घनगडाच्या अनगड वाटा ! नाळेची वाट आणि नाणदांड घाट !!

Submitted by योगेश आहिरराव on 8 January, 2017 - 03:57

घनगडाच्या अनगड वाटा ! नाळेची वाट आणि नाणदांड घाट !!

डिसेंबर २०१२ मध्ये घनगडाच्या माथ्यावरून तेलबैला सुधागड पाहिले तेव्हा त्यापेक्षाही मनात घर करून राहिले ते केवणीचे पठार. घनगडाच्या नैऋत्य दिशेला असलेले हे लांबलचक पठार. मुख्य भांबर्डे एकोले गावापासून दूर पुर्णपणे निसर्गावर अवलंबुन असणारे अत्यंत कमी लोकवस्ती असलेले अगदीच लहान पण सुंदर केवणी असे ऐकून होतो. येथील ग्रामस्थांना वाणसामानासाठी तास दिडतास चालत एकोले भांबर्डे किंवा मग घाटवाट उतरून खाली नेणवलीत किंवा ठाकुरवाडीत येण्याशिवाय गत्यंतर नाही.
अशाच घाटवाटेने चढाई उतराई करत केवणी आणि खडसांबळे लेणी असा रूट ठरवला. मी, विनायक आणि विवेक,आम्ही ठरल्याप्रमाणे खोपोली लोकल पकडली. साडेसात वाजेची खोपोली पाली एसटी, पालीला नऊच्या सुमारास पोहचली तेव्हा पावणेनऊची ठाकुरवाडी एसटी निघून गेली होती. अर्थातच पहिली खोपोली पकडून सुध्दा ठाकुरवाडी एस टी कधीच मिळत नाही हा माझा नेहमीचा अनुभव. नियोजनानुसार ठाकुरवाडी - खडसांबळे गाव -लेणी- घोणदांड घाट- केवणी मुक्काम- नाणदांड घाट - ठाकुरवाडी असा क्रम होता. चौकशी केल्यावर समजले पुढची एसटी सव्वाअकराच्या सुमारास, सहाजिकच वेळ वाया न घालावता नांदगाव नेणवली मार्गे खडसांबळे अशी टमटम ठरवली. सव्वादहा वाजता खडसांबळे गावात उतरलो. गावातल्या उदलाईमातेच्या देवळावर मंदिराच्या जिर्णोध्दाराचा फलक दिसला. मंदिराच्या ओसरीवर गावातले पोलिस पाटील रामभाऊ धानुधरे भेटले.
खडसांबळे लेणी पर्यंत कुणी सोबत मिळते का ते पहात होतो, पण बहुतेक मंडळी आपल्या कामाला गेल्यामुळे कुणीच नव्हते. वरच्या धनगरवाड्यावरच कुणीतरी नक्की येईल सोबतीला, असे रामभाऊंनी सांगितले. गावाच्या समोरच सह्याद्री उभा डावीकडे सुधागड समोर तेलबैला आणि उजवीकडे घाटमाथ्यावरचे केवणीचे पठार त्या मधोमध नाळेची खडी चढणीची वाट आणि उजव्या बाजूला खाली दडलेली खडसांबळेची लेणी.
पण काय माहित वातावरण मुळीच आल्हादायक नव्हते, एक वेगळेच मळभ दाटून सर्वत्र धुसर असे चित्र होते. मुख्य वाटेने छोटे टेपाड चढून धनगरवाड्यावर आलो बघतो तर पुर्ण शांतता, आश्चर्य म्हणजे दहा बारा घरांपैकी बहुतेक घरांना बाहेर दाराची कडी लावलेली. आवाज दिल्यावर दोन शाळकरी मुलं आली, पाड्यातली मोठी मंडळी दैनंदिन कामासाठी बाहेर तिथे फक्त हि मुल आणि दोन चार वयोवृध्द. मुलांनी सोबत येण्यास नकार दिला दुरूनच वाट दाखवली, तशी दिशा आणि थोडीफार माहिती होतीच.
उजवीकडची मळलेली वाट आस्तेकदम चढत पंधरा मिनिटातच नाळेच्या वाटेवरचा मोठा ओढा पार करून सरळ वरच्या पदरात आलो.
