जम्मू ते पुणे सायकल मोहीम (भाग १५): मोडासा - एक दिवस विश्रांतीचा

Submitted by आशुचँप on 28 February, 2017 - 14:49

http://www.maayboli.com/node/60844 - (भाग १४): खेरवारा - अरवलीचे आव्हान
======================================================================

आजचा दिवस हा सोनियाचा दिनु होता. कारण आख्खा मोहीमेत सर्वात कमी अंतर आज कापायचे होते. खरेतर जेव्हा प्लॅनिंग करत होतो तेव्हा असा एक विचार चाललेला की सलग १७ दिवस सायकल चालवून स्ट्रेन आणण्यापेक्षा मध्ये एक दिवस पूर्ण विश्रांती घ्यावी. बॉडी रिकव्हर व्हायला खूप उपयोग झाला असता.

पण एकतर त्याने दिवस वाढला असता, ते शक्य नव्हते, मग आजच्या दिवसाचे अंतर बाकी दिवसात विभागले गेले असते तर दरदिवशीचे अंतर वाढले असते. आधीच आम्ही १५०-१६० किमी अंतर कापून टेकीला आलो होतो आता अजून वाढले असते तर वैताग झाला असता.

त्यातल्या त्यात म्हणून मग असे ठरले की ८०-८५ किमी ची राईड करावी. आता आम्हाला सलग १५० किमी अंतर चालवण्याचा इतका सराव झाला होता की ८० म्हणजे हा हा म्हणत संपतील आणि मग उरलेला दिवस मस्त झोपून काढायचा असा फर्मास बेत होता.

तर थोडक्यात म्हणजे आजचा दिवस विश्रांतीचा होता. आणि दुपारी जास्तीत जास्त वेळ झोपायला मिळावे यासाठी पहाटे नेहमीपेक्षा लवकर निघावे अशी टूम निघाली. मला खात्री होती ही आयडीया पुणेरी दुकानदार असलेल्या ओबीची असणार.

कारण माझ्यासारखी निशाचर लोक पहाटे साखरझोपेत पेंगत पेंगत सायकल चालवत जात. मी पहाटे अतिशय मरगळलेला, दुपारी जरा ओके मध्ये आणि संध्याकाळी फ्रेश असा असायचो. तर या उलट ओबी, लान्स वगैरे मंडळी पहाटे एकदम फ्रेश आणि ओबीला दुपारी मस्त वामकुक्षीची सवय असल्याने दोननंतर फुल्ल डाऊन व्हायचा. कसेतरी करून ती वेळ पार पडली की पुन्हा फॉर्मात यायचा.

तर, ठरल्याप्रमाणे आख्ख्या मोहीमेत पहिल्यांदाच काळोख असताना मुक्काम सोडला. असेही आता पंजाब, राजस्थान मागे पडल्यामुळे धुक्याचा जो अडथळा होता तो आता नव्हता, त्यामुळे दमट हवेपेक्षा सकाळच्या गार अशी मस्त शिरशिरी आणणाऱ्या हवेत सायकल चालवायला मज्जा येत होती.

त्यातही आता इतक्या दिवसांनतर सगळ्यांनाच एक लय सापडली होती त्यामुळे फारसा संवाद न साधताही एक टीम म्हणून चालवणे जमत होते. अर्थात त्यातही क्रमवारी असायचीच. सुह्द सगळ्यात पुढे, पाठोपाठ अहीरावण-महिरावणाची जोडी (उर्फ लान्स-वेदांग), त्यानंतर ओबी पाठोपाठ मी आणि हेमची जोडी आणि सगळ्यात पिछाडीला काका.

