आपण काय करता ? जरा मराठीत सांगाल ?

Submitted by कुमार१ on 16 January, 2017 - 21:33

आपल्या देशात सार्वजनिक ठिकाणी वावरताना आपला अनेकांशी सबंध येतो. त्यापैकी काहीजण मराठी भाषिक असतात. बोलण्यासाठी समभाषिक माणूस मिळाल्यास आपल्याला आनंद होतो व त्याच्याशी गप्पा मारण्यासाठी आपल्याला हुरूप येतो. एखाद्याची नव्याने ओळख झाल्यास आपण प्रथम त्याचे नाव व गाव विचारतो. त्यानंतरचा स्वाभाविक प्रश्न असतो, ‘’आपण काय करता?’’ त्यातून आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या नोकरी अथवा व्यवसायासंबंधी जाणून घ्यायचे असते. माझा अनुभव असा आहे की वरील प्रश्नाचे उत्तर हे बहुतांश वेळा सरळ मराठीतून मिळत नाही. आपले नोकरीतील पद अथवा स्वतःच्या व्यवसायाचे स्वरूप सांगताना माणसे हटकून इंग्लीशचा भरपूर वापर करतात. ’आपण काय करता?’ या प्रश्नाचे उत्तर खूप कमी वेळा पूर्णपणे मराठीतून मिळते ही वस्तुस्थिती आहे.

हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी आता मी बरीच उदाहरणे देतो. बघा, तुम्हाला पटताहेत का. एखाद्याच्या नोकरी /व्यवसायाचे स्वरूप आणि त्याने वरील प्रश्नाला दिलेले उत्तर अशा पद्धतीने लिहीत आहे. प्रत्येक वेळेस अवतरण चिन्हाचा वापर टाळत आहे.

१. शासकीय कर्मचारी : मी इरिगेशन डीपारमेंटला अकाऊंटसमध्ये आहे.
२. शासकीय अधिकारी: मी पी डबल्यू डी मध्ये चीफ सुपरवायझर आहे.

३. नोकरदार अभियंता : मी ‘अबक’ऑटो मध्ये वर्क्स मॅनेजर आहे.( एकूणच आपल्या देशातील बहुतेक अभियांत्रिकी उद्योगांची नावे ही इंग्लिश वा युरोपीय भाषेत असतात हा एक वेगळा मुद्दा).
४. व्यावसायिक अभियंता: माझे एम आय डी सी मध्ये एस एस आय युनिट आहे.
५. वैद्यक व्यावसायिक : माझे क्लिनिक / हॉस्पिटल /डिस्पेनसरी आहे.

६. वकील: मी सेशन्स कोर्टात अडव्होकेट आहे.
७. लष्करी सेवा: मी आर्मीत / नेव्हीत /एअर फोर्स मध्ये आहे.

८. अत्यावश्यक सेवा : मी फायर ब्रिगेडमध्ये आहे.
९. जाहिरात व्यावसायिक: आमची अ‍ॅड एजन्सी आहे.( हे तर १००% वेळा ).

...वरील यादी हवी तेवढी वाढवता येईल. पण आता पुरे. सांगायचा मुद्दा काय तर वरील आणि इतर काही नोकरी/ व्यवसायाचे स्वरूप प्रयत्न केल्यास नक्की मराठीत सांगता येईल. पण,तसे न करता ते जास्तीत जास्त इंग्लिशमध्ये सांगणे हा सवयीचा अन प्रतिष्ठेचा भाग झाला आहे.
आता प्रत्यक्ष नोकरी वा व्यवसाय नसलेल्या काही क्षेत्रान्ची उदाहरणे देतो :
१. शहरी गृहिणी : मी हाउसवाईफ / होममेकर आहे.
२. लोकप्रतिनिधी : मी वार्ड नंबर ३५ चा कॉर्पोरेटर आहे.
३. समाजसेवक : मी सोशल वर्क करतो/करते, मी एका एन जी ओ साठी काम करतो/ करते.
आता वरील उदाहरणांमध्ये तर इंग्लिशचा आधार घ्यायची काहीही गरज नव्हती, हे कबूल? पण नाही, तो घेतल्याशिवाय आपल्या पदाला / कामाला भारदस्तपणा येत नाही !