काही ठिकाणी गवत जाळल्यामुळे बराचसा भाग काळाठिक्कर पडला होता. त्यात ऐन डिसेंबर महिना असुनही थंडीचा पत्ता नाही. वातावरण भलतेच खराब, वारा नसल्यामुळे झाडांची पाने हि स्तब्धच. मुख्य वाटेने उजवीकडे जात डोंगराला वळसा घालून आत जंगलात शिरलो साधारण लेणींच्या दिशेने, झक्क मळलेली वाट काही ठिकाणी लाकुडतोडीच्या खुणा दिसल्या. वाट हळूहळू अरूंद होत चढणीला लागली, पुढे घळीतून येणार्या ओढ्याच्या डावीकडून वळसा घेत पहातो तर आणखी एक वाट आम्ही होतो त्या वाटेला छेदून जात होती. थोडक्यात तो वाटेचा चौक लक्षात ठेवून आधीच्या वाटेने पुढे गेलो काही अंतर जाताच जंगलातले गचपण वाढून वाट अधिकच अरूंद आणि अस्पष्ट झाली. साधारणपणे लेणी ज्या कड्यात असाव्यात तो कडा आमच्या पासून जेमतेम १०० मीटर अंतरावर असेल, शांतपणे विचार केला खडसांबळे लेणी अगदी कोंढाणे कार्ले भाजे बेडसे लेणींसारखी फारशी प्रसिध्द नसली तरी अगदी दुर्गम ही नाही त्यानुसार ही वाट लेणीला जाणारी असुच शकत नाही. आम्ही दोघांनी तिथेच थांबून विवेकला मोजून पाच मिनटे घड्याळात पाहून पुढे जाऊन पहायला सांगितले. दहा बारा मिनिटांत विवेक खांदे टाकत परत आला, पुढे निमुळत्या वाटेत मोठ्ठाले प्रस्तर पडलेले होते. सहाजिकच पुन्हा माघारी येत त्या वाटेच्या चौकात आलो. धनगरवाडा सोडून दिड तासाचा कालावधी लोटला होता. जर वाट योग्य आणि अचुक असती तर आत्तापर्यंत लेणींसमीप तरी पोहचलो असतो, चौकात विनायकला पाठीवरच्या अवजड पिशव्या सांभाळायला ठेवून मी आणि विवेकने परस्पर विरोधी दिशेला जायचे ठरवले. बरोब्बर दहा मिनिटे मोजून जितके अंतर जाता येईल तितके जायचे वाट मिळो न मिळो पुन्हा माघारी चौकात एकत्र यायचे. थोडाफार सुका खाऊ पाणी पिऊन दोघेही सुटलो, पाठीवर वजन नसल्यामुळे भराभर अंतर कापले पण वाट कुठेच कड्याजवळ किंवा डोंगराजवळ जात नव्हती सरळसोट पदरातल्या वाटेलाच समांतर अशीच. दोघेही चौकात परतलो. एक गोष्ट मात्र नक्की लेणी समोरच्या जंगलातल्या पदराबाहेर बरोब्बर आम्ही होतो फक्त त्या वाटेतून लेणींकडे जाणारी जंगलात शिरणारी वाट अचुक हेरायची होती. पुर्ण वाटेवर चालताना आमचे लक्ष असून सुध्दा आम्हाला वाट मिळत नव्हती.
चौकातून पुन्हा आल्यावाटेने पदरात मुख्य वाटेला येऊन शेवटचा चान्स म्हणून पुर्वेकडे जायचे ठरवले, तसेही घोणदांडची सोंड त्याच दिशेला होती आणि तिथुनच आम्हाला चढाई करायची होती. दहा पंधरा मिनिटांतच मोकळ्या माळरानावर आलो इथेही पठारावरचे गवत जाळलेले वातावरणात तर चक्क उन्हाच्या झळा जाणवत होत्या हिवाळा असुनही हे हाल. कारण बहुधा त्याच आठवड्यात चेन्नईमध्ये आलेल्या वरदा वादळामुळे कदाचित हा परिणाम असावा. काही अंतर जात लक्षात आले