स्फुट ४१ - शेगांवचे महाराज

Submitted by बेफ़िकीर on 9 January, 2017 - 09:08

महाराज,

काल तुमचे मुखदर्शन करताना
जिवंत होत्या
माझ्यातील वासना, अपेक्षा, स्वार्थ

महाराज,

तुमच्या मुखदर्शनाला रांग
प्रत्यक्ष दर्शनाला झुंबड
आतमध्ये कुठेतरी तुम्ही
गुदमरलेले
भीतीने थिजलेले

महाराज,
त्या अद्ययावत सुविधा
कंप्यूटराईझ्ड पावत्या
सीसी टीव्ही
गणवेषातील कर्मचारी
ती शिस्त, भक्तीतून आलेली
सगळेच गजब

महाराज,
तो विठ्ठलनामाचा गजर
ते पारायण करणारे
२१ अध्याय पाठ असणारे
घोडा, गाय, ऊस, विहीर, मधमाश्या
सगळी प्रतीके मुखोद्गत असणारे

महाराज,
ते सेल्फि काढणारे
ते तोकड्या कपड्यात आलेले
ते हजारोंच्या पावत्या फाडणारे
कार्ड स्वाईप करणारे
'जुन्या नोटा चालणार नाहीत' ह्या पाट्या वाचणारे

महाराज,
ते मठाबाहेरचे भिकारी
तुमचे फोटो विकणारे
रस्त्यात पहुडलेली कुत्री
शेगावच्या कचोर्‍यांची असंख्य अस्वच्छ दुकाने

महाराज,
ती खोळंबलेली वाहतुक
हॉर्न्सचा कलकलाट
मठाबाहेरचे त्या अत्यवस्थ यंत्रणा

महाराज,
ती गलिच्छ गटारे
त्यात लोळणारी डुकरे
तिथेच असलेली उपाहारगृहे

महाराज,
तुम्हाला आता
कोणीही बाहेर काढू शकत नाही
आता तुम्ही झालात बद्ध
एक कमोडिटी झालात तुम्ही आता
साधी चिलीम मिळेना तुम्हाला
मोठ्या उष्ट्या पत्रावळी खाऊन भक्त जमवलेत
घ्या!
घ्या हे भक्त!
गण गण गणात बोते म्हणणारे

महाराज,
हे आहेत तुम्हाला अटक करणारे
हेच आहेत
जे तुम्हाला स्थानबद्ध करून
तुमचाच गौरव करत
तुमच्याच माहात्म्यावर पैसे मिळवणारे
किंवा मिळवू पाहणारे

महाराज,
लखलाभ तुम्हाला तुमचे शेगांव!
मी आत्ता बिडी मारत
कीव करत आहे तुमच्या अवस्थेची
आणि हसत आहे
तुम्हाला असलेली स्पर्धा बघून
साईबाबा, समर्थ ह्या सगळ्यांशी

महाराज,
मला रडू येते आहे
माझ्या आई आणि मावशीने
जन्मभर तुम्हाला भजले ह्यामुळे

महाराज,
दृष्टांत, प्रचीती, काही नको
फक्त
तिथून बाहेर पडून दाखवा!
===================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्फुट ४१ का ? फेसबुक वर कुणीतरी एक जण कविता क्र. अमूक तमूक असे लिहीत असे त्याची आठवण झाली.

एक कमोडिटी झालात तुम्ही आता
हिंदू धर्मातले सगळेच देव आजकाल कमोडिटी झाले आहेत, त्यांचे दर्शन, कृपा या असल्या मंदिरांत मिळणार नाही. त्यासाठी फक्त स्वतःच्या मनातच त्यांचे स्मरण करावे.
सर्व जगाचे नियंते जे देव ते का रुपयाच्या फुलाला का दोन रुपयाच्या साखरेला महाग झाले आहेत? नाही दिले त्यांना काही तर त्यांचे काहीच अडत नाही, त्यांना फक्त मनापासून श्रद्धा पाहिजे, ती नसेल तरच असले धंदे करावे लागतात.
दुर्दैवाने यालाच हिंदू धर्म म्हणतात याचे वाईट वाटते.

