रौफ (Rauf) - बाल्य हरवण्याचा एक प्रवास

Submitted by भास्कराचार्य on 3 February, 2017 - 07:46

लहानपणी आपण आजोळी आजीकडे जातो. उन्हाळ्याच्या सुट्टीत बागडतो, नाचतो, आंबे खातो, धमाल करतो. पांढर्‍यास्वच्छ लुगड्यात वावरणारी आजी आपले लाड करत असते. आवडणारं तव्यावरचं पिठलं, नाहीतर तांदळाचं घावन, असे काहीन् काही ज्याच्या त्याच्या आवडीचे पदार्थ करत राहते. मग हळूहळू वय वाढतं, तसं आपलं जाणंयेणं कमी होत जातं. व्याप वाढत जातात. मग कधीतरी ध्रुवतार्‍यासारखी अढळ भासणारी आपली आजी खरंच आकाशात तारा व्हायला म्हणून निघून जाते, आणि आपल्याला जाणवतं, की कपाटात घडीत आखडून पडलेल्या त्या लुगड्याच्या विरण्यासारखंच आपलं बाल्य हळूहळू विरत चाललेलं आहे. 'रौफ' हा टर्किश-कुर्दिश सिनेमा ही हरवत जाण्याची क्रिया परिस्थितीमुळे अधिकच फास्ट फॉरवर्ड झालेल्या अशाच एका बालपणाची गोष्ट आपल्यापुढे मांडतो.

चित्रपटाची सुरवात एका झोप निघून गेलेल्या रातीने होते. रौफला त्याची आई कुशीत घेऊन बसली आहे. दूरवर बंदुकीच्या गोळ्यांचे फटफट आवाज येत आहेत. मधूनच तोफेचा एक गोळा दणकन कुठेतरी पडतो. बंदुकीच्या गोळ्या जास्त वेगात येतायत, की रौफच्या आईची आसवं, ते सांगणं कठीण आहे. मायकेल अँजेलोसारख्या प्रतिभावंताला दिसावं, व त्याने कागदावर स्थानबद्ध करून ठेवावं, असं हे चित्र काळाच्या स्मृतीकोशात कायमचं स्फटिकरूप घेउन पडलं आहे व दिग्दर्शकद्वयीने तेच ह्या ७० एमएमच्या पडद्यावर चितारलं आहे. मेरीमाता आणि येशू असो, की रौफची आई आणी रौफ असो, आई-मुलाची वेगवेगळ्या प्रकारच्या युद्धांत होणारी दशा कुठल्याच युगाला चुकलेली नाही.

वरचं वर्णन इतकं विस्ताराने केलं, ह्याचं कारण म्हणजे दिग्दर्शकांच्या चित्रपट दाखवायच्या भाषेचं कौतुक विशेषकरून करायचं होतं. रौफसारख्या लहान मुलाला संघर्षाचा साराच परीघ सजगतेने उलगडणार नाही, हे त्यांना कळलेलं आहे. त्यामुळे बराचसा चित्रपट रौफच्या दृष्टीकोनातून प्रतिमांच्या आणि वाईड शॉट्सच्या भाषेत समोर येतो. ह्या प्रतिमा अत्यंत चतुर आणि नैसर्गिक आहेत. त्यामुळे मी शब्दांत काहीही लिहिलं, तरी त्या प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, अशाच आहेत. विशेषतः रौफ चहासाठी ग्लास घ्यायला जातो, तो सीन अशक्य सुंदररीत्या जमला आहे. ह्या चित्रपटाचा लँडस्केपसुद्धा भयंकर सुंदर आहे. तुर्कस्तानच्या पहाडांतील एका कुर्दिश गावची ही कथा आहे. त्या उतारांवर कॅमेरे ठेवून हिमाच्छादित शिखरांचे व मोठ्ठ्या आकाशाचे घेतलेले उजळ शॉट्स बघतच बसावेत. त्या पार्श्वभूमीवर घरांचे अंधारलेले अंतरंग ह्या सगळ्या नाट्याला जो कॉन्ट्रास्ट देतात, तोही बघत राहावा. त्याच पार्श्वभूमीवर दिग्दर्शकद्वयीने रेखाटलेली अजून एका आईची आपल्या मुलासाठी होणारी - मला योग्य शब्द नाही सुचत, अनेक भावनांचे मिश्रण आहे ते, पण जे आहे, ते बघावे, आणि निमूटपणे दोघांच्या प्रतिभेला शरणचिठ्ठी लिहून द्यावी.

हा सगळा काळोख असूनही 'रौफ' दु:खी नाही. रौफ त्याच्या सवंगड्यांबरोबर खेळतो, हुशार असूनही शाळेतून हाकलला जातो. त्याची आई अधूनमधून त्याला चापट्या ठेवून देत असते. इतकंच काय, रौफ त्याच्याहून मोठ्या असलेल्या 'झना'च्या प्रेमातही पडतो. (मायबोलीवरील एका अलीकडच्या सिनेमाबाफाची आत्ता मला आठवण होऊन खूप हसू येतंय.) त्या प्रेमाचा अर्थ रौफ मित्रांबरोबर शोधायचा प्रयत्न करतो, तो सीन भयंकर निरागस विनोदी आहे. रौफ आणि त्याच्या 'गूस'ची गोष्टही मस्त. त्यातले कॅमेरा अँगल्स खासच. ह्या सगळ्या प्रसंगांत लेन्सिंग, नैसर्गिक प्रकाशयोजना, आणि फ्रेम्स बघत राहाव्या.

