विकतची भावंडं

Submitted by Arnika on 13 January, 2017 - 06:36

कॉलेजला जाताना त्या चौघीजणी रस्त्यात भेटल्या. अभ्यासाचं वर्ष सुरू होऊन चार महिने झाले तरी त्यांच्याशी तोंडदेखलं हसून पुढे जाण्याइतकीच ओळख होती. त्या बाकी मुला-मुलींमधे फार मिसळायच्या नाहीत. तासालाही एकमेकींच्याच शेजारी बसायच्या. इंग्लिशचा एखादा शब्द समजला नाही तर त्याबद्दल मॅंडरिन मधे आपापसात चिवचिवाट करायच्या. चौघींची नावंही थोड्याफार फरकाने मला सारखीच वाटायची. निंग्निंग, लिन-शाओ, निंग्जुन, ज्युन-पू वगैरे वगैरे... त्यादिवशी विशेष खुशीत असाव्यात; मला स्वत:हून ओळख दाखवून हसल्या. मी रेंगाळले म्हंटल्यावर चक्क स्वतःहून बोलायला लागल्या!

अभ्यास झालाय का वगैरे वायफळ गप्पा झाल्या आणि जिचं नाव मला निंग्जुन वाटायचं तिने विचारलं,
“तू त्या वरच्या वर्गातल्या मिंग्यू ला ओळखतेस ना?”
चायनीज़ सोसायटीमुळे त्याही मिंग्यू ला ओळखत होत्या. मी हो म्हणायच्या आतच ज्युन-पू म्हणाली,
“अरे वा! घरचे सोडूनही बाकी मित्र-मैत्रिणी आहेत वाटतं मिंग्यू ला ?”
बाकीच्या सगळ्या छद्मी हसल्या, पण त्यात इतका दंश का होता मला कळलं नाही.
मिंग्यू तशी वेगळीच होती. पक्की चायनीज़ असली तरी सगळ्यांमधे मिसळणारी, सगळीकडच्या मुला-मुलींशी भरपूर बोलणारी, एकदा घरच्यांबद्दल बोलायला लागली की पावसासारखी कोसळणारी, आणि चायनीज़ सोसायटीतल्या घोळक्यात कधीच न दिसणारी! दुपारी एकत्र जेवताना ती नेहमी माझ्या मागे उभी असायची, त्यामुळे हळुहळू ओळख वाढली तसतशा खूप गप्पा व्हायला लागल्या. त्या मुलीत यांना नावडण्यासारखं इतकं काय असेल?
अजून महिन्यभरात या चौघींशीही गाठभेट जास्त व्हायला लागली. वर्गात एकमेकींच्या शेजारी बसायला लागलो; कधीतरी जेवायलाही एकमेकींच्या खोलीवर जायला लागलो. एक दिवस नेमकी मिंग्यू माझ्याकडे आलेली असतानाच लिन आणि ज्युनपण मला फ्राइड राइस द्यायला आल्या होत्या. एकमेकींना बघून अतिघीही अवघडल्या, आणि मिंग्यू लगेचच आम्हाला अच्छा करून निघाली. त्यादिवशी मला अगदीच राहवलं नाही. MSc संपत आलं आणि हे कसली पाचवीतली भांडणं असल्यासारखं वागणं? मी लिन ला विचारलं...

“कंटाळा येतो गं अर्निका, सारखं तिच्या बहीण-भावांबद्दल ऐकून. माझ्या भाच्या अशा आणि माझा भाऊ असा... हो कळलं आम्हाला; असतील मस्त. सतत घरच्यांबद्दल बोलणं इतकं शिष्ट वाटतं. शिवाय जरा पैशांचा गर्व.” लिन जरा वैतागून म्हणाली. “सांगणार असलीस तर सांग तिला. कोणीतरी सांगायला हवंच आहे.”
मिंग्यू ला मी काय सांगणार? मलाच गणित सुटत नव्हतं...पैशांचा गर्व? छानछोकीने रहाणाऱ्या, ब्रॅंडेड कपडे घालणाऱ्या, रोज हॉटेलात जेवणाऱ्या आणि मिनरल वॉटर आणायलाही लॅक्मेचं लिपस्टिक लावून जाणाऱ्या याच मुलींच्या कितीतरी मैत्रिणी मी रोज बघत होते. जरा चार दिवसांची सुट्टी मिळाली की भरमसाठ खर्च करून युरोपात फिरून येणारे यांचे बॉयफ्रेंडही मी बघत होते. ते सगळे नॉर्मल, निगर्वी! आणि ही साधीसुधी रहाणारी-वागणारी मुलगी घरच्यांबद्दल बोलते म्हणून पैशाचा माज करणारी?