हि वाट तर लेणींकडे न जात डोंगराला समांतर म्हणजेच घोणदांडच्या दिशेला जात आहे. घड्याळात पाहिले एक वाजत आला होता, आता मात्र निर्णय घेण्याची वेळ आली होती. सहाजिकच इतका वेळ आणि श्रम वाया गेले त्यात अशा वातावरणामुळे निराशेत जास्तच भर पडली, तिघेही घामाने पार ओले चिंब. घोणदांडच्या सोंडेकडे बघत असताना मला घोणदांडची सोंड सुरू होते ते पठार आणि आम्ही होतो त्या पठार या मध्ये छोटी दरी दिसली. अर्थातच याच वाटेने पुढे जाऊन ती दरी ओलांडून पुन्हा चढाई करून अथवा डावीकडे डोंगराला चिकटून वळसा मारत तिथे पोहचणे हाच पर्याय होता. एवढा वेळ खर्च करून ही त्या बोडक्या सोंडेवरची चढाई आणखी दम काढणार यात शंका नाही.
हा सगळा मामला विवेक आणि विनायकला समजावून सांगितला. चर्चेअंती मी पुन्हा माघारी जात नियोजन बदलून नाळेच्या वाटेने चढाई करायचा निर्णय घेतला.
याला मुख्य कारण सहाजिकच आत्ता पर्यंत खर्च झालेला वेळ आणि श्रम, तसेच आम्ही होतो तिथून पुन्हा वेगाने माघारी परतून तासाभरात धनगरवाडा सहज गाठू शकत होतो आणि नाळेची चढाई हि जरी उभी आणि छातड्यावरची असली तरी कमी वेळात आम्ही केवणीत पोहचनार सरळसोट जास्त वापरातली वाट असल्यामुळे चुकण्याचा प्रश्न नाही सहाजिकच वेळेची बचत, सर्वात महत्वाचे म्हणजे नाळेत असलेला झाडोरा ज्यामुळे उन्हाचा त्रास नाही जो घोणदांडला होता.
एका झाडाखाली घरून आणलेला दुपारच्या जेवणाचा डबा संपवला. एखाद्या किल्ल्याची वाट सापडणे सोपे पण लेणी शोधणे हे महाकठीण काम हे कुठंतरी वाचलेले आठवलं. वाटेत पुन्हा नाळेच्या वाटेतून येणारा ओढा आडवा आला त्याच्या जवळून उजवीकडे एक वाट त्याच नाळेच्या दिशेने गेली पण शॉर्टकटच्या नादात पुन्हा चुकामुक आणि वेळ दडवायचा नव्हता भर दुपारी धनगरवाड्यात परतलो.
सकाळचे चित्र सामोरे आले सहज आवाज दिला काही वेळात दोन म्हातार्या आजीबाई बाहेर आल्या. सकाळपासून घडलेले नाट्य त्यांना सांगितले, ते म्हणाले लेणीतला माणुस (बहुतेक फॉरेस्ट किंवा पुरातत्व खात्यातला) ती वाट आणि मधली वाढलेली झाडी साफ करनार होता पण काय झाले काय माहित. असो, आमच्याकडचा उरलेला जेवणाचा डबा खाण्यासाठी सोबत पाणी मिळेल का विचारले तर आजी म्हणाल्या पाणी जवळ नाही पाणी पार खाली उतरून खडसांबळ्यात हापशी वरून आणावे लागते हे उत्तर ऐकून आम्ही चाटच पडलो. एवढी दमछाक झाल्यावर पुन्हा खाली खडसांबळ्यात जाऊन पाणी आणायची ईच्छा आम्हा तिघांमध्ये नव्हती आणि अर्थातच अशा स्थितीत त्या वृध्द आजींच्या घरातून पाणी घ्यायचा प्रश्नच नव्हता. पटकन तसेच दोन घास पोटात ढकलून तिघांकडचे पाणी साधारण सहा लीटर शिल्लक होते सरासरी दोन लीटर प्रत्येकी एवढ्या पाण्यातच केवणीपर्यंत मजल मारायची होती.
