जम्मू ते पुणे सायकल मोहीम (भाग १७): अंकलेश्वर - नवे साथीदार, नवा उत्साह

Submitted by आशुचँप on 3 March, 2017 - 04:58

http://www.maayboli.com/node/61845 - (भाग १६): बस्का (वडोदरा)- गुजरातमां स्वागत
======================================================================================

दिवस उजाडला तो सगळ्यांच्या धांदलीने. आज मेंबर वाढले होते आणि सगळ्यांचे उठून आवरून यायला नाही म्हणले तरी वेळ लागत होते.
दरम्यान, मामा कार घेऊन थेट पुण्यापर्यंत जाणार असल्याचा सगळ्यात जास्त फायदा आम्ही उठवला. प्रत्येकाने आपापल्या गरम कपड्यांची बोचकी बांधून, नावे घालून मामांच्या हवाली केले. राजस्थान पासून कडाक्याच्या उन्हात ती ओझी वाहून नेताना पाव लीटर जास्त घाम गळत होता. आणि मी तर येड्याबंबूसारखा रेन जर्सी, माकडटोपी, थर्मल, पुलओव्हर असे कैच्याकै भरले होते. ते हिमाचल पंजाब मध्ये खूप उपयोगी पडले पण नंतर निव्वळ गाढव ओझे होते. त्यापासून सुटका मिळाल्यामुळे मी खुशीत होतो.

पण त्या खुशीला लवकरच टाचणी लागली जेव्हा मामा म्हणले की मी अॅरोबार देखील काढून त्यांच्या हवाली करावा. घाटपांडे काकांनी कालची सगळी घटना त्यांच्या कानावर घातली होती त्यामुळे त्यांनी अधिकारवाणीने सांगितले की बाकी कुणाही कडे अॅरोबार नाहीये तर तू ही वापरायचा नाही..

म्हणलं हे काय कारणच होऊ शकत नाही ना. मग घाटपांडे काका मध्ये पडले, ते म्हणे ते खूप रिस्की आहे, म्हणलं मी काळजी घेईन, पुन्हा काही घडणार नाही याची खात्री घेईन, माझ्या जीवाची काळजी माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणारे...

मग म्हणाले, की तु खाली वाकून चालवतोस त्यामुळे तुझ्या हेडविंडसचा त्रास वाचतो पण मागच्यांना मग तुझ्या ड्राफ्टचा फायदा मिळात नाही. म्हणलं, माझ्या मागून कुणी ड्राफ्ट घेत येत असेल तर वाकून चालवणार नाही. मग तर झाले. तरी त्यांचे समाधान होईना. घाटपांडे काकांना इतके हट्टाला पेटलेले मी पहिल्यांदाच पाहिले. एरवी ते असे काहीतरी कानून लागू करत नसत. मी पण काय कमी हट्टी नव्हतोच, मी देखील बंडाचा झेंडा उभारला.. म्हणलं, अॅरोबार काढले तर मी सायकल कॅरीयर ला लावून तसाच पुण्याला जाईन.

मग मामांनी समजूत काढायचा प्रयत्न केला, की अपघाताने काय होते हे माझे उदाहरण आहे ना डोळ्यासमोर तुझ्या... मग का असा करतोस. म्हणलं, माझा माझ्यावर विश्वास आहे, आणि एकदा चुकून झाले म्हणजे सारखेच होईल असे नाही ना, मला आता कळलेय ना कधी वापरायचे कधी नाही ते.

मला माहीतीये मी बऱ्याच जणांना अॅरोगंट वाटलो असणारे, पण माझे असे झाले होते की मला विदाऊट अॅरोबार जाण्याचा विचारही करवत नव्हता कारण सातत्याने ड्रेन होत चाललेल्या माझ्या शारिरीक बॅटरीला थोडाही आधार हवासा वाटत होता. नॅशनल हायवेला नाही म्हणले तरी हेडविंडस टाळल्यामुळे ३० टक्क्यापर्यंत एनर्जी वाचू शकत होती आणि ती मला अत्यावश्यक होती.

