मराठी

Submitted by मोरोपंत on 1 March, 2017 - 01:20

मराठी

तिला पाहिले मी तिला ऐकले मी
तशी कैक लाखात ती देखणी
शुभचिन्हांकिता भरजरी वस्त्र ल्याली
प्रेमिकांच्या मनातील तू साजणी

तुझे रूप वर्णू कसे मी कसे मी
तुला गर्द शालू तुक्याने दिला
अभंगाची नक्षी पदारावरी अन
जरतारी ओव्यात हा बांधला

काय मोल ते चंद्रहारा
उपमा अलंकार ज्ञाने दिला
उत्प्रेक्षा तो असीम सुंदर
साज कोल्हापुरी घातला

दृष्टांत जाहला बाजूबंद
श्लेषाची तुजला कर्णफुले
रूपकाचा गोठ मनगटी
यमकाची मेखला झुले

केशरचना उत्तम केली
अपन्हुतीने सजली वेणी
नाजुक साजुक पाऊल घेता
अनुप्रास किणकिणे पैंजणी

सवित्यासम रूप तुझे
चंद्रापरी ना विरघळते
कविमनाच्या गाभाऱ्यातुन
कस्तुरीसम दरवळते

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

वाह !!
मराठीचे अतिशय सुंदर वर्णन !!
कविता आवडली !!