अपर्णा सेन, सीमा देव व झाकीर हुसेन यांचा यंदाच्या 'पिफ'मध्ये गौरव

Submitted by चिनूक्स on 9 January, 2017 - 11:43

महाराष्ट्र शासन व पुणे फिल्म फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं पंधराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन १२ ते १९ जानेवारी, २०१७ या काळात पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांमध्ये करण्यात आलं आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा महाराष्ट्र शासनाचा अधिकृत चित्रपट महोत्सव आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल दिग्दर्शिका - अभिनेत्री अपर्णा सेन आणि अभिनेत्री सीमा देव यांना या वर्षीच्या महोत्सवात जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. याशिवाय संगीतक्षेत्रातल्या अतुलनीय कामगिरीबद्दल दिला जाणारा 'एस. डी. बर्मन आंतरराष्ट्रीय पुरस्कार' प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांना प्रदान केला जाणार आहे.

मराठी स्पर्धा-विभागात यंदा ५४ चित्रपटांनी भाग घेतला आणि निवडसमितीने त्यांपैकी ७ चित्रपटांची निवड केली आहे.

या विभागात महाराष्ट्र शासन - संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार (रु. पाच लाख) व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनय, पटकथा आणि छायाचित्रण असे प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पुरस्कार दिले जातात. महोत्सवाच्या वतीने प्रेक्षक-पसंती लाभलेला उत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कारही दिला जातो.

या वर्षीच्या मराठी स्पर्धा-विभागातले चित्रपट पुढीलप्रमाणे -

१. डॉक्टर रखमाबाई (दिग्दर्शक - अनंत नारायण महादेवन)

२. लेथ जोशी (दिग्दर्शक - मंगेश जोशी)

३. व्हेंटिलेटर (दिग्दर्शक - राजेश मापुस्कर)

४. एक ते चार बंद - दिग्दर्शक – अपूर्व साठे)

५. दशक्रिया - (दिग्दर्शक – संदीप भालचंद्र पाटील)

६. घुमा - (दिग्दर्शक – महेश रावसाहेब काळे)

७. नदी वाहते - (दिग्दर्शक – संदीप सावंत)

'नदी वाहते' या चित्रपटाचा महोत्सवात आंतरराष्ट्रीय प्रीमियर असेल. या चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद आणि दिग्दर्शन श्री. संदीप सावंत यांचं आहे. चित्रपटाची निर्मिती 'सहज फिल्म्स' (नीरजा पटवर्धन व संदीप सावंत) यांची आहे. चित्रपटाच्या प्रॉडक्शन डिझायनरही नीरजा पटवर्धन आहेत. संजय मेमाणे यांचं छायालेखन असून संकलन नीरज वोरालिया यांनी केलं आहे. वसंत जोसलकर, शिव सुब्रमण्यम, आशा शेलार, पूनम शेटगावकर, हृदयनाथ जाधव, जयंत गाडेकर, अभिषेक आनंद, गजानन झरमेकर महादेव कृष्णा सावंत, भूषण विकास आणि विष्णुपद बर्वे यांच्या चित्रपटात भूमिका आहेत.

El Primero de la Familia (First Born) या चिलीयन चित्रपटाचाही महोत्सवात आंतरराष्ट्रीय प्रीमियर असेल.

या वर्षीच्या महोत्सवाचं खास आकर्षण आहे विजय तेंडुलकर स्मृति-व्याख्यान. यावर्षी चिलीचे होर्जे अरीगेडा हे ‘संगीतध्वनिंचा चित्रपटात होणारा वापर’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत.

याशिवाय 'पिफ बाझारात' व्याख्यानं, कार्यशाळा, चर्चासत्रं यांची पर्वणी असेल.

दिग्दर्शक रवी जाधव आणि चंद्रकांत कुलकर्णी 'चित्रपटांचं माध्यमांतर' या विषयावर चर्चा करतील. 'व्हर्च्युअल रिअॅलिटी' या विषयावरही एक चर्चासत्र असेल. 'शिप ऑफ थीसियस' या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद गांधी हेही या निमिताने महोत्सवात हजेरी लावणार आहेत. सुभाष घई, आशुतोष गोवारीकर आणि राजेश मापुसकर यांच्याशी गप्पा मारण्याची संधी महोत्सवात मिळेल.

'पिफ बाझारा'त उभ्या राहणार्‍या पॅव्हेलियनचं नाव यावर्षी दादासाहेब फाळके पॅव्हेलियन असं असणार असून दिवंगत अभिनेते ओम पुरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुख्य रंगमंचाचं नाव ​'ओम पुरी रंगमंच​' असं करण्यात आलं आहे. ​

महोत्सवाचं उद्घाटन १२ जानेवारी, २०१७ रोजी दुपारी साडेचार वाजता सिटिप्राईड, कोथरूड, इथे होईल. संध्याकाळी साडेसात वाजता बार्बरा एडर यांनी दिग्दर्शन केलेला ‘थॅंक यू फॉर बॉम्बिंग’ (ऑस्ट्रिया) या चित्रपटानं महोत्सवाची सुरुवात होईल.

महोत्सवासाठी नावनोंदणी सिटिप्राईड (कोथरूड व सातारा रस्ता), आयनॉक्स, मंगला इथे सुरू आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'नदी वाहते' या चित्रपटाचा महोत्सवात आंतरराष्ट्रीय प्रीमियर असेल.>>> हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा नी !

>> 'नदी वाहते' या चित्रपटाचा महोत्सवात आंतरराष्ट्रीय प्रीमियर असेल.>>> हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा नी !

+१.

अभिनंदन आणि शुभेच्छा नी! Happy

मायबोलीकर निखिल खैरे यांनी लिहिलेला '१ ते ४ बंद' हा अपूर्व साठी दिग्दर्शित चित्रपटही 'पिफ'च्या मराठी स्पर्धाविभागात आहे.

निखिल खैरे आणि नीरजा या दोघांचंही हार्दिक अभिनंदन. Happy

>>निखिल खैरे आणि नीरजा या दोघांचंही हार्दिक अभिनंदन +१

पिफला येण्याची खूप इच्छा आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून ठेवले आहे.
काही सिनेमे तरी पाहायला मिळावेत अशी खटपट चालू आहे. Sad

वेदर रिपोर्ट नावाचा चित्रपटाच पिफ मध्ये स्क्रीनिंग होतेय . या चित्रपटात मायबोलीकर संघमित्राची एक भूमिका आहे. एफटीआय फ्रॅटर्निटीने बनवला आहे .

पिफमध्ये सहभागी असलेल्या सर्व मायबोलीकरांचं मनःपूर्वक अभिनंदन !

निखिल खैरे आणि संघमित्रांचे अभिनंदन.

खैरेंची माझा जुगारी बाप (किंवा अशीच काही शीर्षक असलेली) शेतकर्‍यांवरील कविता आजही लक्शात आहे

सर्वांचे आभार.
निखिल मस्त रे.

खैरेंची माझा जुगारी बाप (किंवा अशीच काही शीर्षक असलेली) शेतकर्‍यांवरील कविता आजही लक्शात आहे<< बरोबर टण्या!