आजींचा निरोप घेऊन सरळ दिशेने एक दांड चढून मोकळ्या पठारावर आलो इथेच डावीकडून ठाकुरवाडी-खडसांबळे कडून येणारी वाट एकत्र आली. समोरच्या डाव्या सोंडेवरून चढाई करून नाळेतून थेट वर केवणीत, या पठारावरचे गवत सुध्दा जाळलेले अतिशय भकास वाटत होते.
सोंडेजवळ आल्यावर ठाकुरवाडीतले एक गुराखी भेटले. सकाळपासून लेणींसाठी भटकताना कुणीच नजरेस पडले नाही आणि आता योग्य वाटेवर आहोत तर समोर हे अवतरले, खऱच किती विचित्र. नाळेतला मोठा ओढा उजवीकडे ठेवत सोंडेवरून चढाई सुरू झाली. सुरूवातीची झाडी विरळच पण नाळेत बर्यापैकी जंगल होते. खड्या चढाईची एकदम मळलेली वाट.
पुढे उजवीकडची आडवी वाट पार करत नाळेच्या मुखाशी आलो मागे वळून पाहिले तर आम्ही आलो ते झाडीभरले दांड आणि पाठीमागे दुरवर धनगरवाडा दिसत होता. वळसा घेत अरूंद नाळेतली तीव्र चढण सुरू झाली.
कुठे दगड धोंड्याचा मार्ग तर कुठे उजवी डावी नाळेतल्या कड्याला बिलगून वाट. या टप्प्यात विनायक आणि विवेकचा चढाईचा वेग खुपच मंदावला वेळेचे गणित पहाता फार आरामात जाणे परवडणारे नव्हते पण सकाळपासूनचे श्रम पहाता दमछाक होणे स्वाभाविक.
अल्प विश्रांती घेत गुळ चिक्की आणि संत्री खाऊन निघालो. शेवटच्या टप्प्यात वाट अगदीच अरूंद आणि ऊंच ऊंच कारवीचे जंगल झाडीभरला नाळेतली वाट शेवटी काटकोनात डावीकडे माथ्यावर तिरकी चढत गेली.
धनगरवाडा सोडल्यापासून बरोब्बर दोन तासात माथ्यावर दाखल झालो समोरच सुधागड तेलबैला आणि घनगडाचे दर्शन झाले.
सायंकाळ होत आली होती तरी सुध्दा वारा किंवा एखादी झुळूक असे काही नव्हते. पुर्ण दिवस वातावरण एकदम खराब, माझ्यामते ट्रेक मध्ये तुमचा उत्साह तुमची मानसिक शारिरीक क्षमता या सर्व गोष्टींवर अनुकुल वातावरणाचा मोठा हातभार असतो.
चांगले मनसोक्त रेंगाळल्यावर पुढच्या पंधरा वीस मिनिटातच अगदीच छोट्या अथवा पाडा म्हणा हवं तर अश्या केवणीत पोहचलो.
वाटेत बंद पडलेली जिल्हा परिषदेची शाळा कारण गावात शाळेत जाणारे कुणीच नाही. एकमेव घर ‘ढेहबे’ कुटुंबियांचे ते आजी आजोबा त्यांची पाळलेली गाई गुरं. आजींनी लोटा भरून पाणी समोर ठेवले. पाणी पिऊन विचारपुस करून सुरक्षित ठिकाणी पहिले मुक्कामासाठी तंबु लावला.
नंतर अंधार पडायच्या आत जवळच्या कुंडातून स्वयंपाक आणि पिण्यासाठी पाणी घेऊन आलो. परत येताना पठारावरून मळभ दाटलेला सुर्यास्त पाहिला, चांगल्याच घडामोडीने भरलेल्या दिवसाची सांगता झाली.