चपखल लिहिलंत बेफी.
मी परवा तुम्हाला म्हट्लं त्याप्रमाणे मला शब्दात व्यक्त होता येत नाही. पण माझी पण अशीच काहीशी अवस्था काही वर्षांपुर्वी शिर्डीला गेले होते तेव्हा झाली.
माझे वडिल साईभक्त, नियमित शिर्डीची वारी करतात. लहानपणी अनेक वेळेला गेले तेव्हा तिथे कोणतेच नियम नव्हते. कुठेही बागडा, काहीही पहा.... मी त्यांनी पेटवलेली धुनी आणि त्यांची स्वयंपाक करण्याची जागा पुन्हा पुन्हा पहात असे.
पुढे अनेक वर्ष जाऊ शकले नाही, आणी मग एकदा योग आला जाण्याचा. पण तिथे गेल्यावर जो काही अपेक्षाभंग झाला तो शब्दात व्यक्त होऊ शकणार नाही.
परतताना पुन्हा शिर्डिला न येण्याचं निश्चित केलं. जिथे असेन तिथून साईबाबांना मनोमन नमस्कार केला तर तो पोहोचेलंच. त्यासाठी शिर्डी गाठण्याचं काहीच कारण नाही, कारण तिथे आता साईबाबांची फक्त मुर्ती आहे. त्यात प्रेरणा नाही, चेतना नाही.

सत्यवचन श्रीमान,
असे अनेकजण कमोडिटी झालेत, बंदिस्त झालेत, त्यांना आमचा लांबूनच नमस्कार _/\_
कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी ?
हृदयातील भगवंत राहीला हृदयातुन उपाशी !
मी गेलो होतो १० वर्षांपुर्वी शेगावला, तेव्हासुद्धा ४/५ तास रांगेत उभे रहावे लागले होते.
असो, ज्यांना पटते, जमते त्यांनी नक्की जावे.

पुर्वीच्या काळी रहदारीची साधने नव्हती ... लोकसंख्या कमी होती ... नोकरीत सुट्टी घेणेही अवघड असायचे. महती पसरवायला प्रसारमाध्यमे नव्हती.

आता रहदारीची साधने आहेत. लोकसंख्या वाढली
... लोकाना गरजेनुसार लहान सुट्ट्या घेउन जवळपासची तीर्थक्षेत्र गाठता येतात.

भक्त हौसे गवसे नवसे तेंव्हाही होते. आजही आहेत
... पुर्वी ते दिसत नव्हते कारण ते गोळा होत नव्हते , आज ते गोळा होउ शकतात म्हणुन ते दिसतात.

पण गर्दी बघुन भक्त का बिथरतात हे समजत नाही. जशी आपल्याला तशीच गर्दीतील सर्वाना दर्शनाची गरज असते. म्हणजे रांग्व्त आपला नंबर पैला असला की बोलायचं वा वा देवा ! आणि आपला नंबर पस्तीसवा असेल तर बोलायचं देव कमोडिटी झाला !

गंमत म्हणजे हाच त्रागा नोटाबंदीविरुद्ध काही लोक करत होते तर हेच साहेब बोलत होते ... सैनिक मरतात अन तुम्ही रांगेत उभे राहू शकत नाही ?

Proud

हो खरच... आंम्ही पण शेगावला गेलो होतो तेव्हा मंदिर व आवारातली स्वच्छता खुप छान वाटली.. पण कुणी म्हणालं इकडची कचोरी खुप छान असते म्हणुन हॉटेल शोधत होतो.. शिवाय मंदिराबाहेर हि कचोरी बनवणारे.. बरीच अस्वच्छता आढळली... एका हॉटेलात गेलो.. मला नाहि आवडली ती कचोरी.

>>गंमत म्हणजे हाच त्रागा नोटाबंदीविरुद्ध काही लोक करत होते तर हेच साहेब बोलत होते ... सैनिक मरतात अन तुम्ही रांगेत उभे राहू शकत नाही ?
मी तरी कधीच म्हणालो नव्हतो बाबा, माझा त्या नोटा प्रकाराला पहिल्यापासुन विरोधच होता (आणि आहे)
कोणत्याही रांगेत उभे राहणे नकोच वाटते. Sad

बेफी दुर्दैवाने महाराष्ट्रातल्या प्रत्येक मोठ्या मंदिराची थोड्याबहुत फरकाने हीच अवस्था आहे, ही देवस्थान खोर्‍याने पैसा ओढतात पण त्याचा उपयोग सामाजिक कार्यांसाठी म्हणावा तसा करत नाहीत.