साधारण वीस एक किमी गेल्यानंतर पुर्वेकडे दिशा फटफटायला लागली आणि एका अतिशय रमणीय दृश्याने आम्हाला जागीच खिळवून ठेवले. सूर्यनारायण रंगमंचावर प्रवेश करण्यापूर्वी निसर्गाने मुक्त हस्ताने रंगाची उधळण करायला सुरुवात केली होती. त्या रक्तीमलाल रंगाच्या पार्श्वभूमीवर इवली पाखरे आळोखे पिळोखे देत कामाला लागली होती आणि या सगळ्याची मिळून एक इतकी सुंदर सिंफनी जमून आली होती की आम्ही कित्येक क्षण नुसते ते डोळ्यांनी पीत राहीलो. कुठल्याही वर्णनापलिकडकचे ते होते.

पाखरांची शाळा

भुकेने गुरगुर करून जाणीव करून दिल्यावरच मग पुढे सरकलो.

आजचे अजून एक आकर्षण होते ते म्हणजे राजस्थान बॉर्डर क्रॉस करून आम्ही गुजरातेत प्रवेश करणार होतो. बाकीच्यांचे माहीती नाही पण मी विटलो होतो राजस्थानला. तोच तो ओसाड वाळवंटी प्रदेश, तीच ती कोरडी, बारीक रेतीमिश्रीत हवा, कडकडीत रूक्षपणा, खाण्याची बोंब आणि आख्खया मोहीमेत हेच राज्य सर्वात जास्त अनुभवले होते. उभा राजस्थान पार करावा लागल्याने पंंजाब सरहद्द ते गुजरात असे तब्बल सहा दिवस आम्ही राजस्थानातच होतो.

आता मात्र गुजरातेत खाण्यापिण्याची चंगळ असेल, हवा चांगली असेल असे मनातल्या मनात मांडे खात होतो. अर्थात पुढे गेल्यावर घामाच्या शॉवरबाथ पुढे हीच कोरडी हवा परवडली अशी म्हणायची वेळ येणार होती याची सुतराम कल्पना त्यावेळी नव्हती.

साधारण ३५-३६ किमीनंतर राजस्थान गुजरात बॉर्डरवरचे रतनपूर लागले. इथे छानपैकी त्यांनी किल्ल्याची तटबंदी असावी असे द्वार करून मज्जा आणली. अर्थातच इथे फोटो काढणे मस्ट होते. आणि नेहमीप्रमाणेच स्थानिक लोकांनी आमच्या उत्साहाचा पतंग कापला..

तिथे एक ग्रुप फोटो काढण्यासाठी आम्ही कुणाला तरी शोधत होतो, तर दोघेजण चालत जाताना दिसले. नम्रपणे त्यांना विनंती केली, म्हणलं, भाईसाब जरा फोटो निकालेंगे क्या...

हा हा, निकालो ना, कोई बात नही, यहा पै अलाऊड है.... असे म्हणून भाई चालत पुढे निघाले सुद्धा

म्हणलं, च्यायला ही तर केरळाची पुनरावृत्ती झाली, पण सुदैवाने त्यांना हिंदी येत होत त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना पकडले आणि त्यांनी आमचा फोटो काढणे आम्हाला अपेक्षीत आहे असे समजाऊन सागण्यात यशस्वी झालो.

अर्थात त्यातही राजस्थान सीमा समाप्त असा बोर्ड दिसला पाहिजे व्यवस्थित आणि आम्हीही हे सगळे नीट समजाऊन सांगताना पाव लीटर रक्त आटलेच. पुन्हा त्यांच्या त्यांच्यात घनघोर चर्चा, अरे यहा नही वहा, अरे ये भी ले ना भाई, असे करत त्यांनी डझनभर फोटो काढल्यावर एक बरा म्हणता येईल असा फोटो मिळाला...हुश्श्य

राजस्थानच्या सीमेवर धुळमाखले हसरे चेहरे

अमर्याद कुतुहल Happy

दरम्यान वाटेत एक टोल नाका लागला तिथे एक मज्जा झाली. एका सलग लायनीत आम्ही सायकल चालवत जात असताना रस्त्याच्या कडेने एक माणून उभा होता, त्याने एकापाठोपाठ एक सगळ्यांना हातात एक वस्तू द्यायला सुरुवात केली. सगळ्यानी रिदममध्ये चालवत चालवतच वस्तू हातात घेतल्या आणि पुढे गेलो. मी तर न बघताच जर्सीच्या मागच्या खिशात कोंबले आणि पुढे गेलो. आणि पुढे टोल नाक्यावर सगळे थांबल्यावर मग माझ्या लक्षात आले की हा कोण माणूस, आपल्याला काय दिले आणि कशासाठी ते विचारलेच नाही.

