प्लेग्राऊंड (Plac Zabaw) - काळंकुट्ट मैदान

Submitted by भास्कराचार्य on 20 February, 2017 - 01:11

``मला ह्या चित्रपटाविषयी काही लिहायचं नाही.''

``I do not wish to write about this movie.''

अ‍ॅण्ड येट आय मस्ट. मला हे लिहायला हवे. पोलिश दिग्दर्शक बार्तोझ कोवालस्कीची ही फिल्म कितीही राक्षसी वाटली, तरी ह्या चित्रपटातल्या पात्रांसारखी माणसे ह्या जगात आहेत, हे नाकारता येणार नाही. शेवटी हे एका सत्यघटनेवर आधारित आहे. लाखांमध्ये, नव्हे कोटींमध्ये एक, अशी जरी ही माणसे असतील, तरी शेवटी ह्या दुनियेत तीही आहेत. त्यांच्या वर्तणुकीचा आढावा घेणारा हा चित्रपट त्याच्या निष्पक्ष आणि अजिबात न बिचकणार्‍या शैलीमुळे कितीही भावनाहीन वाटला, तरी त्याचा उद्देश चर्चेला प्रवृत्ती देणारा आहे, आणि ही चर्चा कुठेतरी झाली पाहिजे. हा सिनेमा प्रेक्षकांमध्ये सरळसरळ एक सीमा आखतो - ज्यांना तो आवडला, ते त्याच्या ह्याच पोस्टमॉर्टेम करण्यासारख्या थंड दृष्टिकोनाचे, व तो अंगीभूत करणार्‍या चित्रीकरणाचे समर्थन करतील, तर इतरांना ते एका `टॅबू' समजल्या जाणार्‍या अस्पृश्य विषयाला अत्यंत निर्घृणतेने नाटकी ढंगात सादर करणे वाटेल, व ते ह्याला कडाडून विरोध करतील. हा सिनेमा प्रेक्षकांनाच नव्हे, तर प्रेक्षकालाही आतल्या आत दुभंगवून जातो. मला स्वतःला हा सिनेमा आवडला की नाही, ह्याचे उत्तर मी अजूनही ठामपणे देऊ शकत नाही. पण बहुतांशी मला त्याने विचार करायला भाग पाडले, म्हणून आवडला, असेच म्हणता येईल.

चला तर मग. पण पुढे जाण्यापूर्वी एक आत्ताच सांगतो. ह्या सिनेमाबद्दल बोलताना मी कथा आणि शेवट ह्यांबद्दल नेहमीपेक्षा जास्त विस्ताराने बोलणार आहे. ह्याचे एक कारण म्हणजे ज्या रीतीने हा सिनेमा अंगावर आला, ते बघता सामान्य माणसाला ह्या सिनेमाची कल्पना जरी असली, तरी सादरीकरणाची शैली इतकी परिणामकारक आहे, की त्याचा फारसा हिरमोड होणार नाही. उलट थोडीशी मदतच होईल, असे मला वाटते. त्याचबरोबर ह्या विषयावर चर्चा होणे अपेक्षित असेल, तर तो स्पष्टपणे समोर मांडला गेला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला स्पॉयलर्सचा त्रास होणार असेल, तर इथेच थांबा.

ह्या चित्रपटाबद्दल बोलताना शेवटापासून आरंभ करण्याचा मोह टाळून सुरवातीपासून सुरू करतो. शालांत समारंभाच्या दिवसाची ही कथा आहे. गॅब्रीसिया ह्या वय वर्षे १२ असलेल्या पोलिश मुलीचा नट्टापट्टा चालू आहे. लिपस्टिक लावून, बो लावून ती शाळेला रवाना होते. ही सुरवात. मग शाळेत ती पोहोचताच कॅमेरा पुनरारंभ करून झेमेक ह्या तिच्या वर्गातल्या मुलाकडे येतो. तो आपल्या अपंग (पक्षाघात झालेल्या?) वडलांची काळजी घेऊन शाळेकडे रवाना होतो. मग कॅमेरा पुन्हा नव्याने येऊन झारेक नावाच्या त्याच्या अजूनच परिस्थितीने वाईट मित्राकडे येतो, आणि शाळेत येण्यापूर्वीची त्याची स्थिती दाखवतो.

