२४ वीक्स ('24 Wochen') - नैतिकतेवर बोलू काही

Submitted by सन्तु ग्यानु on 4 February, 2017 - 15:39

स्टिव्हन स्पीलबर्ग च्या ‘लिंकन’ चित्रपटात एक मस्त प्रसंग आहे: लिंकन यांनी कृष्णवर्णीयांची गुलामगिरी संपवण्याच्या हेतूने अमेरिकन सिनेट मध्ये एक बिल आणले. त्याच्या चर्चेदरम्यान एक सिनेटर गृहस्थ उभे राहतात आणि म्हणतात - “तशी गुलामगिरी विषयी मला घृणाच वाटते, पण तरीही गुलामांना मुक्त करावं अशा मताचा मात्र मी नाही. आज मुक्त करा म्हणतायत... उद्या मतदानाचा अधिकार देतील!” ह्यावर तत्कालीन अमेरिकन सांसद थोडे चुळबुळतात. आपले गृहस्थ पुन्हा दरडावतात “आणि परवा? अहो! बायकांना मतदानाचा अधिकार देतील!” सांसद भलतेच खवळतात. एखाद्या वेदपाठशाळेत हे घडलं असतं तर उद्गारले असते अब्रह्मण्यम! अब्रह्मण्यम!

हा सगळा इतिहास केवळ १५० वर्ष जुना आहे. भारताला स्वतंत्र होऊन ७० वर्ष होत आली आणि आपल्याकडे पहिल्यापासून स्त्रियांना मतदानाचा हक्क आहे! तात्पर्य: आपल्याला कालपर्यंत जी गोष्ट कल्पेनेपलीकडची, घृणास्पद वाटत होती ती आज स्वागतार्ह वाटू शकते आणि कदाचित उद्या ती हक्काची बाब देखील वाटू शकते. आपली कक्षा रुंदावते खरी पण त्यामुळे काही नवीन गावं आपल्या क्षितिजावर येऊन ठेपतात आणि मग त्यांच्या विषयी संघर्ष सुरु होतो.

जी गोष्ट मतदान हक्काची तीच गोष्ट संतती-स्वातंत्र्याची. संतती नियमनाच्या नैतिकतेविषयी चर्वितचर्वण सुरु करून, आता आपण पहिल्या तिमाहीतला गर्भपात अंगवळणी पडण्यापर्यंत येऊन पोहोचलो आहोत. पण दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत?

गर्भ बऱ्यापैकी बाळासारखं दिसू लागतं. त्याचे वेगवेगळे अवयव ठळकपणे जाणवू लागतात. अशा वेळी गर्भपात आणि हत्या यामध्ये किती अंतर उरतं? आपण समाज म्हणून त्याकडे कसे पाहतो? हे आणि असेच काही प्रश्न घेऊन आपल्यासमोर येतो २४ वीक्स.

अ‍ॅस्ट्रिड (जुलिया येन्श) आणि मार्कस (ब्यार्न मेडेल) हे एक जर्मनी मध्ये राहणारं आधुनिक जोडपं आहे - लग्न न केलेलं आणि ते अधोरेखित करायची गरज न वाटणारं. अ‍ॅस्ट्रिड एक प्रतिथयश स्टॅंड-अप कॉमेडियन आणि मार्कस तिचा मॅनेजर कम बॉयफ्रेंड. त्यांना नेले नावाची मुलगी आहे आणि दुसरं मूल आत्ता पोटात वाढतंय. अ‍ॅस्ट्रिड आणि मार्कस यांचं उत्कट प्रेम आणि नेलेशी असणारं त्यांचं नातं आपल्याला लोभस वाटतं. एक स्त्री स्टॅंड-अप कॉमेडियन, आशा युनिक ओळखीमुळे अ‍ॅस्ट्रिडला जर्मनीत भरपूर प्रसिद्धी मिळतेय. अशातच चौथ्या महिन्यात गर्भाला डाउन्स सिन्ड्रोम असल्याचं कळतं आणि त्यांच्या घराला पहिला धक्का बसतो. त्या धक्क्यातून बाहेर येत, एकमेकांना सावरत, हे सत्य स्वीकारत शेवटी बाळाला जन्म देण्याच्या निर्णयापर्यंत ते दोघे तसे लिलायाच येऊन पोचतात. हा निर्णय घेतल्यामुळे जो ताण अचानक रिलीज होतो त्यात ते इतके एकसाईट होतात की दे एक छोटासा अपघात करतात. एकीकडे अपघातग्रस्त चालक (जो मूळ जर्मनवंशीय नाहीये) त्या दोघांना शिव्या घालतोय आणि दुसरीकडे ते दोघे शांतपणे रस्त्यावर उभे राहून एकमेकांचं चुंबन घेतायत हे दृश्य पाहून तर आपण त्या दोघांच्या भलत्याच प्रेमात पडतो. त्यांच्या नात्यात असलेली ही स्पेस पाहून मस्त वाटतं.