श्री, शेगावला इतर देवस्थानांच्या रांगेत उभं करु नका. तिथलं प्रशासन जेवढं स्वच्छ व प्रामाणिक आहे त्याची इथे कोणाला कल्पना दिसत नाही.

मंदिराच्या आवाराबाहेरच्या गावावर संस्थानाचा अंमल नाही. त्यामुळे शेगाव जसं दिसतं त्याला गजानन महाराज संस्थान जबाबदार नाही. एखाद्या श्रीमंत वस्तीच्या बाजूला झोपडपट्टी असणे जसे तसेच हे आहे. श्रीमंत लोकांनी ती वस्ती आपल्या पैशाने श्रीमंतांसारखी करावी ही अपेक्षा युटोपियन आहे.

माझे काही नातेवाईक संस्थान मधे नोकरी करतात, त्यांना वेळेवर योग्य पगार, आरोग्य-शिक्षणासह इतर सर्व सुविधा उत्तम दिल्या जातात. संस्थानमधे कोणताही भ्रष्टाचार झाल्याचे आजतागायत कळलेले नाही.

संस्थानाद्वारे चालवल्या जाणार्‍या भक्तनिवासांतली राहण्याची, भोजनाची व्यवस्था - दर्जा व त्याचे शुल्क बघितले तर संस्थान कोणता पैसा कसा वापरते हे कळेल, कोणालाही त्यांचे व्यवहार तपासायचे असतील तर तपासू शकतात.

एक किस्सा खराखुरा: माझ्या ओळखीतला एक बडे फॅशन व सिनेमॅगझीन्स, थ्रीडी प्रिन्ट व कॅलेन्डर्स छापणारा मुंबईतला बडा प्रिण्टर. शिर्डीला जी साईबाबाचे वार्षिक कॅलेण्डर संस्थानकडून विकत मिळते, ते हा छापतो. सर्व चित्रे एका चित्रकाराकडून दरवर्षी नवीन रंगवून घेऊन कॅलेण्डर बनवतो. हे कॅलेण्डर तो सर्व डिझाइन्+प्रिण्ट करुन शिर्डीसंस्थानला अमुक एका किंमतीत देतो व संस्थान ते कॅलेण्डर आपल्याला पाहिजे त्या दरात तिथे विकते. ही कल्पना त्याने स्वत: शिर्डी संस्थानला दिलेली. हेच मॉडेल त्याने शेगाव संस्थानला राबवण्याचा घाट घातला तेव्हा ह्या मर्सीडीजमधून फिरणार्‍याला नम्र उत्तर देण्यात आले की तुला पाहिजे ती देणगी इथे दे-नकोस देऊ, पण धंद्याचा विषय परत काढू नकोस.त्याने अनेक प्रयत्न केले पण त्याला शेगाव संस्थानने भीक घातली नाही. हा किस्सा त्याने स्वतः मला सांगितलेला आहे.

मी देव, बाबा, महाराज वैगरेंवर श्रद्धा-विश्वास ठेवणारा नाही किंवा गजाननमहाराजांचा भक्तही नाही. पण कळायला लागल्यापासून कुटुंबियासोबत नियमित संस्थानला जाणे झाले आहे. बेफिंना जाणवलेल्या गोष्टी तेव्हापासून जाणवत आहेत व त्याची कारणेही मला समजली आहेत. पण शेगाव संस्थान आणि इतर देवस्थाने यांतला फरक काय आहे ते अनुभवले आहे. जी दर्जेदार सेवा तिथले लोक मोफत देतात ती इतर कुठे पैसे देऊनही मिळेल याची खात्री नसते.

गाव अस्वच्छ व गलिच्छ मागासलेलं आहे म्हणून संस्थानला कमोडिटी म्हणणे हे तिथल्या प्रामाणिक लोकांवर अन्याय करणारे आहे. इतर देवस्थानाच्या पंक्तित कृपया शेगाव ला बसवू नये. इतर देवस्थानांना शेगावची पातळी गाठणे पुढच्या शंभर वर्षात शक्य नाही.