तोपर्यंत तो आलाच मागून, त्याने ओळख वगैरे करून दिली, एकदम हसतमुख तरूण, बोलायला चटपटीत आणि बोलघेवडा. तो मेडीकल रिप्रेझेंटीटव्ह होता आणि त्याने आम्हाला सगळ्यांना एक अतिशय उपयुक्त अशी वस्तु दिली होती ती म्हणजे स्क्रु ड्रायव्हरचा सेट आणि त्यालाच बाजूला छोटीशी बॅटरी. अर्थात ती कुठल्यातरी मेडीकल कंपनीची जाहीरात असलेले सँपल होते, पण त्याला आम्हाला द्यावेसे वाटले हे कौतुक.
मग आम्ही छानपैकी त्याच्यासोबत फोटोवगैरे काढून घेतला आणि पुढे सरकलो.

घाटपांडे पिता पुत्रांनी अशी अजब पोज का दिली ते कळलं नाही

पंजाब मधून राजस्थानात प्रवेश केल्यानंतर लगेचच सीन ट्रान्सफर झाला होता तसे काही गुजरातेत झाले नाही. असेही आम्ही नॅशनल हायवेने जात होतो त्यामुळे रस्ता चांगलाच होता. पण पुढे १५-२० किमी अंतर गेल्यावर आम्हाला राष्ट्रीय हायवे सोडून स्टेट हायवेसाठी आत वळावे लागले. मश्वा धरणसाठ्यातून निघालेल्या कॅनालला आम्ही समांतर जात राहीलो. सकाळचे १०.३० च झाले होते आणि आता फक्त ३० एक किमी राहीले होते.

तुम्हाला सांगतो, यासारखे सुंदर फिलिंग काय असूच शकत नव्हते त्यावेळी. बाकी कशाही पेक्षा आम्हाला त्या हॉटेलमधले बेड आणि झोप खुणावत होती त्यामुळे सगळेच मस्त बांगबुंग सुटले होते. आणि अचानक ब्रेक लागावा अशी घटना घडली..

बाजूने एक टेंपो सुसाट आला आणि त्याने हॉर्न वाजवून आमचे लक्ष वेधून घेतले. जरा त्रासिकपणेच त्याच्याकडे पाहिले, तर त्याने शॉकच दिला. म्हणे आपके साथ वाला एक गिर गिया है निचे

शप्पथ, पायाखालची वाळूच सरकली. कारण मागे राहिलेले म्हणजे काकाच. ते पडले म्हणजे अॅक्सिडंट झाला असावा काय. तातडीने आम्ही यू टर्न मारला आणि रॉंग साईडनेच जीवाच्या आकांताने मागे सुटलो. सुह्द सगळ्यात पुढे चालला होता आणि मला त्याच्या मनात काय चालले असेल अशा विचारानेच विलक्षण कालवाकालव होत होती. नशिबाने आमच्यात फार अंतर नव्हते आणि एक दिड किमी अंतरावर आम्हाला लाल जर्सी दिसली. तशाच सायकली दामटल्या आणि काका आणि हेम दिसले, त्यात हेम खाली बसलेला आणि काका त्याच्या बाजूला. मला तोपर्यंत तो माझ्या मागे आहे असेच वाटत होते, तो काकांसोबत असल्याचे पाहून बरे वाटले, म्हणलं चला कुणीतरी होतं त्यांच्या सोबतीला.