‘’आपण काय करता?’’ या प्रश्नाला मराठीत उत्तर देणारे काही मोजके(च) अपवाद आहेत. बघूयात अशी उदाहरणे :
१. शेतकरी: मी शेती करतो.
२. मोलकरीण: मी धुण्या-भांड्याची कामे करते.
३. घरगडी : मी शेटजींच्या बंगल्यावर कामाला आहे.
४. मराठी शाळेतील ‘मराठी’ चा शिक्षक: मी मराठी भाषा शिकवतो.
५. पुरोहित : मी भटजी आहे, मी पौरोहित्य करतो. या बाबतीत मात्र मराठीतच सांगायला प्रतिष्ठा आहे !!

यावरून लक्षात येईल की आपल्याला भेटणाऱ्या मराठी माणसांपैकी जास्त जण हे त्यांच्या उद्योगाची माहिती ही इंग्लिशमध्येच देतात. माझ्या मते याची काही कारणे ही अशी आहेत:

१. इंग्रजांनी आपल्यावर १५० वर्षे राज्य केले आणि त्यांनी येथे आधुनिक प्रशासन आणले.
२. ते आपल्यावर राज्य करू लागल्यापासून ते आजतागायत आपली पराभूत मनोवृत्ती कायम आहे. त्यामुळे आपली माहिती वगैरे इंग्लिशमधून सांगण्यात आपल्याला एक प्रकारची प्रतिष्ठा वाटते. अगदी आपल्या नाव-आडनाव इ. ची आद्याक्षरे ही इंग्लिशमधूनच रूढ केली जातात.

३. सरकारी नोकरीत मराठीतून कारभार, पदांचे मराठीकरण असे अनेक प्रयत्न झालेले आहेत पण,ते ‘शासकीय मराठी’ खरेच क्लिष्ट असल्याने जनसामान्यांमध्ये रूळले नाही.
४. त्यामुळे, सर्वसामान्य लोकांना आपण काय करतो हे इंग्लिशमध्ये सांगितले तर पटकन कळते. जर एखाद्याने दुसऱ्याला ‘’मी कनिष्ठ लिपिक आहे’’ असे सांगितले तर ऐकणारा त्याच्याकडे बधिरपणे बघेल किंवा, आधी सांगणाऱ्यालाच आपण टिंगलीचा विषय होऊ असे वाटेल.

मित्रांनो, इंग्लिशवर टीका करणे हा या लेखाचा हेतू नाही. आपल्या आयुष्यातले एक वास्तव मला जाणवले ते मी तुमच्यापुढे मांडले इतकेच. जरा विचार करून बघा. आपण आपली भाषिक संस्कृती जपण्यासाठी कितीतरी गोष्टी करत असतो. मराठी लेखन-वाचन, नाटक-चित्रपट, वादविवाद, परिसंवाद, व्याख्यानमाला, चर्चासत्रे, संकेतस्थळावरील वावर अशा कितीतरी माध्यमांतून आपण आपली मायबोली जपत असतो आणि त्याचा आनंदही घेत असतो. पण, आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट, म्हणजेच आपला पोटापाण्याचा उद्योग, हा मात्र आपल्या बहुतेकांच्या बाबतीत कुठल्या ना कुठल्या प्रकारे इंग्लिशशी निगडीत आहे वा त्या भाषेवर अवलंबून आहे. हे एक कटू सत्य असून ते आपण स्वीकारलेले आहे,हे खरे. अर्थात आपण कार्यालयीन काम जरी इन्ग्लिश्मध्ये करत असलो तरी त्या कमाचे स्वरूप दुसर्‍याला २ वाक्यात मराठीत सांगायला अडचण नसावी.

या पार्श्वभूमीवर मला ‘मायबोली’वरील बऱ्याच सदस्यांचे कौतुक करावे वाटते. अशांनी आपल्या सदस्यत्वाच्या माहितीत आपल्या कामधंद्याची माहिती जाणीवपूर्वक व प्रयत्नपूर्वक मराठीत दिली आहे ( उदा. ‘निर्वात तंत्रज्ञान उद्योजक’,’सनदी लेखापाल’ इ.)

तसेच हे संकेतस्थळ तयार करतानाही जास्तीत जास्त मराठीचा वापर केलेला आहे आणि त्यासाठी प्रशासकांनी खूप कष्ट घेतलेले आहेत, हेही अभिनंदनीय आहे. त्यामुळे, मराठी संस्थळ चालवणे हा जर एक ‘उद्योग’ मानला तर त्याची माहिती दुसऱ्याला नक्कीच मराठीत सांगता येईल !

