‘आहुपे घाट आणि त्रिगुणधारा घाट’

Submitted by योगेश आहिरराव on 13 February, 2017 - 00:08

‘आहुपे घाट आणि त्रिगुणधारा घाट’

‘आहुपे घाट’.. पहिली भेट झाली ती बरोब्बर १२ वर्षांपूर्वी ऐन जूलैच्या तुफान पावसातच. घाटमाथ्यावर पोहचता क्षणी मुखातून आलेले पहिले शब्द अजुनही तसेच आठवतात. "सुंदर, अप्रतिम,भन्नाट इथे सर्व काही फिके" अर्थातच सह्याद्री पावसात सर्व ठिकाणी काहीसा सारखाच, पण त्या वेळी भर पावसात हा सुंदर लयबध्द चढाईचा घाट चढून आल्यावर माथ्यावर जे काही दृश्य दिसले तेव्हाची हि प्रतिक्रिया….
आहुपे गावाला निसर्गाने भरभरून दिले आहे. ऐन घाटामाथ्यावरील या गावाला बरेच सपाट पठार लाभले आहे. अगदी मागच्या काही वर्षांपूर्वीपर्यंत गावात वाहुतुकीची फारशी साधन नव्हती सहाजिक दोन पैशे वाचविण्यासाठी इथले गावकरी वाण सामानसाठी ही पूर्ण घाटवाट उतरून म्हसा किंवा मुरबाडला बाजाराला येत. तसेच कधीकाळी ऐकलेले गावात असलेल्या रातआंधळेपणाचे किस्से अश्या काही गोष्टी कुठतरी वाचलेल्या. त्यामुळेच माझे आहुपेबद्दलचे कुतुहल वाढले असावे.
पण या आहुपे घाटाचा शेजारी म्हणता येईल हवंतर असा त्रिगुणधारा घाट ज्यालाच तिंरगा घाट / डोणीचे दार असेही म्हणतात, हा घाट बरेच वेळा राहूनच जात होता. मी, नारायण अंकल आणि विनायक आमच्या त्रिकुटाने हा ट्रेक ठरवला. आहुप्याने चढाई करून त्रिगुणधाराने उतरायचे.
दि. १९/०१/२०१३ सकाळी आठ वाजताच म्हसा गावात नेहमीच्या ठिकाणी फक्कड चहा आणि मिसळचा नाश्ता केला. म्हसाहून धसईला जाणारी जीपगाडी काही हालेना, अर्ध्या तासानंतर चार पाच माणस जमल्यावर विनवणी करून एकदाची जीप सुरू झाली. पूर्वेला हाकेच्या अंतरावर सह्याद्री एकदम मस्त वातावरण, वाटेत सिध्दगड, गोरख, मच्छिंद्र यांची सोबत होतीच. जांबुर्डे, नारिवली, देहरी मागं टाकत वीस मिनिटांतच खोपिवलीत उतरलो.समोरच सह्याद्रीचे सरळसोट कडे आणि घळी. यामधूनच वाट वळणवळणे घेत कमी उंचीच्या खिंडीतून घाटमाथ्यावर पोहचते. गावातून बाहेर मुख्य वाटेला लागलो, मोठा अर्थातच कोरडा ओढा पार करून सपाटीवर आलो. उजवीकडे गोरख मच्छिंद्र कोवळ्या उन्हात चांगलेच उठून दिसत होते. वाट नंतर एका सोंडेवर चढते इथूनच उजवीकडे खाली पावसाळ्यात मुख्य धबधबा दिसतो त्यालाच खोपिवलीचा धबधबा असेही