त्यातून त्यासारखा कंफर्ट दुसरा नव्हता. सतत एकाच पोझीशनला ठेवलेल्या पाठीला, खांद्याला कोपरे टेकवल्यानंतर जो काही आराम मिळायचा त्याला तोड नव्हती. जेव्हा अॅरोबार नसायचे तेव्हाही मी कोपरे हँडलवर टेकवून सायकल चालवायचोच, पण त्या बॅलन्स जायचा धोका होता, म्हणून मी शोधाशोध करून पार अगदी चीनवरून हे अॅरोबार्स मागवले होते. ते काढून घेण्याच्या त्यांच्या हेक्याचा मला मनस्वी संताप येत चालला होता, पण मामा आणि काका हे अतिशय आदरणीय होते आणि या क्षेत्रात त्यांचा अधिकार मोठा असल्याने मी पडती बाजू घेत त्यांना गयावया करून समजाऊन सांगण्याच्या प्रयत्नात होतो. मामा स्पॅनर घेऊन जेव्हा काढू का अॅरोबार्स विचारयला लागले तेव्हा मोठ्या मुश्किलीने मी भडका टाळला.

शेवटी मग त्यांनीच माघार घेतली आणि नियमांची यादी माझ्यावर लादली आणि तात्पुरता तह झाला. आज सगळे मेंबर्स असल्यामुळे मग मेरिडाच्या जर्सी घालायच्या ठरल्या होत्या. आम्हाला मेरीडाच्या जर्सी स्पॉन्सर्स झाल्यामुळे त्यांना हा ग्रुप फोटो पाठवला की त्यांनाही बरे वाटेल असा हेतू होता पण नंतर थोड्या काळाने आम्हाला आमच्या जर्सी चढवाव्या लागल्याच. कारण मेरीडा होती शॉर्ट आणि उन्हात कुठलीही त्वचा उघडी राहीली की कशी जळून खाक होते याचा चांगला अनुभव गाठीशी होता.

मग हॉटेलच्या दारातच एक ग्रुप फोटोसेशन झाले आणि काढणाऱ्याने पार माती खाल्ली. एकही धड फोटो काय त्याला काढता आला नाही. पुढे मग वडोदऱापाशी नाष्ट्याला थांबू तिथे नीट काढू असे ठरले आणि आम्ही सायकली दामटल्या. मामा आणि सुह्द नंतर आवरून निघणार होते आणि ३० किमी वर वडोदरा बायपासजवळ एखादे चांगले ठिकाण बघून तिथे आमच्यासाठी थांबणार होते.

दरम्यान, आम्हाला आज निघायला उशीर झाला होता, आणि सूर्योदय केव्हाच झाला होता. त्यामुळे गेल्या दोन दिवसांसारखा प्रसन्न सोहळा काय बघायला मिळाला नाही. पण आज गँग बरीच होती आणि त्यांच्यासोबत जाऊ म्हणले तर कुठचे काय. आपटे काका, शिरीष आणि अतुल एकदम नव्या दमाचे शिलेदार होते, असे उत्साहाने फुरफुरत होते त्यामुळे त्यांना एकदम बांगबुंग जाण्यातच इंट्रेस्ट. म्हणलं, जातील कुठे, पहिला उत्साह संपला की येतील आपल्या गटात, तोपर्यंत राहू दे सुसाट ग्रुपात. तिकडे लान्स, वेदांग त्यांना कंपनी मिळाले म्हणून खूष.

सुसाट गँगची नवी कुमक

तर युडींचे एक वेगळेच संस्थान असायचे. त्यांचा थाट एकदम राजेशाही आणि मस्त कानाला गुबगुबीत हेडफोन्स लाऊन, निवांत रमत गमत यायचे. ना कधी त्यांनी सगळे पुढे गेल्याबद्दल कुरकुर केली ना कशाची तक्रार. असेही त्यांनी मधल्या काळात कसून प्रॅक्टिस केल्यामुळे त्यांचा वेगही वाढला होता.

त्यामुळे ते, मी, हेम, घाटपांडे काका असे जमून जायला लागलो. वडोदराच्या बायपास जवळ एका ठिकाणी मामा थांबलेले दिसले आणि आम्ही सायकली आत वळवल्या. ते होते एक मॉलवजा स्नॅक्स सेंटर. खास गुजराथी पदार्थ खाकरा आणि काय काय अतिषय आकर्षक वेष्टनात विक्रीला होते. गाडी घरापर्यंत जाणार होती त्यामुळे सगळ्यांनीच मनमुराद खरेदी केली. ओबीलाही उत आला होता कारण त्याला इतक्या दिवसात काही खरेदी करायलाच न मिळाल्यामुळे बिचाऱ्याची फार कुचंबणा झाली होती. एक भारी गंमत म्हणजे, त्याने तिथून गुजराती बाकरवड्या खरेदी करून मोठ्या उत्साहाने घरी पाठवल्या. पण चितळेंच्या बाकरवडीवर वाढलेल्या त्याच्या पोरींनी त्याला हातही लावला नाही. शेवटी चितळेंच्या बाकरवड्या हेच शाश्वत सत्य.