वरील विवेचन हे भारतात असताना दोन मराठी माणसे एकमेकांशी बोलत आहेत या संदर्भात केलेले आहे. आता इथे ‘मराठी’च्या जागी इतर कुठलीही प्रादेशिक मातृभाषा घातली तरी हे विवेचन तिथेही लागू पडेल असे वाटते.

असो. यानिमित्ताने बरीच वर्षे मनात खदखदत असलेला विषय तुमच्यापुढे मांडला आहे. तुमच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास उत्सुक.
******************************************************

Group content visibility: 
Public - accessible to all site users

{ते आपल्यावर राज्य करू लागल्यापासून ते आजतागायत आपली पराभूत मनोवृत्ती कायम आहे.}

हे उगाच आहे.
हे सगळे व्यवसाय इंग्रजी अमदानीनंतरच आलेत. हे सोपे कारण आहे. मूळ शब्दही इंग्रजी आहेत आणि त्यांच्यावरून 'तयार केले गेलेले' मराठी शब्द तितकेसे वापरसुलभ (!) नाहीत हे एक कारण.

घरगडी, मोलकरीण, इ. वाचताना मला ड्रायव्हर आठवला.

अ‍ॅडव्होकेटला मराठीत अभिवक्ता म्हणतात का?

भाषा संवादासाठी आहे. त्यामुळे तो साधला जाणे पुरेसे. आता उगाच ओढूनताणून मराठी (तेही घडवलेले शब्द ) वापरल्याने संवाद होत नसेल, तर त्याला काय अर्थ आहे?

अचूक निरीक्षण..... अन हे असच होत गेलय, आम्हीच घडवत नेतोय.
कारण स्वभाषेचा अभिमानही नाही अन "गंधही" नाही..... !
तुम्हाला "मेसेज" पोहोचला ना? मग बाकी बयादी कशाला? ही वृत्ती.
गेल्या पंचवीस वर्षातील "इंग्रजी मिडीयमची भुरळ" व त्यामुळे मातृभाषेबाबत अज्ञान्/अडाणीपणा..
इतरांपेंक्षा वेगळेपण दाखविण्यासाठी परकी शब्द वापरण्याचा सोस....

अशी असंख्य कारणे देता येतिल

आमच्या लहानपणी घरात बोलताना जर विनाकारण इंग्रजी शब्द वापरले तर वडीलांकडून कानफटात बसायची. मराठी बोलताना अन्य शब्द नकोत. मराठित शब्दच नसेल, तर अन तरच चालु शकेल, अन्यथा शुद्ध मराठीच बोलले पाहिजे.
अन जेव्हा इंग्रजी बोलायचे, तर तेव्हाही त्यात मराठी/हिंदी/यु नो युनो वगैरे घुसडायचे नाही... असा खाक्या होता.
तो इतिहासजमा झाला.....
आता नुस्ते "भापो" शी मतलब.

>>> घरगडी, मोलकरीण, इ. वाचताना मला ड्रायव्हर आठवला. <<<<
इथेही आम्ही आमचे इंग्रजीचे अडाणीपणच दाखवतो.....

रेफर.... स्क्रु ड्रायवर..... मग पूर्णपणे "व्हेइकल ड्रायव्हर" असे म्हणतो का? का नाही म्हणत? वापरसुलभ नाहि म्हणूनच ना? मग सरळ वाहनचालक म्हणायला काय धाड भरते? Wink

मी काय काम करते ते कुठल्याच भाषेत सांग्ता येत नाही. तशी परवानगीच नाही. विनोद करून वेळ मारून नेते. खरे कामाचे स्वरूप सांगितले तर ऐकणारा विश्वास ठेवत नाही. पण तुमचा जो मुद्दा आहे, ती पदे इंग्रजीतूनच निर्माण झालीत ना. लेखा पाल म्हणजे नक्की कोण असा पर्श्न पडू शकतो.