तिघेही फुल्ल फ्रेश होऊन चहाच्या तयारीला लागलो. समोर ७५ वर्षीय ढेहबे आजोबा त्या संधीप्रकाशात २० किलो सामानाची गोणी एकोल्यातून घेऊन आले ते पाहून खऱच अवाक झालो. केवणी ते एकोले (घनगडाच्या पायथ्याचे गाव) हे अंतर साधारण तासा दिडतासाच्या चालीवर तिथवर चालत जाऊन दैनंदिन गरजेपुरते का होईना सामान आणताना ची कसरत पाहून, खऱच शहरात बसल्याजागी मिळणार्या सुविधेला पदोपदी नाव ठेवण्याची नाकं मुरडण्याची सवय असलेल्या वृत्तीच्या खुजेपणाची जाणीव होते. डोंगरात भटकताना येणारे असेच प्रसंग तुम्हाला आम्हाला जमिनीवर पाय रोवून उभे रहायला शिकवतात, वागण्यात एक नम्रपणा वाढीस लागून शहरी फालतू चंगळवाद, उदमाद, नासाडी हे सर्व कुठच्या कुठे पळून जातात... असो फार खोलात शिरत नाही. चहा, मग तंबु मध्ये शिधा सामानाची तयारी करून रात्रीच्या स्वयंपाकासाठी लागलो.
कांदा बटाट्याची रस्सा भाजी आणि मुगाची खिचडी तिघेच असून जेवण मात्र पाच जण जेवतील इतके होते. नंतर छान गप्पा रंगल्या त्यात विनायकच्या मोबाईलवर लता दिदीची लावलेली हळूवार आवाजातली सुमधुर गाणी रात्रीची शांतता छेदत होती खऱतर गाण्यानुसार गप्पांना उत येत होता. आकाश निरभ्र नव्हतेच, धुसर दुधी प्रकाशात घनगडापलीकडून चंद्र वर आला. काहीवेळातच निद्राधीन झालो विवेक तर थंडी नसल्यामुळे तंबुच्या समोर बाहेरच झोपला. पहाटेच्या सुमारास वारा वाहायला सुरूवात झाली. सकाळी तंबुमधून घनगड आणि माराठाण्याचा डोंगर.
बाहेर आलो तर आश्चर्य कालच्या तुलनेत वातावरण कमालीचे बदलले होते. वहात्या वाराने ते मळभ तो धुरकट धुसरपणा सर्व काही स्वच्छ करून टाकले. सकाळी ढेहबे आजींनी तांब्याभरून ताजे दुध दिले अर्थातच त्यामुळे चहा स्पेशल झाला दोन दोन कप चहा पिऊन पठारावर भटकायला निघालो. सकाळची कोवळ्या उन्हातली, ती गार वाराची झुळूक खुप सुखावून जात होती. त्या प्रकाशात तेलबैला घनगड मारठाण्याचा डोंगर चांगलेच चमकत होते.
वीसएक मिनिटांत केवणीचे पठार आणि एकोले यामध्ये जोडलेल्या चिंचोळ्या वाटेवर पोहचलो पलीकडे नजारा मात्र अवर्णनीय, वायव्येला सुधागड उत्तरेला डोंगरयात्राच्या मुखपृष्ठावर झळकलेला तेलबैला पासून सालटर खिंडीपर्यंत,
ईशान्येला घनगड तर आग्नेयला दूरवर घुटक्याचा पाळणा, आसनवडी, म्हातोबा डोंगर ते दक्षिणेला हिर्डीच्या पठारापासून ताम्हिणी घाटा पर्यंतचा मुलुख सहज नजरेत आला.
तसे भौगोलिकदृष्ट्या केवणी पठार घाटमाथा लगत असुनही रायगड जिल्ह्यात मोडते तर पलीकडे एकोले घनगड किल्ला, घुटका आसनवडी हे सर्व पुणे जिल्ह्यात. वाटेत एके ठिकाणी थांबून मनसोक्त फोटो काढले. सुधागड पासून तेलबैला ते सालटर खिंडी पर्यंतचा बराच भाग टिपता आला. केवणी आणि तेलबैला मधली दरी आणि काही घळी, समोरच भोरप्याची झाडीभरली नाळ सर्वच लाजवाब. नोव्हेंबर महिन्यात ‘ब्लॉगरर्स मीट’ च्या वेळी तेलबैला मुक्काम करून केलेल्या सवाष्णी आणि वाघजाई घाटाचा ट्रेक आठवला. परतल्यावर विनायकने एकदम चविष्ट असा उपमा तयार केला. ढेहबे आजींना उपमा देऊन, पोटभर खाऊन सामानाची आवराआवर, मुक्कामाची जागा व्यवस्थित साफ करून पाणीसाठा वगैरे भरून निघालो.
