(नेक्स्ट) गॉन गर्ल

Submitted by ॲमी on 12 January, 2017 - 13:51

चांगली-वाईट, सुष्ट-दुष्ट, काळ्या-पांढर्या अशा एकाच रंगातल्या व्यक्तिरेखांच्या गर्दीत अचानक कधीतरी करड्या व्यक्तिरेखा सापडतात आणि मी चौकस होते. त्या जर स्त्रिया असतील तर अपील जरा जास्तच. अॅना केरनीना, स्कार्लेट-ओ-हारा, लिजबेथ सेलँडर... यांना ननायिका म्हणतात. यांच्यात काही सद्गुण सहजपणे सापडतात म्हणून त्या नायिका. पण तेवढेच दुर्गुणदेखील असतात त्यामुळे ननायिका. अँटीहिरोइन.

पण कधीकधीमात्र अश्श्या बायका भेटतात की बस्स! धक्काच बसतो! काय चांगलं काय वाईट याची जाण यांच्यात भीषणपणे गंडलेली असते. या बायका स्वतःहून कुठल्याही चांगल्या व्यक्तीला त्रास देत नाहीत. पण जर कोणी यांच्याशी वाईट वागलं तर मात्र त्याची काही खैर नाही. तरीही या खलनायिका किंवा ननायिका नाहीत. त्या नायिकाच. अशाच काही 'व्हिलन हिरोइन'च्या पुस्तकांची थोडक्यात ओळख:

1. गॉन गर्ल - एमी एलीअट:

निक आणि एमी यांच्या लग्नाचा ५वा वाढदिवस आहे. नेहमीप्रमाणे न्याहरी करुन निक कामाला (बहिणीसोबत चालू केलेला बार) जातो. थोड्या वेळाने घरासमोर राहणार्याचा फोन येतो की तुमच्या घराचं दार सताड उघडं आहे. निक घरी येऊन पाहतो तर हॉलमधलं सामान विखुरलं आहे आणि एमी गायब झालीय. मग पोलीसतपास, खून/अपहरणची शक्यता, आसपासच्या भागात एमीचा शोध, मिडीया सर्कस इ. चालू होतं आणि सांगाडे कपाटातून बाहेर पडू लागतात. निकला बायको गायब झाल्याचं दुःख, काळजी वाटत नाही. तिचे मित्रमैत्रीण कोण, तिचं घरातलं रुटीन काय अशा साध्या प्रश्नांची उत्तरं त्याला देता येत नाहीत. एवढंच काय तिचा रक्तगटदेखील त्याला आठवत नसतो. अधिक तपासात नुकताच एमीचा जीवनविमा दुप्पट केल्याचं कळतं. आणि अर्थातच संशयाची सुई त्याच्याकडे वळते. पुढे काय होतं ते जाणून घेण्यासाठी पुस्तक नक्की वाचा.

या पुस्तकाने इतका धुमाकूळ घातला की त्यानंतर थ्रिलर प्रकारात एखादे क्रेझी पुस्तक आले की त्याला 'नेक्स्ट गॉन गर्ल' म्हणले जाऊ लागले. एक पुरुष आणि एक स्त्री असे एकाआडएक न्यारेटर असलेली बरीच पुस्तकं लिहली जाऊ लागली. त्यातला एक किंवा सगळेच अविश्वासू असतील. ते वेगवेगळ्या काळातील घटनांबद्दल बोलत असतील. किंवा एकाच घटनेकडे आपापल्या दृष्टीकोनातून बघत असतील. त्यातून बरेच रेड हेरींग मिळतील. व्यक्तिरेखांबद्दलची वाचकाची मतं एका टोकापासून चालू होऊन पुर्ण विरुद्ध दुसर्या टोकाला जातील. एकंदरच फुलटू रोलर कोस्टर राइड.