म्हणतात. पाठीमागून एक गाववाले मामा आले, राम राम-शाम शाम झाल्यावर मामा सुरू झाले. "सोयरांकडे आलो व्हतो, आता नारायणगाव जायचे आहे. घाटावर गावात बाराच्या सुमारास मंचर येश्टी हाये." थोडक्यात मामांनी पण सह्ययात्रा करत थेट मुरबाड आळेफाटा नारायणगाव असा प्रवास टाळला होता. त्यामागे कारणही तसेच थोडे पैसे बचत होऊन, शरीराला व्यायाम होत असेल तर काय वाईट. मामांनी उपदेशाचे डोस सुरू केले, ज्याचा खऱतर रोजच्या रहाटगाड्यात कंटाळा आला होता. तेच तेच खून, चोरी, भ्रष्टाचार, बलात्कार मग सरकार वगैरे वगैरे. मध्येच आम्हाला थांबवत मामा म्हणाले ‘मी वारकरी दरवर्षी पंढरपूरा जातो. माझ्या अंगात देव आहे, मी पुण्यात्मा आहे’ आता हे जरा अतीच झाल. त्यांचा तोंडाचा पट्टा अखंड सुरू होता, अंकलने परिस्थिती हाथाळत त्या मामांना एस टी च्या वेळेची आठवण करून देत कसेबसे पुढे पाठवले. चला कटकटीपासून सुटका आता आम्ही निवांत, घाटाच्या मध्यावर पाण्याचे टाके तिथेच जरा वेळ विसावलो. पुढे वळसा मारून वाट अलगद वर चढू लागली खाली घाटाचे पहारेकरी गोरख मच्छिंद्र आता बुटके दिसत होते. शेवटची वळणावळणाची झाडीभरली वाट आस्तेकदम चढत घाटमाथ्यावर आलो. खाली गोरख मच्छिंद्र आणि दुरवर चढाई सुरू केली ते खोपिवली. आहुपे गावातून दुपारची मंचरकडे जाणारी एस टी नुकतीच गेली होती. गावात दाखल झालो तर यावेळी बराच बदल जाणवला. बहुतेक ठिकाणी सिमेंटचे बांधकाम दिसले, काही ठिकाणी चांगल्या गोष्टी जसे शाळा व नव्याने बांधकाम केलेला जिल्हा परिषदचा मोठा दवाखाना.वाटेत दवाखान्यात काम करनार्या बाई भेटल्या, स्वत:हून आमची चौकशी करू लागल्या. तेरेकू मेरेकू वाल्या हिंदीत
बाई: किधर से आये इतना बोजा लेके, कुछ बेचने आये हो क्या ?
अंकल : नाही, आम्ही गिर्यारोहक आहोत.
बाई: ( डोक्याला हाथ लावत ) “अररर” …..असल्ल मराठीत,
“का बर एवढी उठाठेव, हे भारी पाठिवर सामान वागवत कशाला फिरायच?”
या संवादाची आता तशी बरीच सवय झाली आहे.
मग जरा गप्पा, त्यातून कळाले की, त्या बाई बेल्हा गावातून इकडे जिल्हा परिषदेच्या दवाखान्यात कामासाठी दाखल झाल्या होत्या. बोलता बोलता म्हणाले, "काय आहे इंथ, नुसते डोंगर डोंगर आणि जोरदार वारा, दुर दुर पर्यंत गाव नाही, वाहतूक नाही, मला तर नाही करमत”