ढेहबे आजींनी नाणदांड्याच्या वाटी लावून दिले. तुरळक झाडी पार करत कड्याजवळ उभे ठाकलो. खाली पाच सहाशे मीटर सरळसोट उतार नजर खाली भिरभिरत सरळ खालच्या ठाकुरवाडीच्या जंगलातल्या धनगर वाडा मग पुढे ओढा पार करत थेट सुधागडाच्या टकमक टोकावर विसावली.
सुरूवातच अरूंद घसाराची पायवाट, खालची माती उकरून छोटे दगड बॉल बेरींग सारखे, आधाराला मोठी झाडी नव्हतीच. काही टप्प्यावर वाळलेल्या कारवीचा मानसिक आधार तेवढा होता. सावकाशपणे एक एक करून तो टप्पा पार केला पुढे व्यवस्थित दगडी वाट आणि जंगल लागले. सुरूवाताची वीसएक मिनिटे घसारात उन्हातून चालल्यामुळे जंगलात शिरताच एसी लावल्यासारखे वाटले. वाटेत ठाकुरवाडीतले वाघ मामा भेटले, केवणीत त्यांची गुरं आहेत त्या संबधी काही कामानिमित्त ते केवणीतून परतत होते. जंगलातली आडवी चाल संपवत थोडं मोकळवनांत आलो, समोरच भले मोठे महाकाय दांड. इथेही गवत जाळलेल्या खुणा होत्या.
पुन्हा वळणे घेत बरेच अंतर खाली आल्यावर, जंगलातल्या ओढ्याजवळ विसावलो. पाण्याची बारीक धार सुरू होती. केवणीतून इथे येई पर्यंत एक तास लागला.
चांगला दहा पंधरा मिनिटाचा ब्रेक घेऊन पुढचा जंगलातला पट्टा पार करून समोर येताच नजरेसमोर आले ते सुधागडाचे तटबुरूज आणि टकमक टोक.
मोकळ्या पठारावरची उजवीकडची धनगरवाड्याची वाट सोडून डावीकडे मळलेल्या वाटेने ठाकुरवाडीच्या दिशेने निघालो.
वाटेतला आणखी एक छोटासा पाणी असलेला ओढा पार करून उजवीकडे उतरणीला लागून ठाकुरवाडीच्या मुख्य नदीत आलो. फार खोल नाहीच, पण थोडेफार वहाते पाणी होते, अंघोळीचा ठराव पास झाला घामाने भिजलेल्या शरीराला तेवढीच तरतरी, लगेहाथ विवेकने पटकन चहाही तयार केला.
वाघ मामा चहा पिऊन भलतेच खुष झाले, गप्पांच्या नादात मला म्हणाले, ‘या एके दिवशी परत तुम्हाला नाळेने (भोरप्याच्या) वर तेलबैलाला घेऊन जाणार’. पुढे नदी ओलांडून ठाकुरवाडीचा चढ चढून आलो समोरच सुधागडाची ठाकुरवाडीतली शिडीची वाट आणि त्यामागे घाटावर तेलबैला
मागे वळून पाहिले तर केवणीचे पठार आणि आम्ही उतरलो ती नाणदांड घाटेची वाट अगदी मधोमध दिसत आहे.
ठाकुरवाडीतून साडेतीनची पाली एसटी आरामात मिळाली पुढे कनेक्ट साडेचारची खोपोली मग सहाची लोकल खोपोलीहून असा धरपकड प्रवास घडला.
केवणीचे पठार तिथल्या या सुंदर घाटवाटा अजुनही मनाला साद घालताय. खडसांबळे लेणीचा या वेळी काही योग नव्हता असेच मानावे लागेल, पण का माहीत कदाचित या मुळेच मला पुन्हा एकदा लवकरच घोणदांड घाट- खडसांबळे- डेर्या घाट असा ट्रेक करावा लागेलच.
मनात आराखडा तयार आहेच... भेटू पुन्हा एकदा...
योगेश चंद्रकांत आहिरे.

