ध्यानीमनी : सो sss फनी !!

Submitted by झंप्या दामले on 15 February, 2017 - 03:27

मराठीतल्या चांगल्या चित्रकर्त्यांची नावं घेतली जातात तेव्हा कायम उमेश कुलकर्णी, भावे-सुकथनकर, नागराज मंजुळे यांचीच नावं घेतली जातात, पण चंद्रकांत कुलकर्णीनेही गेल्या 20 वर्षांत भेट, बिनधास्त, कदाचित, तुकाराम, आजचा दिवस माझा, फॅमिली कट्टा असे मोजके पण दर्जेदार सिनेमे दिले आहेत, त्यावर काहीतरी लिहायला हवे असा मी परवा विचार करत होतो. पण म्हटले उद्या ध्यानीमनी बघून येऊ आणि मग त्याचेही नाव त्या यादीत समाविष्ट करून लिहू.
पण ......
हा हन्त हन्त !
काय होतं ते ?

मुक्ता बर्वे अनुभवायला गेलो आणि अलका कुबल सहन करावी लागली ! 'एकतरी ओवी अनुभवावी' म्हणून गेलो आणि वाणसामानाची यादी वाचावी लागली ... माधुरीचं स्माईल बघायला गेलो आणि सिद्धूचं हसणं वाट्याला आलं.

अख्खा चित्रपट म्हणजे अनैसर्गिक अभिनय, अनाकलनीय शॉट्स/कॅमेरा अँगल्स, काल्पकताशून्य पार्श्वसंगीत, रानोमाळ संवाद, असंख्य चुका, जुनाट नि अजागळ दिग्दर्शन या सगळ्याचा प्रचंड येळकोट आहे ! चित्रपटाच्या पहिल्या सीन पासून यात कृतकपणा शिगोशीग भरलेला आहे. साधारण सातव्या मिनिटापासून अश्विनी भावेची अतिउच्च पट्टीतली वटवट चालू होते ती शेवटच्या मिनिटापर्यंत ऐकून ऐकून थकवा आलेला असतो. ही अश्विनी भावे आहे की मीरा मोडक हेच कळेनासं होतं. खरं म्हणजे रहस्योदघाट्न होईपर्यंत भावेबाईंचं बोलणं अगदी casual दाखवणं गरजेचं होतं पण 'बघा हे character किती casual आणि नॉर्मल आहे’ हे आपल्या हावभावांतून भावे मॅडम पुन्हा पुन्हा सांगत होत्या (डिट्टो सोनाली कुलकर्णी (ज्येष्ठ)). शिवाय सोबत म्हणून तिने हाताच्या, चेहऱ्याच्या इतक्या वाढीव हालचाली केल्या आहेत की श्रेयनामावलीत तिचं नाव 'अश्विनी हावभावे' असं नाव द्यायला हवं. हे सगळं धक्कादायक होतं. नव्वदीच्या दशकात उसगांवकर, कुबल, शहाणे, वाड वगैरे मुलींच्या काळात अश्विनी भावेच सगळ्यात प्रभावी अभिनेत्री होती. याशिवाय अलीकडच्या काळातला 'कदाचित'मधला अप्रतिम अभिनय सर्वांच्या समोर असताना इथे एवढी खोटी acting का करावी तिने ?

पहिल्या दहा पंधरा मिनिटात एकंदरीत चित्रपटाची हाताळणी लक्षात लक्षात आली आणि 'व्हॉट टू एक्सपेक्ट फ्रॉम धिस फिल्म' हे लक्षात आले. यापुढचा सगळं सिनेमा म्हणजे 'Laugh Riot' होता. अनाकलनीय संवादांनी हास्याचे स्फोट व्हायला लागले.
(उदा.
अश्विनी उर्फ शालिनी : मी तुला अपर्णा म्हटलं तर चालेल ना ?
मृण्मयी उर्फ अपर्णा : होss, मी माझ्या नवऱ्याला समीरच म्हणते.
किंवा
मांजरेकर उर्फ सदाभाऊ : मेणबत्ती लाव.
अश्विनी उर्फ शालिनी : संपलीये... शोधते..)