भाषा फक्त संवाद साधायला असते. भावना पोहोचवायला असते. आपण उगाच त्यात अस्मिता जोडत ईश्यू करतो.
कुठल्याही भाषेत व्यवसाय सांगा, समोरच्याला तो समजल्यावर त्या व्यवसायाला त्याच्या लेखी जी किंमत असते तितकीच तो देतो.
कोई काम छोटा या बडा नही होता. हे आपल उगाच असते.
आणि मराठी तर प्रादेशिक भाषा आहे. हिंदीभाषिकांएवढ्या लोकांना ती समजतही नाही. आपले आयुष्य महाराष्ट्रातच गेले तर आपण ही मराठीत बोलायची चैन करू शकतो. बाहेर काय करणार.

>>> आणि मराठी तर प्रादेशिक भाषा आहे. हिंदीभाषिकांएवढ्या लोकांना ती समजतही नाही. आपले आयुष्य महाराष्ट्रातच गेले तर आपण ही मराठीत बोलायची चैन करू शकतो. बाहेर काय करणार. <<<
ठीक आहे, उद्या काय, आजपासुनच गर्लफ्रेन्डबरोबर बोलताना "कोबोल्/डॉस्/एसक्युएल भाषेत इफ/एल्स्/एन्डीफ, डू व्हाईल टी," अशा टर्ममधे अशा भाषेत बोलू लाग
म्हणजे कस? की
डू व्हाईल ट्रू.......
>> इफ यु अराईव्हड अ‍ॅट डोम्बिवली स्टेशन अ‍ॅट शार्प ८ पीएम,
>>>> देन वुई विल मीट
>>>>>> इफ यु लेट बाय टेन मिनिट्स, आय विल स्टील वेट फॉर यु
>>>>>>>> इफ यु लेट बाय >१० मिनिट्स, आय विल नॉट बी देअर
>>>>>>>> एन्डीफ
>>>>> एन्डीफ
>> एन्डीफ

एन्डू..... Proud

मानव यांचेकडून आलेल्या सुचनेप्रमाणे हे जरा दुरुस्त करुन लिहायचा प्रयत्न करतो
डू व्हाईल ट्रू....... (गल्रफ्रेंड) यु आर कॉल्ड अ‍ॅट ८ पीएम अ‍ॅट डोंबिवली स्टेशन
>> इफ यु लेट बाय >१० मिनिट्स, आय विल नॉट बी देअर
>>>> इफ यु लेट ओन्ली बाय टेन मिनिट्स, आय विल स्टील वेट फॉर यु
>>>>>> इफ यु अराईव्हड अ‍ॅट डोम्बिवली स्टेशन अ‍ॅट शार्प ८ पीएम, देन वुई विल मीट
>>>>>>>> इफ यु अराईव्हड अ‍ॅट डोम्बिवली स्टेशन बिफोर ३० मिनिट्स, आय वुड बी देअर लुकिंग अदर्स... Proud
>>>>>>>> एन्डीफ
>>>>> एन्डीफ
>> एन्डीफ
>एन्डिफ

एन्डू..... Proud

>>>> आपले आयुष्य महाराष्ट्रातच गेले तर आपण ही मराठीत बोलायची चैन करू शकतो. बाहेर काय करणार. <<<<<
बाहेरचे सोड, इतकेच आहे, तर "इथे माबोवर तरी काय करतो आहेस?" फुकाची चैन? इतर ठिकाणी विन्ग्रजी/फ्रेन्च्/जर्मन/हिंदी/तामिळ/गुजराथी सोशल नेटवर्क्स नाहीच्चेत का? आपले इथ्थेच धागे काढतोस ते? Wink

माझ्या मते मातृभाषेचा त्याग म्हणजे स्वधर्माचा/स्वराष्ट्राचा/स्वसंस्कृतीचा त्याग होय, अन तो "देशद्रोहासमानच" आहे असे माझी आई मला सांगायची, जे मला मान्य आहे . Happy

इफ लूप व्यवसथित मांडा लिंबु,

इफ यु अराईव्हड अ‍ॅट डोम्बिवली स्टेशन अ‍ॅट शार्प ८ पीएम

जर मी शार्प ८ पीएम ला पोचलो नाही (आधी किंवा उशिरा पोचलो) तर मी लूपच्या सरळ बाहेर. 'इफ लेट बाय < / > १० मिनिट्स' हे लूप्स बायपास होतात. मी शार्प ८ पीएमला पोचलो तर 'इफ लेट बाय' हे लूप्स लागु होत नाही. थोडक्यात 'इफ लेट बाय' हे लूप्स वाया जातात.