फोटो साठी हे पहा : http://ahireyogesh.blogspot.com/2017/01/kevani.html

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ब्लॅागमधले फोटो पाहिले. त्या वाटा आणि ते सुधागडकडचे डोंगर भारी फसवे आहेत. ठाणाळेनी असंच फसवलय मला. गावात आल्यावर तांब्याभर पाणी मिळाले. अजून हवे होते पण तेच म्हणाले टँकर आला की मिळते. एक मोठा ड्रम भरलेला दिसला. त्यातले सकाळच्या कामाला वापरतो म्हणाले. पण तहान एवढी लागलेली की त्यातले आठ लिटर प्यायलो.

अश्या जेव्हा वाटा चुकण्यासारख्या असतात, तेव्हा पहिल्यापासून नेमक्या वाटा आणि वळणे, त्यावरच्या खुणा आणि शक्य असल्यास नकाशा व फोटो दिले, तर नंतर जाणार्‍यांना सोयीचे होईल.

@ कावेरी - गुगल आणि पिकासा धोरण बद्दल्यापासून किचकट आणि वेळ ही खुप लागतोय निदान मला तरी

इकडे सहसा सामान्य भटके जात नाहीत त्यामुळे खुणा नसतात. > > > > दिनेशदा, Srd अगदी बरोबर बोलताय. कारण तेच फार कुणी या वाटेना जात नाही त्यात या पडल्या घाटवाटा. अगदी सुधागडवर जाणारे सुध्दा या वाटेबद्दल माहीती तशी कमीच.

उन्हाळ्यात मात्र ठाणाळे - केवणी या भागातल्या या घाटवाटा टाळाव्यात.

>>> पण तहान एवढी लागलेली की त्यातले आठ लिटर प्यायलो. <<< बापरे... पण खर आहे हे, अवस्था बिकट होते हे खरेच. Happy

योगेशराव, इथे अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद.

थोडे विषयांतरः (संदर्भः http://www.maayboli.com/node/61359 )
पण काय हो, तुम्ही म्हणा, इतरही काहि माबोकर आहेत, नियमित ट्रेकिंग करता, सह्यांद्रीतल्या विविध गडकिल्ल्यांवर जाता, तर तुम्हालाही पुढील अनुभव आलेच असतील ना? अशा सक्ति झाल्याच असतील ना?

