मेमॉयर्स ऑफ अ गेइशा.

Submitted by पद्मावति on 26 February, 2017 - 17:03

झुकलेली नजर, ओठांवर मंद स्मित आणि एक लाजरा कटाक्ष…अगदी क्षणभरच.. पण त्या क्षणभरच्या नजरभेटीतूनही जी कुठल्याही पुरुषाला वेड लावू शकते, ओढ लावू शकते ती खरी गेइशा!!
स्पर्श नाही, अंगप्रदर्शन नाही किंवा सवंग हावभाव नाहीत...फक्त एक कटाक्ष.

'गेइशा'- जपानच्या इतिहासातले, त्याच्या संस्कृतिक जडणघडणीतले महत्त्वाचे अंग. सामाजिक जीवनाचा अभिमानास्पद नसला तरी एक अविभाज्य भाग.

आता गेइशा म्हणजे कोण आणि काय? तर गेइशाचा शब्दश: अर्थ आहे कलाकार. नृत्य-गायनाने पुरुषाचे मनोरंजन करणारी कलावंत, आपल्या सौंदर्याने आणि वाकचातुर्याने त्याला रिझवणारी मोहिनी, त्याच्या समस्या ऐकून घेणारी, प्रसंगी सल्ला देणारी मैत्रीण. ही स्त्री शरीरविक्रय करणारी वेश्या नाही, पण त्याचबरोबर कायदेशीर पत्नीसुद्धा अर्थात नाहीच नाही. हिचे स्थान आहे कुठेतरी अधेमधे…

पुरुषांसाठी निर्माण केलेले एक जग...आभासी दुनिया. या जगात फक्त सौंदर्य आहे, सुगंध आणि आनंद आहे, जिथे येऊन घरच्या - दारच्या सर्व चिंता साकेच्या पेल्यात आणि गेइशांच्या सहावासात विरघळून जाव्यात असे हे स्वप्नांचे जग.
पण हे जग निर्माण करण्यासाठी मात्र काही स्त्रियांना फार भारी किंमत चुकवावी लागायची. सुंदर चेहरे, महागडे किमोनो आणि त्या नाजूक हास्याच्या मुखवट्याआड किती जखमा, किती अश्रू असतील याची परक्या व्यक्तीला कल्पनाही करणे अशक्य आहे.
मध्ये याच विषयावर एक नितांतसुंदर पुस्तक माझ्या वाचनात आले. लेखक आर्थर गोल्डन यांची कादंबरी ' Memoirs of a Geisha’.

geisha.jpg

कथेचा काळ आहे साधारणपणे १९३०पासून ते १९५६ पर्यंतचा. ग्रेट डिप्रेशन ते दुसरे महायुद्ध असा हा कालखंड. जपानच्या समुद्रकिनार्‍यावरचे एक लहानसे गाव. या गावात नऊ वर्षांची चिमुरडी चियो आपली मोठी बहीण सात्सु आणि आईवडिलांबरोबर राहत असते. मरणाच्या दारात असलेली आजारी आई आणि वृद्ध गरीब बाप. हे चियोचे आई-वडील परिस्थितीसमोर हात टेकून, काळजावर दगड ठेवून एक निर्णय घेतात, तो म्हणजे पोटच्या मुलींना स्वत:पासून दूर करण्याचा... पैशाच्या मोबदल्यात त्यांना विकण्याचा.
आता या मुलींची रातोरात घरातून उचलबांगडी होते आणि त्यांना नेण्यात येते दूर क्योतो शहरात. जपानचे संस्कृतिक केंद्र असलेले क्योतो शहर कला, साहित्य, स्थापत्यशास्त्र याबरोबरच आणखी एका गोष्टीसाठी ओळखले जायचे, ते म्हणजे इथल्या गेइशा.

