यादवाडचे शिल्प आणि शिवरायांचा जाज्वल्य इतिहास...

Submitted by अजातशत्रू on 31 January, 2017 - 02:00

शिवबांनी त्यांच्या सख्ख्या मेहुण्याचे डोळे काढण्याची सजा फर्मावली होती हे आपणास ठाऊक आहे का ? छत्रपती शिवरायांचे घोडयावर स्वार होऊन शस्त्रसज्ज असलेले किंवा जिजाऊ मां साहेबासोबतचे शिल्प किंवा चित्र तुम्ही अनेक ठिकाणी पाहिले असेल. शिवाजीराजांच्या या ठराविक मुद्रेतील शिल्पाखेरीज सामान्य रयतेच्या मुद्रेतील शिल्पे आहेत का ? शिवाजीराजे मांडी घालून बसलेले आहेत आणि त्यांच्या मांडीवर एक लहान मुल आहे, ते त्याच्याकडे प्रेमाने पाहत आहेत असं एक शिल्प आहे हे आपणास माहिती आहे का ? विशेष म्हणजे हे शिल्प शिवाजीराजे हयात असताना कोरलेले आहे ! कोड्यात पडलात ना ? लेखाच्या सुरुवातीला एक प्रश्न राजांच्या मेहुण्यांबद्दल विचारला आहे आणि पुढचे मुद्दे एका सामान्य मुद्रेतील शिवशिल्पाबद्दल आहेत. हा काय प्रकार आहे ? गोंधळून जाऊ नका. या दोन्ही मुद्द्यांचे परस्पर संबंध आहेत. या दोन्ही मुद्द्यांमागे एक जाज्वल्य इतिहास आहे. जो आपल्यापुढे क्वचित मांडला गेला आहे किंवा ज्याला हेतूपुरस्सर दुर्लक्षित ठेवले गेले आहे. आपल्याकडे गाळीव इतिहास मांडण्याची, ठराविक साचेवंद माहिती पुरवण्याची एक खोड इतिहासकरांना आणि जाणकारांना आहे. काही माहिती अत्यंत महत्वाची असते पण तिच्याकडे ढुंकूनही बघितले जात नाही, किंबहुना तिला प्रकाशात आणले जात नाही. असे का केले जाते हे तेच लोक सांगू शकतात जे शालेय व क्रमिक पाठ्यपुस्तकातून जाणीवपूर्वक गाळीव व ठोकळेबाज ठाशीव इतिहासाची पाने रचत जातात. असो. आपण आपल्या मुद्द्याकडे वळूयात...

ही घटना आहे इस.१६७८ च्या सुमारासची. शिवाजीराजांची दक्षिण दिग्विजयाची मोहीम जवळपास संपत आली होती. प्रचंड यश संपादन करून ते आता स्वराज्याच्या परतीच्या मार्गावर होते. परतीच्या मार्गावरही येताना वाटेतील छोटे मोठे परगणे आणि बाजारपेठा, कसबे यांच्या दृष्टीने महत्वाची असलेली ठाणी त्यांच्या नजरेतून सुटत नव्हती. अशाच एका कसब्यापैकी एक होते, दक्षिण मध्य कर्नाटकातील गदग प्रांतातील बेलवडी हे गाव. या लहानमोठ्या कसब्यांना वेढा घालण्याचे काम झाले की त्या संबंधीची जबाबदारी एखाद्या जाणत्या शिलेदाराकडे सोपवून राजे पुढे रवाना होत असत. बेलवडीच्या गढीला वेढा घालून त्याचे नेतृत्व राजांनी आपले मेहुणे असणारे सखोजी गायकवाड यांच्यावर सोपवले. त्यानंतर राजांनी पन्हाळ्याकडे कूच केले. हा वेढा काही आठवडे टिकला. यात बेलवडीचा ठाणेदार येसाजी प्रभू देसाई मराठ्यांकडून मारला गेला. मुख्य ठाणेदार मारला गेल्यावर गढी पडेल आणि आपल्या ताब्यात ठाणे येईल या विचारात मश्गुल असलेल्या सखोजीरावांच्या मनसुब्यांना येसाजी देसायाच्या पत्नीने मल्लाबाईने सुरुंग लावला. तिने हार मानली नाही. तिचं अर्ध्याहून अधिक सैन्य मारलं गेलं. तिने आपल्या काळजावर पत्थर ठेवला,बेलवडीतल्या स्त्रिया एकत्र केल्या. त्यांच्यातल्या लढाऊ बाण्यास साद घातली. तिची योजना फळास आली. बेलवडीमधील स्त्रिया पुरुषवेश धारण करून लढाईत सामील झाल्या. मल्लाबाई इतक्यावरच थांबली नाही. तिने स्वतः चिलखत घातले, तलवार हाती धरली आणि पुरुषवेशात तीही मराठयांच्या सैन्यावर तुटून पडली. बेलवडीसारख्या एका छोट्याशा ठाण्यातून होत असलेला तीव्र प्रतिकार पाहून शिवराय अचंबित झाले. कोण असा योद्धा आहे त्याला भेटावे आणि आपले स्वराज्याचे मनसुबे त्याच्यापर्यंत पोहोचवावेत आणि बेलवडीरही कब्जा करावा या हेतूने पन्हाळगडाहून ते पुन्हा बेलवडीकडे रवाना झाले. स्वतः शिवराय मराठ्यांच्या मुख्य छावणीत डेरेदाखल झाल्यावर मराठ्यांच्या अंगावरचे मांस वाढले, त्यांनी जोराचे प्रतिहल्ले करून देसायांच्या सैन्यास माघार घ्यायला भाग पाडले.