पण पुढे जाऊन बघतो तो चित्रच वेगळे. काका आपले पसारा मांडून फर्स्टएडचे सामान शोधत होते आणि हेमच्या डोक्याला छानपैकी जखम आणि रक्त वाहतय. हायला, हा काय उद्योग. तोपर्यंत आम्हाला हेम ला काही झालं असेल असे वाटलेच नव्हते. काकांनाच लागले असणार असे गृहीत धरले होते.

तोपर्यत काकांनी जखमेवर मलमपट्टी केली आणि त्यानंतर सगळे स्थीरसावर झाल्यावर हेमने त्याची कहाणी सांगितली. ती ऐकल्यावर आता काय बोलावे अशा बुचकळ्यात सगळे पडले.

मलमपट्टी

झाले असे की सायकल चालवता चालवताच हेमला लक्षात आले की त्याच्या हँडलबॅगची पट्टी लूज झालीये. आता तेवढ्यासाठी थांबून मग नीट करायच्या ऐवजी त्याने चालवता चालवताच ती ओढून बसवायचा प्रयत्न केला. आता हँडल चालता चालताच ओढले गेल्याने अर्थातच त्याचा तोल गेला आणि साहेब दणदिशी खाली आपटले.

केवळ नशिब थोर की आम्ही नुकतेच स्टेट हायवेला लागलो होतो आणि अजिबात ट्रॅफिक नव्हते. हा असला दिव्य प्रकार त्याने नॅशनल हायवेला केला असता तर किती महागात पडले असते. असो, ही वेळ त्याला काही बोलायची नव्हती आणि त्यालाही त्याची चूक जाणवली होतीच. म्हणलं, फोटो काढलाय तो आता बायकोला पाठवतो तुझ्या आणि मग खा शिव्या.

असो, पण दुर्घटना थोडक्यावर निभावली होती आणि मोहीमेला कसलेही गालबोट लागले नव्हते यावरच आनंद मानत पुढे निघालो. आता मात्र कटाक्षाने हेम आणि काकांना पेलेटॉनच्या मधोमध घेतले आणि सावकाश उर्वरित अंतर काटून मुक्कामच्या स्थळी प्रवेशते झालो.

ते हॉटेल नव्हते तर चक्क रिसॉर्ट होते. आपल्याकडे शहराच्या बाहेर असते तसे छोटेखानी बंगलेवजा खोल्या, इतक्या प्रशस्त की गव्हर्नमेंट क्वार्टर अशाव्यात अश्या. सुबक आणि क्वालीटी फर्नीचर, सोफा आणि गुबगुबीत डबलबेड, बाहेर मस्त हिरवळ, त्यावर मुलांना खेळायला झोपाळा, घसरगुंडी वगैरे.

घसरगुंडी करण्याचा मोह कटाक्षाने टाळला

हे सगळं बघून भारी वाटलं, म्हणलं चला विश्रांतीची जागा सार्थकी लागली. पण या सगळ्यात मेजर सरप्राईज होते ते म्हणजे खायची प्यायची काहीही व्यवस्था नव्हती. तिथल्या केअर टेकरने सांगितले की आधी सांगितले असते तर कुक ला बोलवून घेतले असते, पण तसे काही न सांगितल्यामुळे आता तिथे नुसतेच किचन होते पण खायला खडखडाट. जास्तीत जास्त चहा मिळू शकणार होता.

हाय रे दैवा, एकतर ८० किमी सायकल चालवून आल्यावर पोटात भला थोरला खड्डा पडलेला, कावळे काय आख्खा कावळ्यांची शाळा कोकलत होती. म्हणले जवळपास कुठे हॉटेल तर म्हणे आजूबाजूला सगळी मुस्लीम वस्ती आहे, आणि तुम्हाला व्हेज हवे असेल तर ५-६ किमी जावे लागेल. हे ऐकूनच खचलो. एकतर उन्ह कडक आणि त्यातून मुक्काम गाठल्यावर पुन्हा आता कुणातच पेशन्स नव्हता की परत सायकलवर १०-१२ किमी अंतर मारायचा. पण खाणेतर भाग होते, शेवटी मग ओबी आणि हेमनेजुगाड केला, त्या केअरटेकरची गाडी घेतली आणि पार्सल आणतो म्हणाले.