स्वत:च्या घरापासून अक्षरश: ओरबाडून नेलेल्या या मुलींचे दुर्दैव आत्ता कुठे सुरू झालेय. आधीच अनाथ झालेल्या या बहिणी इथे येऊन एकमेकींपासुनही दूर केल्या जातात. जितक्या अलिप्ततेने आपण धान्य निरनिराळ्या डब्ब्यात भरून ठेवतो ना, तितक्या सहजतेने या मुलींनासुद्धा दूर वेगवेगळ्या घरांमध्ये पाठवले जाते.
खरी कहाणी सुरू होते ती इथपासून. चियोला केंद्रस्थानी ठेवून संपूर्ण कथा लिहिण्यात आली आहे.

गेइशांच्या दुनियेत घर आणि परिवाराच्या व्याख्या फार वेगळ्या आहेत. इथे घर, परिवार म्हणजे काही गेइशांचा एक समूह. एक ग्रूप. हा परिवार जिथे राहतो ते घर. या घराला ओकिया असे म्हणतात. लहानगी चियोचान ज्या घरात पडली आहे, तेथील सर्वेसर्वा आहे तेथील मालकीण. घरातला प्रत्येक निर्णय हा हिच्या मर्जीवर. या बाईच्या खालोखाल स्थान आहे हात्सूमोमोचे. हात्सूमोमो आहे या ओकियातील प्रमुख कमावती सदस्या. क्योतोमधील त्या काळातील अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाच्या गेइशांमधली एक. दिसायला अप्रतिम सुंदर असलेली ही मुलगी स्वभावाने मात्र फार दुष्ट आहे. चियोशी तर ती साताजन्माचे वैर असल्यासारखे वागत असते.

या जगात दुर्दैवाने अडकलेल्या मुलींच्या आयुष्याला दोन दिशा असतात. एक म्हणजे जन्मभर ओकियामध्ये गुलामाचे जीवन जगत राहणे. हा मार्ग अर्थातच कुणालाच नको असतो. दुसरा मार्ग आहे राजमार्ग....तो म्हणजे कसेही करून स्वत: गेइशा बनणे हा. अर्थात हाही मार्ग महाकठीण असायचा आणि तो निवडण्याचे स्वातंत्र्यही मुलींना नसायचे. एखादी मुलगी दिसायला, वागायला बरी असेल, त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे मालकिणीच्या मर्जीतली असेल, तर मात्र मग तिचे नशीब उजळायचे. अशा मुलीचे मग गेइशा बनण्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण सुरू व्हायचे.
चियोलाही असे शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी मिळते. नृत्य, वादन, साहित्य, काव्य अशा विषयांमध्ये तिची काटेकोर तालीम सुरू होते. गेइशा तालमीचा आणखी एक महत्त्वाचा भाग असायचा तो म्हणजे पुरुषांना मोहवण्याच्या, रिझवण्याच्या निरनिराळ्या खुब्या शिकणे. यामधे संवादकला, मेकअप करण्याची कला, सौंदर्यप्रसाधने, अत्तरे, मद्य अशा अनेक गोष्टी शिकणे हे आवश्यक असायचे.

थोड्याच कालावधीत चियो शिक्षण पूर्ण करते आणि तिला एक नवीन नाव मिळते...सायुरी!!!

कथा जरी सायुरीच्या आयुष्याभोवती फिरत असली, तरी ही कथा तिच्या एकटीचीच नाहीये. ही कथा वाचकाला सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वीच्या जपानमध्ये घेऊन जाते. तत्कालीन समाजजीवन, राहणीमान, लोकांची विचारसरणी, राजकीय चढउतार यांचे चित्र लेखक अगदी सहजपणे वाचकासमोर उभे करतो. गेइशांची झगमगती दुनिया, गेइशांचे आश्रयदाते आणि चाहते असलेले बडे राजकारणी, सर्वोच्च लष्करी अधिकारी, मोठे उद्योगपती त्याचबरोबर मानवी भावना, स्वभाव, हेवेदावे, प्रेम, मत्सर असे सगळे रंग, सगळी रूपे आपल्या पुढ्यात हळुवारपणे उलगडले जातात. पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत वाचकाला खिळवून ठेवणारी ही कादंबरी आहे.