खऱच आपण सुध्दा शहरातल्या धकाधकीच्या रोजच्या कंटाळवाण्या दिनक्रमातून सुटका म्हणून असे काही छंद जोपासतो. पण उद्या जर वेळ आली आणि खरच अशा मग ते कितीही सुंदर रमणीय का असेना, पण नोकरीसाठी रहावे लागले तर !.. शहरात चटावलेल्या सर्व सोयी सुविधांची तशी इथे कमतरता. चार आठ दिवस मजेत जातीलही पण पुढे काय ? कदाचित एखाद्याला ते जमेल ही ! बाईंचे वाक्य विचार करण्यासारखे होते. असो तर डोकं जड होण्याआधीच तिथून सटकलो, थेट गावात पठारावरच्या छोट्या खेतोबाच्या देवळात पाठपिशव्या टेकवल्या. पुन्हा एकदा पश्चिम कड्यावर जाऊन मनसोक्त वारा पिऊन घेतला. त्या छोट्या मंदिरातच दुपारचा घरातून आणलेला जेवणाचा डब्बा संपवला. जरा वेळ तिथेच रेंगाळलो नंतर देवराई वगैरे करत सरळ डिंभे रोड पकडला. डोणी गावात जाण्यासाठी दुसरा पर्यायच नव्हता वाटेत कुठली गाडी येईल आम्हाला सोडेल याची आशाच नव्हती.वाटेत अघाणे, पिंपरगाणे छोट्या वाड्या मागे टाकत त्या डांबरी सडकेने १०-१२ किमीचे डोणी गावापर्यंतचे अतंर कापून डोणी गावात पोहचायला सायंकाळ झाली. डोणी गावाच्या वेशीवरच पलीकडेच दुर्ग-ढाकोबा दिसले. ढाकोबाच्या माथ्यावर मावळतीचे रंग खासच वाटत होते. मुक्कामाचा शिधा सोबतच असल्यामुळे डोणी गावाच्या बाहेर पठारावर पाझर तलावाच्यापुढे तंबु ठोकला. तलावाकडे जाऊन फ्रेश होऊन आल्यावर अंकलनी मस्त चहा तयार केला. चहामुळे त्या कंटाळवाण्या डांबरी सडकेवर चालून आलेला थकवटा कुठच्याकुठे पळून गेला. एकदम फ्रेश, एकदम निवांत कसलीही घाई नाही कि चिंता नाही. काही वेळाने स्वयंपाकासाठी चूल पेटवायला लाकुडफाटा शोधू लागलो, तेवढ्यात तंबू पाहून दोन गावकरी आले विचारपूस चौकशी झाल्यावर, त्यांच्या घरी जेवणासाठी मुक्कामासाठी आग्रह करू लागले, नम्रपणे नकार दिला, शेवटी आम्ही ऐकत नाही हे पाहून चक्क त्यांच्या घरातले सरपण चूलीसाठी दिले. मस्तपैकी मोकळ्या आकाशाखाली, अगणित तारकांच्या लुक लुक खेळीत चूलीवर खिचडी शिजत होती. साथीला होते ते फक्त सह्याद्री आणि जीवलग सोबती. पोटभर जेवण झाल्यावर पुन्हा त्या नभोमंडळाखाली गप्पाचे फड रंगवत बसलो विषय फक्त आणि फक्त ट्रेक, अर्थात अंकल सोबत असल्यामुळे हा फायदा असतोच. थंडीचा कडाका वाढल्यावर तंबूमध्ये शिरलो, दिवसभराची चढाई चाल या मुळे पाठ टेकताच झोपी गेलो.