त्याहून त्याचा वैताग वेगळाच होता. तो शिरीषची सायकल घेऊन आला होता आणि त्याचाच रणगाडा झाला होता. आणि तो ओढून आणताना तो अगदी टेकीला आला होता त्यामुळे शिरिष येताच त्याच्या गळ्यात ते अवजड ओझे लादून तो पसार झाला. पण थोड्याच वेळात लक्षात आले की थोड्या नाजूक प्रवृत्तीच्या शिरिषला ते रणगाडा ओढायला लावणे म्हणणे एक क्रूरपणा होता. त्यातून त्याचे इथल्या पाण्याने पोट बिघडले होते आणि फेऱ्या सुरु झाल्या होत्या. त्याची अवस्था बघून हा कसा काय निभावणार अशी काळजी वाटू लागली पण पठ्याने हाणली बाबा पुण्यापर्यंत सायकल. पण त्यामुळे झक मारत परत ते गाडं पुन्हा ओबीच्याच पदरात आले.

मेव्हणे मेव्हणे मेव्हण्यांचे पावणे Happy

तोपर्यंत तिथे आलेल्या लोकांनीही गर्दी करून आम्हाला बघायाला सुरुवात केली. सगळ्यांनी एकसारख्या जर्सी घातल्यामुळे आम्ही अगदीच उठून दिसत होतो. तिथल्या एका तरूणाला तर आम्ही इतके आवडलो की तो आत जाऊन आम्हा सगळ्यांसाठी चांगल्यातली मिठाई घेऊन आला आणि आग्रह करकरून आम्हाला खायला लावली. माझे लक्ष हेमकडे होते. तो बाणेदारपणे नको म्हणेल अशी भीती होती, पण त्याने घेतली आणि गुपचून माझ्याकडे पास केली, म्हणलं, लई भारी असा मित्र पाहिजे Happy

डावीकडून - घाटपांडे काका, युडी, आपटेकाका, पुढे शिरिष, अतुल, सुह्द, लान्स, हेम, आशुचँप, वेदांग आणि ओबी.

तिथल्या लोकांचे प्रश्न पण भारी होते. जसे पंजाबात लोकांना आम्ही कुणीही सक्तीचे केल्याशिवाय असले काम अंगावर घेतले आहे हे समजू शकत नव्हते तसे इथल्या व्यापारी माईंडेड लोकांना आम्हाला कुणीही स्पॉन्सर केलेले नसून स्वताच्या खिशातून हजारो रुपये खर्च करून आम्ही हा उद्योग करत आहोत आणि त्याचा पुढे जाऊनही कसलाही आर्थिक फायदा होणार नाही हे पटवून देताना पुरेवाट झाली. आमच्या माघारी किती आम्हाला वेड्यात काढले असेल याची गणतीच नव्हती. असो...

टमटमीत नाष्टा आणि भरपूर वेळ टाईमपास करून झाल्यावर मामा आणि सुह्दला गळाभेट घेऊन निरोप दिला. इतके रामायण घडूनही आमच्यात कसलाही दुरावा आला नव्हता किंबहुना आम्ही एकमेकांचे जास्तच चांगले मित्र झालो होतो.

कूल घाटपांडेज

आता उन्हे चांगलीच तापली होती. आणि त्यापुढे राजस्थानचे उन्ह परवडले म्हणायची वेळ आली. पण आता सवय झालीच होती म्हणून यांत्रिकपणे पॅडल मारत चाललो होतो. असेही नॅशनल हायवे असल्यामुळे ट्रक्स आणि बसेस आणि बेगुमान वेगाने धावणारी एसयुव्ही तत्सम वाहने हेच दिसत होते. आम्ही आपले कडेने अंग चोरून जितके सावधपणे जाता येईल तितके जात होतो.

आपटेकाकांचे शक्तीचे प्रयोग...घाटपांडेकाकांना स्ट्रेचिंग देताना...:)

वाटेत रामनगमदी, मंगलेज, करजान अशी काय काय नावाची गावे लागत होती आणि हायवे त्यांना चिरडून फ्लायओव्हरवरून पुढे अतिवेगाने सुसाट जात होता. मी होता होईतो फ्लायओव्हर घेतच नव्हतो, त्यामुळे गावातली गर्दी लागली तर लागली पण निदान शांतपणे बाजूबाजूने तरी जाता येत होते.

