आमची भारतीय प्रमाणवेळ !

Submitted by कुमार१ on 22 January, 2017 - 20:50

‘’अनेक बाबतीत विविधता व मतभिन्नता असलेल्या तुमच्या देशातील नागरिकांमध्ये एखाद्या बाबतीत तरी समानता आहे का हो?’’ असा प्रश्न जर आपल्याला एखाद्या परदेशी व्यक्तीने विचारला, तर त्याचे उत्तर ‘’होय, आम्ही भारतीय, ठरलेली वेळ न पाळण्याच्या बाबतीत समानधर्मी आहोत’’ असे देता येईल!

काय, दचकलात ना हे उत्तर ऐकून? पण वास्तव नाकारून कसे चालेल? आपल्याकडे कुठलाही प्रसंग असो, ठरलेली वेळ ही अभावानेच पाळली जाते. थोडाफार उशीर करणे हा आपला स्थायीभाव आहे. जर कोणी आपल्याला यावरून टोकले तर आपण अगदी बेफिकीरीने मान उडवत अन मनगटावरच्या घड्याळात बघत म्हणतो, ”हा हा, त्यात काय एवढे, ही तर आपली भारतीय प्रमाण वेळ !” वर पुढे खो खो हसून आपल्याला वेळेचे गांभीर्य नसल्याचे दाखवून देतो.

आपल्या शालेय जीवनात आपण वेळेचे महत्व शिकविणारी अनेक वचने, सुभाषिते वगैरे शिकतो. नमुन्यादाखल ही पाहा काही :
‘वेळेचे मूल्य पैशापेक्षाही जास्त असते’,
‘वेळ ही फुकट मिळणारी अमूल्य गोष्ट आहे’.

पण हे सर्व वाचण्यापुरते राहते. मोठे झाल्यावर व्यवहारात त्याचे पालन करण्याबाबत मात्र आपण अगदी उदासीन असतो. बहुसंख्य लोकांमध्ये ही उदासीनता भिनल्यामुळे समाजाच्या अनेक क्षेत्रात वेळ न पाळण्याच्या वृत्तीची लागण झालेली दिसते. त्यामुळे अनेकांना अनेक प्रसंगी नुकसान सोसावे लागते. बघूयात याची काही ठळक उदाहरणे.

बहुतेक सरकारी कार्यालये ही वेळेच्या बाबतीत बेशिस्तीचा वस्तुपाठ घालून देतात. बऱ्याच कर्मचाऱ्यानी कामावर उशीरा जाणे पण, तिथून निघताना मात्र बरोबर वेळेवर निघणे हा पायंडाच पाडला आहे. जसपाल भट्टी यांच्या एका दूरदर्शन मालिकेतील एक सरकारी कर्मचारी अगदी निर्लज्जपणे म्हणतो, ‘’ देखो, शाम ५ बजें दफ्तरसे मेरा निकलना बहोत जरूरी है, क्योंकी दिनमें दोनो टाईम मै कैसा लेट हो सकता हू?’’ बस्स, बहुतेक कर्मचाऱ्यांनी हे वाक्य अगदी वास्तवात आणलेले आहे. या अनागोंदीमुळे जनतेची असंख्य कामे रखडलेली असतात.पण, त्याची फिकीर कोणाला? अर्थात, गेल्या काही वर्षात सरकारी आणि खाजगी क्षेत्रात हजेरीच्या ‘बायोमेट्रिक’ पद्धतीमुळे या बेशिस्तीवर काही प्रमाणात तरी नियंत्रण आलेले आहे, हेही नसे थोडके.

बर, एक वेळ आपण सरकारी नोकरीचे सोडून देऊ. पण,खाजगी व्यावसायिकांमध्ये तरी काय स्थिती असते? समाजातील अनेक व्यवसाय हे संबंधीत ग्राहकांना पूर्वनियोजित वेळ देऊन चालवलेले असतात. पण बऱ्याचदा तिथेही वक्तशीरपणाचा अभाव दिसतो. कधी खूप कार्यमग्न असलेले व्यावसायिक वेळ पाळू शकत नाहीत तर कधी ग्राहकही वेळेवर पोचण्यात बेफिकीर असतात. एकमेकांच्या वेळेची कदर करणे हा आपला अंगभूत गुण नाही, हेच खरे.

आता बघूयात जरा सांस्कृतिक आघाडीवर डोकावून.

बहुसंख्य सभा, संमेलने, उद्घाटनाचे कार्यक्रम इ. नियोजित वेळेपेक्षा उशीरानेच सुरू होतात. त्याची अनेक कारणे असू शकतात पण, मुख्य कारण म्हणजे समारंभाच्या प्रमुख पाहुणे वा अध्यक्षाना उशीरा येण्यातच भूषण वाटते. त्यातून ही मंडळी जर राजकारणी असतील तर मग विचारायलाच नको. अनेक शिक्षणसंस्थांमधील कार्यक्रम तर या बाबतीत अगदी बदनाम झालेले आहेत.कार्यक्रमाच्या दिवशी तेथील विद्यार्थी व कर्मचारी आदीना भल्या पहाटेपासून हजर राहावे लागते.तो कार्यक्रम मात्र वेळेवर सुरू न होता पाहुण्यांच्या येण्याच्या वेळेनुसार सुरू होतो व त्यांच्याच इच्छेनुसार संपतो. आपण वेळ न पाळल्यामुळे आपण हजारो लोकांच्या वेळेचा अपव्यय करतो याची जाणीव अशा मंडळीना कधी होणार?