ट्रेकींग मधल्या सकाळ मध्ये एक जोश, नाविन्यता, वेगळीच हुरहुर असते. अगदी तशीच सकाळ या ट्रेकला अनुभवता आली. जवळच्या पाझर तलावात मुबलक पाणी होते. झटपट चहा आणि उपमा तयार करून पोटभर हादडले. पण हा मुक्काम मात्र कायम लक्षात रहानार माझा तरी ऑल टाईम फेव्हरेट. सर्व जागेची सफाई करून आवरते घेत त्रिगुणधारा ने उतरण्यासाठी प्रस्थान केले. पठारावरून गावाला डावीकडे ठेवून पश्चिम कड्याच्या दिशेने निघालो. वाट मळलेली, पुढे उजवीकडे मुख्य शिरोधारेवरून सरकत दुर्ग च्या दिशेने जाऊ लागली. मनात लगेच शंका आली कारण डोणी दार/त्रिगुणधारा ही वाट तर गावापासून फार दूर नसावीच. पुढे गेल्यावर दुर्ग आणि त्यामधली छोटी दरी दिसली. म्हणजे ही दरी उतरली समोर डोंगर चढलो की पोहचलोच दुर्गवाडी पठारावर. आधी २००६ मध्ये खुट्टेधार घाटाने दुर्ग ढाकोबा पाहून दार्या घाटाने गेलो होतो. तसा हा भाग परिचयाचा होता, हे तर पक्के होते की घाटाची सुरूवात मागे राहिलीय. पण सहज म्हणून पुढे जायचे ठरवले, थोडे अंतर जाताच कड्याच्या अलीकडे मोठे जेसीबी आणि डंपर दिसले पाहून आश्चर्य वाटले, आजूबाजूला आवाज दिला तर काहीच प्रतिसाद नाही. वेळेचा अंदाज घेत दुर्ग वर न जाण्याचा निर्णय घेत, अचुक वाट शोधाण्यास परत फिरलो, अगदी नाहीच जमले तर शेवट गावात जाऊन कुणाला तरी सोबत घेण्याचा पर्याय होताच. समोर कड्याजवळ बैल चराई करत दिसले. थोडे खालच्या बाजूला एक छोटे घर दिसले, तिथे जाऊन विचारपूस केली.
श्री. कामा विठ्ठल निर्मळ रा. आंबे हातवीज.
दुर जंगलात एकाकी असे घराचे लोकेशन तर अप्रतिम, अंगणातून समोरच दरीपलीकडे दुर्ग, त्यामागे उठावलेला ढाकोबाचा माथा, मागेच सह्यकडा आणि खाली हातवीज गाव. समोरच पाण्याचा हंडा मग ताक हजर, सारावलेल्या अंगणात जरा वेळ विसावलो. मला तर आणखी एक मुक्काम इथे करावा असे प्रचंड वाटत होते अंकलजवळ तसे बोलूनही दाखवले पण अंकलने माझी ईच्छा फेटाळून लावत मला भानावर आणले, असो पुन्हा कधीतरी..
विठ्ठल मामाशी बोलताना सर्व उलगडा झाला, आम्ही मुक्कामाच्या जागेहून थेट थोडे गावाअलीकडून दक्षिणेला जायला हवे होते तर चुकीच्या अंदाजाने उत्तरेकडे म्हणजेच दुर्ग ला जाण्याचा वाटेवर आलो आणि तिथून शोध घेत मुख्य कड्यावर पोहचलो जिथे ते बैल पुढे जेसीबी वगैरे दिसले. मामांशी बोलताना कळाले की दुर्ग ते भीमाशंकर हा घाटमाथ्याजवळून रस्ता होण्याच्या मार्गावर आहे, म्हणूनच ही सगळी यंत्र सामग्री इथे आणली आहे. हे ऐकूण तर आम्ही चाटच पडलो, काय बोलावे....
मामा घाटाच्या सुरूवातीपर्यंत सोबत आले, येताना कुठे गफलत झाली तेही लक्षात आले. पण जे होते ते चांगल्यासाठीच थोडी वाट वाकडी झाली पण वेगळीच माहिती मिळाली, घाटमाथ्यावरून त्यातही डोणीच्या दाराचा वेगळाच नजारा पहायला मिळाला. विठ्ठल मामांकडे औट घटकेचा पाहुणचार घेता आला.
