्या दरम्यान येतो. तेवढे बदलाल का?

मलाही हा चित्रपट आवडतो... लहान असतांना पाहिला होता, आणि कळलाही होता...
मस्त लिहिलंय Happy

<<<तसंच मधला एक राजकारण्यांविषयी चा परिच्छेद थोडा आऊट ऑफ ऑर्डर वाटला>>> + १

तू-नळीवर पाहिला. चांगला आहे.

या चित्रपटाला समीक्षकांनी नावाजलं, राष्ट्रीय पुरस्कारासहित अनेक पुरस्कार मिळाले, पण प्रेक्षक मात्र या सिनेमापासून लांब राहिला. >>> बरोबर आहे. समीक्षकांना आवडणे व प्रेक्षकांना आवडणे या दोन परस्परविरोधी गोष्टी आहेत . Bw
गीते चांगली आहेत पण, मला त्यांची संख्या जास्त वाटली. मी प्रत्येक गाणे पूर्ण न ऐकता 'फॉरवर्ड' करीत चित्रपट पाहिला.
चित्रपटाची सर्व श्रेयनामावली उत्तम आहे हे नक्की !

अप्रतिम. सिनेमाचे रसग्रहण कसे असावे याचा उत्तम नमुना - सिनेमाच्या सगळ्या अंगांना स्पर्शून जाणारा अणि सिनेमाचे सौंदर्य उलगडून दाखवणारा.

सिनेमा पाहीला नाहीये पण जरी पाहिला असता तरी तू दाखवलेल्या गोष्टी समजून घेण्याकरता नक्कीच परत एकदा पहावा लागला असता.

बऱ्याचवेळा प्रयत्न करून तुकड्या तुकड्यात पाहिलेला चित्रपट. उदास करणारा चित्रपट आणि माझा थोडा संवेदनशील स्वभाव असल्याने एका बैठकीत कधीच पहावासा वाटला नाही. नववी - दहावीत असताना "कोल्हाट्याचं पोर" पुस्तक वाचलं होतं, आणि त्यानंतर चित्रपट पाहिल्याचं अंधुक आठवतं. पण, लहानग्या आबूरावांची नक्कल आणि चित्रपटातला शेवटचा प्रसंग मात्र लख्ख आठवतात. लक्ष्याला दिग्दर्शकांनी आणि प्रेक्षकांनीच एका पठडीत अडकवून ठेवलं, आणि पुन्हा जेव्हा ९० ची हि पिढी मोठी झाली तेव्हा याच प्रेक्षकांनी "लक्ष्या सारखं सारखं तेच करतो, लक्ष्याचे चित्रपट आता आवडत नाहीत" अशी मतं बनवली. लेकराचे सगळे हट्ट पुरवून देखील तेच लेकरू मोठं होऊन "काय केलंत तुम्ही माझ्यासाठी?" असं बापाला विचारतं तेव्हा हतबल होणारा बाप (उदा: श्रीनिवास पेंढारकर) आणि लक्ष्या सारखेच..

Pages