पुढे भरूचपाशी आम्हाला गाड्यांचा महापूर लागला. मायबोलीकर केदार याने लिहील्याप्रमाणे इथे दिवसाच्या कोणत्याही वेळी १७६० ट्रक्स उभ्या असतात. तशाच आजही होत्या आणि सुदैवाने आमच्याकडे सायकली होत्या, त्यामुळे वैतागलेल्या ड्रायव्हरना टुकटुक करत आम्ही मस्त पुढे जात राहीलो.

पण वातावरणात इतके प्रचंड प्रदुषण होते, सतत भकभक असा धुर ओकणाऱ्या गाड्यांच्या बाजूने जाऊन जाऊन श्वास गुदमरायला लागला. कार्बन मोनॉक्साईडची पुटे अंगावर चढली असणार याबद्दल खात्रीच होती. पुढे ब्रीजवर नर्मदा मय्याचे पहिले दर्शन झाले. नर्मदे हर म्हणत तीला मनोमन हात जोडले आणि पुढे सरकत राहीलो. पण कित्येक किमी गेलो तरी गाड्या काय संपेचनात. खूप द्या आली त्या ट्रकचालकांची, पण त्यांना सवय असावी, काही जण निवांत बाजूला बसून मशेरी लावत होते, काहीतर बाजूला चक्क बादली घेऊन आंघोळ करत होते. फुल्ल बाजार मांडला होता.

ब्रिज संपल्यानंतर थोडे पुढे थांबलो असल्याचा पुढच्यांचा मेसेज आला. म्हणलं चला बरं झालं, बघितलं तर एक मस्त रेस्टॉरंट शोधलं होतं. पहिल्याने काय केले तर रेस्टरुम शोधली आणि जवळ जवळ मीनी अंघोळच केली. डोके, मान, चेहरा खसखसून धुतल्यावर जरा काजळी कमी झाल्यासारखी वाटली आणि तसाच हाशहुश करत येऊन बसलो. तोपर्यंत युडीपण येऊन ठेपले. इतक्या उन्हातून आल्यावर काही खायची इच्छाच नव्हती पण राजस्थानात सापडलेली ठंडी खीर इथेही होती. त्याबरोबर फाफडा आणि उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून भरपूर कांदा.

झालं आता अंकलेश्वर म्हणजे मुक्कामाचे ठिकाण फार लांब नव्हतेच. १०० किमी आलो होतो आणि आता अजून २५-३० किमी बाकी होते, पण आता विश्रांती घेतल्यावर ते २५ किमी पण अंगावर आले. पण पर्याय नव्हताच. पण बाकीच्यांना पुढे जाऊ दिले आणि मी आणि हेम सावकाश वाटेत दिसणाऱ्या काही मंदिरांचे फोटो वगैरे काढत आणि गप्पा हाणत जात राहीलो.

...

हॉटेलला गेल्यावर एक मस्त सरप्राईज होते पण. घाटपांडे काकांचा एक मित्र आम्हा सगळ्यांसाठी ऑथेंटीक उंधीयू घेऊन आला होता. आमच्या शेजारीच एक गुजराती कुटुंब राहते त्यामुळे मला या चविष्ट प्रकाराची विशेष आवड होतीच. मग सगळा संकोच बाजूला ठेऊन त्यावर तुटून पडलो. आणि नंतर मग फर्मास आईस्क्रीम. नर्मदा परिक्रमा करताना घाटपांडे काका, वेदांग हे अंकलेश्वरलाच मुक्कामी होते, त्यावेळचे काही किस्से मग त्यांच्याकडून ऐकायला मिळाले.
दरम्यान त्या माणसाने अजून एक इंट्रेस्टिंग माहीती सांगितली, म्हणाला उद्या जाताना तुम्हाला रस्त्याच्या बाजूला उबाडीयो विकणारी लोकं दिसतील. भन्नाट प्रकार असतो, खाऊन बघा...म्हणलं, नेकी और पूछ पूछ..असेही स्थानिक खाद्यपदार्थ आमच्या हिटलिस्टवर असतातच...