हां, पण अशा मंडळीना सरळ करणारे काही मोजके संयोजक असतात. त्यासंबंधीचा हा एक घडलेला किस्सा. सुमारे २० वर्षांपूर्वीचा. महाराष्ट्रातील एक नामवंत संस्था. तिचा सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम ठरला होता. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रण होते. कार्यक्रमाचे सूत्रधार होते संस्थेतील एक कठोर शिस्तप्रिय गृहस्थ. कार्यक्रमाची वेळ होती सकाळी १० वाजता. हळूहळू सभागृह भरत होते. ९ वाजून ५० मिनिटांपर्यंत पाहुण्यांचा पत्ता नव्हता. ९.५५ ला सूत्रधारांनी घोषणा केली की सर्वानी शांत बसावे, कार्यक्रम बरोबर १० वाजता सुरू होईल. १० वाजले. पाहुण्यांचा पत्ता नव्हताच. तसेच काही निरोपही नाही. १० च्या ठोक्याला सूत्रधारांनी कार्यक्रम सुरू केला. त्यांच्यापुढे बोलण्याची संस्थेतील कोणाची हिम्मत नव्हती. आता कार्यक्रम चालू झाला होता. सुमारे दीड तासाने बाहेर मुख्यमंत्री अवतरले. कार्यक्रम सुरू झाल्याचे त्याना कळले. त्यावर त्यांनी फक्त स्मित केले आणि त्याच क्षणी बाहेरच्या बाहेर निघून जाण्याचा निर्णय घेतला. एवढेच नाही तर संध्याकाळी त्यांनी संस्थाप्रमुखाना फोन करून दिलगिरी व्यक्त केली.तो कार्यक्रम यथासांग पार पडला, हे सांगणे नलगे.

असे वक्तशीर सूत्रधार व त्यांचा आदर करणारे मुख्यमंत्री हा योग दुर्मिळच मानावा लागेल! अन्यथा पाहुणा जेवढा अधिक प्रसिद्ध आणि वलयांकित तेवढा तो जास्तच उशीर करणार असे एक विचित्र समीकरण रूढ झालेले आढळते.

आपण नाटक, चित्रपट, संगीताचे कार्यक्रम अशा करमणुकीच्या ठिकाणी तर पैसे मोजून जात असतो. तिथे यायची आपल्याला कुणी सक्ती केलेली नसते. तरीसुद्धा सर्व प्रेक्षक कार्यक्रमाच्या बरोबर वेळेवर तिथे हजर असतात का? बऱ्याच जणांना थोडे उशीरानेच अंधारात चाचपडत आत जाण्यात भूषण वाटते. त्यांच्या उशीरा आत येण्याने उपस्थित प्रेक्षक व कलाकार अशा सर्वांचाच रसभंग होतो हे त्यांच्या गावीही नसते. परदेशात कलाकारांच्या कुठल्याही मैफिलीत असे कोणीही करत नाही कारण तो कलाकारांचा अपमान समजला जातो.

निरनिराळ्या कारणांसाठी आपण सार्वजनिक वाहनांनी प्रवास करत असतो. त्यासाठी बस, रेल्वे आणि विमान ही साधने आपण वापरतो. या प्रवासांच्या बाबतीत वेळेचा काटेकोरपणा अजूनही समाधानकारक नाही, हे खेदाने म्हणावे लागते. आपले वाहन बरोबर ठरलेल्या वेळी निघाले व पोचलेसुद्धा तर स्वताला भाग्यवान समजायला हरकत नसावी. प्रवासाची वेळ पाळली न गेल्याने अनेक प्रवाशांचे काहीतरी नुकसान होत असते. पण, ही गोष्ट प्रवासी यंत्रणा पुरेशा गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. ‘’आपल्याला होत असलेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत’’ असे एक ध्वनिमुद्रित वाक्य वारंवार ऐकवले की त्यांचे काम झाले! जपानमध्ये अगदी दोन मिनिटांचा जरी उशीर वाहन यंत्रणेकडून झाला तर प्रवाशांना चक्क आर्थिक नुकसानभरपाई दिली जाते, हे आपण फक्त वाचायचे अन सोडून द्यायचे. असो.

वेळ न पाळण्याच्या बाबतीत अग्रेसर असलेले अजून एक क्षेत्र म्हणजे आपली न्यायालये. ‘तारीख पडणे’ हा बदनाम वाक्प्रचार तेथूनच उगम पावला आहे. एखाद्या पक्षकाराला सुनावणीसाठी ठराविक तारीख व वेळ दिल्यानंतर त्यावेळेस प्रत्यक्ष काम होईलच असे बिलकूल नसते. तारखांवर तारखा पडत सुनावणी महिनोंमहिने लांबत जाते हा सार्वत्रिक अनुभव. याची कारणे काहीही असोत पण, नागरिकांच्या वेळेची किंमत नसणे हीच त्यामागची मनोवृत्ती.