"लिन, म्हणजे मी तर तुमच्या लेखी जगातली सगळ्यात उद्दाम आणि गर्विष्ट मुलगी असणार! बहीण-भावंडांच्या गोष्टी सांगणारी... तरी माझ्याशी बोलताच की तुम्ही." मी म्हणाले.
“तुझा काय संबंध? उद्दाम नाही, सुदैवी आहेस तू! आमच्याकडे एकच मूल असू शकतं ना... One-child policy. आम्ही सगळ्या एकेकट्या आहोत. निंग्नुओ आणि माझे आईबाबाही एकुलती एक मुलं आहेत त्यांच्या त्यांच्या आई-वडिलांची. दुसरं मूल होऊ द्यायचंच असेल तर तुम्हाला सरकारला दाखवून द्यावं लागतं की आमच्या घरची परिस्थिती उत्तम आहे; अजून एक मूल पोसण्याची आमची कुवत आहे; आमच्याकडे तितका पैसा खेळता आहे...तसं तरी, किंवा मग सरकारात असाल तर असतात बाकी अपवाद.

मिंग्यूच्या घरची परिस्थिती चांगलीच असावी त्या काळातही. तिला मोठा भाऊ आहे...भावाला दोन मुलं आहेत आता. शिवाय आत्ते-मामे भावंडांबद्दलही ऐकलंय बरेचदा. कशाला सांगायच्या सारख्या विकतच्या भावंडांच्या गोष्टी? आमची काय किंवा बाकी बऱ्याच जाणांची काय, काय परिस्थिती आहे माहित्ये ना तिला?”

माणसांनी बजबजलेल्या देशातल्या लोकांच्या नशिबात असा एकटेपणा असू शकेल ही कल्पनाही केली नव्हती! त्यांची श्रीमंती मी पैशात मोजत होते, आणि माझी श्रीमंती त्या माझ्या भावंडांमध्ये. भावंडांना किंमत, म्हणजे अक्षरश: पैशात मोजली जाणारीही किंमत असते, हे मला त्यादिवशी पहिल्यांदा जाणवलं.

त्यांचं असणं, त्यांच्याशी भाडणं, त्यांच्याबरोबर रहाणं, त्यांची कौतुकं आणि त्यांच्या तक्रारी सांगणं, एकत्र खेळलेली भातुकली, एकत्र जागवलेल्या रात्री, एकत्र न केलेला अभ्यास, आई-बाबांवर रुसल्यावर हक्काने तक्रार सांगायला त्यांच्यापाशी जाणं, गृहित धरलेलं रक्षाबंधन आणि भाऊबीज, मित्र-मैत्रिणींबरोबर फिरायचं असताना कधीतरी जबरदस्तीने यांच्याबरोबर रहायला लागणं आणि त्यामुळे होणारी धुसफूस, जरा कोणी वेणी ओढली तरी घरी येऊन एकमेकींकडेच सगळं सांगून टाकणं... हे आठवून हसायला किंवा डोळ्यात पाणी आणायला आपल्याला मुळात हक्काची भावंडं आहेत, आपल्या आई-बाबांनाही ती आहेत, हे घरचं केवढं मोठं वैभव आहे हा विचारच कधी केला नव्हता! लहानपणी घरी भांडण झालं की आम्ही एकमेकांना चिडून म्हणायचो, “नको बोलू. काही मोठं सोनं लागलं नाहीये तुला.” पण खरंच सोनं लागलेलं होतं आम्हाला सगळ्यांना!

तेव्हापासून लिन आणि तिच्या बाकी तिघी मैत्रिणी आपापसातच रहातात याचं वाईट वाटेनासं झालं. आम्ही भावंड एकत्र असलो की त्या कोंडाळ्याबाहेर काय चाललंय याची शुद्धही नसते आम्हाला. ती गोष्ट या मुलींच्या वाट्याला अशी आडवळणाने आली असेल कदाचित!

त्यादिवशी जेवताना मी घरी सगळ्यांना फोन केला. माझ्या भावंडांना केला... मग आईबाबांच्या भावंडांना...आणि नंतर आजीच्याही भावंडांना! उगाच शिळोप्याचं बोलायला...भांडण उकरून काढायला... पत्र लिही म्हणून हट्ट करून घ्यायला... हक्क गाजवायलाही... एका राखीत सगळ्यांना घट्ट एकत्र बांधून टाकावंसं वाटत होतं!
लिन ने आणून दिलेला तिखट फ़्राइड राइससुद्धा उगाच नारळीभातासारखा गोड लागत होता...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Avadala!

दर वेळी तुझा कोणताही लेख वाचताना तुझा चष्मा घालून दुनिया पाहिली पाहिजे असं वाटतं. १००% कसला तरी भलताच जादूई हसीन चष्मा आहे तुझ्याकडे Happy

खूप सुंदर

आधी वाचताना थोडं कळलं नाही, नंतर लिंक लागत गेली

मस्त लिहितेस तू.
सई, तुझ्या ह्या प्रतिसादासाठी १०० मोदक.>>>>दर वेळी तुझा कोणताही लेख वाचताना तुझा चष्मा घालून दुनिया पाहिली पाहिजे असं वाटतं. १००% कसला तरी भलताच जादूई हसीन चष्मा आहे तुझ्याकडे

भावंडांना किंमत, म्हणजे अक्षरश: पैशात मोजली जाणारीही किंमत असते, हे मला त्यादिवशी पहिल्यांदा जाणवलं.
>>>>
शहारा आला अंगावर अक्षरश:. काही गोष्टी किती गृहीत धरलेल्या असतात आपण.

Pages