यंदाच्या 'पिफ'ची काही आकर्षणं

Submitted by चिनूक्स on 3 January, 2017 - 13:58

महाराष्ट्र शासन व पुणे फिल्म फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं तेराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन १२ ते १९ जानेवारी, २०१७ या काळात पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांमध्ये करण्यात आलं आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा महाराष्ट्र शासनाचा अधिकृत चित्रपट महोत्सव आहे.

यंदा महोत्सवात आठ चित्रपटगृहांमध्ये, सोळा पडद्यांवर ऐंशीपेक्षा जास्त देशांतल्या अडीचशेहून अधिक चित्रपटांचे सुमारे साडेचारशे खेळ सादर केले जाणार आहेत.

यंदा जागतिक स्पर्धाविभागासाठी विविध देशांतल्या तब्बल एक हजार चित्रपटांनी प्रवेशिका पाठवल्या होत्या. त्यांपैकी स्पर्धेसाठी चौदा चित्रपट निवडण्यात आले आहेत. त्यांची नावं पुढीलप्रमाणे -

अनुक्रमांक. मूळ नाव - इंग्रजी नाव (निर्माते देश) - दिग्दर्शक

1 Zoologiya - Zoology (Russia) - Ivan I. Tverdovsky

2. Someone to talk to - Someone to talk to (China) - Yulin Liu

3. Uchenik - The Student (Russia) - Kirill Serebrennikov

4. Los Decentes - A Decent Woman (Argentina) - Lukas Valenta Rinner

5. Ma loute - Slack Bay (France) - Bruno Dumont

6. Ztraceni v mnichově - Lost in Munich (Czech Republic) - Petr Zelenka

7. The Land of the Enlightened - The Land of The Enlightened (Belgium) - Pieter-Jan De Pue

8. Plac Zabaw - Playground (Poland) - Bartosz M. Kowalski

9. Agnus Dei - The Innocents (France) - Anne Fontaine

10. Bar Bahar - In Between (Israel) - Maysaloun Hamoud

11. La Correspondencias - Correspondences (Portugal) - Rita Azevebo Gomes

12. Bezbog - Godless (Bulgaria) - Ralitza Petrova

13. Loktak Lairembee - Lady of The Lake (India) - Haobam Paban Kumar

14. Don’t Tell Orhan Pamuk That His Novel Snow Is In The Film I Made About Kars - Don’t Tell Orhan Pamuk That His Novel Snow Is In The Film I Made About Kars (Turkey) - Riza Sonmez

या विभागात महाराष्ट्र शासन - प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (रु. दहा लाख), महाराष्ट्र शासन - प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक (रुपये पाच लाख) व विशेष ज्यूरी पुरस्कार हे पुरस्कार दिले जातात. महोत्सवाच्या वतीने प्रेक्षक-पसंती लाभलेला उत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कारही दिला जातो.

महोत्सवात परीक्षक म्हणून यंदा अपर्णा सेन (भारत), प्रो. जेर्झी स्टर (पोलंड), गोरान पास्कलजेव्हिक (सर्बिया), जॉर्ज अर्यागादा (चिली), जेन्स फिशर (स्वीडन), गौरी रामनारायण (भारत), बेनेट रत्नायके (श्रीलंका) आणि नर्गिस अबायर (इराण) हे मान्यवर काम पाहणार आहेत. या परीक्षकांचे काही निवडक चित्रपटही महोत्सवात पाहायला मिळतील.

'पर्यावरण' ही यंदाच्या महोत्सवाची मध्यवर्ती संकल्पना आहे. या विभागात ७ आणि 'सोशल अवेअरनेस' या विभागात ५ चित्रपट दाखवले जातील.

स्पॅनिश नृत्यप्रकारांवर आधारलेल्या चित्रपटांच्या विभागात १३ चित्रपट दाखवले जातील.

फेदेरिको गार्सिया लॉर्का यांच्या साहित्यावर आधारित २ चित्रपट दाखवले जातील.

जागतिक चित्रपटविभागात (ग्लोबल सिनेमा) यंदा कान, बर्लिन, टोरन्टो, म्यूनिख, रोटरडॅम यांसारख्या महोत्सवांतर्गत वाखाणल्या गेलेल्या ८६ चित्रपटांचा समावेश असेल.

फ्रान्समधल्या तरुण, नव्या दमाच्या दिग्दर्शकांचे २०१५ साली प्रदर्शित झालेले पाच चित्रपट 'टुडेज टॅलेन्ट फ्रॉम फ्रान्स' या महोत्सवात बघता येतील.

'कण्ट्री फोकस' या विभागात यंदा अर्जेंटिना आणि व्हिएतनाम या दोन देशांत तयार झालेले चित्रपट असतील. अर्जेंटिनाचे १० आणि व्हिएतनामचे ५ चित्रपट या विभागांत दाखवण्यात येतील.

'कॅलेडिओस्कोप' विभागात इजिप्त, अमेरिका, तायवान, श्रीलंका, इटली, बेल्जियम, नॉर्वे, कतार, युनायटेड किंग्डम, बोस्निया या देशांतले २५ चित्रपट असतील.