तर सारांश हा की आपल्या नागरी जीवनात आपण कार्यालयीन, शैक्षणिक, व्यावसायिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अशा अनेक आघाड्यांवर वेळेबाबत दक्ष नसतो. एखाद्याने एखाद्या प्रसंगी वेळ न पाळण्याचे परिणाम हे त्या घटनेपुरते मर्यादित राहत नाहीत. हळूहळू सर्वांमध्ये ही वृत्ती मुरत जाते आणि मग तिचे सामूहिक परिणाम दिसू लागतात. एकदा का ‘चलता है’ ही सामाजिक मनोवृत्ती झाला की कार्यसंस्कृती झपाट्याने ढासळत जाते. अनेक मोठे सामाजिक प्रकल्प वेळेत पूर्ण न होण्यास त्यातील प्रत्येकाने आपापली वेळ न पाळण्याचा अवगुण कारणीभूत आहे.

आपले कुठलेही काम वेळच्यावेळी करण्यासंबंधी एक हिंदी दोहा प्रसिद्ध आहे. तो म्हणजे ‘कल करे सो आज कर, आज करे सो अब...’. परंतु, आपण भारतीयांनी आपल्या वेळेबाबतच्या बेफिकीरीने पुढील दोहा प्रचारात आणला आहे:

‘आज करे सो कल कर, कल करे सो परसो
जल्दी जल्दी क्या पडी है, जब जिना है बरसों ‘

असे काही लिहिताना मला मनापासून खेद वाटतो. ‘जाऊ द्या, आपण असेच आहोत’ असे हताशपणे म्हणून हा विषय सोडून द्यावासा वाटत नाही. आपण सर्वांनी मनात आणले तर हे चित्र नक्की बदलू शकू.

आजकाल आपल्याला प्रत्येक बाबतीत ‘स्मार्ट’ व्हायची घाई झाली आहे. पण, त्याआधी आपण वक्तशीर होण्याची नितांत गरज आहे.प्रत्येकाने वेळ पाळण्याचे बंधन स्वतःवर घातले तर कुणाचाच वेळ वाया जाणार नाही. त्यातून वाचवलेले कित्येक मनुष्यतास सत्कारणी लावता येतील. शिस्तबद्ध समाज घडविण्याच्या दृष्टीने टाकलेले ते एक महत्वाचे पाउल असेल.
***************************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख ! एकदम पटेश ..

आणि हे भारीयं,
<<<<<<
देखो, शाम ५ बजें दफ्तरसे मेरा निकलना बहोत जरूरी है, क्योंकी दिनमें दोनो टाईम मै कैसा लेट हो सकता हू?’’ 
>>>>>
Happy

माझ्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे हा. कारण वेळेवर पोहोचून वेगवेगळ्या लोकांसाठी ताटकळत उभे राहायचे कित्येक प्रसंग माझ्या नशिबी आलेले आहेत.
काही वेळा संतापानी मी अश्रू देखील ढाळले आहेत. तरी मी उशिरा जाऊ शकत नाही.

एखादी व्यक्ती तुमच्याशी अतिपरिचित असते तेव्हा काही काळाने तुमच्या वेळेवर पोहोचण्याचीच टिंगल केली जाऊ लागते. किंवा उशिरा येणारी व्यक्ती सरळ तुला माहितीच आहे मला उशीर होतो असा पवित्रा घेते.

पण वेळेवर जाणाऱ्या व्यक्तीकडे क्वचित दिलगिरी व्यक्त केली जाते.
पण अशा तीन प्रसिद्ध व्यक्ती बघितलेल्या आहेत ज्या नेहमी वेळेवर किंवा वेळेच्या आधी येतात.
माधुरी ताई पुरंदरे.
जयंत नारळीकर (आणि त्यांच्या पत्नी मंगला नारळीकर)

आणि त्यांच्याकडे पाहून विश्वास बसतो की त्यांना इतक्या गोष्टींमध्ये यश मिळाले आहे यात त्यांच्या वक्तशीरपणाचा फार मोठा हात असणार.

इतक्या गोष्टींमध्ये यश मिळाले आहे यात त्यांच्या वक्तशीरपणाचा फार मोठा हात असणार. >>
हो, नक्कीच असे असणार.
आपल्या समाजातील बहुतेक क्षेत्रे वेळेबाबत ढिसाळ् आहेत. बहुधा लष्करी सेवांमध्ये वेळेचे महत्व असावे असे वाटते. कोणी यावर प्र्काश टाकल्यास आवडेल.

योग वर्गाला आलेल्या साधकांनी वेळेवरच यावे म्हणून आम्ही योग शिक्षक पहिल्या दिवशीच सुचना देत असायचो, की सायंकाळी सहाला वर्ग सुरु होईल.सहा वाजून पाच मिनिटापावेतो आतमध्ये प्रवेश करणे क्षम्य, सहा वाजून पाच मिनिटानंतर आलेल्यांनी , आतमध्ये यायचेच नाही, परस्पर घरीच जायचे. पहिला आठवडा फक्त हे सांगावे लागत असे, मग मात्र सारेजण वेळेवरच येतात असा माझा अनुभव आहे.
लेखातील उदाहरणे अनुभवास येतात. लेख छान आहे.
वेळा पाळण्याची सुरवात आपल्यापासूनच करावी हे मी स्वतः शिकलो आहे. वेळेवर सुरु न होण्यार्‍या , कार्यक्रम स्थळावरून , मी अनेकवेळा परत निघून गेलो आहे, मग तो कार्यक्रम कितीही चांगला असो.