"१. गडावर जाताना तुमच्याबरोबर भगवा झेंडा असायलाच हवा.
२. तुमच्या तोंडी फक्त आणि फक्त आणि फक्त शिवरायांचीच गाणी हवीत. त्याव्यतिरिक्त गाणी गाणा-यांना औरंगजेबाची अवलाद असे ठरवले जाईल.
३. शिववाघांच्या गस्तीचौकीवर आपापल्या सॅका उघडून दाखवाव्यात. तुमच्याकडे भले दारू सापडणार नाही, पण ज्युस, कोल्ड्रिंक, सूप, असे पातळ पदार्थही शिववाघांनी प्रमाणित केलेले असावेत. ती दारू नाही हे त्यांनी ठरवायला हवे.
४. तुम्ही विवाहित स्त्री असाल तर तुमच्या गळ्यात मंगळसूत्र हवे. कपाळावर कुंकू हवे. सवाष्णपणाची सर्व लक्षणे ठसठशीत दिसायला हवीत.
(तुम्ही अविवाहित स्त्री असाल तर तुम्ही गडावर यायचेच नाही किंवा कसे, याबद्दल अद्याप शिववाघांचा विचार झालेला दिसत नाही. पण तुम्ही भारतीय पोशाखातच यायला हवे.)
५. घसे ताणून बेंबीच्या देठापासून किंचाळत शिवाजी महाराज, जिजाऊ यांच्या घोषणा तुम्ही द्यायलाच हव्यात. मनातला आदर वगैरे शिववाघ ओळखत नाहीत.
६. गडावर मुक्काम करणार असाल तर तुमचे मोबाईल शिववाघांकडे जमा करावेत. तुम्ही सांगत असलेल्या माहितीची सत्यासत्यता ते तुमच्या घरी फोन करून पडताळून पहातील तसेच गडावरील तुमच्या वर्तनाबद्दल घरच्यांशी विचारविनिमय करीत रहातील.
७. सर्वात महत्वाचे म्हणजे याऊप्परही तुमच्या वर्तनात खोट आढळली, तर शिवभक्त, शिवभक्तिणी, शिववाघ, शिववाघिणी तुम्हाला बांबूचे फटके देतील, पण त्याबद्दल तुम्ही पोलिसांकडे तक्रार करायचे धाडस करू नये कारण ते तुमची तक्रार दाखलच करून घेणार नाहीत."

तुमचे अनुभवही वरील प्रमाणेच असतील, तर जरुर त्यास "वाचा" फोडाच राव... कायेना , या शिवभक्त, शिवभक्तिणी, शिववाघ, शिववाघिणींचा त्रास फारच वाढू लागलाय हल्ली असे काही जण म्हणताहेत... ! सत्य काय ते लोकांस कळलेच पाहिजे... सारी जनता तुमच्याकडे सत्य जाणून घ्यायच्या अपेक्षेने बघत आहे...

>>> समोर ७५ वर्षीय ढेहबे आजोबा त्या संधीप्रकाशात २० किलो सामानाची गोणी एकोल्यातून घेऊन आले ते पाहून खऱच अवाक झालो. केवणी ते एकोले (घनगडाच्या पायथ्याचे गाव) हे अंतर साधारण तासा दिडतासाच्या चालीवर तिथवर चालत जाऊन दैनंदिन गरजेपुरते का होईना सामान आणताना ची कसरत पाहून, खऱच शहरात बसल्याजागी मिळणार्या सुविधेला पदोपदी नाव ठेवण्याची नाकं मुरडण्याची सवय असलेल्या वृत्तीच्या खुजेपणाची जाणीव होते. डोंगरात भटकताना येणारे असेच प्रसंग तुम्हाला आम्हाला जमिनीवर पाय रोवून उभे रहायला शिकवतात, वागण्यात एक नम्रपणा वाढीस लागून शहरी फालतू चंगळवाद, उदमाद, नासाडी हे सर्व कुठच्या कुठे पळून जातात... असो फार खोलात शिरत नाही. <<<<
क्या बात है.... बाकी आख्खा गडकिल्ला, निसर्ग बघितले नाही, दिसले नाही तरी चालेल, पण हे बघायची समजायची नजर हवी... Happy

लिंबूटिंबूजी धन्यवाद.

थोडे विषयांतरः (संदर्भः http://www.maayboli.com/node/61359 )
पण काय हो, तुम्ही म्हणा, इतरही काहि माबोकर आहेत, नियमित ट्रेकिंग करता, सह्यांद्रीतल्या विविध गडकिल्ल्यांवर जाता, तर तुम्हालाही पुढील अनुभव आलेच असतील ना? अशा सक्ति झाल्याच असतील ना?
> > > > झाला प्रकार हा नक्कीच असमर्थनीय आणि दुर्दवी