'लॉस्ट ईन म्यूनिख' आणि 'लेथ जोशी' पंधराव्या 'पिफ'मध्ये सर्वोत्कृष्ट

Submitted by चिनूक्स on 19 January, 2017 - 13:52

गेला आठवडाभर तमाम चित्रपटप्रेमींच्या गर्दीत सुरू असलेला जगभरातल्या उत्तमोत्तम चित्रपटांचा महोत्सव आज संपला.

कोथरुडातल्या सिटिप्राईड चित्रपटगृहात आज समारोप व बक्षीससमारंभ रंगला. समारोप समारंभाचं मुख्य आकर्षण होतं महोत्सवाच्या स्पर्धाविभागाचा निकाल.

मराठी स्पर्धाविभागाचे परीक्षक होते श्री. गोरान पास्कलयेव्हिक, श्रीमती नर्गेस अब्यार आणि श्री. बेनेट रत्नायके.

सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटासाठी महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा 'संत तुकाराम' पुरस्कार यावर्षी 'लेथ जोशी' या चित्रपटाला देण्यात आला. सन्मानचिन्ह आणि रु. पाच लाख असं या बक्षिसाचं स्वरूप आहे. दिग्दर्शक श्री. मंगेश जोशी आणि निर्माते सोनल जोशी - मंगेश जोशी यांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला.

अ. भा. चित्रपट महामंडळातर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट दिग्दर्शकासाठीचा रोख २५ हजार रुपयाचा पुरस्कार 'दशक्रिया' चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप भालचंद्र पाटील यांना मिळाला.

अ. भा. चित्रपट महामंडळातर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा रोख २५ हजार रुपयाचा पुरस्कार 'दशक्रिया' या चित्रपटातील भूमिकेबद्दल आर्य आढाव यांना जाहीर करण्यात आला. 'पिफ'मध्ये हा पुरस्कार मिळवणारे ते वयानं सर्वांत लहान अभिनेते आहेत. आर्य आढाव यांचं वय आठ वर्षं आहे.

अ. भा. चित्रपट महामंडळातर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा रोख २५ हजार रुपयाचा पुरस्कार 'डॉक्टर रखमाबाई' या चित्रपटातील भूमिकेबद्दल तनिष्ठा चटर्जी यांना जाहीर करण्यात आला.

अ. भा. चित्रपट महामंडळातर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट पटकथेसाठीचा रोख २५ हजार रुपयाचा पुरस्कार 'व्हेंटिलेटर' या चित्रपटासाठी राजेश मापुसकर यांना देण्यात आला.

अ. भा. चित्रपट महामंडळातर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट छायालेखनासाठीचा रोख २५ हजार रुपयाचा पुरस्कार 'लेथ जोशी' या चित्रपटासाठी सत्यजीत शोभा श्रीराम यांना जाहीर झाला.

'नदी वाहते' या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सावंत यांना दिग्दर्शनासाठी परीक्षकांचा विशेष पुरस्कार देण्यात आला.

'लेथ जोशी' या चित्रपटातल्या भूमिकेसाठी सेवा चौहान आणि 'एक ते चार बंद' या चित्रपटातल्या अभिनयासाठी पद्मनाभ भिंड यांना परीक्षकांचे विशेष पुरस्कार जाहीर झाले.

आंतरराष्ट्रीय स्पर्धाविभागाचे निकाल पुढीलप्रमाणे (कंसात परीक्षकांचं मत नोंदवलं आहे) -

१. महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा 'प्रभात' सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - 'लॉस्ट ईन म्यूनिख'

(For its re-reading of a tragic chapter of Czechoslovakian history in an effective, humorous and zany manner, the award for BEST FILM goes to the film scripted and directed by Petr Zelenka, produced by David Ondrícek - Lost in Munich)

२. महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारा 'प्रभात' सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शक पुरस्कार - किरील सेरेब्रेनिकोव्ह (द स्टुडन्ट)

('For its innovative lighting design and cinematography, brilliant mise en scene and acting, and its commentary on the growing religious intolerance across the world today, the award for BEST DIRECTION goes to the Russian film THE STUDENT, scripted and directed by Kirill Serebrennikov)

३. परीक्षकांचा विशेष पुरस्कार - 'लेडी ऑफ द लेक' (भारत)

(For its metaphoric depiction of how modern developmental projects endanger human existence, the JURY PRIZE goes to the Indian film directed by Haobam Paban Kumar, LADY OF THE LAKE)