2. सायलेंट वाइफ - ज्योडी ब्रेट:

निक-एमी तरुण, लग्नाला पाचंच वर्ष झालेलं जोडपं होतं. इथे टोड आणि ज्योडी यांचं २० वर्ष मुरलेलं नातं आहे. एखाददुसर्या पेशंटला सायकोथेरपी काऊंसलींग करणारी ज्योडी मुख्यतः होममेकर आहे. घर टीपटॉप ठेवणे, टोड कामाहून आल्यावर त्याच्या आवडीचे खाणेपिणे तयार ठेवणे इ कामं ती वर्षानुवर्ष करत आली आहे. टोड हा बाहेरख्याली आहे. ज्योडीला ते माहीत आहे. पण त्याबद्दल ती काही बोलत नाही. छोटेछोटे प्रतिशोध घेऊन ती शांत राहते. हे केवळ कचरा गालिचाखाली ढकलणं असतं का? ज्योडीची शांतता ज्वालामुखीसारखी ठरणार का? हे जाणून घ्यायला पुस्तक नक्की वाचा.

गॉन गर्ल सुरवातीपासूनच डिस्टर्बींग आहे. तर सायलेंट वाइफ हळूहळू अँटीसिपेशन वाढवत नेणारं आहे. नात्यांमधला साचलेपणा, गृहितकं यांच्याबद्दल प्रश्न निर्माण करणारं पुस्तक.

3. द गर्ल ऑन द ट्रेन - रेचल, अॅना, मेगन:

घटस्फोटीत, वांझोटी, बेकार, बेवडी रेचल रोज ट्रेनने (दारु पीत पीत) नोकरीवर जाण्याचे नाटक करत असते. वाटेत सिग्नलला ट्रेन जिथे स्लो होते तिथल्या एका घरातील पर्फेक्ट कपल मेगन-स्कॉट यांचे डेली रुटीन पाहणे हा तिचा छंद आहे. एकेदिवशी ती मेगनला त्रयस्थ इसमाचे चुंबन घेताना पाहते आणि तिला फार धक्का बसतो. रेचलला दारुमुळे बर्याचदा ब्लेकआऊट येत असतात. अशाच एका ब्लेकआऊटमधुन चिखल, रक्ताने माखलेल्या कपड्यांत ती जागी होते आणि आदल्या दिवशी मेगन बेपत्ता झाल्याची बातमी येते. मेगनचं काय झालं? अॅना कोण आहे? रेचलचा या सगळ्याशी काय संबंध? हे जाणून घेण्यासाठी पुस्तक वाचा.

मला स्वतःला हे पुस्तक अर्ध्यापर्यंतच आवडलं. पुढेपुढे कंटाळले आणि शेवटीशेवटीतर 'कमॉनऽ संपवा आता!' झालं. पण हे पुस्तकदेखील नेक्स्ट गॉन गर्ल म्हणून फ्रेंझी निर्माण करणारं होतं (कदाचीत केवळ मार्केटींग गिमीक) म्हणून इथे या यादीत आलं.

4. लकीएस्ट गर्ल अलाइव - अॅनी फनेली:

सुंदर, चांगले करीयर, श्रीमंत+प्रेमळ मंगेतर... वरवर पाहता २८ वर्षीय अॅनीचे आयुष्य कोणालाही पर्फेक्ट वाटेल. पण पौगंड वयातील काही भयानक अनुभवांनी अजूनही तिची पाठ सोडलेली नाही. ते अनुभव कोणते हे जाणून घ्यायचे असेल तर पुस्तक वाचा.

हे पुस्तकदेखील मला फारसे आवडले नाही. पण गऑदट्रेप्रमाणेच हे पुस्तकदेखील नेक्स्ट गॉन गर्ल म्हणून फ्रेंझी ब्ला ब्ला ब्ला :-D. वेलऽ लेखिकेने स्वतःचा 'अनुभव' यात लिहला आहे. अमेरीकेतील कॉलेज लाइफ, बुलिइंगबद्दल मला थोडीफार आयडीया यातून मिळाली म्हणता येइल.

