गंजका चरखा

Submitted by सुप्रिया जाधव. on 20 January, 2017 - 07:22

फ़क्त शिक्षण पाहुनी ठरते इथे तनखा
पाडुनी पैलू हि-याला मग चमक परखा

एकतर्फी गुंतते त्याच्यामधे कारण...
झाड़ वेलीला कधी मारेल का विळखा ?

थेंब ओघळतो दवाला स्पर्शल्यावरती
दागिना अनमोल आहे लांबुनी निरखा

सर्व प्रश्नांचे मिळाले वाटते उत्तर
त्या क्षणी निर्माण होतो प्रश्न का नवखा ?

भावनांचे सूत घे कातावयाला तू
त्याविना आयुष्य म्हणजे गंजका चरखा

झाकल्याने वाढते औत्सुक्य दुपटीने
चेहऱ्यावरती तुझ्या ओढून घे बुरखा

सुप्रिया

Group content visibility: 
Use group defaults