तिन्ही इफ आणि एण्डीफ स्वतंत्र लिहा.

इतर ठिकाणी विन्ग्रजी/फ्रेन्च्/जर्मन/हिंदी/तामिळ/गुजराथी सोशल नेटवर्क्स नाहीच्चेत का? >>> लिंबु, `सोशल नेटवर्क्स'ला मराठी शब्द वापरा की. उगाच देशद्रोहाचे पातक येऊन बसायचे माथ्यावर.

>>> लिंबु, `सोशल नेटवर्क्स'ला मराठी शब्द वापरा की. उगाच देशद्रोहाचे पातक येऊन बसायचे माथ्यावर. <<<<
मी वापरीनहो, पण मातृभाषेबाबत "अडाणी" राहिलेल्यांना ते कसे समजावे?
तर म्हणतो मी.... "आंतरजालावरील समुहमेळे"नाहिच्चेत का? Proud

समुहमेळे ऐवजी समुहपोळे पण चालु शकेल, नै? Wink (पोळे = मधमाशांचे पोळे या अर्थाने)

>>> इफ लूप व्यवसथित मांडा लिंबु, <<<
येस्स, तुमचे अगदी बरोबर आहे.
इफचा (जर-तरचा) सिक्वेन्स (क्रम) चुकलाय, बरेच वर्षात म्हणजे १० वर्षे होतिल शेवटचा प्रोग्रॅम (आदेशक्रम) केल्याला.
त्यामुळे चुक झाली..... लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद... Happy

लिंबू , सहमत आहे.
वापरसुलभ नाहि म्हणूनच ना? मग सरळ वाहनचालक म्हणायला काय धाड भरते? >> एकदम बरोबर. धेडगुजरीपणापेक्षा सर्व मराठी केव्हाही चांगले.

मी वापरीनहो, पण मातृभाषेबाबत "अडाणी" राहिलेल्यांना ते कसे समजावे? >> अच्छा अच्छा. म्हणजे लोकांना समजावे म्हणून परभाषेतले शब्द वापरले तर चालते तर. Wink

>>> अच्छा अच्छा. म्हणजे लोकांना समजावे म्हणून परभाषेतले शब्द वापरले तर चालते तर. Wink <<<<
नुसते परभाषेतले शब्दच नव्हे, तर वेळेस हेकटांकरता शब्दाविनाची फटक्यांची भाषाही वापरली तरी चालते, बर्का.... Proud Lol

भाषा फक्त संवाद साधायला असते. भावना पोहोचवायला असते. आपण उगाच त्यात अस्मिता जोडत ईश्यू करतो.
कुठल्याही भाषेत व्यवसाय सांगा, समोरच्याला तो समजल्यावर त्या व्यवसायाला त्याच्या लेखी जी किंमत असते तितकीच तो देतो.
कोई काम छोटा या बडा नही होता. हे आपल उगाच असते.
आणि मराठी तर प्रादेशिक भाषा आहे. हिंदीभाषिकांएवढ्या लोकांना ती समजतही नाही. आपले आयुष्य महाराष्ट्रातच गेले तर आपण ही मराठीत बोलायची चैन करू शकतो. बाहेर काय करणार.>>>>>> ऋ, +१

पण हे इथे लिहुन काही उपेग नाही. भाषारक्षक लग्गेच तुमची भाषा कशी चुकीची आहे हे प्रमाण मराठीचं प्रमाण देउन सांगितील. आता प्रमाण मराठीच बरोबर आहे आणि तसं न बोलल्यास चुकीची भाषा हा नियम पण ह्यांचा ह्यांनीच बनवला.

नुसते परभाषेतले शब्दच नव्हे, तर वेळेस हेकटांकरता शब्दाविनाची फटक्यांची भाषाही वापरली तरी चालते, बर्का.... Proud Lol >> मुद्दे नसले की तुम्ही गुद्द्यावरच येणार. त्यात नवल ते काय? Proud

लेख अजिबात पटला नाही...
भाषे मध्ये जसे व्यकरण, शब्द तसे लिपी ला अनन्यसाधारण महत्व आहे.. लिपी भाषेचा प्राण आहे.
तमीळ ची तमीळ, तेलुगु , कन्नड , बंगाली यान त्यांची लिपी आहे ... तशी माय मराठी ची कोणती हो ?
आठवत नाही...ह्म्म.... "मोडी" लिपी.. बरोबर ना..