5. द काइंड वर्थ किलींग - लिली किटनर:

टेड आणि लिली विमानतळावरील बारमधे भेटलेले अनोळखी. कॉकटेल रिचवताना ट्रुथ गेम चालू होतो. अगदी जवळच्या व्यक्तिशी जे बोलू शकणार नाही ते परत कधीच न भेटणार्या अनोळखी व्यक्तिलामात्र सांगू शकतो. टेड आपल्या बायकोच्या व्याभिचाराबद्दल बोलतो. लिली विचारते "मग तू काय करणार आहेस याबद्दल?". टेड डोळा मारायचा प्रयत्न करत उत्तरतो "तिचा खून करावासा वाटतोय". लिली डोळे मोठे करत म्हणते "मला वाटतं तू हे जरुर करावं." पुढे काय होतं जाणण्यासाठी पुस्तक नक्की वाचा.

गॉन गर्ल-एमीइतकीच कावकि-लिली मला आवडली. गर्ल ऑन द ट्रेनपेक्षा या पुस्तकाला जास्त प्रसिद्धी मिळायला हवी होती. फार जबरदस्त पुस्तक आहे. आणि शेवट तर खल्लासच! याचा सिक्वेल यावा अशी माझी फार इच्छा आहे. आणि हो पुस्तकात एक फार विनोदी कविसुद्धा आहे बरं का. नक्की वाचा.

===
* ही सगळी पुस्तकं थ्रिलर/सस्पेंस असल्याने प्लॉट, बायकांच्या श्रुडपणाबद्दल जास्त लिहले नाही.
* तुम्हीदेखील इतरत्र समिक्षा, चिरफाड वाचत बसू नका. सरळ पुस्तक वाचा किंवा चित्रपट बघा. आणि काय वाटलं ते इथे लिहा.
* डिटेल लिहणार असाल तर स्पॉयलर अलर्ट टाकायला विसरू नका.
* लेखातील इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द सुचवा.
* वांझोटी शब्द ट्रीवलाइज करण्यासाठी मुद्दाम वापरला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लेख. सगळी पुस्तके वाचावीशी वाटतात.

बादवे, ह्या सर्व पुस्तकान्चे मराठी अनुवाद कुठे सापडतील?

द गर्ल ऑन द ट्रेन वर हिन्दी चित्रपट येतोय. मुख्य भुमिका परिणिती चोप्रा करणार आहे म्हणे.

१. यापैकी कुठल्याच पुस्तकाचे मराठी अनुवाद अजून तरी झाले नाहीत.
२. इंग्रजी गर्ल ऑन द ट्रेन सिनेमाने फार निराशा केली होती.

धन्यवाद सुलू Happy

चैतन्यने सांगितल्याप्रमाणे मराठी अनुवाद नाहीय एकही पुस्तकाचा.

> द गर्ल ऑन द ट्रेन वर हिन्दी चित्रपट येतोय. मुख्य भुमिका परिणिती चोप्रा करणार आहे म्हणे. > हे माहित नव्हतं.

Gone girl हा चित्रपट दुर्दैवाने थोडासा पाहिला. शेवट बघायची खूप इच्छा आहे. तिचा नवरा टिव्ही वर मुलाखत देतो ते बघून तिची चलबिचल झाली आहे असे वाटते.

Verity हे Colin hoover हिचं गॉन गर्ल/काइंड वर्थ किलिंग च्या तोडीचं पुस्तक वाचलं आणि ह्या धाग्याची आठवण आली. बऱ्याच वर्षांनी बिंज रीड केलं. जाम वेगवान सस्पेन्स कादंबरी. आणि त्यातली नायिका म्हणजे असलं सॉलिड प्रकरण आहे! सांगता सोय नाही.

Pages