छान लेख..
मी सुद्धा दिल्या वेळेला पोहचणारी.. अगदी २ मिंट जरी उशीर झाला तरी फार कानकोंड होत मला पण इतरेजण तसे वागत नाही तेव्हा खुप त्रास होतो मला...

पुण्या मुंबईच्या रस्त्यांवरील वाहतुक पाहिली की वेळप्रसंगी (सगळेच "वेळप्रसंग" असतात) कायदे मोडून सुद्धा आपलेच वाहन पुढे घुसवायचे याची इतकी घाई झाली असते की ते पाहून वाटते की व्वा, या लोकांना वेळेवर पोचणे फारच महत्वाचे वाटत असावे. अगदी समोर गर्दी दिसत असताना मोठ मोठ्याने भोंगा वाजवून आपल्याला पुढे जाऊ देण्यासाठी, प्रसंगी खिडकीतून हात बाहेर काढून "खुणा"करणारी लोकं पाहिली की त्यांच्या वक्तशीरपणाचे कौतुक वाटते.
मुख्य कारण म्हणजे समारंभाच्या प्रमुख पाहुणे वा अध्यक्षाना उशीरा येण्यातच भूषण वाटते. त्यातून ही मंडळी जर राजकारणी असतील तर मग विचारायलाच नको.
आमच्या लहानपणी हे अगदी इतके मनावर ठसले होते, की आपण जेव्हढे उशीरा जाऊ तेव्हढे आपले समाजातील स्थान उच्च. त्यामुळे वेळेवर पोचणे हे कमीपणाचे मानले जात असे.

पण यात काही वाईट वाटायला नको -
नेहेमीप्रमाणे भारतात शंभरदा काही घडले नि इतर देशात एकदाच तसे घडले तरी, भारतीय म्हणायला मोकळे - आम्हीच नाही, इतर देशात सुद्धा असेच चालते!
विशेषतः अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन हा नेहेमी उशीरा येण्याबद्दल प्रसिद्ध होता!

वेळेवर सुरु न होण्यार्‍या , कार्यक्रम स्थळावरून , मी अनेकवेळा परत निघून गेलो आहे, मग तो कार्यक्रम कितीही चांगला असो. >> जयंत, याबद्दल आपले अभिनंदन !
यावरून एक अवतरण आठवले ते असे:
' एखाद्या कार्यक्रमास वेळेवर पोचण्याचा तोटा असा असतो की तुमची दखल घेण्यास तिथे कुणीच हजर नसते.'

खूप छान विषय!!

मी येथे स्थानिक मराठी मंडळाची कार्यकर्ती आहे. आमची ही सदाची रड आहे....हॉल वगैरे अगदी वेळेवर तयार असतो पण प्रेक्षक कायमच नियोजित वेळेच्या १ ते १.५ तास नंतर येतात....प्रेक्षक नाही तर कार्यक्रम कसा चालू करणार?? परदेशी कार्यक्रमांना मात्र हेच प्रेक्षक अगदी काटेकोरपणे वेळ पाळतात....भारतीय कार्यक्रमांबद्द्लच हा "चलता है" अ‍ॅटीट्यूड आहे....

बऱ्याच जणांना थोडे उशीरानेच अंधारात चाचपडत आत जाण्यात भूषण वाटते. त्यांच्या उशीरा आत येण्याने उपस्थित प्रेक्षक व कलाकार अशा सर्वांचाच रसभंग होतो हे त्यांच्या गावीही नसते. >>>> अशा मंडळींचा तर मला प्रचंड संताप आहे....काही बोलायला गेले की वर हे "इतना क्या है" करत आपल्यावरच डाफरणार

पण वेळेवर जाणाऱ्या व्यक्तीकडे क्वचित दिलगिरी व्यक्त केली जाते. >>> सहमत आहे

प्रेक्षक नाही तर कार्यक्रम कसा चालू करणार?? <<< हा प्रकार बर्‍याच मराठी मंडळामधे असतो. आमच्या इकडे मध्यंतरी २ प्रेक्षक असले तरी कार्यक्रम सुरु करायची पध्दत सुरू केली. मग हळू हळू ते लोकांच्या लक्षात येऊ लागलं आणि ते वेळावर येऊ लागले. पण काही दिवसानी पदाधिकारी बदलले. आता परत 'येरे माझ्या मागल्या' .. मंडळाचा कार्यक्रम सुरू व्हायला १५/२० मिनिटे उशीर ठरलेलाच..

मला उशिरा येणार्‍या लोकांचा तेवढा राग नाही येत जेवढा उशीर होणारेय हे माहीत असुन पण कळवण्याची तसदी न घेणार्‍या लोकांचा येतो.
आणि त्याहुनही जास्त राग आपणच फोन करून कुठे आहेस विचारलं की आलोच दोन मिनिटात म्हणत १ तास आणखी उशीर करणार्‍यांचा येतो:रागः:

माझी एक मैत्रिण आहे ती मोठ्या अभिमानाने सांगते ' कार्येक्रमाची वेळ ७ असेल तर मला ६ सांगत जा म्हणजे मी किमान ८ पर्यंत तरी पोहचेन

मी लेटलतीफ आहे, कबूल करतो. खोटं कशाला बोला? पर मुझे ऐसा बननेके लिये मजबूर किया इस जालिम जमानेने.....