तुम्ही मनात म्हणत असाल, `बरं मग? ह्यात एवढं काय आहे?' आणि देअर लाईज द नब. कोवालस्कीचे थंडपणे `ह्या सगळ्यांत काहीतरी गडबड आहे' हे सांगण्याचे कसब वाखाणण्याजोगे आहे. ह्या तिन्ही मुलांमध्ये माणूसपण आहे म्हणजे काय आहे, अशी शंका मनात उद्भवू लागते. पूर्णपणे डी-ह्युमनायझिंग अनुभव. गॅब्रीसिया विवस्त्र अवस्थेत तयार होत असताना तिचे वडील एकदम दरवाजा उघडतात. वास्तविक ती अशा अडनीड्या वयात आहे, की तिने स्वतःला झटकन लपवायला हवे, व वडलांनीही झटकन शर्मिंदे होत दार लावून घ्यावे. पण ह्यातले काहीच होत नाही. ते दोघेही थंड नजरेने एकमेकांकडे पाहतात, व वडील तिला नाश्त्याला यायला सांगून निघून जातात. हीच गोष्ट झेमेक आणि झारेकची. झेमेक त्याच्या गोष्टीच्या शेवटी वडलांना काय करतो, ते मी इथे सांगणार नाही. पण जे काही होते, ते इतक्या ब्लिंक-अ‍ॅण्ड-मिस पद्धतीने होते, की आपलाच आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. हेअरस्टाईल करायला घरी पैसे नाहीत, म्हणून झारेक सरळ डोक्यावरचे केस एका लांब आणि वेदनादायक कंटिन्युअस शॉटमध्ये सरळ काढून टाकतो. अजून काही असलेच प्रकार, आणि काळाकुट्ट विनोद, ह्यांमुळे त्याची कथा भयंकर वाटते. ह्या सगळ्याला जोड आहे ती घरांत असणार्‍या नैसर्गिक प्रकाश-अंधाराच्या खेळाची, रंगीत आणि तरीही रंगविरहीत अशा फ्रेमची, आणि फ्रेमच्या बाहेरून येणार्‍या नेहमीच्या तरीही चित्रविचित्र आवाजांची. नवीन अंधार्‍या धूळभरल्या घरात राहायला गेल्यावर जर इमारतीतल्या सगळ्या घरांच्या भांड्यांचे आवाज तुम्हाला ऐकू यायला लागले, तर जसे वाटेल तसा अभद्र भुताळी प्रकार. हे तंत्र भयंकर परिणामकारक जमले आहे. ह्यामुळे कुठली तरी एक सूचक घंटा मनात सारखी वाजत राहते, अशी तजवीज दिग्दर्शकाने पुरेपूर करून ठेवलेली आहे.

गॅब्रीसिया श्रीमंत घरातली, झेमेक मध्यम परिस्थितीतला, तर झारेक कम्युनिस्टांनी बनवलेल्या स्वस्त घरांत राहणारा. हे वर्गीकरण आहे. पण गॅब्रीसियाच्या मनात झेमेक बसला आहे. आज शाळेतल्या शेवटच्या दिवशी तरी तिला झेमेकला हे सांगायचे आहे, त्याच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळवायचा आहे. पण तिच्यासारख्या गोबर्‍या गालांच्या `फॅटी' मुलीला तो काही भाव देत नाही. मग ह्यात तिची `मैत्रीण' तिची मदत करते. पण हीदेखील काही मैत्रीतली गोड मदत नाही! गॅब्रीसिया तिला पैसे देते आहे, म्हणून ती हे करते आहे, एवढेच. तिथेही काही दोस्ती वगैरे मूल्यांना वावच नाही. ती मैत्रीण झेमेकला गॅब्रीसियाला एकांतात भेटायला भाग पाडते. तेही का? तर त्याला `ब्लॅकमेल' करून. म्हणजे तिथेही काही मूल्येबिल्ये नाहीत. सारेच कसे विकृत. गॅब्रीसिया झेमेकला स्वतःला `ऑफर' करते, आणि झेमेक त्या ऑफरचे जे करतो, तेही सगळेच प्रेमाबिमासारख्या आदर्श वगैरे गोष्टींना वाटाण्याच्या अक्षता लावणारे आहे. ह्या चित्रपटातल्या प्रत्येक प्रसंगात प्रत्यक्ष नाहीतर अशी अप्रत्यक्ष (मूल्ये आणि मुले नष्ट करणारी) हिंसा भरून राहिलेली वाटते. पण ही काही फक्त हिंसेची गाथा नाही, तर `बघा आपल्याला ह्या युगामध्ये पोरांमध्ये काय काय होताना पाहावं लागतंय' असा दिग्दर्शकाने दिलेला इशारा आहे. लूक व्हॉट वी हॅव टू डील विथ अ‍ॅण्ड बेअर विथ इट.