माघार घेतल्यानंतर मल्लाबाई देसाईने शिवबांकडे तहाची याचना केली. तिने कुठल्याही अटीशर्ती मांडल्या नाहीत पण एक तक्रार तिने केली. ती ऐकून शिवाजीराजांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली, संतापाने त्यांचा चेहरा लालबुंद झाला. क्रोधाग्नीत डोळे भडकले. त्यांच्या तलवारीच्या मुठीकडे त्यांचे हात वळले. दोन्ही हातांनी त्यांनी तलवारीची मुठ आवळली. पुढच्याच क्षणाला त्यांनी आपल्या मेहुण्यास आपल्या समोर हजर होण्याचे आदेश दिले.
असे काय घडले होते की शिवबा राजे क्रोधाने बेभान झाले होते ? असे काय ऐकले त्यांनी की त्यांच्या मुठी वळल्या ? मल्लाबाईने तक्रारफिर्याद दिली होती की, 'सखोजी गायकवाड याने युद्ध जारी असताना आपल्या काही स्त्री सैन्यास कैद केले होते. इतकेच नव्हे तर कैदेत त्यांना रात्रभर मराठा छावणीत डांबून ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या सर्व स्त्रियांना थपडा मारून सोडून दिले !"
साक्षात आपल्या मेहुण्याने असे लांच्छनास्पद कृत्य करावे यामुळे राजे व्यथितही झाले होते आणि क्रोधीतही झाले !
शिवबांच्या सैन्यास सक्त ताकीद होती की, 'सैनिकांनी स्त्रियांना डांबून ठेवू नये वा गिरफ्तारही करू नये. अशी गुस्ताखी करणाऱ्या सैनिकाविरुद्ध सक्त सजा फर्मावली जाईल'.
आजच्या सरकारप्रमाणे शिवाजीराजांचे नियम कागदोपत्री नव्हते. त्यांची तामिली व्हायची, कठोर अंमलबजावणी व्हायची. अपराधी कोणीही असो त्याच्याविरुद्ध तक्रार ऐकून घेतली जायची. त्यात तथ्य आढळले तर जागेवरच सजा दिली जायची. न्यायदानांच्या नावाखाली सहिष्णूतेचे, मानवतेचे थोतांड राजे अजिबात माजू देत नसत. इथेही तसेच झाले. ज्यांच्या विरुद्ध तक्रार आली होती ते सखोजी गायकवाड शिवाजीराजांच्या पत्नी सकवारबाईसाहेब यांचे बंधू होते. राजांचे सख्खे मेहुणे होते ते !'

शिवाजीराजांनी आपल्या मेहुण्यास हजर होण्यास फार्मावले आणि मल्लाबाई देसाई चकित झाली. तिला अश्रू आवरेनासे झाले. तिला विश्वास बसत नव्हता की केवळ एका महिलेच्या तक्रारीवरून एक सार्वभौम राजा आपल्या सख्ख्या मेहुण्याला जेरबंद करण्याचे फर्मान सोडतो ! हे काही तरी और आहे. हा राजा काही तरी वेगळा आहे. हा राजा अद्वितीय आहे, अलौकिक आहे, परमन्यायी आहे, रयतेचा खरा जाणता राजा आहे !