४. परीक्षकांचा विशेष पुरस्कार - 'झूलॉजी' (रशिया)

(For its incisive presentation of superstition and cruelty directed by society towards anyone perceived as abnormal, the JURY PRIZE goes to the Russian film directed by Ivan I. Tverdovsky, ZOOLOGY)

५. परीक्षकांचा विशेष पुरस्कार - 'लेझ'इनाँसाँ' या फ्रेंच / पोलिश चित्रपटातील भूमिकेसाठी अ‍ॅगता ब्यूझेक

(For her convincing and charismatic interpretation of Maria in the French / Polish film The Innocents, AGATA BUZEK receives special mention for Best Actor.)

६. परीक्षकांचा विशेष पुरस्कार - 'लॅण्ड ऑफ द एनलायटण्ड' या चित्रपटातल्या छायालेखनासाठी पीटर-जां द प्यू

(For its spectacular and evocative visuals where the camera finds a distinctive style of operation in The Land of the Enlightened, the director and cinematographer of the film PIETER-JAN DE PUE, receives special mention for BEST CINEMATOGRAPHY.)

***
यंदा दरवर्षीपेक्षा प्रेक्षकांची नोंदणी कमी झाली. इफ्फी, केरळ महोत्सव, कोलकाता महोत्सव यांनाही या वर्षी असा अनुभव आल्यानं पुढच्या वर्षी प्रेक्षकांचा अधिक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा करूया.

यंदा उद्घाटनाचा सोहळा फारसा रंगतदार झाला नव्हता. अपर्णा सेन, सीमा देव, उ. झाकीर हुसेन असे दिग्गज मंचावर असूनही टाळ्यांचा कडकडाट झाला नाही. समारोपाचा समारंभ मात्र तरुण प्रेक्षकांच्या उपस्थितीमुळे कमालीचा बहारदार झाला. प्रत्येक निकाल जाहीर झाल्यावर प्रेक्षकांनी अत्यंत उत्साहात विजेत्यांचं कौतुक केलं. अर्थात सालाबादप्रमाणे याही वर्षी सर्वाधिक टाळ्या, शिट्ट्या यांचा गजर समर नखाते मंचावर सत्कार स्वीकारायला गेले, तेव्हा झाला. महोत्सवातले सातही दिवस नखातेसर प्रेक्षकांच्या गराड्यात असतात. सतत तरुण प्रेक्षकांशी, विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतात. संपूर्ण भारतभर त्यांचे विद्यार्थी आहेत. आज त्यांचं नाव पुकारल्याक्षणी सार्‍या प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे उभं राहून त्यांना मानवंदना दिली, ही त्यांच्या फार मोठ्या कामाची पावती आहे. नखातेसर केवळ महोत्सवातल्या चित्रपटांची निवडच करत नाहीत, तर संपूर्ण चित्रपटभर ते अनेकांशी चित्रपटांबद्दल सतत संवाद साधत असतात. आज नखातेसरांमुळे चित्रपटांकडे डोळसपणे बघणारे देशभर अनेक आहेत.

चित्रपट-साक्षरता वाढीस लागावी यासाठी नखातेसर आणि 'पिफ'चे आयोजक धडपडत असतात. कमालीची आर्थिक चणचण असूनही महोत्सव दणक्यात साजरा होतो. प्रत्येक महोत्सवात काही अडथळे येतातच. यंदा सिटिप्राईड (सातारा रस्ता) इथे एक खेळ रद्द झाला. चित्रपटाचे वेगवेगळे, नवनवे फॉर्मॅट महोत्सवाच्या आयोजकांकडे येत असल्यानं ऐनवेळी अडचणी येणं साहजिक आहे. बहुसंख्य महोत्सवांमध्ये हे घडतं. वर्तमानपत्रांत या अडचणींची बातमी आल्यावर समाजमाध्यमांतून कुत्सित शेरेबाजी होणं, हे म्हणूनच क्लेशकारक आहे. 'पिफ'च्या वातावरणाचा अजिबात अनुभव न घेता, आयोजकांच्या अडचणी (आर्थिक व इतर) लक्षात न घेता (न घडलेल्या घटनांवर) टीका होणं योग्य नाही.

'पिफ'च्या एकंदर व्यवस्थापनात काही सुधारणा मात्र जरूर व्हायला हव्यात.