गॅब्रीसिया प्रकरण आटोपल्यानंतर झेमेक आणि झारेक दोघे वीर शाळेला `बंक' मारून निघतात आणि एका मॉलमध्ये जाऊन पोहोचतात. तिथे त्यांना तीन-चार वर्षांचा एक छोटा दिसतो, आणि आपण सीसीटीव्ही कॅमेर्‍यातून दिसलेल्या ओपनिंग शॉटला येऊन पोहोचतो. पुढे काय होते, ही एक अत्यंत वेदनादायक सत्यघटना आहे. रॉबर्ट थॉम्प्सन आणि जॉन व्हेनेबल्स ह्या दोन १० वर्षांच्या मुलांनी ब्रिटनमध्ये १९९३ साली जेम्स बल्गर नावाच्या ३ वर्षांच्या मुलाला दूर रेल्वे ट्रॅकजवळ नेऊन निर्घृणपणे मारून टाकले होते, ही कथा दिग्दर्शक येथे अत्यंत अनअ‍ॅपॉलॉजीटिकली दाखवतो. शेवटचा अत्यंत लांबून घेतलेला, सीजीआयच्या सहाय्याने निर्माण केलेला, वेदनादायकरीत्या खेचलेला शॉट भ.यं.क.र. आहे. अनेक लोक तो चालू असताना थिएटरमधून निघून गेले. ही गोष्ट फक्त पिफचीच नव्हे, तर जगभरातल्या इतर फेस्टिव्हल्सचीही आहे. ह्याच शॉटमुळे पहिल्या परिच्छेदात मी जे काही म्हटले आहे, ते म्हटले आहे.

आता असा सिनेमा बनवावा, की नको? इथपासून लोकांच्या मतभेदांची सुरूवात आहे. सिनेमा शेवटच्या शॉटला संपतो, पण काहीही निष्पन्न होते का? हे कळत नाही. दिग्दर्शकाने सिनेमामध्ये `चाईल्ड सायकोपॅथी' ची अनेक पॉसिबल एक्सप्लनेशन्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे खरे. पण हा विषयच इतका गुंतागुंतीचा आहे, की ती खूपच साधी आहेत का? कधीकधी मला वाटते, ह्याशिवाय अजून काय असू शकेल? कधीकधी वाटते, काही माणसे कदाचित जन्मापासूनच तशी असतील. १० वर्षांच्या मुलांनी (चित्रपटात १२) इतके दुष्ट होण्याचे कुठले कारण समर्थनीय असू शकेल? पण हा सिनेमा कदाचित कारणे न देता येणार्‍या गोष्टीला चौकसपणे कारणे शोधण्याचा एक जोरदार प्रयत्न करतो, हे नक्की. चित्रपटाचा शेवट सत्यघटनेवर आधारित असला, तरी त्या पात्रांची गोष्ट लेखक-दिग्दर्शकांनीच बनवली आहे. त्यात त्यांनी आपल्या परीने तसे संकेत दिले आहेत. कदाचित आपणच आपल्या पिढ्यांना शिकवण्यात कमी पडत असू, असेही वाटून जाते. शालांत परीक्षेच्या दिवशी मुख्याध्यापिकेच्या भाषणाचा सीन तर सगळ्यांनीच बघावा, व कुठल्याही मुलांच्या सिनेमात तो फिट बसावा, असा आहे. दिग्दर्शकाची निरीक्षणशक्ती प्रचंडच आहे, ह्यात शंका नाही. कदाचित मुले कुठेतरी प्रौढांचेच अनुकरण करत असतील. कदाचित हे एका डिसफंक्शनल समाजाचेच चित्रण आहे. ते इतक्या थंडपणे केले आहे, की आपण चरकतोच. पण दिग्दर्शक फक्त एक गुन्हा दाखवून आणि शक्य संकेत देऊन कॅमेरा बंद करून टाकतो, नंतरचे काहीच दाखवत नाही. तो आपल्याला ह्याची उत्तरे कुठेतरी शोधायला भाग पाडतोय, कुठेतरी विचार करायला भाग पाडतोय.