सखोजी गायकवाडांना हजर होण्याचा हुकुम जाहला आणि सैन्यात चुळबुळ सूरु झाली, डेऱ्यात कुजबुज सुरु झाली. आता पुढे काय घडते याची सर्वाना उत्कंठा लागून राहिली. मल्लाबाई तर भान हरपून पाहतच राहिली होती. उपस्थित सरदार, शिपाई. मावळे दिग्मूढ होऊन पाहत राहिले. साखोजी गायकवाड शिवबांच्या पुढे हजर झाले. त्यांना मल्लाबाईची तक्रार ऐकवण्यात आली. त्यांना काय बोलावे सुचेनासे झाले. आपला मेहुणाच राजा आहे, तो दया दाखवेल असं त्यांना वाटले नाही. ते राजांना चांगले ओळखून होते. स्वारीच्या जोशात पुरुषसैन्य समजून त्यांनी स्त्रियांना कैद केले खरे पण त्यांची असलियत कळल्यावर त्यांना सोडून देण्याऐवजी त्याने डांबून ठेवले. त्यांच्याशी दुर्व्यवहार केला नाही हे खरे मात्र त्यांना रात्रभर डांबण्याचा गुन्हा त्याने केला. शिवाय सकाळी रिहाई करताना त्यांना थपडा लगावून आपल्या ताकदीचा एहसास देण्याची गुस्ताखी त्याने केली होती. त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. शिवबांनी काय ओळखायचे ते ओळखले. आपल्या मेहुण्याची त्यांना दया आली नाही, आपल्या मेहुण्याच्या शोकाकुल अवस्थेने ते द्रवले नाहीत, त्याची माया दाटून आली नाही की त्यांना आपला नातलग असल्याने त्याची कड घ्यावीशी वाटली नाही. त्यांनी मनात आणले असते तर तंबी देऊन, माफीनामा घेऊन त्याला सोडले असते. पण आजच्या पुढाऱ्यासारखे किंवा सरकारसारखे ते नव्हते. ते शिवबा होते. अन्यायाच्या विरुद्ध एल्गार करणारा, प्रजाहितदक्ष असणारा, कर्तव्यसन्मुख आणि निस्पृह राजा होता तो ! शिवबांनी हुकुम दिला, "तापलेल्या सळईने मुजरीमाचे दोन्ही डोळे काढून टाकले जावेत, माझिया राज्यात मायभगिनीकडे वक्र नजरेने जो पाहील त्याची गय केली जाणार नाही, त्यासी सजा होणार म्हणजे होणार !"

लोक थक्क होऊन बघत राहिले. मल्लाबाई तर हैराण होऊन गेली. असे कसे घडू शकते याचे तिला आश्चर्य वाटत होते. मंडळी त्या आधीच्या काळातही आणि शिवाजीराजांच्या नंतरच्या काळातही असा पारदर्शी न्याय करणारा राजा झाला नाही. आजकालच्या फुटकळ लोकांची तर औकातही नाही की त्यांचे उल्लेख करावेत. सखोजीचे डोळे काढले गेले. हे करताना शिवबांच्या दुसऱ्या मनास यातना निश्चित झाल्या असतील. आपल्या पत्नीचा सकवारबाईचा चेहरा त्यांच्या डोळ्यापुढे आला नसेल का ? आला असेल. त्यांना तिच्याबद्दल वाईट वाटले असणार. आपल्या मेहुण्याबरोबर जे काही आनंदाचे क्षण घालवले असतील ते ही आठवले असतील. त्याने स्वराज्याची चाकरी बजावताना दाखवलेले शौर्यही आठवले असेल. पण त्याहीपुढे जाऊन त्यांना आठवला तो राजधर्म. त्याचे पालन करण्यास त्यांनी प्राधान्य दिले. आजचे चित्र याच्याविरुद्धचे आहे, राजधर्म पायदळी असतो आणि स्वाप्तधर्म मस्तकी असतो. पण शिवबांनी आपला राजधर्म पाळला. न्याय केला.