चूकभूल देणेघेणे. धन्यवाद!

शेगावच्या गजानन महाराज संस्थानाचा आम्हालाही अतिशय चांगला अनुभव आला आहे. त्यांच्या कडून देणगीची रीतसर पावती आणि प्रसाद इथे पोस्टाने पाठवतात. देणगी देताना ती कुठल्या सेवाभावी कामासाठी वापरावे ते निवडता येते. गावाच्या परीस्थितीवर त्यांचा अंकुश नाही. ठाण्याला एक गजनन महाराजांचे देवस्थान आहे. गेल्या भारतभेटीत तिथे दर्शनाला गेलो होतो. साधेसे देवस्थान. शांतपणे दर्शन झाले. पोथी हवी होती म्हणून चौकशी केली तर पोथी दिली. प्रसाद म्हणून दिली आहे असे सांगून पोथीचे मूल्य घेतले नाही. विनंती करुनही त्याचे पैसे घेतले नाहीत.

बाकी कुठलेही देवस्थान चालवायचे तर व्यवहार आणि नियम असणार. भारतात हिंदूंच्या देवळासाठी तर काहीतरी कायदाही आहे ना? त्यानुसार सरकार देवूळ ताब्यात घेवून त्याचे उत्पन्न घेवू शकते वगैरे. तसे तर चर्च मधेही सदस्यत्वाची फी असते. त्याशिवाय मेणबत्ती लावायचे वेगळे.

मी जरा भावनेच्या भरात प्रतिसाद लिहिला खरा,
पण नानाकळा यांचे म्हणणे बरोबर आहे,
शेगाव संस्थान हे त्यांच्या अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या बाबतीत फारच सरस आहे.
त्याची तुलना इतर देवस्थानांशी करता येणार नाही.

अर्थात ते काही असले तरी, दर्शनासाठी लांबलचक रांगा, जे लोक जास्त पैसे देतील त्यांना आधी दर्शन, इ. गोष्टी अजिबात पटत नाहीत.

नगरपालिका आणि संस्थान यांचा संबंध नाही. हा संबंध का नाही, यामागे काही कारणं आहेत आणि त्याची चर्चा इथे शक्य नाही.

स्वाती२,

ठाण्याचं मंदिर ही शेगावच्या संस्थानाची शाखा नाही. संस्थानाच्या अधिकृत शाखा आळंदी, त्र्यंबकेश्वर, ओंकारेश्वर, पंढरपूर, गिरडा आणि कपिलधारा इथेच आहेत.

महेश,

शेगावला जो जास्त पैसे देईल, त्याला आधी दर्शन हा प्रकार नाही. तुमची माहिती साफ चुकीची आहे. उत्सवांच्या वेळी गर्दी होते, तेव्हा कोणी कितीही मोठी व्यक्ती आली तरी रांगेतच उभं राहावं लागतं.
दर्शनासाठी लांब रांगा लागतात, त्यात संस्थानाची चूक नाही. लोकच तेवढे येतात. तरी रांगांमध्ये कमीत कमी वेळ लागावा यासाठी सतत प्रयत्न सुरू असतात.

>>शेगावला जो जास्त पैसे देईल, त्याला आधी दर्शन हा प्रकार नाही. तुमची माहिती साफ चुकीची आहे. उत्सवांच्या वेळी गर्दी होते, तेव्हा कोणी कितीही मोठी व्यक्ती आली तरी रांगेतच उभं राहावं लागतं.

माझी माहिती काहीच नाही, ते जनरलायझेशन होते, अनेक देवस्थानांमधे तसे असते म्हणुन लिहिले,
इकडे तसे नसेल तर चांगले आहे, पण लांबलचक रांगांमधे उभे राहून तासनतास घालवणे नाही जमणार.
अगदीच टाळता येण्याजोगे नसेल तेव्हा इलाज नाही.

चिनुक्स, अधिकृत नाही हे माहीत नव्हते. मात्र तिथे जे काका होते त्यांनी डोनेशन द्यायचे असेल तर शेगावला चेकने पाठवा असे सांगितले. प्रतिसादात बदल केलाय.