मुलांच्या कामाविषयी काय लिहावे? तिन्ही मुलांनी इतकी अनैसर्गिक वाटणारी पात्रे कशी निभावून नेली असतील? मिकालिना स्विस्तुनच्या गोबर्‍या वाटणार्‍या गालांमुळे जो काही थोडा अल्लडपणा वाटू शकतो, तो तिचे निस्तेज डोळे केव्हाच गिळून टाकतात. तिचा स्वतःविषयीचा न्यूनगंड तिने जो दाखवला आहे की बस! त्या हँडसम डॅशिंग वगैरे असलेल्या झेमेकच्या डोळ्यांतून मध्येच एक क्रूर नजर अशी आपल्या डोळ्यांत डोकावून जाते, की हॅरीला पझेस करणारा व्हॉल्डेमॉर्ट आपल्याकडे बघून गेला की काय, असे वाटावे. तो जेव्हा अनपेक्षित निर्दयी बनतो, तेव्हा प्रचंड धक्का बसतो. आणि त्या नाझी वाटणार्‍या झारेकविषयी काय लिहावे? केसांची झुलपे असणारा हा गोंडस मुलगा केस काढून टाकल्यावर खुनशी वाटायला लागतो. त्याचे ते दु:खी डोळे एकदम थंडपणे सगळे काही पाहायला लागतात. त्याने ते केस नक्की का काढले, तेही कळत नाही. ठेवले असते तसेच केस. काय बिघडले असते? पण प्लेग्राऊंडमध्ये सगळे काही असेच आहे. उत्तराच्या जवळ नेऊन प्रश्न अनुत्तरित सोडणारे. उत्तरे मिळण्याचा आनंदच नाही. ह्या सिनेमात आनंदाचा पूर्णतः अभाव आहे. नवरसांतील फक्त `बीभत्स'रसच ह्यात आहे. पण तोही एक रस आहे, हे ह्या रसग्रहणात नाकारता येणार नाही.

उपरोल्लेखित सत्यघटनेचा ब्रिटनवर मोठा परिणाम झाला, हे सांगणे नलगे. सार्वजनिक जागी कॅमेर्‍यांचा वापर ह्या केसनंतर वाढला. ह्याचे कारण म्हणजे दोन दहा वर्षांची मुले जर कॅमेर्‍यात पकडली गेली नसती, तर त्यांचा गुन्ह्याशी संबंध कोणी लावला असता? त्याचबरोबर `निर्भया' प्रकरणानंतर जशी अल्पवयीन गुन्ह्यांबद्दल आपल्याकडे चर्चा झाली, तशी तेथेही खळबळ माजली. परंतु ह्या प्रवृत्तीचा छडा अजून कोणत्याच समाजाला घेता आलेला नाही. `प्लेग्राऊंड' हा त्याचाच एक प्रयत्न आहे. ह्या सिनेमाचे नावच इतक्या काळ्या विनोदाने भरलेले आहे, की सिनेमा तसाच असेल, ह्याचा अंदाज येतो (रेल्वे ट्रॅकजवळची जागा ही ह्या सायकोपॅथ्सचे प्लेग्राऊंड होऊन जाते). हृदयाने कमकुवत लोकांसाठी नसलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे, आणि तो खूप विचार करायला लावतो, हे नक्की.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही सिनेमे संपल्यावर ही सुरु राहतात. किंबहुना तेव्हाच खरे चालू होतात
चांगलं लिहिलंयस.
आदीश केळुस्करच्या ('कौल' नावाच्या मराठी चित्रपटाचा दिग्दर्शक) एका शॉर्ट फिल्म ची आठवण झाली.

झालं तसं चित्रीत करून असे चित्रपट काय दाखवू बघतात ? त्यामागची कारणं, मानसिकता वगैरे दाखवली असती, निदान त्या दिशेने प्रयत्न तरी केला असता, तर ...

दिनेशदा, कारणं आणि मानसिकता दाखवली आहेतच. पण ती बरीच आहेत, हे एक. आणि दिग्दर्शक छातीठोकपणे `हेच ते कारण' असे सांगत नाही, तर आपल्यालाच तो धुंडोळा करायला भाग पाडतो.