त्यामुळे उंधीयूने भरलेल्या पोटाने उद्याच्या उबाडियोची स्वप्ने रंगवतच आम्ही झोपी गेलो

--
डावीकडे दिसतेय ते खंबायतचे आखात आणि उजवीकडे शूळपाणीचे जंगल. परिक्रमावासियांकडून या जंगलाबद्दल आणि तिथल्या मामांबद्दल बरेच काही ऐकले आहे. पण आता ते लूटत नाही उलट मदतच करतात असे ऐकिवात आहे. पुढे मागे जेव्हा योग येईल परिक्रमेचा तेव्हा बघू

======================================================================================
http://www.maayboli.com/node/61878 - (भाग १८): वलसाड- गुजरातमधली खादाडी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख वर्णन Happy

भरूच चा ब्रिज आणि सिंग सगळ्या गुजरात मध्ये फेमस आहे.
आमच्या बाईक (मोटरसायकल) राईडच्या वेळेस सुद्धा आमचा बराच वेळ घेतला होता ह्या ब्रिजने आणि येथील १७६० ट्रक्सने

आशुचँप पेटलाय आता......धडाधड पुढचे भाग टाकतोय. पण मस्त लिहितोय ........नेहमीप्रमाणे.

"...गावे लागत होती आणि हायवे त्यांना चिरडून फ्लायओव्हरवरून पुढे अतिवेगाने सुसाट जात होता" मस्त लिहिताय.

इतके detail वर्णन (आजुबाजूचा परिसर, लोकं, त्यांच बोलणं, तुमच्या मनातील भावना आणि बरेच काही ) करता, रहस्य काय आहे ? प्रवासात रोज लेखी नोंद ठेवायचा कि mobile वर record वगैरे करायचा ?

उबाडीओचा फोटो टाकाच >>>>>

नुसते फोटो नाही वर्णनही येणार थांबा

आमच्या बाईक (मोटरसायकल) राईडच्या वेळेस सुद्धा आमचा बराच वेळ घेतला होता ह्या ब्रिजने आणि येथील १७६० ट्रक्सने

बाईकला खरे तर लागायला नकोय वेळ, आम्ही तर मस्त कडेकडेने आलो..

तुम्ही लोक पुढच्या वेळेस एक फोटोग्राफरला पण टीम मध्ये घ्या बरं

अहो, मीच होतो फोटोग्राफर...मी माझा वजनी एसएलआर नेलेला, पण दर वेळी सायकल थांबवा, बॅग उघडा, कॅमेरा काढा, फोटो काढून परत नीट जपून बॅगेत ठेवा याप्रकारात इतका वेळ जायला लागला की नंतर नंतर नुसते मोबाईलवरच फोटो काढायला लागलो.

इतके detail वर्णन (आजुबाजूचा परिसर, लोकं, त्यांच बोलणं, तुमच्या मनातील भावना आणि बरेच काही ) करता, रहस्य काय आहे ? प्रवासात रोज लेखी नोंद ठेवायचा कि mobile वर record वगैरे करायचा ? >>>>

खरे सांगायचे तर यातले काहीच करत नव्हतो, लेख लिहीण्यापूर्वी फोटो चाळतो, स्ट्राव्हावर कुठून कसे गेलो हे बघतो आणि मग गावांची नावे, फोटो असे पाहून आपोआप आठवणींची लड उलगडत जाते. आणि हे अनुभव इतके भन्नाट होते की आता एक वर्ष उलटून पण मी जसेच्या तसे ते आठवू शकतोय...

अ‍ॅरोबार म्हणजे काय विचारणार होते पण गुगल करून कळलं.
धन्यवाद

आदूबाळ, फेरफटका - बच्चेकी जान लोगे क्या Happy

"आदूबाळ, फेरफटका - बच्चेकी जान लोगे क्या" - हे म्हणजे सेहवाग ला १०० च्या स्ट्राईक रेट ने खेळतोस का असं विचारल्यावर त्याने 'बाप रे, ईतकं फास्ट कसं जमणार' म्हणण्यासारखं झालं. Wink

सेहवाग ला १०० च्या स्ट्राईक रेट ने खेळतोस का असं विचारल्यावर त्याने 'बाप रे, ईतकं फास्ट कसं जमणार' म्हणण्यासारखं झालं

Happy Happy :प

पुणे जवळ येत चाललं असं वाटत राहीलं या भागात.
गुजराती बाकरवड्यांचा किस्सा भारी. खुसखुशीत झालाय भाग (खाण्यापिण्याची चंगळ आहे या भागात )