ओंडका अन ओंडका बहरून आला

Submitted by सुप्रिया जाधव. on 20 January, 2017 - 07:43

एकटी नाहीस तू ...ठसवून आला
चंद्र गच्चीवर तुझ्या उतरून आला

वेल ही वृक्षाविना दिसल्याबरोबर ...
ओंडका अन ओंडका बहरून आला

ताकदीने घेतला मी उंच झोका
चांदवा हातात आपणहून आला

दृष्य हे नाही अचानक उजळलेले
हा कवडसा धूळ ओलांडून आला

पांढरे होताक्षणी हे भाळ माझे
रंग दुनियेचा खरा समजून आला

टेकडी निश्चल उभी होती तिथे ही
डोंगरावरचा कडा निखळून आला

हक्क जगण्याचा अता मिळणार त्याला
लाख मरणे जो इथे भोगून आला

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्कृष्ट !!

लेखणीमधे जादू आहे तुमच्या !!

>>>वेल ही वृक्षाविना दिसल्याबरोबर ...
ओंडका अन ओंडका बहरून आला>>>स्तब्ध!

>>>ताकदीने घेतला मी उंच झोका
चांदवा हातात आपणहून आला>>>क्या बात!

>>>दृष्य हे नाही अचानक उजळलेले
हा कवडसा धूळ ओलांडून आला>>>सुंदर!

>>>पांढरे होताक्षणी हे भाळ माझे
रंग दुनियेचा खरा समजून आला>>>निःशब्द!

>>>हक्क जगण्याचा अता मिळणार त्याला
लाख मरणे जो इथे भोगून आला>>>खरंच का?

खूप-खूप आवडली गझल!