"मराठी फ्रेजा" अर्थात इंग्रजी म्हणींचे मराठीत रूपांतर - ३ मार्च

Submitted by संयोजक on 3 March, 2017 - 02:59

भाषा आणि त्या प्रदेशाची संस्कृती यांचे घट्ट नाते असते. ते नाते ठळकपणे दाखवतात त्या भाषेतल्या म्हणी आणि वाक्प्रचार. हे शब्दसमुह आपल्याला शहाणपणाच्या गोष्टी सांगतात आणि त्या सांगताना त्या प्रदेशातील अनेक संदर्भ त्यात येत असतात. तर आपल्याला खेळ खेळायचाय या म्हणींचा.
आम्ही तुम्हाला इंग्रजी म्हणी देऊ आणि तुम्ही त्याचे मराठी रुपांतर करायचे आहे. लक्षात ठेवा रुपांतर ! भाषांतर नव्हे ! सगळे शब्द आणि संदर्भ अस्सल मराठमोळे असायला हवेत.

एका वेळी एका संचात ५ म्हणी दिल्या जातील. तुम्हाला तुमच्या प्रतिसादात त्या म्हणींचे रूपांतर लिहायचे आहे. जमल्यास सर्व पाचही म्हणींचे रुपांतर एका प्रतिसादात सुद्धा तुम्ही लिहू शकता.

तुमचे रुपांतर चटपटीत शब्दांत असायला हवे - अगदी म्हणींसारखे.
उदा. A penny saved is a penny earned
दमडी वाचली कमाई झाली.

३ मार्च संच १ -

१. Born with a silver spoon in one's mouth
२. Darkest hour is just before the dawn
३. Every cloud has a silver lining
४. Exception that proves the rule
५. He who can, does; he who cannot, teaches

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२. Darkest hour is just before the dawn
घनदाट तिमिर देतो चाहूल... येतोय पहाट प्रहर!

३. Every cloud has a silver lining
काळ्या ढगाला किनार रुप्याची
संकटाला आस येणाऱ्या सुखाची

४. Exception that proves the rule
अपवाद करतो नियम पक्का!

२. Darkest hour is just before the dawn
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल

५. He who can, does; he who cannot, teaches
करून दाखवा नाहीतर शिकवून पकवा? Lol

३. Every cloud has a silver lining
मळभ काळं त्याला रुपेरी खळं
४. Exception that proves the rule
नाही अपवाद तो नियम बाद!

१. Born with a silver spoon in one's mouth
जरीच्या दुपट्यात भाग्याचं मापटं

३ मार्च संच १ -
१. Born with a silver spoon in one's mouth
हलवायाचं पोर, मुठीत सदा खडीसाखर
तालेवार घराणं, रेशमाचं नाक-पुसणं
पाटलाच्या लेकरा, चंदनी भोवरा
सावकाराच्या बंड्या, सोन्याच्या गुंड्या

२. Darkest hour is just before the dawn
काजळकाळ्या रातीची पहाट पाठराखीण
फिटे काळोख काळोख, फुटे तांबडे सुरेख
मनी दाटल्या अंधारी, आशा-किरणे सोनेरी
घनगर्द निशा गेली, उगवती उजळली

३. Every cloud has a silver lining
झाकोळलं तेज, पुन्हा उजळतंच
विपदा दोन क्षणांची, किमया सामर्थ्याची
निराशेच्या क्षणांना, उमेदीची झालर
न्हाणं होई फवार्‍यात, फुलांची रांगोळी घंगाळात

४. Exception that proves the rule
सोमवारी मौनव्रत, बाकी दिवशी अखंड वटवट
अपवादाची रीती, सांगे नियमाची मिती
खूप आवडतं, खूप नावडतं, विचारलं की काम भागतं
उपास नाही, पथ्य नाही, खायला मोकळ्या दिशा दाही

५. He who can, does; he who cannot, teaches
एक कृतीतून बोलतो, दुसरा फक्त बोलतो
पुरात उडी घेववेना नि काठावरून सूचना
कामात खाल्ला मार, बनून फिरतो सल्लागार
उंट की घोडा नाही समजत, असा दे शह न तशी दे मात

Exception that proves the rule
उपास नाही, पथ्य नाही, खायला मोकळ्या दिशा दाही

दोन्ही कसे म्याच होते ?

प्रति -- taimur,
इतक्या बारकाईने वाचून दिलेल्या प्रतिसादासाठी आभार.
बाकीच्या म्हणी exception + rule अशा स्वरूपात आहेत.
तुम्ही उल्लेख केलेली -- फक्त exception लिखित आणि rule अलिखित / अध्याहृत / संदर्भरूपाने -- अशा स्वरूपात आहे.
म्हणी / वाक्प्रचार अशा स्वरूपात लिहिले जाऊ शकतात. ( उदा -- कपिलाषष्ठीचा योग )
उपरोक्त म्हणीत exception आणि rule दोन्हीचे उल्लेख येतील आणि वाक्य सुटसुटीतही होईल -- असं तुम्हाला काही सुचलं तर सांगा, बदलता येईल.