असं सगळं होत असताना थोडिशी प्रॅक्टिकल-माईंडेड झना रौफला तिच्यासाठी काहीतरी आणायला सांगते. आता ते 'काहीतरी' आहे, ते मी इथे सांगणार नाही, पण रौफला त्या युद्धाच्या वातावरणात ते 'काहीतरी' काय असतं, ते मुळात माहीतच नाही, आणि ते त्याला कुठे मिळतही नाही, हे रुपक इतकं लाजवाब आहे, की विचारू नका! युद्धामुळे सगळ्यांची आयुष्यं उलटीपालटी झालेली आहेत, गावात फक्त म्हातारे आणि लहान मुलंच शिल्लक आहेत, असं असताना रौफ ते 'काहीतरी' शोधायच्या मोहिमेवर निघतो. आधीच हळूबाई असलेलं हे गाव आता युद्धामुळे 'डेड स्लो' झालंय. तिथली बस डुगूडुगू चालते. सुतारदादांकडे आता फक्त एकाच गोष्टीची मागणी होतेय. हे सगळं डिटेलिंग छान आणि भयावह झालंय. ह्या सगळ्या काळ्या कडू कॉफीसारख्या पार्श्वभूमीवर रौफबाळ मोहिमेवर निघालंय, ही गोष्ट अगदी योग्य प्रमाणात साखर घालते. ह्यात परत ते 'काहीतरी' व्हिज्युअल एलीमेंट घेऊन येतं. हा सगळा मामला हळूहळू क्लायमॅक्सकडे वेगात जातो. अंतिम सीन तर युद्धाला सरावलेल्या आपल्या सर्वांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा आहे. रौफची वर्तणूक 'त्याचं बालपण संपतंय' ही एक दु:खद जाणीव आपल्याला अत्यंत नाजूकपणे देऊन जाते, पण त्याचबरोबर आपल्याला ही जाणीव देऊन जाते, की ह्या सगळ्या धबडग्यात, कल्लोळात, आक्रोशात सौंदर्याचीही एक जागा कुठेतरी असू शकते. त्याचबरोबर 'आशा ही नेहमीच एक शृंखला असते, असं नाही' असा काहीसा विचार माझ्या मनात ह्यावेळेस येऊन गेला. ह्यावेळेस शेवटचं म्युझिक न येतं तरी चालतं, असंही वाटून गेलं. ते थोडंसं कर्कश वाटलं. पण हे केवळ माझं मत आहे. दुसर्‍या कोणाला ते संगीत आवडलंही असेल.

कलाकार बरेचसे हौशी आहेत, व्यावसायिक नाहीत, हीच बाब ह्या चित्रपटाला वजन देऊन जाते. रौफच्या भूमिकेतील आलन गर्सोयने त्याच्या त्या मोठमोठ्ठ्या डोळ्यांतून हा चित्रपट आपल्याला दाखवलाय. उपरोल्लेखित प्रत्येक सीन त्याने स्वतःच्या कृश पण सक्षम खांद्यांवर पेललाय म्हणा ना! त्याचे काम भल्याभल्यांना लाजवेल असे आहे. लहान मुलांकडून इतके छान काम वठवून घ्यायचे, म्हणजे खरेच कौतुक आहे. दिग्दर्शक जोडगोळीपैकी एक टर्किश तर दुसरा कुर्दिश आहे, असं नंतर कळलं. त्या दोघांच्या पडद्यामागच्या संवादातून आणि डिटेलिंगमधून, मिनिमॅलिस्ट फ्रेम्समधून हा सिनेमा आपल्याशी बोलतो, एक निश्चयी भूमिका घेतो. माणसाच्या सोसण्याबद्दल आणि शोषणाबद्दल विचार करायला लावतो, पण त्यातून काळ्या विनोदाची कड असलेल्या सौंदर्याची झलकही आपल्याला दाखवतो. टर्किश म्हातार्‍याचा कोरीयन युद्धाबद्दल बोलतानाचा विनोदी सीन युद्धासारख्या गोष्टीतली विसंगती काय खास दाखवतो! हे असं सगळं एकत्र दाखवायचं, म्हणजे काही खायचं काम नाही. रौफच्या डोळ्यांतून दिसणारी ही यादवी आपणही पाहिलीच पाहिजे, हे नक्की.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहितोस भास्कराचार्या! तुझा हा रिव्ह्यु वाचला नसता तर त्या दिवशी जास्त वेळ झोपल्यामुळे हा चित्रपट घालवल्याची खंत एवढी जाणवली नसती Proud

आवड्ला परिचय. जरा ते इराणी (माजिदी ई चे) पिक्चर असतात तशा टाइपचा अनुभव असेल असे वाटते, किमान तशी तयारी ठेवून बघायला हवा असे दिसते. लिस्टमधे.

सुंदर ओळख.
चित्रपट कुठे बघायला मिळेल रादर तुम्ही ओळख करून दिलेले सगळेच चित्रपट

जाई.,
मुंबईत गेल्या महिन्यात यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवात हा आणि पिफमधले इतर अनेक चित्रपट दाखवले गेले.

धन्यवाद सगळ्यांना!

सन्तु, झोप सलामत तो सिनेमे पचास. Lol

टग्या, जाई, सोलापुरात ह्याचा सॅटेलाईट फेस्टिवल चालू आहे. तिथे कदाचित हा असेल.