अमिताभ बच्चनला लाज वाटेल इतका पंचुअल मी एकेकाळी होतो, घड्याळं लावून घ्यावी टाईप. कॉलेजात होतो तेव्हा एका वीस जणांच्या गृपचा निर्वाचित लिडर होतो. ह्या गृपमधे सिनियर जुनिअर, मुले मुली सर्व होते. हा सांस्कृतिक कार्यक्रम करणारा गृप होता. आम्हाला गोव्याच्या कॅम्पसाठी तयारी करायची होती. दिडमहिना हाताशी होता. रोज अकरा वाजता कॉलेजात जमायचे हा शिरस्ता होता. दिवाळीच्या सुट्ट्यांमधे बरंका!.... तर मी आपला तयार होऊन १०.४५ च्या ठोक्याला बरोब्बर पोचत असे. पहिला चुकार पक्षी सव्वाबाराला उगवायचा... नंतर दहा मिनिट-पाच मिनिटांच्या फरकाने दिड वाजेस्तोवर लोकं जमायची.... आणि गंमत अशी की गृपडान्स असल्याने सगळे सोबत असल्याशिवाय काहीच करता यायचे नाही. बरं आल्यावर लेकरांना जायची घाई आधी. अडिचपासून निघायची तयारी... तीन तास प्रॅक्टीस अवघा दिड तास तेही वेळ-काळ गुंडाळून... मी सुरुवातीला खूप भडकायचो... सिनियर मुली माझ्यावर डाफरायच्या... मग मी वेळेचे लाड करणं सोडून दिलं....

एकदा माझ्या स्वतःच्या प्रायवेट गृपचा डान्स परफॉर्मन्स होता व त्यासाठी मला दिवसभर प्रॅक्टीस करायची होती.. मग मी कॉलेजच्या प्रॅक्टीसरुमची चावी माझ्याकडे असायची ती घेऊन नाहिसा झालो.... दिवसभर बेपत्ता. आणि तो दिवस कॉलेजगृपच्या तयारीसाठी खूपच महत्त्वाचा असल्याने झाडून सारे लोक, आमच्या फॅकल्टीसहीत आलेले. बसलेत वाट बघत... चार वाजेस्तोवर सगळी लोकं मला कुठे कुठे शोधत होती... प्रोफेसरांसह घरीही जाऊन आली. तेव्हा काय मोबाईल नव्हते.. Wink असली अद्दल घडवली की बस!

त्या दिवसांच्या अनुभवांपासून मी लक्ष देऊन बघायला लागलो की लोकांना खरंच कोणाच्या वेळेचं महत्त्व नसतं. स्वतःला तोशिस न लागता लोक वेळ पाळतात. पुढचा कितीही ताटकळेना. हे फक्त मीटींगची वेळ पाळण्याबद्दल नाही तर पेमेंट-पगार-मान-सन्मान-कौतुक-आदर-महत्त्व देणे-घेण्यापासून बघितले. इतर अनेक बाबतीत लोक आपली किती कदर करतात ते बघून एक निगरगट्टपणा आलाय. कबूल केलेला वेळ, पैसा, महत्त्व जे लोक देत नाहीत त्यांना मी तसाच ट्रीट करतो आता.

याचा अर्थ मी १००% लेटलतीफ नाही हां! जिथे वेळेवर पोचणे आवश्यकच आहे जसे पहिली क्लायंट मीटींग आहे, जुना क्लायंट योग्यप्रकारे ट्रीट करतोय, महत्त्वाचा कार्यक्रम आहे, नाटक-फिल्म-बैठक, इत्यादी तिथे मी अजिबात लेट होत नाही.

आणि अजून एक सबब (लंगडीच हो) देऊ का? मी हाडाचा कलाकार आहे. Wink

चांगल्या विषयावर लेख आहे. मागे एकदा एका ईंडियन असोसिएशन चा स्वातंत्र्य-दिनाचा कार्यक्रम होता. वेळ सकाळची १० वाजताची ठरली होती. ९ वाजता कार्यक्रमाच्या ठिकाणी ३-४ कार्यकर्ती मंडळी जेमतेम पोहोचली होती. १०:१५-१०:३० च्या सुमारास जेव्हा त्या कार्यक्रमात गाणार्या, नृत्य करणार्या लोकांना त्या ऑर्गनायझर्स नी फोन करायला सुरूवात केली, तेव्हा, 'आ ही रहे है', 'बस, पहूंच ही रहे है' अशी उत्तर मिळाली. ११:१५-११:१५ च्या पुढे ते ग्रूप्स आले. मग स्टेज समोर, झेंड्यासमोर फोटोसेशन्स झाली आणी १० वाजता सुरू होणं अपेक्षित असलेला कार्यक्रम १२:१५ वाजता सुरू झाला.

त्यातही पुढे जाऊन सांगायचं तर स्वतःच्या मुलांचा कार्यक्रम चालू असताना प्रेक्षकात बसलेले आई-बाप्स पुढच्या मोकळ्या जागेत जाऊन फोटोज-व्हिडीओज वगैरे काढत होते आणी तो कार्यक्रम झाल्यावर बाकीच्या कार्यक्रमांकडे संपूर्ण दुर्लक्ष करून मोठ्या आवाजात गप्पा मारणे, हाका मारणे ह्यात देखील काही वावगं आहे, असं त्यांना चुकूनही वाटलं नाही. गंमत म्हणजे हीच मंडळी अमेरिकन कार्यक्रमांना वेळ आणी सभ्यतेचे बाकीचे सगळे संकेत पाळतात. पण भारतीय कार्यक्रमांना मात्र त्यांच्या ह्या 'देसी'पणाला ऊत येतो. (जसं न्यूयॉर्क-मुंबई विमान सुटताना जरी न्यूयॉर्क-मुंबई विमान असतं आणी अ‍ॅटलांटीक ओलांडता ओलांडता त्याला 'गोरखपूर-दादर एक्स्प्रेस ची कळा येते, तसंच आहे हे).