चित्रपटाला दिलेल्या जुनाट नाटकी ट्रीटमेंटमुळे यातली मुलाचे अस्तिस्त्व सिद्ध करू पाहणारी आई 'करुण' वाटण्याऐवजी धम्माल विनोदी वाटू लागली ! (उदा. वाळत घातलेले कपडे भराभरा ओढून काढत असतानाचे संवाद - "हे बघा… माझ्या मोहितचे बूट, हा बघा शर्ट, ही बघा अंडरपँट (येस्स्स !! यु हर्ड इट राईट, आय ऍम नॉट ऍट ऑल Jo(c)k(ey)ing !!! ), बघा.. त्याचे सॉक्स, अजूनही ओले आहेत" असे म्हणून सॉक्सला स्पर्श करायला सांगण्याऐवजी वास देणे वगैरे प्रकारांनी आमच्या थेट्रातल्या टवाळक्यांना पारावर उरला नाही).
संवाद चालू होते आणि त्यातल्या 'टोन'मधून मला अत्रंगी काहीतरी आठवत होतं
उदा :
१) "अरे मोहित ? आलास ?" हे वाक्य ऐकताना "अरे परशुराम ?? येss येss येss परशुराम .. ये"
२) महेश मांजरेकर शेवटी 'मोहित'ला फोडून काढताना "तू अमुक केलंस ? तमुक केलंस ?" वगैरे जाब विचारतो तेव्हा
"माळी म्हणाला ???? तुम्हाला तुमच्या तोंडावर माळी म्हणाला ???" वगैरे स्फोटक संवाद प्रकर्षाने आठवायला लागले होते. Unintentionally hilarious (अर्थात ध्यानीमनी नसताना विनोदी झालेल्या) चित्रपटासाठी आजपासून मी 'ध्यानीफनी' हा शब्द वापणार आहे !!

ज्युरासिक पार्कमध्ये जसा तो डायनासॉरला कोणे एके काळी चावलेला डास गोठून राहिलेला असतो आणि मग त्याच्यापासून पुन्हा डायनासॉर तयार करतात तसे वीस वर्षांपूर्वी गोठवलेले 'ध्यानीमनी' हे नाटक कमीत कमी बदल करून चित्रपट आपल्या माथी मारलेले आहे. शिवाय यात काही डायनासॉर इतक्याच जुन्या गोष्टी आहेत.
उदा. अपर्णा प्रेग्नन्सी टेस्ट घरी करू शकत नाही… त्यासाठी तिला लॅबची मदत घ्यावी लागते, तिथून येताना ती समीरला कॉईनबॉक्सवरून फोन करते, महेश मांजरेकरच्या घरातच काय ऑफिसातसुद्धा AC नाही , तो जुना CRT टीव्ही बघतो, बजाज चेतक चालवतो … हे आणि असलं बरंच काही.
उत्तरार्धात एका अत्यंत तणावपूर्ण क्षणी अश्विनी भावे 'अस्तित्व' म्हणजे काय अशा अर्थाचे काही संवाद म्हणते. आख्ख्या सिनेमात हे मोजकेच संवाद अतिशय नेमके आणि विचार करायला लावणारे आहेत, एवढंच काय तर चित्रपटाचा शेवट हा 'कन्टेन्ट म्हणून अतिशय हादरवणारा आहे. दुर्दैवाने तोपर्यंत चित्रपट इतका कोसळलेला आहे की त्यातलं काहीही भिडूच शकले नाही.

या सगळ्यात नक्की दोष तरी कुणाकुणाला द्यायचा ?
पार्श्वसंगीतकार अजित परब ? 'लोकमान्य'चे सुरेख पार्श्वसंगीत यानेच दिलेय का ? मध्यंतराच्या वेळेस एक तपशील उघड होऊन धक्का बसणे अपेक्षित असताना त्याने इथे बाराव्या मिनिटापासून असे काहीतरी गूढबिढ पार्श्वसंगीत दिले आहे की तेव्हाच सस्पेन्स फुटायला लागतो
कलाकार ? अत्यंत कंठाळी अश्विनी भावे की निबर मांजरेकर ?
संवादलेखक अजित दळवी ? साधारण ३० ते ४० वर्षांपूर्वीचे वाटावेत असे कृत्रिम संवाद लिहिल्याबद्दल ?
पार्टनर इन क्राईम बरेच आहेत, पण सगळ्यात मोठा वाटा दिग्दर्शकाचा. ऍव्हरेज किंवा फसलेला सिनेमा काढणे/निघणे समजू शकतो. पण चंद्रकांत कुलकर्णीने मूर्तिमंत डिझास्टर काढणे हे आकलनापलीकडचे आहे. इतका, की तो चित्रपट त्याचा न वाटता महेश मांजरेकरचा वाटतो.
चुका तर अश्या लेव्हलच्या आहेत की filmmaking चा पार्टटाईम डिप्लोमा करणाऱ्याचा सिनेमा वाटावा. इथे अश्विनी भावेला होम सायन्स करून आर्ट्सची पदवी मिळते, साधारण कारकुंडा असणारा (त्याशिवाय त्याच्या चेतक आणि CRT टीव्हीचे स्पष्टीकरण काय असू शकते ?) महेश मांजरेकर अचानक कम्पनीचा GM बनतो, GM झाल्यावरही तो चारचौघांसोबतच टेबल टाकून पंख्याखाली हाश्शहुश्श करत करत बसतो, "See, I did it" च्या ऐवजी "Saw, I did it" म्हणतो, समीर - अपर्णा रोह्याला येताना गाडी ज्या दिशेनी येते त्याच दिशेनी ते दोघे रोह्याहून निघतानाही येते…..
या असल्या गोष्टी तपासणी न करता नाक्यावरून पुढे सोडण्याचा दोष कुलकर्णीसाहेबांकडेच जातो. त्यांनी एका अत्यंत संवेदनशील विषयाचा आणि हलवून सोडणाऱ्या संहितेचा सत्यानाश केलेला आहे. चित्रपटाची भावनिक जातकुळी पाहता चित्रपटात कुठेही पॉझेस, ठहराव वगैरेचा पत्ताच नाहीये. कुठलाही प्रसंग ठसण्याआधीच पुढे धाव ! पळवायची एवढी कसली घाई होती न कळे.... "रवीनाजी मैं आपसे कुछ कहना चाहता हूँ" म्हणेम्हणेपर्यंत संडासात जायची घाई झालेल्या सलमानची आठवण झाली मला ..

