सर्वांचे लाडके, अर्थसंकल्प Cliche`

Submitted by झंप्या दामले on 1 February, 2017 - 04:19

अर्थसंकल्पापूर्वी

१) अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला अर्थमंत्र्याचा संसदभवनाच्या पायऱ्यांवर ब्रिफकेस हातात घेतलेला फोटो. याशिवाय अर्थसंकल्प सादर होणार नाही असे घटनेतच निर्बंध असावेत.
२) क्र. एकच्या मुद्यातल्या फोटोला अर्थमंत्र्यांच्या 'पोतडीत काय दडलंय ?' किंवा तत्सम विलक्षण सस्पेन्स निर्माण करणाऱ्या कॅप्शन्स
३) वर्तमानपत्रात प्रश्नार्थक मथळे असलेल्या बातम्यांमधून वाढीव सस्पेन्स. उदा. '१.२५ कोटींचा रेल्वे सुरक्षा निधी ?', 'सेवाकरात २ टक्क्यांची वाढ ?', 'सामान्यांना दिलासा मिळणार ?'
४) 'अर्थसंकल्पाकडून सामान्यांच्या अपेक्षा' या मथळ्याखाली एक गृहिणी, एक विद्यार्थी, एक नोकरदार आणि एक भाजीवाला/रिक्षावाला यांच्या मागण्या.
५) जसे क्रिकेट कॉमेंट्रीत 'This is very 'crucial' phase/period/session/partnership of this match हे वाक्य एकदातरी यायलाच हवे तद्वतच 'यावर्षीचा अर्थसंकल्प विशेष महत्वाचा आहे' अशी एक पिंक बातमीत टाकणे अत्यावश्यक.

अर्थसंकल्पानंतर

१) हुजूरपक्ष : "विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प" (हे वाक्य नसल्यास त्या पक्षाला सत्तेवरून पायउतार व्हावे लागते) (उत्तेजनार्थ बक्षीस : "देशाला पुढे नेणारा अर्थसंकल्प", "सर्वांना सोबत घेऊन जाणारा अर्थसंकल्प" इ. नेहमीचे यशस्वी कलाकार)
विशेष उल्लेख - पंतप्रधानांकडून अर्थमंत्र्यांचे कौतुक. (हे मला कधीच कळलेले नाहीये. पंतप्रधानांची शिकवणी न लावता आख्खा पेपर अर्थमंत्र्यानी एकट्याच्या टॅलेंटवर लिहिलेला असतो की काय ?)
२) खजूरपक्ष : "गरिबाला अधिक गरीब आणि श्रीमंताला अधिक श्रीमंत करणारा अर्थसंकल्प" (यांचे सगळेच काम उत्तेजनार्थ गटात मोडत असल्यामुळे वेगळी बक्षिसे नाहीत)
विशेष उल्लेख : बाळासाहेब ठाकरेंसारखा शब्दांचे खेळ करणारा कुणी असेल तर "अर्थसंकल्प कसला, हा तर अनर्थसंकल्प" अशी एका वाक्यात वासलात. म्हणजे यांना कितपत कळलंय हे गुलदस्त्यातच !
३) पेपरमध्ये 'रुपया असा येणार' आणि 'रुपया असा जाणार' याचा शक्य तितके आधुनिक ग्राफिक्स वापरून बनवलेला 'Pie चार्ट'
४) रेल्वे बजेट असल्यास दुसऱ्या दिवशी -
अ) 'अर्थसंकल्पात मुंबईकरांना ठेंगा' अशी तक्रारवजा-आरोपवजा बातमी व 'इतका महसूल मिळवून देत असूनही' होणाऱ्या मुंबईकरांच्या हालांबद्दलचे दुःख
ब) इंजिनावर रेल्वेमंत्र्यांचा चेहरा किंवा गार्डच्या डब्यात बावटा/कंदील दाखवणारे आख्खे रेल्वेमंत्री असणाऱ्या एखाद्या झुकझुकगाडीचे खेळकर कार्टून
५) आणि या सगळ्यात 'निवडणुकांवर डोळा ठेऊन मांडलेला अर्थसंकल्प' अशी मखलाशी करायला पत्रकार/वर्तमानपत्रे/'एक्स्पर्ट' विसरत नाहीत.