मला उशिरा येणार्‍या लोकांचा तेवढा राग नाही येत जेवढा उशीर होणारेय हे माहीत असुन पण कळवण्याची तसदी न घेणार्‍या लोकांचा येतो.
अगदी खरे.
मोठ्ठी प्रौढी मारतात आमच्याकडे सगळ्यांचे वेगळे वेगळे मोबाईल्स आहेत, अमेरिकेपेक्षा स्वस्तात असतात. मग कॉल का नाही करत सांगायला की उशीर होतो आहे.

>>>(जसं न्यूयॉर्क-मुंबई विमान सुटताना जरी न्यूयॉर्क-मुंबई विमान असतं आणी अ‍ॅटलांटीक ओलांडता ओलांडता त्याला 'गोरखपूर-दादर एक्स्प्रेस ची कळा येते, तसंच आहे हे--

हा हा,.अगदी अगदी असंच वाटतं.

>>>मला उशिरा येणार्‍या लोकांचा तेवढा राग नाही येत जेवढा उशीर होणारेय हे माहीत असुन पण कळवण्याची तसदी न घेणार्‍या लोकांचा येतो.
किंवा ज्या वेळेला भेटायचंय त्याच वेळेला उशीर होतोय म्हणून मेसेज करणारे.
मला अशा लोकांच्या मेंदूत शिरून एकदा बघायचंय. जर क्ष वेळी आपण कुणालातरी भेटायचं ठरवलंय, तर त्याच्या आधी एक तास आपण खरंच त्या वेळी पोहोचू शकतो का याचा आढावा घेणे कितीसे अवघड आहे? आणि तेव्हाच जर त्या व्यक्तीला मेसेज केला, तर तिला पण तिचा वेळ चांगला वापरता येईल.

पण आयरॉनिकली, माझ्या आयुष्यातली बरीच वक्तशीर माणसे कुठलेही भारी फोन किंवा साधी घड्याळे सुद्धा घालत नाहीत. मीदेखील कधीच घड्याळ घालत नाही. आणि जे लेट लतिफ आहेत त्यांच्याकडे मात्र १७६० वेगळी वेगळी घड्याळे असतात.

हो, उशीर होत असल्याबद्दल सुचवण्याचं काम मी इमानेइतबारे करतो. त्यात हयगय नाही करत. तेवढी तरी कर्टसी असलीच पाहिजे. किमान अर्धातास आधी आपल्याला नक्की किती वेळ अजून लागणार आहे व त्यात बफर टाइम किती असेल, कुठल्या रस्त्याने येणार, ट्रॅफिक किती लागेल असं सर्व मी समोरच्याला कळवतो. तेवढं प्रोफेशनल असलंच पाहिजे.

'बस आरहा हूं पाच मिनिटमें' हे राष्ट्रीय खोटं डोक्यात जातं. त्यापेक्षा काय तो अर्धा तास एक तास वाढवून सांगावा.. तेवढ्यात दुसरं एखादं काम होतं...

'गांधी' चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या वेळचा किस्सा आहे. जरा आठवून लिहीतोय (चुभूदेघे).

दिग्दर्शक अ‍ॅटेनबरो कडक शिस्तीचे. कलाकारांना नेणारी बस स. ६ वा. हॉटेलवर येई. पहिल्याच दिवशी दोन भारतीय कलाकारांना आवरायला ५ मिनिटे उशीर झाला. अर्थात, बस त्यांना न घेता निघून गेली.
नंतर अ‍ॅटेनबरोनी त्यांना कडक शब्दात समज दिली की त्यांच्या एका मिनिटाचे मूल्य काही लाख रु. आहे !

मानले राव ! अशीच माणसे पाहिजेत आपल्याला सरळ करायला...