त्यांच्या घरच्यांना मात्र हा निर्णय फारसा आवडत नाही. तिची आई विरोध करते, नेले ला सांभाळणारी आया ‘डाऊनी’ बाळाचा सांभाळ करायला नकार देते, डाउन्स सिंड्रोमग्रस्त मुलांच्या शाळेला भेट दिल्यामुळे असेल कदाचित, पण बारक्या नेलेला काहीतरी गडबड जाणवली आहे आणि तिलाही ते बाळ नकोय. अ‍ॅस्ट्रिड आणि मार्कस मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहेत. ह्यात अ‍ॅस्ट्रिडच्या आईची साईड स्टोरी सुद्धा इंटरेस्टिंग आहे. आपल्या नवऱ्याच्या निधनानंतर तिला प्रथमच स्वतंत्र आयुष्य जगता येतंय आणि ते तिला आता कोणत्याही परिस्थितीत गमावायचं नाहीये. आपल्या गतिमंद नातवाला सांभाळायला अ‍ॅस्ट्रिडकडे जावं लागेल ही कल्पनाच तिला नकोशी वाटतेय! माझ्या ओळखीतल्या बर्याच स्त्रियांची आज काही प्रमाणात हीच रियालिटी आहे असं मला जाणवतं.

अशातच सहावा महिना (२४ वीक्स) उजाडतो आणि गर्भपरीक्षणातून अजूनच गुंतागुंती समोर येतात. बाळ जन्मताच त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागतील आणि त्यातूनही ते वाचण्याची शाश्वती नाही अशी माहिती अ‍ॅस्ट्रिड आणि मार्कसना कळते. आणि इथे मग खरा संघर्ष सुरु होतो.
सोनोग्राफीच्या हाय रेसोल्युशन चित्रांमध्ये दिसलेल्या त्या गोंडस बाळाला, केवळ ‘गर्भ’ म्हणून स्वतःची समजूत काढणं आता शक्य नाही. कायद्यात बसत असली तरी ही एका प्रकारे हत्याच. पण मग बाळाच्या हिताचा विचार नको का करायला? हं.. मग बाळाचं हीत नक्की कशात आहे? कायम इतरांवर अवलंबून राहून जगायचं असेल तर अशा जीवनाला तरी काय अर्थ आहे? शिवाय जन्मतःच अनेक शस्त्रक्रिया भोगायला लावून त्या बाळाला अपरिमित त्रासच नाही का आपण देत आहोत? अनेक प्रश्न अ‍ॅस्ट्रिडला भेडसावतायत.

त्यात अ‍ॅस्ट्रिड एक कर्तबगार, पुरुषांना त्यांच्याच आखाड्यात हरवणारी, रोल मॉडेल स्त्री आहे. लोकांच्या तिच्याकडून अपेक्षा आहेत. मग त्यासाठी तिने आपल्या इच्छा आकांक्षांना मुरड घालून, करिअरचं बलिदान देऊन ‘देवी’त्व पत्करायला हवं का? तिला व्यक्ती म्हणून काही स्वातंत्र्य आहे का आणि ते नक्की कुठे संपतं?

बर.. हे सगळं घडतंय जर्मनीत - हिटलरच्या भुतांचा पिच्छा सोडवू पाहणाऱ्या जर्मनीत. अपंग व्यक्ती समाजोपयोगी नाहीत म्हणून त्यांना मारून टाकणाऱ्या हिटलरच्या कृत्याशी ह्या गर्भपाताचं (दूरचं का असेना) नातं जोडता येईल का? आणि त्यामुळे कदाचित जर्मन लोक ह्या बाबतीत जास्तच संवेदनशील असतील का? - असा विचार आपला माझ्या मनाला चाटून गेला

त्या गर्भाच्या सचेततेची अनुभूती प्रेक्षकांना व्हावी म्हणून प्रथमच ३D सोनोग्राफी दृश्यांचा वापर आणि डॉक्टरांच्या भूमिकेत खऱ्याच डॉक्टर मंडळींना घेणं ही ह्या सिनेमाची परिणामकारकता वाढवणारी वैशिष्ठ्य आहेत. क्लोज शॉट्स चा वापर भरपूर केलेला आहे. कॅमेरा सतत पात्रांच्या जवळ राहून त्यांच्या चेहऱ्यावरील भाव टिपू पाहतोय असं वाटतं.