<<दिग्दर्शकाने सिनेमामध्ये `चाईल्ड सायकोपॅथी' ची अनेक पॉसिबल एक्सप्लनेशन्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे खरे. पण हा विषयच इतका गुंतागुंतीचा आहे, की ती खूपच साधी आहेत का? कधीकधी मला वाटते, ह्याशिवाय अजून काय असू शकेल? कधीकधी वाटते, काही माणसे कदाचित जन्मापासूनच तशी असतील. १० वर्षांच्या मुलांनी (चित्रपटात १२) इतके दुष्ट होण्याचे कुठले कारण समर्थनीय असू शकेल? पण हा सिनेमा कदाचित कारणे न देता येणार्‍या गोष्टीला चौकसपणे कारणे शोधण्याचा एक जोरदार प्रयत्न करतो, हे नक्की. चित्रपटाचा शेवट सत्यघटनेवर आधारित असला, तरी त्या पात्रांची गोष्ट लेखक-दिग्दर्शकांनीच बनवली आहे. त्यात त्यांनी आपल्या परीने तसे संकेत दिले आहेत.>> ह्यात म्हटल्याप्रमाणे त्यांनी मुलांच्या बॅकग्राऊंड स्टोरीजमध्ये ती कारणे पेरलेली आहेत. झेमेकवर मूल बनलेल्या आपल्या वडिलांचा भार आहे, तर झारेकला त्याच्या लहान भावंडाचा त्रास होतो आहे. मुद्दा असा आहे, की असा त्रास असलेली फक्त हीच मुले आहेत असे काही नसावे. पण जे कृत्य केले, ते करणारी हीच का? त्यांच्या जीन्समध्येच काही दडले आहे का? ते माहीत नाही. पॉसिबल एक्सप्लनेशन्स सगळी सिनेमात आहेत, पण अमुक एक गोष्टीने हे झाले, असे ठामपणे कळत नाही.

आय होप नो अ‍ॅनिमल्स वेअर हर्ट. मनुष्यांच्या कृरतेची मला १००% खात्री आहे. मुले पन विकृत वागू शकतात सगळीच काही देवाघरची फुले नसतात हे आहेच. ह्याहूनही वाइट घटना उत्तरप्रदेशात नेहमी घडत असतात पण त्यावर कोणी फ्लिमे बनवऊन महोत्सवात दाखवत नाहीत. फार पूर्वी दूरदर्शन्वर अश्याटाइपचे पण इतके कृर प्रसंग नसलेले परदेशी चित्रपट दाखवत असत. जे साधारण फेस्टिवल मध्येच दिसत. रेग्युलर रिलीज होत नसत. चित्रपटाचा नेट परिणाम काय आहे?

नुसता ट्रेलर बघुनही अंगावर येतोय.. छान परिक्षण भाचा..
बर्‍याचदा आहे हे असं आहे हीच गोष्ट मान्य करावी लागते, ती मुलं अशी का वागली याचं कारण शोधण्यात काही हशील नाही.

अमा, अ‍ॅनिमल्स फिजीकली हर्ट झाले, असे काही वाटत नाही. पण झारेक आणि एका कुत्र्याचा एक सीन आहे, तो वाईट आहे. खराखुरा तो कुत्रा हर्ट झाला नसेल, तरी सिनेमात ते बघताना कसंतरी होतं जरा.

नेट परिणाम सिनेमाचा माझ्यासाठी तरी हाच, की (हिटलरसारखी) माणसं जन्मतःच वाईट असतात की नाही, ह्यावर विचारमंथन, आणि कंपॅशनचं आयुष्यातलं महत्व अधोरेखित होणे. तुम्हाला ह्याच अर्थी विचारायचं होतं का?

सायको पाथ लोकां चे पाय पाळण्यातच दिसतात. प्राण्यांचा छळ करणे व त्यांना हाल करून मारणे हे अगदी प्राथमिक लक्षण आहे. दिग्दर्शकाचा हेतु अगदी चांगला असला तरीही अन ट्रेंड प्रेक्षक वर्ग ही अशी एक वागण्याची टेंप्लेटच आहे असे समजून त्यातील कृत्ये करू बघतो. असे भयानक क्रौर्य आजूबाजूला सर्वत्र दिसतेच. गोड गोजिरा कंपॅशनेट समाज हेच खरे तर एक मोठे बबल मधले विश्व आहे.
त्यात राहणारे लोक कधी चुकून अश्या क्रौर्याचा संबंध किंवा त्याबद्दल माहिती मिळाली की विचलित होतात. सहन करू शकत नाहीत.
साधे प्राणीजन्य घाण वास सुद्धा कधी न घेतलेले ह्युमन बीइंग्स असतात. त्यांचे बबलजीवन एखादा नैसर्गिक पण घाण वास आला कि डिस्टर्ब होते. मग असे अनुभव तर सोडाच. कायम कंपॅशन चे गोडवे गाणारे समाज मुलींना धर्माच्या नावाखाली उपाशी ठेवतात, सुनांना हाल हाल करून मारतात जाळतात. दुसृयावर होणारा अत्याचार बघून जाने दो म्हणून निघून जातात. असल्या मानसिकते पेक्षा
वरील चित्रपटातले अ‍ॅज इट इज चित्रण खरे वाटते.