मिळालेल्या वेळात आम्ही सगळ्यांनी धोबीघाट काढला. राजस्थानच्या मुक्कामात आम्हाला कपडे धुवायला वेळ मिळाला नव्हताच. आदले दिवशीचे कपडे सुकवत ठेवायचे आणि सकाळी तेच चढवायचे हाच शिरस्ता. त्यात अंघोळीला मस्त गरम पाणी. त्यामुळे छानपैकी गरम पाण्यात साबण घालून कपडे भिजवत ठेवले, काळेशार पाणी झाल्यावर सगळी धूळ माती घासून काढली आणि वर गरम गरम पाण्याने अंग शेकले.

सुख सुख म्हणतात हे हेच.

कपडे बाहेर खुर्च्यावर वाळत घालत असताना मला हेमची जर्सी दिसली. पडल्यावर त्याच्या कोपरालाही थोडे खरचटले होते, आणि तिथे जर्सीला छानपैकी भोक पडले होते. ते त्याला दाखवले, गंमतीत म्हणलं, माझी जर्सी चांगली आहे, ती ढापलीस तर पहा. माझ्या या आगाऊपणाकडे बाप्पांचे लक्ष होतेच आणि त्याची प्रचिती लगोलग दुसऱ्याच दिवशी आली. त्याचा वृत्तांत येईलच पुढे.

दरम्यान, ओबी, हेम खायला घेऊन आले होते, भात, आमटी, भाजी पोळी अशी अस्सल राईसप्लेटच मिळाली होती त्यांना. वर ताकसुद्धा, और क्या चाहीये जिंदगी मै. गरम करायला मायक्रोवेव्ह होताच. त्यामुळे सगळ्यांनी मस्त ताव मारला आणि गारगार खोल्यांत पडी टाकली. ओबी तर दुसऱ्या मिनिटाला घोरायला लागला. मला दुपारी झोपायची अजिबातच सवय नसल्यामुळे पेंगुळलो तरी झोप अशी येईना. मग व्हॉट्सअपवर या त्या मित्रांशी, बायकोशी गप्पा मारत बसलो आणि कधीतरी डोळा लागला असावा कारण उठलो तेव्हा फोन तसाच हातात.

संध्याकाळी एक एक चहाची फैर झाली आणि मस्त निवांत आम्ही बागेत गप्पा मारत बसलो. खूप काळाने असे झाले होते कारण बहुतांश दिवशी यावेळी आम्ही असे घामाने थबथबलेल्या अंगाने, हॉटेलची वाट पुसत, शेवटचे २०-२५ किंवा कधी ३०-४० किमी अंतर पार करत असू. आज जेवण, अंघोळ, चहा सगळे करून असे निवांत बसायला शरीर फारच सुखावले होते.

हॉटेलमधून सूर्यास्त शूट करण्याचे वेदांगचे स्वप्न अखेरीस सत्यात आले

दरम्यान, आमचे उद्याच्या दिवसाचे प्लॅन सुरु झाले. कारण उद्या परत मोठा पल्ला होता आणि जाण्याचे रस्ते दोन होते. त्यापैकी कुठला घ्यावा यावर नकाशे काढून खल सुरु झाला. त्यात तिथल्या केअरटेकरने भाग घेतला. अतिशय वृद्ध अशा त्या मिंयाने आम्हाला सांगितले की बालासिनोरवरून गेलात तर जवळ पडेल कारण तिथे नंतर कॅनालच्या बाजूने जाणार रस्ता अजून खुला झाला नाही पण सायकली जाऊ शकतील. आणि आमचे बरेच अंतरपण वाचेल आणि ट्रॅफिकपण लागणार नाही.