गुलज़ारचा म्हणून चित्रपट पाहायला गेलो आणि तो मनोजकुमारचा निघाला याचे दुःख मोठे आहे !!!
(Bookmyshow च्या 50% off वाल्या ऑफर मुळे दुःख थोडं कमी झालं एवढंच !)

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

हाहाहा! दुसऱ्याचा रेडिओ ठणाणा करायला लागला की मी तो माझ्याचसाठी लावला आहे अशी स्वतःची समजूत करुन घेतो तेवढाच आपला संताप कमी होतो (इति पुलं).. ही युक्ती वापरून तुम्ही सिनेमा सहन केलात असं वाटतं! ज्यांच्याकडून अपेक्षाच नसतात त्यांनी काहीही केले तरी फार चिडचिड होत नाही पण चांगल्या लोकांनी चांगल्या कलाकृतीची वाट लावली की फार दुःख होते. उपरोधाने लिहिले असून तुम्हाला मनापासून वाईट वाटल्याचे देखिल लेखातून पोचते आहे.

उपरोधाने लिहिले असून तुम्हाला मनापासून वाईट वाटल्याचे देखिल लेखातून पोचते आहे.>>>> +१
नाटक तर आम्च्या काळातले नक्कीच नाही,त्यामुळे काहीच कल्पना नाही. पण तुमचा रीव्ह्यु पाहता चित्रपट नाही पाहिला तरी चालेल ह्या कॅटेगिरीत येतो आहे.

बघणार होतो. आता झीवर येइल तेव्हा बघेन
"रवीनाजी मैं आपसे कुछ कहना चाहता हूँ" म्हणेम्हणेपर्यंत संडासात जायची घाई झालेल्या सलमानची आठवण झाली मला .. >>>>>> Lol

अरेरे, या नाटकाची पण वाट लावली का ?
मी मूळ संचात बघितलेय हे नाटक ( नीना कुलकर्णी, शिवाजी साटम आणि महेश मांजरेकर ) आणि त्याचा प्रभाव आजही आहे.
नीनावर "चम्पु" चा छाप तेव्हाही होताच, तरीपण हि भुमिका छान जमली होती. शिवय स्टेजची म्हणून एक वेगळी मजा होतीच.
नवीन संहीता का करत नाहीत ही मंडळी ? ( सेलेब्रेशन बाबतीत पण हेच केलं होतं, पण निदान नाव तरी बदललं होतं, इथे तर
तेही नाही केलेय. ) आत्मविश्वास नाही का राहिला आता ?
ती नाटकं जुनाट झालीत आता. त्यातली रहस्य देखील सर्वांना माहीत आहेत. चित्रपटच करायचा तर निदान वेगळा काहीतरी विचार
करायचा ना !

