सेलिब्रेशन ... प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 January, 2017 - 13:50

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने.. !

काल ऑफिसमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा झाला. असे आदल्या दिवशी आपली सोय बघून 25 जानेवारी आणि 14 ऑगस्ट साजरे करणे कितपत योग्य हा प्रश्न मला नेहमीच पडतो. पण ते एक राहू द्या. तर या निमित्ताने ऑफिसमध्ये पांढरा रंग किंवा राष्ट्रध्वजाच्या तीन रंगातील वेशभूषा हा ड्रेसकोड होता. बरयाच मुली तीन रंगांचा दुपट्टा घालून येतात तर आम्हा मुलांना पांढरया रंगाचा शर्ट सोयीचा पडतो. पण पांढरा हा माझ्या आवडीचा रंग नसल्याने एखाददुसरेच पांढरे शर्ट माझ्या वॉर्डरोबमध्ये असते. पण जर ते धुतलेले नसले आणि हे नेमके 24 जानेवारीच्या रात्री लक्षात आले, तर बुडालाच म्हणून समजा माझा 25 जानेवारी. यावेळी नेमके तेच झाले. पांढरे दात जसे तंबाखू सेवनाने पिवळे पडतात तसे माझ्या एकुलत्या एक पांढरया शर्टाचे झाले होते. बरं तिरंग्याचे तीन रंग अलाऊड असतात मात्र त्यात अशोक चक्राचा निळा रंग यांना नको असतो. अन्यथा निळ्या रंगाचे कपडे ढिगाने आहेत. त्याचेच काही कॉम्बिनेशन बनवून घालता आले असते.

असो, तर सर्व स्टाफ पांढरया रंगाच्या कपड्यांत असताना आपण अगदीच काळ्यानिळ्या गडद रंगाच्या कपड्यात नको म्हणून त्यातल्या त्यात फिकट लिंबू रंगाचा शर्ट घातला. पण तरीही ऑफिसला पोहोचल्या पोहोचल्या लोकांची माझ्याकडे बघत नाकं मुरडून झाली. कारण आता मी त्यांचा ग्रूप फोटो खराब करणार होतो. पण पुढे तसे होऊ नये याची काळजी घेत मी स्वत:च फ्रेमच्या बाहेर राहिलो ती गोष्ट वेगळी..

तर सकाळीच ऑफिसबॉय सर्वांसाठी राष्ट्रध्वजाचे स्टिकर घेऊन आला. प्रत्येकाने ते आपापल्या शर्टवर लावले. त्या स्टिकरवर "I Love India" असे ब्रिटीशांच्या मातृभाषेत स्पष्टपणे लिहिले होते. पण त्याचा एक फायदा झाला. कोणीही राष्ट्रध्वज उलटा लावण्याची शक्यता नाहीशी झाली. अन्यथा माझा स्वत:चाच यात नेहमी गोंधळ उडतो. म्हणजे एकूणच मी एक धांदरट आणि विसरभोळे व्यक्तीमत्व आहे. आणि एखादी गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात ठेवायची आहे असे म्हणताच माझा आणखी गोंधळ उडतो. राष्ट्रध्वज उलटा लावून त्याचा आपल्याकडून अपमान होऊ नये म्हणून ते जाणीवपूर्वक लक्षात ठेवायच्या नादात मी आणखी गडबडतो. आता हेच मी गप्पांच्या नादात सहजपणे ईतरांना सांगितले आणि काय तो गहजब उडाला.

.... झेंड्यांच्या रंगाचे क्रम माहीत नाहीत म्हणजे काय?? मधला पांढरा रंग आणि निळे अशोक चक्र सर्वांनाच ठाऊक असते. उरले दोन रंग. त्यात देखील वर कोणता आणि खाली कोणता हे लक्षात ठेवता येऊ नये??
बस्स, एका क्षणात मी 25 जानेवारी साजरा करायला नालायक ठरलो होतो.