माझा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. मी वेळ पाळते म्हणजे पाळतेच आणि वेळ न पाळणार्‍या लोकांचा मला रागच नव्हे तर तिटकारा आहे. माझ्या एक कलिग असा प्राणी आहे ज्याला कुणाच्याच वेळेची अजिबात किंमत नाही. पुर्वी आम्ही चहा प्यायला एकत्र जायचो. वेळ ठरली होती पावणे पाच ची, पण हा माणूस कधीच ४.४५ ला तिथे आलाय असं झालं नाही. आमचं ऑफिस अतिशय मोठं आहे, माझी बिल्डिंग वेगळी त्याची वेगळी... रोज मी १० मिनिटं वाट पहायची. घड्याळाचं आणि याचं काय वाकडं आहे देवालाच ठाऊक. मग त्याला सुट व्हावं म्हणून आम्ही पावणे पाचची वेळ बदलून ५ केली, तरिही उशिरच. Uhoh
आमची सकाळची बस पण तो त्याच्या घरापासून ते पुढच्या ५-७ किमी च्या पट्ट्यात अक्षरशः कुठेही पकडायचा. आता कार ने येतो त्यामुळे त्याला हवं तेव्हा निघता येतं. पण तेव्हा भल्या सकाळी तो घर आणि बस स्टॉप मध्ये ढेंगेचं अंतर असूनही भावाला गाडीवरून घेऊन यायचा, का तर बस चुकली असेल तर पाठलाग करून पकडता यावी म्हणून. कुतूहल म्हणून मी एक दिवस त्याला 'घरी तुला फार काम असतं का'? असं विचारलं तर काही नाही, फक्त अन्घोळ कपडे, आणि दिलेला आयता चहा प्यायचा असतो असं उत्तर मिळालं. आणि एक नाही दोन नाही मी कन्सिसटंटली त्याला मोजून ३-४ वर्ष रोज जीव खाऊन बस पकडताना पाहिले आहे.
एकदा तर हाईट झाली.. मला त्याच्या सोबत जायचं होतं ऑफिसला.... ते पण लवकर. मी नॉर्मली १२ ला निघते, तर त्याचा मेसेज आला माझं काम होत आलंय ११.१५ पर्यंत होइल, लगेच पोहोचतो. मग माझ्या स्मस ला उत्तर नाही, फोन कट केले गेले. आला फायनली १२.३० ला. मग कानाला खडा लावला... आणि चुकूनही त्याच्या बरोबर जायचं नाही असं ठरवलं.
हा १० सांगतो तेव्हा १०.३० शिवाय उगवत नाही हे आम्हाला कळून चुकलं त्यामुळे आम्ही अर्धा तास बफर च पकडू लागलो, पण वाट्लं हे काही बरोबर नाही.
कमाल शिरोमणी म्हणजे त्याला वेळेविषयी काही सांगायला गेलं तर, काय तु घड्याळ घड्याळ करतीस, वेळ काय पाळायची गोष्ट आहे का? असं थुत्तरफोड उत्तर मिळतं. ५-१० मिनिटं हिकडं तिकड् होणारच की म्हणे.
त्याच्याबद्दल लिहावं तितकं कमी आहे. वेळेच्या बाबतील माणसाने कसं असू नये, याचं उत्तम उदा. आहे तो.
तरिही अधून मधून इमर्जन्सी ला आम्ही सोबत जातो, पण तो कितिही लेट आला तरिही माझ्यासाठी ते माझ्या नेहमीच्या वेळेपेक्षा लवकर असते. त्यामुळे चालते.
एक लक्षात आलं की मी खरंच फार प्रॉम्प्ट आहे वेळेच्या बाबतीत, ठरवलं की त्या वेळेला त्या ठिकाणी पोहोचायचंच.

पण कधीही वेळेत न येणार्‍यांबद्दल मला कमालिची उत्सुकता आहे, फार सफाईदारपणे खोटं बोलतात ते, जवळच आहे, ५ मिनिटात पोहोचतोय इ. इ. आणि मूळात अजून घरीच असतात.

"'बस आरहा हूं पाच मिनिटमें' हे राष्ट्रीय खोटं डोक्यात जातं. " - सहमत.

डाऊनटाऊन पुण्यात घडलेला प्रसंगः नवीन काँप्युटर आणून बसवणारा एक माणूस एकदा(चा) आला आणी त्याने खोक्यातून काँप्युटर बाहेर काढायला सुरूवात केली. तितक्यात त्याचा फोन वाजला. कुणीतरी पाषाण हून बोलत होतं (संध्याकाळच्या ट्रॅफिक मधून तिथे पोहोचायचा अंदाजे वेळ निघाल्यापासून एक तास). ह्याने बिनधास्त त्या माणसाला आपण 'ऑन द वे' असून १५-२० मिनीटात पोहोचत असल्याचं सांगितलं. त्यानंतर हा माणूस २-२.५ तासाने निघाला. पाषाण ला म्हणजे लांब जायचय, जपून जा, ह्या माझ्या वाक्यावर 'आता ईतक्या उशीरा ईतक्या लांब कोण जाईल, जाऊ दे, उद्या बघतो' असं सांगून हा महानुभाव निघून गेला. मला त्या कधीही न भेटलेल्या पाषाण च्या माणसाविषयी अजुनही वाईट वाटतं. व्यावसायिकता, जवाबदारी, दर्जा, सेवा वगैरे गोष्टी तर फार लांब राहील्या.

हा प्रकार बर्‍याच मराठी मंडळामधे असतो. आमच्या इकडे मध्यंतरी २ प्रेक्षक असले तरी कार्यक्रम सुरु करायची पध्दत सुरू केली. मग हळू हळू ते लोकांच्या लक्षात येऊ लागलं आणि ते वेळावर येऊ लागले. >>>> हे करुन पहायला हवे. पण खाणेपिणे मिळाले की लोकं खूष कार्यक्रमाची कोण फिकिर करतं???? तेच सेलिब्रिटी वगैरे मंडळी बोलावली की सेल्फी काढायला अगदी वेळेवर हजर!!!