मात्र हा सिनेमा मधेच काही दृश्यांमध्ये डॉक्युमेंटरी च्या अंगाने जातो, तेव्हा प्रेक्षक थोडासा disengage होतो असं मला वाटलं. शिवाय मागे वळून पाहताना मुख्य जोडपं सुरुवातीला जरा जास्तच आयडियल वाटते. त्यांच्या व्यक्तिमत्वातल्या काही इतर छटा दिसल्या असत्या तर प्रेक्षक त्या पात्रांशी अजून जास्त कनेक्ट झाला असता आणि शेवटचे संघर्षाचे प्रसंग अधिक सुसंगत वाटले असते.

तरीही, आपल्या मूल्यांच्या आणि धारणांच्या मुळाशी जायला लावणारे प्रश्न विचारणारा हा सिनेमा आवर्जुन पाहावा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

नैतिकतेच्या व्याख्याच मुळात वेगळ्या वेगळ्या केल्या जातात.
काही लोक या बाबतीत शास्त्र मानत नाहीत, इतर कुठलीहि नैतिकता ओळखत नाहीत, प्रसंगी बाळंतीण स्त्री मेली तरी चालेल पण गर्भपात नाही असे काही धर्मगुरुंनी सांगितल्याचे ऐकीवात आहे.
तेंव्हा हा सिनेमा पाहून या देशात काही बदल संभवत नाहीत.
तसेहि विषयाचे गांभीर्य इतके मोठे आहे की सिनेमा म्हणून अभिनय, दिग्दर्शन इ. गोष्टींची चर्चा गौण ठरते.

मतदान हक्क आणि संतती नियमन ह्या दोन्ही गोष्टी नैतिकतेच्या एकाच पारड्यात ठेवणे काही पटले नाही. बाकी परीक्षण चांगले आहे.
गर्भपात ही खरोखरच नैतिकतेच्या सीमारेषेवर असलेली गोष्ट आहे. फाशी, इच्छामरण हेही विषय असेच.
सिनेमा बघायला नक्की आवडेल कारण मला विचार करायला लावणारा सिनेमा आवडतो!

विषय नवा आहे, पण ज्या बाळाला जन्मतःच अनेक यातनांना सामोरे जायचे आहे, त्याला केवळ आपल्या हट्टाखातर जन्माला घालण्यातही काय माणूसकी आहे ? जर ते बाळ नॉर्मल असते आणि पालकांचे इतर प्रश्न असते, तर कथा वेगळ्या मार्गाने गेली असती का ?

साधारण अश्याच विषयावर ( म्हणजे जन्माला न आलेल्या बाळावर ) लाईक इन हेवन, ऑन अर्थ अश्या काहिश्या नावाचा एक चित्रपट बघितल्यासारखा आठवतोय. त्यातला विषय फारच वेगळा आणि फँटसीच्या अंगाने जाणारा होता.

चांगलं लिहिलं आहेस. पहायला हवा कधीतरी. तू जे लिहिलं आहेस, त्यावरून अ‍ॅस्ट्रिड थोडीशी स्वार्थी आहे की काय, असं वाटून गेलं. अर्थात सिनेमा बघितल्यावरच ह्यावर काय ते म्हणता येईल. बराच कथाप्रधान सिनेमा दिसतो.

हिटलरच्या भुतांचा पिच्छा सोडवू पाहणाऱ्या जर्मनीत. अपंग व्यक्ती समाजोपयोगी नाहीत म्हणून त्यांना मारून टाकणाऱ्या हिटलरच्या कृत्याशी ह्या गर्भपाताचं (दूरचं का असेना) नातं जोडता येईल का? आणि त्यामुळे कदाचित जर्मन लोक ह्या बाबतीत जास्तच संवेदनशील असतील का?

ह्याबाबतीत मला असं आठवतं, की जर्मनीमध्ये अपंगत्वाची शक्यता असेल, तर जास्त उशीरा करता येणार्‍या गर्भपाताची तरतूद कायद्यात आहे. त्यामुळे असं काही असेल, असं वाटत नाही.

Utsukata ahe baghanyachi.
Parikshan changale.

I personally feel, people who think, they should not abord even if there are such complications - they should not use option of modern medicine as well.

ईंटरेस्टींग विषय छान परीक्षण.
मांसाहार करणारा माणूस स्वतःच्या गर्भाबाबत मात्र जीवहत्येचे आणि नैतिकतेचे वेगळेच निकष लावतो.
जर आधीच समजत असेल की येणारे बाळ कसलेही सुंदर आयुष्य घेऊन येणार नाहीये तर त्याला का या नरकात लोटायचे.
गर्भपात कितव्या महिन्यात करतोय यापेक्षा जास्त महत्वाचे कोणत्या कारणासाठी करतोय हे नाही का..

जर आधीच समजत असेल की येणारे बाळ कसलेही सुंदर आयुष्य घेऊन येणार नाहीये तर त्याला का या नरकात लोटायचे.
गर्भपात कितव्या महिन्यात करतोय यापेक्षा जास्त महत्वाचे कोणत्या कारणासाठी करतोय हे नाही का..>>> अनुमओदन