तरी एकाने मला उपहासाने स्वत:ला सिद्ध करायची अजून एक संधी दिली, "आजचा दिवस कोणता आहे हे तरी माहीत आहे का?"

मी शांतच ...

पण सारे माझ्या चेहरयाकडे टकामका बघू लागले.

मी ओशाळलो, "काय हे, रिपब्लिकन डे !"

"रिपब्लिकन नाही... रिपब्लिक डे ! "

मी शॉकमध्ये. कुठून ईंग्रजीत सांगायची दुर्बुद्धी झाली. प्रजासत्ताक दिनच म्हणालो असतो. आर्किटेक्ट आणि आर्किटेक्चर मध्येही माझा असाच गोंधळ उडतो. आर्किटेक्टला मी बरेचदा चुकून आर्किटेक्चर बोलतो कारण तो शब्द ईंजिनीअर, ड्रायव्हर, प्लंबर, कंपाऊंडर सारखा वाटतो. म्हणजे माझ्या दृष्टीने निदान ही तरी फार मोठी चूक नव्हती. पण ती नको त्या वेळी झाली होती. असा कुत्सित हास्याचा फवारा उडाला की मी शरमेने पाणी पाणी झालो. बिचारया आलिया भट वर जोक्स बनतात तेव्हा तिला काय यातना होत असतील याची एका क्षणात प्रचिती आली. कालचा जवळपास पुर्ण दिवस मी टिंगलटवाळीचा विषय बनलो. दिवस संपला तेव्हा स्वत:ची समजूत काढली. बस्स एक तूच म्हणून हे धैर्याने झेललेस, अन्यथा दुसरा एखादा कोलमडलाच असता, हे स्वत:लाच समजावले.

आणि मग आज फेसबूकवर ऑफिसमधील मित्रांचे फोटो पाहिले.. "सेलिब्रेटींग रिपब्लिक डे" .. असे टायटल ठेवून एकेकाला टॅग करत ऑफिसमध्ये काढलेले ग्रूप फोटो पाहिले. नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगात नटलेले फोटो असतात ना, अगदी तसेच होते. त्या पलीकडे त्यात काही नव्हते. असल्यास ऑफिसतर्फे रिफ्रेशमेंट म्हणून वाटण्यात आलेले चिकन समोसे आणि कॉफीचे मग काही जणांच्या हातात होते. त्यात काही जण पुर्ण कार्यक्रम संपेपर्यंत थांबलेही नव्हते. कारण त्यांचा लाँग विकेंड प्लान त्यांना खुणावत होता. आजचा त्यांचा 26 जानेवारी एखाद्या रिसॉर्टवर साजरा झाला असावा.

मी मात्र कालचा दिवस जरा लांबलांब राहूनच काढल्याने त्या फोटोत कुठेच नव्हतो. पण तरीही ते फोटो पाहून मला बोचणारे शल्य थोडे कमी झाले. असेलही मी थोडासा नालायक. पण मला चिडवायचा हक्क राखून असलेले तरी कुठे पराकोटीचे देशभक्त आहेत.... अशी पुन्हा स्वत:चीच समजूत काढली. त्यानंतर ईथे ही पोस्ट लिहितोय. आता जरा हलके वाटतेय ..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिकन समोसे आणि कॉफी>> हे आवडलेलं आहे. मस्तच.

सरळ प्रजासत्ताक दिन म्हणावं. आणि हे असले प्रश्न विचारणारांना आजच्या दिवसाचं महत्व काय? नक्की काय झालं होतं आज? अस्लए उलटप्रश्न विचारावेत.

वाह नेमके चिकन समोसे हेरलेत. पण मी नाही खाल्ले ते. कारण दुपारी जेवायला बाहेर होतो. एका मैत्रीणीशी पैज लावून मुद्दाम हरलो होतो. बदल्यात तिच्यासोबत तुडुंब मांसाहार करून आलेलो. त्यामुळे पोट जाम होते.
असो, प्रजासत्ताक दिनाची माहीती मलादेखील खात्रीने व्यवस्थित माहीत हवी ना, तरच दुसरयाला विचारणार..