१२ शतका पासुन ते जवळ जवळ १९५० पर्यंत "मोडी" ही आपली, आपल्या मातीची लिपी...
कोणीतरी व्यवहार सोयीचे व्हावे.. म्ह्णुन बदलुन टाकत..इतक्या सहज....
आणि आपण ती सहज स्वीकारतो.... अहो मग काही शब्द स्वीकारलेत तर काय झाल ?

आणि काय तर म्हणे स्वभाषेचा अभिमानही नाही अन "गंधही" नाही...!!

भरत, लॉजिकल पोस्ट.

भाषा संवादासाठी आहे. त्यामुळे तो साधला जाणे पुरेसे. आता उगाच ओढूनताणून मराठी (तेही घडवलेले शब्द ) वापरल्याने संवाद होत नसेल, तर त्याला काय अर्थ आहे? >>> अगदी सहमत आहे.

सिंहगडरोड धाग्यावरील माझी प्रतिक्रिया.... इथे विषयास धरुन असल्याने देत आहे.
****************
>>>> त्या पेक्षा इतरत्र कसे तर्रीदार मिसळ असते... >>>> Uhoh
अरे मिसळ कसली?
धेडगुजरी इंग्रजी अन इतर भाषांच्या भेसळीचे निरर्गल निलाजरे समर्थन असते..... !
अन ते देखिल "मराठीकरता" वाहिलेल्या देवनागरीमध्ये लिहायची सोय असलेल्या आंतरजालावरील मायबोलीवर

रस्त्यांवरील पाट्यांचे मराठी भाषांतर करणारे चांगले नेमावेत.
Tunnel Ahead चे मराठीत भाषांतर काय?
"बोगदा पुढे आहे".

आता "बोगदा पुढे आहे" हे सावध करणारे वाक्य अजिबात वाटत नाही.
मला तरी यातून दोन असे अर्थ जाणवतात:
१. "अरे आत्ताच काय गाडी हळु केलीस? बोगदा इथे नाहीय. बोगदा पुढे आहे!"
२. मी बोगदा शोधत चाललोय, कुठे आहे बोगदा, च्यायला केव्हाचा शोधतोय कुठे आहे बरं? मग ती पाटी दिसते, ओह! "बोगदा पुढे आहे" होय!.
अशीच बरीच उदाहरणे, मराठी / हिंदी पाट्यांमध्ये सापडतील.
तेव्हा शब्दश: भाषांतर करण्याचा प्रयत्न करु नये.

तर सिग्नलला मराठीत काय प्रतिश्ब्द असेल यावर कुणीतरी उगाच असेच काहीतरी सटरफटर लिहिले आहे. ज्या व्यक्तीने ते लिहिले आहे तिला सिग्नल म्हणजे रेल्वेत गाड्या जाण्या येण्यासाठी वापरणारा सिग्नल एवढाच अर्थ ठाउक असावा. म्हणुन ती लिहिते की सिग्नलचे भाषांतर होईल "अग्नीरथ गमनागमन दर्शक सूचक लोह ताम्र पट्टीका" कदाचीत त्याकाळात रस्त्यात सिग्नल नसावेत? तर हे एक दुसरे टोक आहे. कदाचित हे लिहिणार्‍या व्यक्तीचा उद्देश वेगळा काही असेल, पण हे उदाहरण बरेच जण, मराठीकरण अशक्य आहे अशा अर्थाने वापरतात.
याला मराठी पर्यायी शब्द काय यावर कधी विचार केला नाही, कदाचित ट्राफिक सिग्नल ला 'वाहतुक दर्शक' म्हणता येईल? किंवा यापेक्षा उचीत श्ब्द असतील.
असे प्रतिशब्द प्रचलीत होण्यासारखे असल्यास लोक वापरतील व प्रचलीत होतील.
काही शब्दांना योग्य प्रतिशब्द नसतात. जसे मराठीतील / भारतीय भाषेतील : निर्वाण / कर्म / गुरु / अवतार इत्यादि. इंग्रजीत तसेच वापरण्यात येतात. तसे सगळ्याच इंग्रजी शब्दांना योग्य मराठी शब्द असतील असे नाही.
जीथे योग्य प्रतिशब्द / संज्ञा आहेत तीथे त्यांचा वापर हवा, हे मान्य.