इतके करून राजे थांबले नाहीत. आपल्या पतीच्या निधनानंतर पुरुषवेशात आपली जिगर दाखवणाऱ्या मल्लाबाईचे मनोगत त्यांनी जाणले. तिला बोलते केले.
'आपल्या पतीचे हे ठाणे हेच आपले माहेर आहे हेच आपले आजोळ आहे हेच आपले सर्वस्व आहे इथले लोक हेच माझे आप्त आहेत हेच माझे जीवन आहे'
हे तिचे बोल ऐकून राजांचे मन द्रवले. त्यांनी जिंकलेले बेलवडी तिला परत दिले. इतिहासात याच्यासाठी एक मजेदार शब्द आलेला आहे. मल्लाबाईच्या मुलाच्या दुधभातासाठी हे राज्य राजांनी तिला परत दिले असा उल्लेख आहे. इतकेच नव्हे तर सत्यवानाच्या मृत्यूनंतर सावित्रीने त्याच्या प्राणासाठी तपश्चर्या केली होती, निग्रह केला होता त्याप्रमाणे मल्लाबाईनेही आपल्या पतीच्या पश्चात त्याचे राज्य टिकवण्यासाठी, त्याच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला म्हणून शिवाजीराजांनी तिला सावित्रीबाई म्हणून गौरवले. कानडी इतिहासात याच मल्लाबाईचे नाव मल्लवाबाई असे आढळते.

शिवाजीराजांनी दाखवलेल्या या प्रेमामुळे मल्लाबाईच्या डोळ्यांना धारा लागल्या. तिचा ऊर मायेने भरून आला. आपले जिंकलेले राज्य परत देणारा आणि शरणागताच्या तक्रारीवर विश्वास ठेवून आपल्या आप्ताचे डोळे काढणारा हा माणूस नव्हे हा महापुरुष आहे, हा युगपुरुष आहे याची तिला जाणीव झाली. त्यांच्या सन्मानार्थ, त्यांच्या मायेपोटी मल्लाबाई उर्फ सावित्रीबाई प्रभू देसाई हिने आपल्या ताब्यातील बहुतेक गावांच्या दरवाज्यात व मंदिरासमोर शिवरायांची दगडी शिल्पे उभी केली.

या शिल्पांपैकीचे एक शिल्प कर्नाटकमधील धारवाडच्या उत्तरेस असणारया यादवाड नावाच्या खेड्यात मारुतीच्या दक्षिणाभिमुख देवळाच्या ओट्याच्या पश्चिमेस आहे. सुमारे तीन फूट उंच आणि अडीच फूट रुंद असणारया या शिल्पाचे दोन भाग आहेत. याच शिल्पाच्या खालच्या भागात शिवाजी राजे मांडी घालून बसलेले आहेत आणि त्यांच्या मांडीवर एक लहान मुल आहे. वरील घटनेचे संदर्भ माहिती असले की या शिल्पाचा अर्थ लागतो. शिवाजीराजांच्या मांडीवर असणारे ते मुल म्हणजे मल्लाबाईचे बाळ. आपल्या बाळाला त्यांनी मांडीवर घेतले, आपल्या राज्याला अभय दिले हे मल्लाबाईला यातून सूचित करायचे होते !

या शिल्पाच्या वरच्या भागात शृंगारलेल्या घोड्यावर स्वार झालेले शिवाजीराजे साकारण्यात आले आहेत. या प्रतिमेत त्यांच्यासोबत ज्या व्यक्ती दाखवण्यात आल्या आहेत त्यांच्या हातात राजचिन्हाचे सूचक असणारे छत्र, सूर्यपान, राजदंड आदी वस्तू आहेत. शिवबांच्या डाव्या हातात ढाल आणि उजव्या हातात मराठा पद्धतीच्या मुठीची तलवार दाखवण्यात आली आहे. याच शिल्पात खालच्या बाजूला एक कुत्राही आहे, काही इतिहासकार हा कुत्रा म्हणजे वाघ्या कुत्रा असल्याचे मत नोंदवतात. मात्र त्याचे नामाभिधान वा दखलअस्तित्व या घटनेच्या संदर्भातील दस्तऐवजात आढळत नाही.

इतिहासापासून अनभिज्ञ असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने हे शिल्प पाहिले की त्याला मांडीवर मुल घेऊन बसलेल्या शिवबांच्या शिल्पाचा उलगडा होत नाही. पण खरा इतिहास सामोरा येताच कोणत्याही शिवप्रेमी माणसाचा जीव आभाळाएव्हढा होतो ! मराठ्यांचा हा राजा एकमेवाद्वितीय होता याचे हे अत्यंत बोलके उदाहरण ! तरीही याचे उल्लेख कुठल्या पाठ्यपुस्तकात नाहीत की कुठल्या चरित्रात याचे दाखले फारसे आढळत नाहीत. आपल्या राजाची ही गौरवगाथा आपल्यालाच जगापुढे मांडायची आहे.