आम्ही गूगल मॅपवर शोधले पण असा काही रस्ता अस्तित्वातच नव्हता. दुसऱा पर्याय होता तो म्हणजे हत्याकांडासाठी कुप्रसिद्ध अशा गोध्रावरून जाणारा. पण त्यात २० किमी जास्त होत होते आणि शेवटी गुगल मॅप्स पेक्षा स्थानिक लोकांची माहीती जास्त अचूक असते याचे प्रत्यंतर आम्हाला अनेकदा आल्यामुळे आम्ही शेवटी त्यावरच शिक्कामोर्तब केले.

रात्रीचे जेवण आणायला परत ओबीलाच पिटाळले, आणि तो बापडा रिक्षाने जाऊन घेऊन आला. सेम जेवण पण दिवसभरच्या विश्रांतीने चित्तवृत्ती प्रफुल्लीत झालेल्या त्यामुळे दोन घास जर जास्तच गेले आणि मस्त वाऱ्यावर बाहेरच गप्पा मारत बसलो.

एकेकाची विकेट पडायला लागली तशी आत जाऊन पडी टाकत होते. शेवटी मग मी आणि हेमच उरलो आणि आम्ही मग शुभरात्री चिंतून आपापल्या खोल्यात गेलो.

काल स्ट्रावाची साईट डाऊन होती त्यामुळे ग्राफ टाकला नव्हता आज टाकत आहे.
मॅप बघा, नुसता वैराण प्रदेश, पण उतार लागला होता त्यामुळे तेच त्यातल्या त्यात सुख

====================================================================
http://www.maayboli.com/node/61845 - (भाग १६): बस्का (वडोदरा)- गुजरातमां स्वागत

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तब्बल साडेतीन महिन्यांनी पुढचा भाग आला !!! फोटो आणि वर्णन मस्तच..
त्याची प्रचिती लगोलग दुसऱ्याच दिवशी आली. त्याचा वृत्तांत येईलच पुढे >>>पुढचा भाग लवकर येऊ दे..

अरे वा Happy पुन्हा एकदा धन्यवाद, हे सगळं तुम्ही इथे लिहिताय.
<<साधारण वीस एक किमी गेल्यानंतर पुर्वेकडे दिशा फटफटायला लागली आणि एका अतिशय रमणीय दृश्याने आम्हाला जागीच खिळवून ठेवले. सूर्यनारायण रंगमंचावर प्रवेश करण्यापूर्वी निसर्गाने मुक्त हस्ताने रंगाची उधळण करायला सुरुवात केली होती. त्या रक्तीमलाल रंगाच्या पार्श्वभूमीवर इवली पाखरे आळोखे पिळोखे देत कामाला लागली होती आणि या सगळ्याची मिळून एक इतकी सुंदर सिंफनी जमून आली होती की आम्ही कित्येक क्षण नुसते ते डोळ्यांनी पीत राहीलो. कुठल्याही वर्णनापलिकडकचे ते होते.>> हा पॅरा खूप आवडला. आशुचँप तुम्ही आता कविता करायला लागलात

धन्यवाद सुलक्षणा...

कविता नाही हो, जे सुचले ते उतरवले, काही गोष्टी अशा असतात की त्यापुढे प्रतिभा तोकडी पडते...

राया, आवर्जून काढण्यासारखे नव्हते, पुढे येतील काही चांगले

गारुडी पुंगी वाजवताना, पुंगी जिकडे फिरवतो तिकडे नाग वळतो.
आशुचँपच लेखनसुद्धा वाचकांच्या मनावर असचं गारुड निर्माण करतं, मग आशुचँप लिखाणाचा फोकस जिकडे वळवेल तिकडे आम्ही वळतो.
btw हेम, तुम्हाला आता सहा महिन्यानंतर कशी काय आठवण झाली ? इतके दिवस तुम्हीपण आमच्यासारखे या गारुड्याच्या पुंगीवर तल्लीन झाला होतात काय?

हेम, तुम्हाला आता सहा महिन्यानंतर कशी काय आठवण झाली ? इतके दिवस तुम्हीपण आमच्यासारखे या गारुड्याच्या पुंगीवर तल्लीन झाला होतात काय?

मी भागच आज वाचला. Happy