परीक्षणच वाचवले नाही तर सिनेमा बघण्याचा प्रश्नच नाही.
अमा, वरच्या प्रतिसादातला दृष्टीकोन रोचक आहे. कृतीतून व्यक्त झालेली हिंसा आणि वागणूकीतून अप्रत्यक्षपणे व्यक्त होणारी हिंसा ही एकाच पातळीची असू शकते ही खरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. The indirect non physical violence is like slow poisoning.

छानच लिहिलंय.
हा मजकूरच अंगावर आला. इतका, की माझा ट्रेलरच्या लिंकवर क्लिक करण्याचाही धीर होईना पटकन. (पण ट्रेलर पाहणार.)

बापरे !!

खरंच असे भयानक बघण्याचा धीर होत नाही. त्यातही जर ते नॉर्मल लाईटींग , कुठलीही फोडणी न देता असले तर जास्तीच अंगावर येते. खरं म्हणजे आपल्या चित्रपटात हिंसा नविन नाही पण त्याला कुठे तरी हे खरं नाही अशी सुरूवात असते - आपल्याला कळत असते की हे सगळे फँटसी आहे. पण जेव्हा असा एखादा सत्य घटनेवरचा पिक्चर येतो आणि त्यात कुठलेही आवरण न लावता हिंसा दिसते तेव्हा खरच थरकाप उडतो.

माझ्यासकट, इथे अनेक जण म्हणताहेत कि हे आम्हाला बघवणार नाही.. हा दिग्दर्शकाचा हेतू असू शकतो का ? जे झालं तसं दाखवलं, तर
या माध्यमाची ताकद ती काय ? झालं त्याच्या पलिकडे जाऊन जर काही दाखवता आले नाही....

शिवाय हा प्रेक्षकाच्या मानसिकतेचा आणि पार्श्वभूमीचाही मुद्दा आहेच. कत्तलखान्यात काम करणार्‍या व्यक्तीला ते दृष्य पडद्यावर बघायला काहीच वाटणार नाही.
वर नग्नतेचा मुद्दा आलाय. हे वावडे केवळ आपल्याच नजरेला आहे, ते सुद्धा वर्तमान काळातील आपली मानसिकता जी आहे, त्यामूळे आहे.
पण कालांतराने नजरच मेली तर..

माझ्यासकट, इथे अनेक जण म्हणताहेत कि हे आम्हाला बघवणार नाही.. हा दिग्दर्शकाचा हेतू असू शकतो का ? जे झालं तसं दाखवलं, तर
या माध्यमाची ताकद ती काय ? झालं त्याच्या पलिकडे जाऊन जर काही दाखवता आले नाही....

शिवाय हा प्रेक्षकाच्या मानसिकतेचा आणि पार्श्वभूमीचाही मुद्दा आहेच. कत्तलखान्यात काम करणार्‍या व्यक्तीला ते दृष्य पडद्यावर बघायला काहीच वाटणार नाही.
वर नग्नतेचा मुद्दा आलाय. हे वावडे केवळ आपल्याच नजरेला आहे, ते सुद्धा वर्तमान काळातील आपली मानसिकता जी आहे, त्यामूळे आहे.
पण कालांतराने नजरच मेली तर..

माझ्यासकट, इथे अनेक जण म्हणताहेत कि हे आम्हाला बघवणार नाही.. हा दिग्दर्शकाचा हेतू असू शकतो का ? जे झालं तसं दाखवलं, तर
या माध्यमाची ताकद ती काय ? झालं त्याच्या पलिकडे जाऊन जर काही दाखवता आले नाही....