माझ्याही अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे हा. मराठी मंडळाच्या बाबतीत प्रत्येक प्रतिसादाशी सहमत. वेळेवर न येणे ही एक वृत्ती आहे असं वाटतं मला. "वेळेवर काय पोचायचं" असं म्हणणारे नक्कि काय विचाराने असं म्हणतात? लहानपणापासुन "प्रमुख पाहुणे" किंवा "महत्वाची व्यक्ती" उशीराच येते असं मनात ठसल्यामुळे आपणही उशीरा पोचुन "महत्वाचे" होऊ / लोक आपली वाट बघतील / आपल्यामुळे कामं अडतील ह्याच समाधान वाटत असेल का? ह्यापैकी बर्‍याच लोकांना वेळेवर पोहोचणं कमी पणाचं वाटतं. का असं वाटतं माहिती नाही पण वाटतं. लवकर / वेळेवर पोचलो तर कामं, मदत करायला लागेल कारण उशीरा पोचल्यावर काही करायला लागत नाही असं वाटतं का?
काही लोक तर आपल्याकडे येणारे पाहुणे सुद्धा उशीराच येतील असं अध्यारुत धरून चालतात असं पाहिलं आहे. मित्राच्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला दिल्या वेळी आम्ही दांपत्य आणि त्याचे दोन गोरे मित्र फक्त हजर होतो. यजमान काय काय ते आणायला बाहेर गेले होते. ते आल्यावर आम्हीच त्यांना सजावट वगैरे करायला मदत केली. भारतीय मित्रमंडळी नेहमीप्रमाणे दीड तास नंतर उगवली. आणि सगळ्यात आधी आलेले गोरे लोक तोपर्यंत मिळेल ते खाऊन निघुनही गेले! भारतीयांपैकी कोणालाही आपण उशीरा आलोय ह्याचं सोयरसुतक नव्हतं. ही वृत्ती मला फार बोचते.
उत्तर भारतीय लोकांमधे (अर्थात अपवादही आहेत) ही वृत्ती माझ्या बघण्यात तरी जास्त दिसली आहे. बरेच मराठी लोक दहा पंधरा मिनिटे, फार तर अर्ध्या तासाच्या उशीरने येतात. बरेचसे, लोक उशीर होणार असेल तर मेसेज / फोन करतात किंवा आत्ताच निघालोय, थोड्यावेळात येतो असं तरी कळवतात. उत्तर भारतीय मंडळी मात्र हक्कानी उशीरच येतात.

मला पण वेळेवर जायला आवडतं, पण जस्ट काट्यावर. तेही मरत मरत. वेळेआधी जायला आणि लवकर निघायला मात्र अजिबात आवडत नाही. जगातले सगळे रस्ते त्यावेळी जो काही रेग्युलर ट्राफिक असतो त्याच कंडीशन मध्ये मला मिळणारेत या अझम्शनवर मी चालतो. एकही लाईट जास्त लागला तर वेळ मेकप करतो, म्हणजे करावाच लागतो. पब्लिक ट्रान्झिट असेल तर सगळ्या सिस्टीम वेळेवर येऊन सगळे ट्रान्स्फर बरोब्बर होणारेत हे गृहीतक असतं.
हे गणित साधारण २०% वेळा वेळेआधी ५ मिनिटं पोहोचवेल अशा पद्धतीने केलेलं असतं.
१०% वेळा हे चुकतं आणि ५-१० मिनिटे उशीर होतो. तो उशीर माफी मागून मेकप करतो. त्याहून जास्त वेळा गणित चुकतंय असं वाटलं की ricalibrate करतो. सगळं वेळेवरच होणारे यावर प्रचंड विश्वास असल्याने आधी फोन करूच शकत नाही. मात्र एकदा कळून चुकलं की उशीर होतोय की लगेच फोन करतो. धावण्याचा व्यायाम आणि पोचू की नाही पोचू की नाही यात हृदयाची धडधड वाढते थोडी.

रोजो १० मिनिटं लवकर पोहोचणे इज वेस्ट ऑफ टाईम.

रोजो १० मिनिटं लवकर पोहोचणे इज वेस्ट ऑफ टाईम.
>>>>
अगदी सहमत. ते सुद्धा सकाळी ऑफिसला वेळेच्या आधी पोहोचणे म्हणजे नुसते वेस्ट ऑफ टाईम नाही तर वेस्ट ऑफ स्लीपिंग टाईम. याची किंमत तर पैश्यातही करता येणार नाही. किंबहुना म्हणूनच ऑफिसमध्ये १०-१५ मिनिटांची लेटकमर्सना मार्जिन असते. मी ती कसोशीने पाळते. ९ च्या आधी पोहोचत नाही, सव्वानऊच्या नंतर जात नाही Happy

ज्या ग्रुपमध्ये उशीर होतो हे माहित आहे तिकडे मी पण तसाच जातो. वेळेवर जाणे या तत्त्वापेक्षा माझ्यावेळेची किंमत बघतो मी.

हो, जर आपल्याला कल्पना आहे की कोणी वाढदिवसाची वेळ सातची दिली आहे तरी आठपर्यंत त्यांच्याकडे काहीच सुरू होणार नाही तर उगाच अवघडलेल्या अवस्थेत अख्या सोफ्यात एकटेच बसायला आणि यजमानांना घरच्या कपड्यात वावरताना बघायला आपण तरी का लवकर जायचे?

बरं सातची वेळ दिली असताना तुम्ही सातलाच पोहोचलात तर त्यांच्या कपाळावर एक आठी... सात म्हटले की सातलाच हजर झाले.

Pages