माधुरीचं स्माईल बघायला गेलो आणि सिद्धूचं हसणं वाट्याला आलं.
"रवीनाजी मैं आपसे कुछ कहना चाहता हूँ" म्हणेम्हणेपर्यंत संडासात जायची घाई झालेल्या सलमानची आठवण झाली मला
चित्रपटासाठी आजपासून मी 'ध्यानीफनी' हा शब्द वापणार आहे !! >>>>>>>> Rofl Rofl Rofl

Laugh Riot साठी तरी पहायला हवा. अर्थात ऑनलाईन येईपर्यंत वाट पाहिन

छान लिहीले आहे. तूनळीव र आला की बघीन. अश्विनी भावे हीना मध्ये पण असह्य झाली होती. तिच्याशी साखरपुढा होउ नये म्हणोन रिसि पकूर चक्क पाकिस्तानात वाहून जातो. बुडत पण नाही ढोल्या. फॅमिली कट्टा पण असह्य च आहे मी अर्धा तास बघायचा प्रयत्न केला पण म्हातार्‍यांची बड्बड थांबवेना. वंदना गुप्ते किती दिवस क्यूट दिसू शकेल. अशांचं फंडिंग बंद केले पाहिजे.

अमा, वंदना गुप्ते सिनेमातही, नाटकाच्या व्हॉल्यूम मधेच बोलते !!!

चंद्रकांत कुलकर्णी नवीन होता, त्यावेळेस त्याने अनेक नाटके गाजवली होती. पण नंतर तेच तेच करत राहिला.
युवक मंडळी छान छान एकांकिका सादर करत असतात, पण जूने लोक बाजूला व्हायला तयार नसल्याने,
त्यांना मुख्य धारेत संधी मिळत नसावी बहुतेक.

अमा Lol Lol

अमा, फॅमिली कट्टा साठी +१ महा क्रीपी सिनेमा आहे.
चंद्रकांत कुलकर्णी फार आवडत नाहीत पण आजचा दिवस माझा बरा सिनेमा होता की चिनूक्स!

"रवीनाजी मैं आपसे कुछ कहना चाहता हूँ" म्हणेम्हणेपर्यंत संडासात जायची घाई झालेल्या सलमानची आठवण झाली मला .. Lol Lol

भारी लिहिलंय Happy

मला तर ट्रेलर बघूनच समजलेले की फातच जुनाट ट्रीटमेंट वाला सिनेमा आहे ..

जबराट लिहिलंय ! पटलं सगळं .
Thank you पैसे आणि मनस्ताप वाचवल्याबद्दल .
प्रोमोत सुद्धा अश्विनी विचित्र ओरडत बोलताना दिसते. मूळ नाटक बघितलेलं नाही. आणि प्रोमोत वेगळा विषय वाटल्याने बघायला जावं का असा विचार करत होते.
मूळ नाटका पेक्षा नवीन काहीच देता येत नसेल तर इतके पैसे खर्चून cinema काढतातच कशाला ? आणि channels वर अशा काही मुलाखती देत असतात की हजार वर्षातला सर्वोत्तम cinema आपण काढलाय ..

भारी लिहिलेय Lol
मटात दिग्दर्शकाला अगदीच वाईट वाटू नये म्हणून थोडं सावरुन घेऊन लिहिला आहे रिव्ह्यू.
तुम्ही परखडपणे लिहून पैसे वाचवलेत त्याबद्दल धन्यवाद. हल्ली मला महेश मांजरेकर ज्या चित्रपटात असतो त्या चित्रपटाला हजेरी लावण्याबाबत 200 टक्के साशंकता असते .

फॅमीली कट्टा मधला ट्विस्ट फार अन्गावर येतो.. खरच क्रिपी आहे, मला वन्दना गुप्ते फार आवडते , गोड गोड आयाच्या गर्दित ती फार वेगळ काम करते , डॅशिन्ग-चुर्चुर्तित खणखणित सवाद असतात .. पण यात तिला फारच म्हातारी दाखवलिये.
ध्यानिमनीचा रिव्ह्यु भारी..

धमाल लिहीले आहे! Happy सर्व पन्चेस् सुरेख!

कदाचित मध्येही अश्विनी भावे ने एक्सेप्शनल काम केलं होतं असं मला वाटत नाही Happy

एकदम झकास लिहिलेय Happy आजकाल अनेक मराठी चित्रपटांत "कूल फॅक्टर" गायब असतो. संवाद/अभिनय/गाणी ह्या सगळ्यात आकांडतांडव केल्याशिवाय चित्रपट प्रभावी होणार नाही अशी आजकाल अनेक मराठी निर्माते/दिग्दर्शकांची समजूत का झालेली आहे कळत नाही. आणि ते "नऊ महिने पोटात सांभाळले आहे" वगैरे असले कानाला चाटत बोलल्यासारखे संवाद कधी थांबणार आहेत काय माहित.

Pages