याच कथेवर निर्माता स्टीवन स्पीलबर्ग आणि दिग्दर्शक रॉब मार्शल या जोडीने २००५मध्ये एक चित्रपट बनवला. चित्रपटाचे नाव तेच - 'Memoirs of a Geisha’.

geisha 1.jpg
(गूगल इमेजेसवरून साभार)

कथेचा आवाका प्रचंड आहे. साडेचारशे पानांचे पुस्तक अडीच तासांमध्ये प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे खरे म्हणजे फार कठीण काम होते. पण ही कथा पडद्यावर रॉब मार्शल यांनी अत्यंत समर्थपणे आणि फार देखण्या रूपात मांडली आहे. सिनिमॅटोग्राफी अप्रतिम आहे. चित्रपटाचा विषय गंभीर असला, तरी तो कुठेही उदासवाणा किंवा डार्क वाटत नाही. अतिशय सुरेख चित्रण.
स्क्रीनप्ले सशक्त आहे आणि एडिटिंग अगदी नेमके. घट्ट विणलेली ही पटकथा त्यातील कलाकारांनी रूपेरी पडद्यावर मोठ्या ताकदीने साकारली आहे.

सूझूका ओहगो या लहानशा गुणी मुलीने चियोचानची भूमिका फार सुरेख केली आहे. घरापासून, आईवडिलांपासून दुर्दैवाने दूर झालेली ही मुलगी हालअपेष्टा सोसतेय. पण तरीही खळखळ वाहणार्‍या पाण्याची लवचीकता हिच्या स्वाभावात आहे. म्हणूनच ही मुलगी तुटत नाही, कुठेही थांबत नाही. पाण्याच्या प्रवाहासारखी स्वत:साठी वाट बनवण्याची जिद्द हिच्या अंगात आहे. मनाची घालमेल, दु:ख पण तरीही अतिशय निश्चयी स्वभाव सुझूकाने डोळ्यामधून आणि हावभावांमधून फार जबरदस्त दाखवलाय.

गॉँग ली या अभिनेत्रीने हात्सूमोमोची भूमिका साकारलीय. पराकोटीचा मत्सरी आणि उर्मट स्वभाव, पण त्याचबरोबर अप्रतिम सौंदर्य असलेली ही बाई या चित्रपटातली खलनायिका आहे. भूमिकेला तिने शंभर टक्के न्याय दिलाय.

सायुरीवर एकतर्फी प्रेम करणारा नोबू आणि फक्त पैशाशी इमान ठेवणारी मालकीण या दोन भूमिकांमध्ये अनुक्रमे कोजी याकुशो आणि काओरी मोमोइ या कलाकारांनी अगदी मनापासून काम केलेय.

चियोच्या आयुष्यात काही लोक मात्र देवदूत बनून येतात. त्यामधली एक म्हणजे मामेहा! क्योतोमधील त्या काळातील सर्वात यशस्वी गेइशा. चियोला सायुरी बनवण्यात या मामेहाचा खूप मोठा वाटा असतो. सायुरीची मोठी बहीण बनून तिला मार्गदर्शन करणारी, प्रसंगी कठोर बनणारी पण प्रत्येक वळणावर तिला सांभाळून घेणारी मामेहा मिशेल येओह या अभिनेत्रीने उत्तम साकारलीय.

सायुरीच्या या गोष्टीत तिच्या स्वप्नांचा राजकुमारसुद्धा आहे. रखरखीत वाळवंटात अचानक एखादी हिरवळ दिसावी, त्याच प्रकारे हा राजकुमार सायुरीच्या आयुष्यात येतो आणि तिच्या आयुष्याची दिशाच बदलून टाकतो. केन वातानाबे या प्रचंड गुणी अभिनेत्याने या नायकाची भूमिका केलीय. अत्यंत शांत, खंबीर आणि संयमी असा हा मनुष्य. अबोलपणे प्रेम करणारा प्रियकर, दूर राहूनही नायिकेला प्रत्येक पावलावर साथ देणारा, आधार देणारा सखा, मित्रासाठी स्वत:च्या प्रेमाचा त्याग करणारा सच्चा मित्र अशी अनेक रूपे केन वातनाबेने ज्या ताकदीने सादर केली आहेत, त्याला तोड नाही.