एकुणात काय तर, एवढ्या ब्रह्मघोटाळ्यातून अर्थशास्त्रातले शष्पदेखील न कळणाऱ्यांना (म्हणजे माझ्यासारख्यांना !) शेवटपर्यंत अर्थसंकल्प चांगला की वाईट हे कळत नाही.

ता.क. : अजून काही सुचल्यास/सुचवल्यास मुद्दयांमध्ये भरच पडेल !

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय.
>>, एवढ्या ब्रह्मघोटाळ्यातून अर्थशास्त्रातले शष्पदेखील न कळणाऱ्यांना (म्हणजे माझ्यासारख्यांना !) शेवटपर्यंत अर्थसंकल्प चांगला की वाईट हे कळत नाही.>> सहमत.

>>गेल्या २५ वर्षात वर्षानूवर्ष तेच तेच आहे.>> पण मग झोडपायला अलिकडेच लागलात का? Wink
>> इन्कम टॅक्स वाढलेला असेल तर उत्तमच. तेवढीच त्यावर टीका करता करता इतरांसमोर आपलं उत्पन्न अप्रत्यक्षपणे जाहीर करण्याची संधी>> +१. पण ह्यांची रग्गड उत्पन्नं वाचायला आपल्याला बजेटचीच वाट बघायला लागत नाही हे एक बरंय. Proud

भारी लिहिलंय Lol

आज दुपारी जेवायला जाताना एक मित्र बोलला, बजेट आले असेल ना... पाहिलेस का?
मी म्हटलं, अरे वा हो का? आज येणार होते का?
आमच्याबरोबर आणखी एक तिसरा मित्र होता त्याने कसल्या तुच्छतेने बघितले माझ्याकडे ..
नंतर मग जेवताना दोघे जण मोबाईलवरच्या बातम्या मोठमोठ्याने वाचून वाचून आजूबाजुच्या लोकांनाही काहीबाही ऐकवत होते. एकूणात दोघे अबकी बार असल्याने बजेटची तारीफ चालू होती.
पण जाताना मात्र वेटरला नेहमीसारखे पाच रुपयांचीच टीप ठेऊन उठले, तेव्हाच मला कळले, हे देशाचे बजेट वजेट नुसते भ्रम असते. आपल्या घरचे आणि दैनंदिन व्यवहाराचे बजेट मात्र वर्षानुवर्षे तेच तसेच असते.

मस्त लिहले आहे
आपल्या कडे अर्थसंकल्प ह्या विषयाला एवढे अवास्तव महत्व का दिले जाते ते कळले नाही कुठल्यातरी चार गोष्टीवर कर कमी करायचा चार गोष्टीवर कर वाढवायचा कुठल्यातरी योजनेवर जास्त खर्च करायचा . हा विषय प्रेस आणि राजकिय पक्ष हा विषय महिनाभर चघळत असतात. असे बाकी कुठल्याच देशात देशाचे बजेट ह्या विषयावर एवढी चर्चा होत असेल .
तरी बरे ह्या वर्षी रेल्वेचे बजेट काढुन टाकले.

छानच लिहिलंय.
त्यात मग हिंदी चॅनेल असेल तर मग त्या वर्षीच्या चित्रपटांवरुन टायटल बनवतात. बजेटबद्दल चांगल बोलायचं असेल तर 'मोदी का महासंकल्प' 'काबिल मोदी' 'जेटली की जादुगरी' 'जेटली का दिमाग और मोदी की डेअरिंग' 'बजेट की दंगल' वगैरे. आणि टीका करायची असेल तर 'ऐ बजेट है मुश्किल' 'बजेट - ढिशूम' वगैरे.

Pages