उद्घाटन आणि समारोप यांचे सोहळे अधिक नेटके असावेत. मंचावर डॉ. जब्बार पटेलांनी निवेदकांना सूचना देणं, निवेदकानं मान्यवरांची नावं चुकवणं, सत्कारमूर्ती मंचावर आले तरी त्यांचं बक्षीस अजून विंगेतच असणं हे प्रकार दरवर्षी न चुकता घडत असतात. ते यापुढे कमी होतील, अशी अपेक्षा आहे.

हे सोहळे वेळेवर सुरू व्हावेत. यंदा उद्घाटनाचा चित्रपट वेळेआधी सुरू करण्यात आला. असं यापुढे होऊ नये.

कार्यक्रम मोकळाढाकळा असला तरी तो शिस्तबद्ध असावा. जगभरातून येणार्‍या पाहुण्यांसमोर ढिसाळ वर्तणूक शोभत नाही.

यंदा चित्रपटांच्या खेळांची संख्या कमी करण्यात आली. ती पुढच्या वर्षी वाढेल, अशी अपेक्षा करूया.

सर्वांत महत्त्वाचं म्हणजे राज्य शासनानं आणि पुणे महानगरपालिकेनं महोत्सवासाठीचा निधी वाढवायला हवा. इफ्फी, मामि, केरळ, चेन्नई, कोलकाता इथल्या महोत्सवांचं बजेट 'पिफ'च्या बजेटापेक्षा कितीतरी जास्त असतं. 'पिफ' हा महाराष्ट्र शासनाचा अधिकृत चित्रपटमहोत्सव आहे. त्याला शासनानं उचित महत्त्व द्यायला हवं.

पुढचा 'पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' ११ ते १८ जानेवारी, २०१८ या काळात आयोजित होणार आहे.

महोत्सवातले पुरस्कारप्राप्त आणि इतर अनेक दर्जेदार चित्रपट मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि सोलापूर या शहरांमधल्या 'पिफ'च्या सॅटेलाईट महोत्सवांमध्ये पाहायला मिळतील. या शहरांमधल्या प्रेक्षकांनी आवर्जून या महोत्सवांना हजेरी लावावी.

वर्षभर या महोत्सवाची वाट पाहणारे अनेक आहेत. केवळ महोत्सवादरम्यान भेटून वर्षभर न भेटणारे असंख्य प्रेक्षक दरवर्षी ओळखी जपतात, रोज चार-पाच चित्रपट बघून ताजेतवाने होतात.

थेटरातला अंधार, पडद्यावरची हलती चित्रं आणि आवाज कितीजणांना ऊर्जा देतात, कोणास ठाऊक! म्हणून 'पिफ'सारखे महोत्सव कायम नांदते राहणं अत्यावश्यक आहे.

पुढची भेट ११ जानेवारी, २०१८ रोजी. कोथरुडातल्या सिटिप्राइडात.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहीतीसाठी धन्यवाद चिनुक्स .
नी परत एकदा अभिनंदन पुरस्कारासाठी
<< महोत्सवातले पुरस्कारप्राप्त आणि इतर अनेक दर्जेदार चित्रपट मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि सोलापूर या शहरांमधल्या 'पिफ'च्या सॅटेलाईट महोत्सवांमध्ये पाहायला मिळतील. >>> हे कधी आणि कुठे पाहायला मिळेल ?

पुण्याबाहेरच्या महोत्सवाच्या तारखा पुढीलप्रमाणे -

१. मुंबई - यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - २० जानेवारी ते २६ जानेवारी, २०१७

२. नागपूर - ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - २७ जानेवारी ते २९ जानेवारी, २०१७

३. औरंगाबाद - ३ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारी, २०१७

४. सोलापूर - १० फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी, २०१७

'नदी वाहते' या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप सावंत यांना दिग्दर्शनासाठी परीक्षकांचा विशेष पुरस्कार देण्यात आला. >> म्हणजे श्रीयुत नीधप ना ? अभिनंदन .

नीधप व संदीप सावंत यांचे अभिनंदन. हा चित्रपट जनतेसाठी केव्हा रिलिज होणार आहे. हिंदी मधे पण आहे का?

आज बघितला हा बाफ. धन्यवाद सर्वांचे.

मंदार, रिलीजची तारीख ठरली की अनाऊन्स करेनच येथे. आणि हिंदीमधे नाहीये हा चित्रपट. इंग्रजी सबटायटल्स आहेत.