मी स्वतः शेगावी ४ वर्ष राहुन शिकलीए..
इतर देवस्थानांसारखे जनरलाईझ्ड विधान शेगाव संस्थानाबाबत नाही करता येणार...
जास्त पैसे देऊन लवकर दर्शन असला प्रकार नाही तेथे..
भक्त एवढे म्हटल्यावर रांगांशिवाय पर्याय नसतो.. निव्वळ मुखदर्शन सुद्धा करु शकतात लोक.. आणि जे लोक अपंग आहेत अथवा चालण्याचा त्रास असलेल्यांना ते व्यवस्थित दर्शन करवतात...
अधिक तेथे काम करणारे बरेचसे सेवकगण विनामुल्य सेवा देतात...एक पैसाही न घेता फक्त सेवा द्यायची म्हणुन..
संस्थेच्या मालकीत असणारी प्रत्येक गोष्ट जसे मंदिर, भक्तनिवास, आनंदसागर, शाळा, कॉलेज सारकाही अतिशय स्वच्छ आहे.. गावातील लोक त्यापासुन प्रेरणा घेउन स्वतःसुद्धा स्वच्छता बाळगत नाही त्याला काय करावे?
एखाद्याला हात नाही म्हणुन भरवता येईल पण चावावं तर त्याच त्यालाच लागेल ना?

लिहिलयं छान बेफी पण शेगावबाबत ते नाही एक्सेप्ट करता येणार..

नानाकळा+१११११

बेफिकीर, तुमच्या भावना खरच पोहोचल्या, पण ते इतर बाबतीत जाणवले. ( शेगाव, गोंदवले व अक्कलकोट सोडुन ) शेगावचे संस्थान खरच आदर्श आहे.

पण बेफिंनी शेगाव बद्दलच नव्हे तर अशा अनेक बड्या देवस्थानाच्या बाबतीत लिहिलं आहे असं वाटतंय. जनरल.

बेफी, तुम्ही शेगावचा नीट अभ्यास केला नाहीये. शेगावचे संस्थांन अत्यंत उत्तम प्रकारे चालवले जाते. त्याची तुलना शिर्डी वगैरे शी १ टक्का सुद्धा होऊ शकत नाही.

शेगाव संस्थानाची सत्ता त्यांच्या आवारात चालते आणि तिथे ते उत्तम व्यवहार करतात. भक्तगृहातल्या खोल्या १००-२०० रुपयांपासुन देतात. मोफत बससेवा चालवतात. स्वच्छता तर भारतभर उदाहरण होऊ शकेल अशी असते.

ह्या पलिकडे संस्थान प्रचंड सामाजिक काम करते. विक्रम पंडीत यांनी ७० कोटी रुपयाची देणगी दीली आहे खेड्यापाड्यात वैद्यकीय सुविधा देण्यासाठी. इतके पैसे त्यांनी देवस्थान काम कसे करते त्याचा अभास करुनच दिले असणार.

माझा संत, देव ह्यावर विश्वास नाही तरी पण मला शेगावला जाऊन १ दिवस राहुन यायला आवडते.

पण बेफिंनी शेगाव बद्दलच नव्हे तर अशा अनेक बड्या देवस्थानाच्या बाबतीत लिहिलं आहे असं वाटतंय. जनरल. >>>>>>>>>

शेगाव हे बाकी सर्व देवस्थानांना अपवाद आहे. बड्या देवस्थांनाबद्दलच लिहायचे असेल तर शेगावचे उदाहरण देणे पुर्णतः चुक आहे.

शेगावचे संस्थान बाकी देवस्थानांसारखे नाही. खूपच चांगला अनुभव आहे त्यांचा. गर्दीला काही इलाज नाही. त्यासाठी सुटीचे दिवस टाळणे हाच उपाय.

बर्‍याच लोकांचे जे मत आहे तसेच माझेही आहे. मी राहतो शिर्डी जवळ पण शेगावलाच जास्ती वेळा जाणे झालेय. आणि प्रत्येकवेळेस संस्थानची शिस्त आणि प्रामाणिकपणा दिसला आहे. आपल्याजवळ असलेल्या पैशाचा योग्य विनियोग केलेला दिसतो त्यांनी. शिर्डी बद्दल काही न बोललेलेच बरे.

Pages