डीक्लटर

Submitted by आनन्दिनी on 25 January, 2017 - 08:11

नवीन वर्षाचा पहिला महिना जवळजवळ संपत आला. नवीन वर्षाचे नवे संकल्प या पहिल्या महिन्याच्या शेवटापर्यंत हळूहळू विरघळत जातात.

 काही दिवसांपूर्वी मीसुद्धा विचार करत होते की या वर्षांचं काय resolution करावं !! रोज ट्रेडमिलवर पळेन , meditate करेन.... काही नक्की  होत नव्हतं आणि मग एकदम सुचलं किंवा खूप दिवसांपासून जे मनात होतं ते अचानक उसळून वर आलं की येस्स या वर्षी मी declutter करेन! लगेच डोळ्यांसमोर भरलेली कपाटं , अस्ताव्यस्त माळा , गॅरेज  अडगळीचा कोपरा आला ना ? पण मी म्हणतेय ते clutter घरातलं नाहीच. ते आहे माझ्या मनातलं .

मला जमेल का? मी करू शकेन का ? खरंच करायची काही गरज आहे का? माझ्या करण्याची कोणी दखल  तरी घेणार आहे का ? त्याचा काही उपयोग तरी आहे का? आज नको, उद्यापासून.... हे आणि असले सगळे जे विचार माझ्या मनात येतात ना हेच माझं clutter !

मी आजूबाजूला बघते तेव्हा सगळ्यांना घाई असते. सगळे पळत असतात. सगळे अशा अजब रेसमध्ये पळत असतात ज्याची कुठे फिनिशिंग लाईनच नसते. तर या वर्षी मी ठरवलंय की at least या वर्षी आणि जमलं तर फॉरेव्हर या जगाच्या रेसकडे पाठ फिरवून माझ्या मनाला आवडेल त्या दिशेने जायचं . माझी दिशाच वेगळी असल्यामुळे स्टॅंडर्ड रेसमध्ये धावल्यावर टप्याटप्यांवर जे incentive मिळतात जसं पैसा, प्रतिष्ठा etc ते कदाचित नाही मिळणार पण स्वतःला शोधल्याचा आनंद तर मिळेल. माझ्या मनाचं  जर मीच ऐकत नसेन तर दुसरं कोणी ऐकेल अशी अपेक्षा तरी कशी करावी!
"म्हणजे काय मनमानी करायची ठरवलीये वाटतं!" असा खोचक प्रश्न नाही ना आला तुमच्या मनात?
    तर तसं नव्हे. ज्या नात्यांच्या परीघात मी आहे, ती कर्म करणं तर माझं कर्तव्यच आहे , ती करायलाच हवीत पण त्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी आपण आपण उगाचच वाढवतो त्यात आपली खूप एनर्जी वाया जातेय असं वाटतंय. जसं कोणत्याही घड्याळात बघितलं तरी वेळ समजते तरीही ब्रँडेड घड्याळ हवंसं वाटतं , मग त्यासाठी जास्त पैसा कमवावा लागतो, वर ते घड्याळ लोकांनी नोटीस  करावं ,  कॉम्पलिमेन्ट्स द्यावी असं वाटायला लागतं . ह्या ज्या सगळ्या वाढीव गरजा आहेत ना त्या सुद्धा clutter च !!

So to summarise, the plan is to find my true self....स्वतःचा शोध घेणार आहे, स्वतःहाची नीट ओळख करून घेणार आहे आणि स्वतःमध्ये उचित असे बदल घडवून आणण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न करणार आहे. मनात काही ढोबळ आराखडा आहे पण तो पुढच्या वेळेसाठी ठेऊया . माझ्याकडे तर हे एकच आयुष्य आहे. तुमचा काय प्लॅन?

डाॅ. माधुरी ठाकुर
http://drmadhurithakur.blogspot.co.uk/

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

वाढीव गरजा >> या खरच टाळायला हव्या.. खुप गोष्टी सोप्प्या होतील..
वाढीव गरजांबरोबरच वाढीव नाते सुद्धा कमी करावे असे वाटते.. उगाच लोढणं गळ्यात घेउन मिरवायचं..

लिहिलय छान..

गेली तीस वर्षे माझे अनेक "मित्र"आहेत, त्यांचे परत परत ऐकलेले विनोद, त्यांच्या सर्जरीच्या कहाण्या, त्यांचे तब्येतीबद्दल मला केलेले उपदेश (जणू मी कालच इथे दगडवाडी बुद्रुक येथून टपकलो - माझा डॉक्टर नाही, मला क्रेडिट कार्ड कसे वापरायचे माहित नाही इ.) या सर्वांचा मनस्वी कंटाळा, नव्हे त्रासच होऊ लागला.

मग मी एक करून बघितले - आपणहून कुणाला फोन करायचा नाही, कुणाकडे जायचे नाही, ज्यांना कुणाला माझ्याशी संपर्क ठेवायचा असेल ते येतील मा़झ्याकडे.
मग मी नातेवाईकांचेहि असेच केले.
मग लहान सहान गोष्टींकडे संपूर्ण दुर्लक्ष करायचे ठरवले - जसे कधी भाजीत मीठ कमी जास्त पडले, इतर माणसे काय करतात त्याच्यावर आपले मत मांडणे नि त्यातून उद्भवणारे वादविवाद हे सर्व टाळले.
मला कदाचित राजकारण, आर्थिक परिस्थिती, क्रिकेट यामागील खरी - (?!) कारणे माहित नसतील, जी माझ्या मित्रांना नक्की माहित आहे की मोदीने असे का केले, किंवा धोणीने आमक्या ऐवजी तमक्या खेळाडूला टीममधे का घेतले वगैरे. पण त्यात मी वाद घालत बसत नाही.

डोके बरेच रिकामे झाले. (फारसे काही नव्हतेच त्यात)
आता काही मित्र आपणहून फोन करतात, एअरपोर्टवर पोचवायला आणायला येतात, मी पण त्यांच्या साठी तेच करतो.
मला ब्रिज खेळायला, फुटबॉल, बेसबॉल, क्रिकेट बघायला आवडते, त्यांना कुणाला नाही. मग मला नवीन मित्र भेटले ज्यांच्या माझ्या आवडी सारख्या झाल्या. अजूनहि त्या गोष्टी मनाला आनंद देतात.
बरेच, बरेच शांत झाले मन.

मी फेबुवर सगळ्या फ्रेण्ड्सना अनफॉलो केलंय यावर्षी. आता फेबु लॉगिन केलं की छान मोकळंमोकळं वाटतं. फक्त बर्थडे नोटिफिकेशन्स आले की त्यांना विश करते. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्समध्ये आहे पण मेसेजेस (जे मोस्टली फॉर्वर्‍ड्स असतात ते वाचतच नाही). काही पर्सनल मेसेज असेल तरच रिप्लाय. आता सिरिअल्सचे व्यसन सोडायचे आहे (झी मराठी आणी नेटफ्लिक्स) आणि थोडे माबोचे ही Happy