झाडीभरल्या वाटेने घाटाच्या मुखाशी आलो.थोडे वरच्या अंगाला पाण्याचा छोटासा ओहोळ मामांनी दाखवला या मुळेच या वाटेला त्रिगुणधारा असे म्हणतात. वाट अगदीच निमुळती आणि तीव्र होत उतरत होती. मामांचा निरोप घेऊन उतरायला सुरूवात केली. सुरूवातीला झाडीझुडपे ही बरीच होती, तसे पाहिल तर वाट हि मोठ्या ओढ्यातूनच उतरते बरिचशी दार्या घाटाशी साधर्म्य असणारी, मोठ मोठ्ठाले दगड धोंडे उतरत कड्याला चिकटून वाटेचा अंदाज घेत हळूहळू उतराई चालू ठेवली. उतार तीव्र असल्याकारणाने गुडघ्यांवर चांगलाच ताण येत होता. कितीही अंतर चालतोय तरी त्या निमुळत्या वाटेने बाहेर पडताच येईना, बहुतेक तीन तास उतरल्यावर उजवीकडे एक पायवाट दिसली मग मागे वळून पाहिले तर आम्ही उतरलो ती वाट. तिथून उजवी मारून जंगलातून खालच्या पदरात उतरलो. इथून मात्र उत्तरेला नाणेघाट जीवधन डावीकडेच खुट्टेधार घाट सहज ओळखु आले. अर्ध्या तासाच्या चालीनंतर वाघाच्या वाडीत दाखल झालो तेव्हा सायंकाळ झाली होती. तसेही मढ पर्यंत चालत जाण्याची आजिबात इच्छा नव्हती पण पर्याय नव्हता. वाघाची वाडी ते मढ यामध्ये आणखी एक वाडी लागते बहुतेक हुंबाची वाडी तिथे आलो. एव्हाना अंधार पडला होता. गावातले हौशी मंडळी चौकात उभेच होते. परत प्रश्नोउत्तरांचा तास सुरू, गावात जीप गाडी होती पण चालक शुध्दीत नव्हता. दुसरा पर्याय मढला जाणे. पण तेव्हा गावात असे कळाले की मढ गावातले जीपवाले कुठतरी जत्रेला गेले आहेत तिथे जाऊन ही फायदा नाही, गेलात तर थेट पुढे धसईपर्यंत चालत जावे लागेल. सकाळपासून जे चालत होतो ते सायंकाळ पर्यंत,माझी तरी त्यावेळी पुढे चालत जाण्याची तयारी नव्हती. एका घराच्या अंगणात बसलो, खऱच माणुसकी लागलीच छोट्या स्टीलच्या कपात चहा मिळाला. घरातल्या आजोबांसोबत बोलताना परत खुट्टेदारा, माकडनाळ, पोशीची नाळ, त्रिगुणधारा, सोनावळ्याची रामदेवळी उर्फ गणपती गडद मग जंगली वनस्पती अमक्या तमक्या आजारावर औषध मग उतारा हे सर्व विषय झाले पण गाडीचे काय ठरत नव्हते. साडेआठच्या सुमारास जीपववाल्याजवळ गावातले दोन चार लोक पुन्हा जमली, त्यापैकी एकाने आमची परिस्थिती पाहून मुरबाड पर्यंत सोडायची तयारी दाखवली. परत पैशावरून आडीबाजी सुरू शेवटी ५०० रूपयात मुरबाड पर्यंत सौदा ठरला, ट्रेकमध्ये काहीवेळा असेही अनुभव येतातच. कसेबसे दहा वाजता मुरबाड उतरून पुढे कल्याणला जाणारी बस तर धावतच पकडली. बसमध्ये मात्र सारखे त्या आहुपेत भेटलेल्या बांईचे बोल आठवत होते.... का बरं एवढी उठाठेव ?

योगेश चंद्रकांत आहिरे.

फोटो साठी हे पहा : http://ahireyogesh.blogspot.com/2017/02/ahupe-trigundhara.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त वर्णन. फोटो पण इकडेच टाका.. मजा नाही येत त्याशिवाय !
बाईंचे वाक्य विचार करण्यासारखे होते. >>> खरंय !

व्वा, काय मस्त लिहिलय Happy भारी अनुभव. फोटो असते तर बघायला अन वर्णनाशी जुळवुन घ्यायला अजुन मजा आली असती Happy

मस्त..