शिवाय हा प्रेक्षकाच्या मानसिकतेचा आणि पार्श्वभूमीचाही मुद्दा आहेच. कत्तलखान्यात काम करणार्‍या व्यक्तीला ते दृष्य पडद्यावर बघायला काहीच वाटणार नाही.
वर नग्नतेचा मुद्दा आलाय. हे वावडे केवळ आपल्याच नजरेला आहे, ते सुद्धा वर्तमान काळातील आपली मानसिकता जी आहे, त्यामूळे आहे.
पण कालांतराने नजरच मेली तर..

Dinesh Sir this is realistic cinema without any type of exposition. Viewer is supposed to draw his own inferences.cruelty exists at all levels. The director has served a slice. Way more impact full than crafted set action pieces.

दिनेशदा, दिग्दर्शकाचा हेतू काही हिंसेला नॉर्मलाईझ करायचा किंवा लोकांच्या नजरेला मारायचा मला तरी वाटत नाही. त्याच्या हातात दृकश्राव्य माध्यमाची ताकद आहे. वर्तमानपत्रात अमुक एखादी बातमी वाचणे, आणि डोळ्यांसमोर धनिने व अमांनी म्हटल्याप्रमाणे कुठलीही फोडणी न देता असले काही बघणे, ह्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे, आणि हेच दिग्दर्शकाला आपल्याला शॉक देऊन सांगायचे आहे, असे मला वाटले. अमा म्हणाल्या, तसे ह्यामध्ये इंटरप्रीटेशन तुमच्यावर आहे. त्यात तुम्ही तुमचे इंटरप्रीटेशन मांडलेत, हेही काही चूक नाही. कदाचित ह्या अशा चर्चा व्हाव्यात, हाच दिग्दर्शकाचा हेतू असेल. त्याने स्वतः एका मुलाखतीत म्हटले आहे, की हा सिनेमा सध्या पोलंडमध्ये वर्चस्व दाखवणार्‍या राईटविंग चळवळीची रिअ‍ॅक्शन म्हणूनही आहे. आपण आपल्या मुलांना नक्की कोणता समाज देत आहोत, ह्याबद्दल विचारमंथन व्हावे, असा त्याचा हेतू दिसतो. चित्रपटातल्या मुलांच्या पालकांना त्यांच्या वागणुकीचा शेवटपर्यंत काही फरकच पडलेला दिसत नाही. असे होऊ देऊ नका, असे थोडेसे टाहो न फोडता थंडपणे त्याने मांडले, असे मला वाटते.

बापरे! वाचताना पुरेपुर झलक मिळाली पिक्चरची. छान लिहीलं आहेस.

छोट्या मुलांमधलं क्रौर्य दाखवणारी एक कथा सुहास शिरवळकरांच्या 'मूड्स' कथासंग्रहात आहे. त्या कथेची किंचित आठवण झाली.

लेख एकदम जबरी..
बापरे वाटावे असे लिहिले आहे.
पिक्चरही तसाचा असणार.. नंतर ट्रेलर बघेनच, त्यातून समजेलच.

मात्र वास्तव कधीही खरेखुरे गचाळ दाखवण्यात अर्थ नाही. जर एखादी गचाळ झोपडपट्टी दाखवायला आणि तिथे लोकं कशी राहतात हे दाखवायला तिथे रस्त्यावर पडलेल्या मलमूत्राचे क्लोज शॉट घेतले आणि ते बघून आपल्या पोटातले पॉपकॉर्न ढवळले तर आपण फार प्रभावित होऊन बाहेर पडू असे मला वाटत नाही.
मूळात प्रेक्षकांना या प्रकारे प्रभावित करायला सुरुवात झाली आणि असे चित्रपट त्यांनाही झेपू लागले तर अश्या प्रकारांचे प्रमाण वाढेलच. त्यात सहजता येऊ लागेल..
यापेक्षा लोकांसमोर चित्रपटाचा विषय पोहोचवण्याचे "सैराट" तंत्र मला चांगले वाटते.