आजकाल लोक कुणापुढेही जाणता राजा ही पदवी लावतात आणि त्या पदवीचा घोर अवमान करतात. काहींना तर जाणता म्हणजे नेणत्याच्या (लहानाच्या) विरुद्धार्थी शब्द अर्थात मोठा असा याचा शब्दार्थ इतकीच माहिती असते. रयतेची सर्व दुःखे, वेदना जाणणारा त्यांच्या इच्छा आकांक्षाची माहिती असणारा, त्यांच्या सुखाचे इंगित जाणणारा तो जाणता राजा ! शिवबांच्या नंतर कुणी जाणता राजा होऊ शकला नाही. हे मराठी मातीचं दुर्भाग्यच नव्हे का ? असो...

तुमचे आमचे नाते काय, जय जिजाऊ जय शिवराय !!

- समीर गायकवाड.

संदर्भ - शिवाजीमहाराज स्मृतीग्रंथ पृ. २४/२५,
शोध भवानी तलवारीचा पृ. ५०/५१
जिद्द, एक इतिहास (सप्टेबर २००३) - पृ. ३४/३५

(पोस्ट आवडली तर नावासह शेअर करा)
ब्लॉगलिंक -
https://sameerbapu.blogspot.in/2017/01/blog-post_23.html
यादवाड शिल्प.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

या प्रसंगाबद्दल वाचले होते कुठे ते आठवत नाही आणि त्यात राजांनी मेव्हण्याचे डोळे काढण्याचा आदेश दिल्याचे सुध्दा आठवत नाही. पण राजांनी एका स्त्रीला तिच्या पतीच्या मृत्युपश्चात तिने दाखवलेल्या असामान्य पराक्रमाबद्दल तिचे राज्य परत दिले हे वाचल्याचे नक्कीच स्मरते.

जय जिजाऊ जय शिवराय !!

सर्रकन काटा आला अंगावर!! किती पैलू आहेत या युगपुरुषाचे. Simply magnificent. विचारांची किती क्लॅरिटी. त्यांचा वारसा सांगायची लायकी आमच्यात येवो हीच देवाला प्रार्थना. _/\_

>>>>>>>आपल्याकडे गाळीव इतिहास मांडण्याची, ठराविक साचेवंद माहिती पुरवण्याची एक खोड इतिहासकरांना आणि जाणकारांना आहे. काही माहिती अत्यंत महत्वाची असते पण तिच्याकडे ढुंकूनही बघितले जात नाही, किंबहुना तिला प्रकाशात आणले जात नाही. असे का केले जाते हे तेच लोक सांगू शकतात जे शालेय व क्रमिक पाठ्यपुस्तकातून जाणीवपूर्वक गाळीव व ठोकळेबाज ठाशीव इतिहासाची पाने रचत जातात.---

पटले. माहितीसाठी धन्यवाद.

उत्तम लेख. अर्थात इथे वर्णिलेल्या कथेमध्ये काही शंका आहेत परंतु लेखकाच्या आवेशावरुन तरी इथे काही विचारत नाही (तसेही ललितलेखन असल्याने शंका असणे अपेक्षित नसावेच बहुतेक).. Happy

स्वारीच्या जोशात पुरुषसैन्य समजून त्यांनी स्त्रियांना कैद केले खरे पण त्यांची असलियत कळल्यावर त्यांना सोडून देण्याऐवजी त्याने डांबून ठेवले. त्यांच्याशी दुर्व्यवहार केला नाही हे खरे मात्र त्यांना रात्रभर डांबण्याचा गुन्हा त्याने केला.

यात चुक काय आहे? सोदुन दिले तर परत त्यनि अत्तेक केला असता ना?

>>>यात चुक काय आहे?---एकदम पर्फेक्ट टाईप केलंत, अभिनंदन!

>>>>>>सोदुन दिले तर परत त्यनि अत्तेक केला असता ना?-----पइंत अहे.

आवडले. परंतु अस्वस्थामा यांनी आपल्या शंका विचाराव्यात आणि च्रप्स यांच्या शंकेला उत्तर मिळावे.
चर्चा झाली तर गोष्ट अजून स्पष्ट होईल ना?