फोटो

Submitted by आनन्दिनी on 9 January, 2017 - 19:52

सकाळीच  फोन वाजला . "परवाच्या पार्टीचे फोटो पाहिलेस का ?" भारतातून ताईने मोठ्या उत्सुकतेने विचारलं . "हो, काल रात्री निवांतपणे वाचत होते"
"अमेरिकेत फोटो वाचतात वाटतं?" ताईने हसून म्हटलं.
"नाही ग ताई, बहुतेक लोक फोटो नुसते पाहतात. पण साड्यांचे रंग, कपड्यांचे ब्रॅण्ड यापेक्षा अधिक लक्ष लोकांच्या बॉडी लँग्वेज कडे दिलं ना की फोटो वाचता येतात.

बघ ना लोकं हनीमूनचे फोटो फेसबुकवर टाकतात. नुकतंच लायसन्स मिळाल्यावर बेफाम गाडी चालवणाऱ्या तरुणाईसारखं , धबधब्यासारखं उसळणारं प्रेम त्या फोटोंमध्ये सुद्धा वाहत असतं.

आता  तुमचाच पार्टीचा हा अल्बम घे ना. फोटो बघताक्षणीच मला जाणवलं की नलूमावशी अजूनही काकांच्या दुःखातून सावरली नाहीये. फोटोपुरती हसली तरी ते बळेबळे आहे हे समजतंय.

तेच निम्मीमावशी आणि तिच्या सुनेचं चांगलं चाललंय हे त्यांच्या फोटोतून कळतंय. फोटोमध्ये त्या दोघी जशा एकमेकींकडे सरकल्या आहेत, ते दाखवतं की त्यांची मनसुद्धा एकमेकींच्या जवळ येत आहेत.

आपल्या कुटुंबातल्या नव्या पिढीचा दिलदार मोकळेपणा त्यांच्या सेल्फीतून सुद्धा थिरकतोय आणि पुरुषांचा थोडासा अलिप्तपणा त्यांच्या फोटोत डोकावतोय.

एखाद्याच्या दिशेने झुकलेली मान, खांद्यावरचा हात, एखादा हसरा कटाक्ष, शंभर वाक्य नाही सांगणार इतकं बोलून जातात. फोटो बघून ते नातं तसं आहे असं खात्रीलायक नाही सांगता येणार पण त्या मोमेन्टला तरी माणसाची मनःस्थिती कशी होती ते बहुतेक वेळा दिसून येतंच .

"भारीच विचार करतेस बाई तू! जाऊदे, तुमचा दोघान्चा एक छानसा फोटो काढून पाठवून दे. मी या पार्टीच्या अल्बममध्ये अॅड करते."

"अगं ताई, आमचा एकत्र फोटो हवा असेल तर दोन वेगवेगळे फोटो घेऊन एकत्र करावे लागतील. म्हटलं ना तुला, फोटो बोलतात आणि आम्हाला दोघांना एका फ्रेममध्ये फार जाच होतो गं !!"

आनन्दिनी
http://drmadhurithakur.blogspot.co.uk/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान..

जबरदस्त लिहिलंय स्फुट. कमी शब्दात बरंच काही बोलून गेलात.
खरंच आता फोटो पाहण्यापेक्षा वाचणं की कला अवगत करायला हवी.
बरंच काही नव्याने कळेल मग Happy

मस्तय .

वाह, हे वाचल्यावर मॉन्सून वेडिन्ग चित्रपटात शेवटी जेव्हा ग्रूप फोटो काढतात त्याची आठवण झाली.