प्रत्येक प्राणी क्रूर होउ शकतो आणि माणूस हा एक प्राणी आहे. त्यामुळे माणसात क्रूरता ही जन्मजातच असते. इतर प्राणी आणि माणसात खूप फरक आहेत आणि त्यातला एक फरक म्हणजे माणसाला असलेली हाव. इतर प्राण्यांना भूक असते आणि त्यांची क्रूरता ही त्या भुकेशीच संबंधीत असते. पण भूक संपली तरी हाव संपत नाही आणि म्हणून माणसाची क्रूरता ही इतर प्राण्यांपेक्षा कैक पटींनी जास्त असते. ह्या क्रूरतेला काबुत ठेवण्यासाठी कदाचीत रुढी बनवल्या गेल्या असतील. ह्या रुढी जंगलाचा कायदा नाकारून एक समाज वसवतात. रुढींमध्ये सगळेच बरोबर असते असे नाही आणि त्यामुळे त्या सतत बदलत असतात - बहुतेक प्रगल्भही होत असाव्यात. त्यालाच आपण संस्कृती म्हणतो. असे जरी असले तरी माणसाच्या मनात मुलतः क्रूरता असतेच - जास्त कमी असेल, पण असते नक्की. लहान मुलांचे कंडीशनिंग व्हायचे असते त्यामुळे त्यांना क्रूरतेला ताब्यात ठेवणे जमतेच असे नाही. काही कारणामुळे उफाळलेली क्रूरता आणि बालसुलभ उत्सुकता यांची सांगड घातली गेली तर एक डेडली काँबो बनते.

वरचा मी वाचलेल्या एका लेखाचा गोषवारा आहे. लेख खूप मोठा होता आणि अंगावर येणाराही होता त्यामुळे वाचतानाही खूप त्रास झाला होता. चित्रपटाची दृकश्राव्य भाषा तर नुसत्या लेखनापेक्षा आणखीनच परीणामकारक करता येऊ शकते. त्यामुळे हा चित्रपट पाहणे बहुतेक जमणार नाही मला. पण ...

ते त्याच्या ह्याच पोस्टमॉर्टेम करण्यासारख्या थंड दृष्टिकोनाचे, व तो अंगीभूत करणार्‍या चित्रीकरणाचे समर्थन करतील >>> दिग्दर्शकाला काय सांगायचय हे तुझ्या लेखात अगदी अचूक पकडले आहेस. इथली चर्चा तेच सांगतेय.

यापेक्षा लोकांसमोर चित्रपटाचा विषय पोहोचवण्याचे "सैराट" तंत्र मला चांगले वाटते. >>> माझे मत याच्या अगदी उलट आहे. त्या तंत्रात जहाल विष करमणूकीच्या गोड आवरणातून दिले जाते. त्याने आपण मरत तर नाहीच उलट ते विष आपल्या अंगवळणी पडू लागते. तसे होऊ द्यायचे नसेल तर त्या विषाची जहालता जाणवून देणारा धक्काच आवश्यक असतो. त्यानेच कदाचीत औषधोपचार सुरु होण्याची शक्यता असते.

प्रत्येक चित्रपटाची एक स्वतंत्र कक्षा असते.
धक्कातंत्र जे सैराट मधे वापरले तसे गँग ऑफ वासेपुर सारख्या चित्रपटात नाही वापरले जात. त्याचा बाज वेगळा आहे.
बॉलिवूड मधे रोमॅन्स दाखवायची जी पध्दत आहे ती हॉलिवूड मधे नाही. तसेच आपल्या कडच्या "आर्ट" चित्रपटात सुध्दा वेगळी आहे.
उत्तान प्रदर्शन दाखवणे ही चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या बाजावर अवलंबून असते.
चित्रपटात दाखवण्यात येणारी प्रचंड हिंसा ही राम गोपाल वर्मा, अनुराग कश्यप, इ. मंडळीच्या चित्रपटात बघायला मिळाली तर आपल्या नजरेला ती पटून जाते. पण तशीच हिंसा जर सुरज बडजात्या, करण जोहर, इ. च्या चित्रपटात बघायला मिळाली की आपण त्यावर टीका करू लागतो. आपणास ते पटत नाही. आणि आपण ते स्वीकारत सुध्दा नाही.

काही जण स्वप्नातले चित्रपट बनवतात तर काही जण वास्तवातले चित्रपट बनवतात.
काहींसाठी वास्तव दाखवण्याकरीता अगदी खरेखुरे दाखवण्याची गरज भासत नाही तर काहींना खरेखुरे शॉट घेण्याची गरज लागते.

बडजात्यांच्या चित्रपटांचे रसिक लोकांना अनुराग कश्यप अजिबात पचणी पडणार नाही. तेच उलट सुध्दा आहे.

शेवटी प्रेक्षकांवर आहे काय बघावे काय बघू नये. सर्वसमावेश मंडळींना चांगली कलाकृती असण्याशी मतलब असतो