आणि मराठी तर प्रादेशिक भाषा आहे. हिंदीभाषिकांएवढ्या लोकांना ती समजतही नाही. आपले आयुष्य महाराष्ट्रातच गेले तर आपण ही मराठीत बोलायची चैन करू शकतो. बाहेर काय करणार.>>>>>>

दोन मराठी माणसे एक्मेकाशी बोलत आहेत ह्या संदर्भावरच लेख लिहीला आहे, हे विसरू नये ही विनंती.

>>> आता प्रमाण मराठीच बरोबर आहे आणि तसं न बोलल्यास चुकीची भाषा हा नियम पण ह्यांचा ह्यांनीच बनवला. <<<<<
होय हो होय... "ह्यांनीच" म्हणजे कुणी ती खदखद जरा स्पष्ट शब्दात सांगितली तर काय आभाळ कोसळणार नाही.....
अन इथे मायबोलीवर "देवनागरीतच" लिहायचे हा नियम देखिल त्या ह्यांनीच ... म्हणजे आपल्या वेबमास्तरांनी" बनविला आहे हो.... Proud अन आम्ही तो इमानेइतबारे पाळतो.
मला दहाबारा वर्षांपूर्वीची मायबोली आठवली .. \देव टॅग देऊन लिहावे लागायचे.
अन तेव्हा आम्ही रोमन मध्ये लिहिणार म्हणून हेकटपणा करणारे अनेक वरिल सारखेच वाद घालत बसायचे.
मग त्यांच्या लक्षात आले, की रोमनमध्ये लिहिले,तर इथे "इग्नोर" होते, दुर्लक्षिले जाते, मग आले "लायनीवर" (सरळ वठणीवर) Proud

>>> दोन मराठी माणसे एक्मेकाशी बोलत आहेत ह्या संदर्भावरच लेख लिहीला आहे, हे विसरू नये ही विनंती. >>>>> Lol
अहो मराठीला वाहिलेल्या मराठी माणसाने अतिशय कष्टाने प्रयत्नपूर्वक सुरु केलेल्या या आंतरजालावरील मायबोली नामक ठिकाणी देखिल आपले "धेडगुजरी निलाजरे विंग्रजी/परकीयभाषेचे प्रेम (व पर्यायाने स्वभाषेचे/मातृभाषेबाबतचे अडाणीपण)" उतू घालविण्याची/व्यक्त करण्याची संधी जे सोडत नाहीत, त्यांना या विसरू नका वगैरे सूचनेचा काय उपयोग?

याच बरोबर डोक्यात जाणारा प्रकार म्हणजे माझी मम्मी, पप्पा, माझा माझी कझिन, माझे अंकल,
अरे निदान मराठी मध्ये बोलताना तरी आई बाबा म्हणा कि
बाकी भाषेत बोलत असाल तर काय सक्ती नाहीये आई च म्हणायची

मित्रहो, आपल्या समाजातील 'एकंदरीत इंग्लिशचे प्रस्थ' हा माझ्या लेखाचा विषय नाही.

आपण काय ''कामधंदा'' करतो ते आपण २ वाक्यात जास्तीत जास्त मराठीत सांगायला काय हरकत आहे एवढ्याच मुद्द्यावर मी लिहीले आहे.
काही व्यवसायांबाबत सांगताना इंग्लिश शब्द वापरावे लागतील, हे मान्य आहे. पण, काही अगदी पूर्ण मराठीतच सांगता येतात. तिथेसुद्धा काही जणांना मराठीत सांगायची लाज वाटते, असे माझे निरिक्षण आहे.

अरे निदान मराठी मध्ये बोलताना तरी आई बाबा म्हणा कि>>>> अहो पण आमची मुलं मराठीतच मम्मी पप्पा म्हणतात. आई - बाबा म्हणजे आजी आजोबा आहेत आमच्याकडे. मम्मी पप्पा इंग्लिश आणि आई बाबा मराठी असं काही नाहीये.

आपण काय ''कामधंदा'' करतो ते समोरच्याला काही वेळा मराठीतुन सांगुन कळत नाही आणि एंग्लिशमधे सांगितल्यावर नीटच कळत. ईझीली.

Pages