वाटते वैषम्य ह्याचे फक्त बघतो व्याकरण

Submitted by सुप्रिया जाधव. on 20 January, 2017 - 08:19

योग्य वेळी वेल छाटत योग्य ते दयावे वळण
तेवढा उत्कर्ष होतो जेवढे खच्चीकरण !

कैक वर्षांनी तुझी येतेय बाबा आठवण
कैक वर्षांनी नव्याने उपटले आजारपण

तेच ते भाडेकरी वर्षानुवर्षे नांदती
दे नव्या चिंतेस घर बदलेल बघ वातावरण

त्याच त्या वळणावरी आयुष्य नेउन सोडते
तोच तो चकवा पुन्हा अन तेच ते मार्गक्रमण

खंत ही नाही मुळी की तो मला पडताळतो
वाटते वैषम्य ह्याचे फक्त बघतो व्याकरण

काळजीची काळजी घे काळजीने जन्मभर
काळजी व्यतरिक्त जातो सोडुनी प्रत्येकजण

वेळ गेल्यावर कळे हव्यास नाही चांगला
कहर होतो पावसाचा वाहते कच्चे धरण

पंचमी दसरा दिवाळी अष्टमी कोजागिरी
माणसांवाचुन कसे हे साजरे करणार सण ?

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>तेच ते भाडेकरी वर्षानुवर्षे नांदती
दे नव्या चिंतेस घर बदलेल बघ वातावरण

वेळ गेल्यावर कळे हव्यास नाही चांगला
कहर होतो पावसाचा वाहते कच्चे धरण>>>सुरेख शेर!

*खंत ही नाही मुळी की तो मला पडताळतो
वाटते वैषम्य ह्याचे फक्त बघतो व्याकरण.....*
या ओळी सगळ्यात छान !!

जबरदस्त... खुपच छान लिहली आहेस..

"खंत ही नाही मुळी की तो मला पडताळतो, वाटते वैषम्य ह्याचे फक्त बघतो व्याकरण"....
हे वाक्य तर खरच खुप मस्त.....

खंत ही नाही मुळी की तो मला पडताळतो
वाटते वैषम्य ह्याचे फक्त बघतो व्याकरण

या ओलिन्चा अर्थ समजवुन सन्गल क प्लीज... मला नीत नाहि कलल