चित्रपटातला केंद्रबिंदू आहे सायुरी! झॅंग झियी या अभिनेत्रीने आर्थर गोल्डनची ही नायिका पडद्यावर अक्षरश: जिवंत केलीय. भूमिकेचे लहानात लहान बारकावेसुद्धा हिने अप्रतिम दाखविले आहेत. सुरेख कोवळा चेहरा, गोड आवाज आणि अभिनयाची उत्तम जाण. या मुलीने कमाल केली आहे.

geisha 2.jpg
(गूगल इमेजेस वरुन साभार)

हा चित्रपट बोट धरून आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. क्योतोच्या रस्त्यांवरून, गजबजलेल्या मैफलींमधून, ओकियामधल्या घरांमधून आपल्याला तो फिरवून आणतो. आता जवळपास लोप पावलेल्या गेइशा नावाच्या एका अध्यायाची जराशी झलक दाखवतो.

मेमॉयर्स ऑफ अ गेइशा हे केवळ आत्मचरित्र नाही. ही स्मरणयात्रा आहे जपानच्या एका वादळी कालखंडाची, त्या देशाच्या राजकीय, सामाजिक स्थित्यंतरांची, मानवी स्वभावांच्या अनुभवांची, तरल प्रेमाची, अपेक्षाभंगांची आणि राखेतून पुन्हा भरारी घेणार्‍या एका पक्ष्याची....ही आहेत स्मृतिचित्रे..... स्मृतिचित्रे एका गेइशाची!!!
………………………………………………….
(मिसळपावच्या 'गोष्ट तशी छोटी' या विशेषांकात पुर्वप्रकाशीत)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी चित्रपट पाहिला आहे, छान आहे. कलाकार किंवा गेइशा पध्दती बद्दल फारसं माहिती नव्हतं , पण तरी कथेचा आशय पोहोचला होता. आता पुन्हा पहावासा वाटतोय.

छान ओळख.....
ज्यांना इंग्रजी वाचनाची सवय अथवा विशेष आवड नसेल तर हया पुस्तकाचा मराठी अनुवाद मी सायुरी नावाने झालेला आहे आणि तोही छान आहे....

छान आहे लेख.
हे पुस्तक वाचलं होतं. आता सिनेमा शोधुन पाहीन आणि मराठी अनुवाद आहे हे माहित नव्हतं. तो सुद्धा वाचायला आवडेल.

वाचायचा प्रयत्न केला पण मला त्यातली पात्र, त्यांच जीवन हेच कळायला नको आहे अगं पद्मा..
हा चित्रपट आहे माझ्याकडे..
पुस्तक वाचायच आहे पहिले म्हणुन त्या मुव्हीला हात नाही लावलाय मी अजुन..
बुरा मत मानना पण पुस्तक वाचल्यानंतरच मी लेख वाचेल शायद.. नक्की वाचेल.
Happy

छान लेख ....
हे पुस्तक वाचले आहे... वेगळ्याच जपानी संस्कृती शी ओळख झाली... चियोचान ते सायुरी हा प्रवास हेलावून टाकणारा आहे...

अगा..कित्ती सुंदर लिहिलंयस.. मी सिनेमा नाही पाहिलाय पण पुस्तक वाचलंय..तु झी वर्णन करण्याची हातोटी इतकी उत्तम आहे कि गेइशा अगदी डोळ्यासमोर उभी केलीस.. खूप सुर्रेख ओळख करून दिलीयेस..आता सिनेमा बघेनच Happy

तर हया पुस्तकाचा मराठी अनुवाद मी सायुरी नावाने झालेला आहे>>>>>>>>>>>> हो हेच ते पुस्तक, नाव आठवत नव्हते.खूप वर्षे झाली वाचून..
लेख सुंदर आहे.

पुस्तक वाचल नाही.पन चित्रपट पाहिला आहे.खरंच त्या अभिनेत्री ने कमाल अ‍ॅक्टींग केली आहे.तिचा स्टेज -परफॉर्म्स्न्स अजुन ही डोळ्यासमोर येतो.
मराठी अनुवादित आहे का ???

Don't you DARE press read more

सर्वांचे खूप खूप आभार.