यंदाच्या महोत्सवात आशियाई चित्रपटांचा वेगळा विभाग असून त्यात चीन, भूतान, इस्रायल, इराण, फिलिपीन्स आणि अजरबैजान या देशांतले ७ चित्रपट दाखवण्यात येतील.

'इंडियन सिनेमा' या विभागात ९ भारतीय चित्रपट दाखविण्यात येतील.

'रेट्रोस्पेक्टिव्ह' विभागामध्ये या वर्षी ज्यांचं निधन झालं, त्या पोलंडच्या प्रख्यात दिग्दर्शक आन्द्रे वायदा यांचे ७ चित्रपट आणि भारतीय दिग्दर्शक अपर्णा सेन यांचे ५ चित्रपट दाखविण्यात येतील.

'ट्रिब्यूट' या विभागात चित्रपटसृष्टीतील या वर्षी दिवंगत झालेल्या सहा चित्रकर्मींचं कर्तृत्व अधोरेखित करणारे चित्रपट दाखवण्यात येतील. अब्बास किआरोस्तमी, राजेश पिल्लई, अनिल गांगुली, माइक निकोल्स आणि जयललिता यांना या चित्रपटांद्वारे श्रद्धांजली वाहण्यात येईल.

याबरोबरच 'जेम्स फ्रॉम एनएफएआय' या विभागात सहा पुनरुज्जीवित चित्रपट दाखविण्यात येणार आहेत, तसंच फिल्म्स डिव्हिजननं तयार केलेल्या चित्रपटांचा वेगळा विभाग असेल.

याबरोबरच यावर्षी महोत्सवात आयोजित होणार्‍या 'पिफ बाझार'अंतर्गत 'दादासाहेब फाळके पॅव्हेलियन' उभारलं जाणार आहे. कोथरुडातल्या सिटिप्राईड चित्रपटगृहाच्या मागच्या बाजूला हा ’पिफ बझार’ असेल. 'पिफ बझार'मध्ये महोत्सवाच्या प्रायोजकांचे स्टॉल्स् तर असतीलच, याबरोबरच चित्रपटांशी संबंधित कार्यशाळा व चर्चासत्र यांचं आयोजनही करण्यात येणार आहे, ज्यामध्ये अनेक मान्यवर चित्रपटांविषयीची त्यांची मतं उपस्थितांसमोर मांडतील. याशिवाय या ठिकाणी चित्रपटक्षेत्राशी निगडीत असलेल्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र असं व्यासपीठही उपलब्ध करून देण्यात येणार असून ते आपली कला सादर करू शकणार आहेत. या ठिकाणी महोत्सवासाठी नोंदणी न केलेल्यांनाही प्रवेश असेल.

यंदाच्या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे लेखक, निर्माते आणि तंत्रज्ञ यांच्यासाठी खास कार्यशाळा अयोजित करण्यात आल्या आहेत. या कार्यशाळा केवळ महोत्सवापुरत्या नसून वर्षभर त्या सुरू राहणार असून पुढच्या वर्षीच्या महोत्सवात कार्यशाळांमध्ये सहभागी झालेल्यांच्या कामाचा आढावा घेतला जाईल.

याशिवाय अनेक परिसंवाद, मुलाखती हे कार्यक्रमही अर्थातच असतील.

महोत्सवात दाखवले जाणारे मराठी चित्रपट, जीवनगौरव पुरस्कार, विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यान यांची घोषणा ९ जानेवारी रोजी केली जाईल.

महोत्सवासाठी नावनोंदणी सुरू झाली असून दरवर्षीपेक्षा यंदा अधिक प्रतिसाद आहे. त्यामुळे महोत्सवास हजेरी लावू इच्छिणार्‍यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी.

’पिफ'ला दरवर्षी अनेक मायबोलीकरांची हजेरी असते. यंदाही या महोत्सवात मायबोलीकर धमाल करतील, हे नक्की!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पिफ ला शुभेच्छा !! सगळेच चित्रपट चांगले वाटत आहेत. In Between (Israel) आणि Lady of The Lake (India) मध्ये चुरस असेल असे वाटते. कोण विजेता ठरले ते कळव चिनूक्स.

यंदाच्या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे लेखक, निर्माते आणि तंत्रज्ञ यांच्यासाठी खास कार्यशाळा अयोजित करण्यात आल्या आहेत. या कार्यशाळा केवळ महोत्सवापुरत्या नसून वर्षभर त्या सुरू राहणार असून पुढच्या वर्षीच्या महोत्सवात कार्यशाळांमध्ये सहभागी झालेल्यांच्या कामाचा आढावा घेतला जाईल.

>>>

याविषयी अधिक माहिती कुठे मिळेल?

फ्लेम युनिव च्या विद्यार्थ्यांना महोत्सवाचा आणि ह्या कार्यशाळांचा भाग घेणे फार उपयोगाचे ठरेल. तिथे एक फिल्म क्लब आहे तर त्यांना ही माहिती पोहोचवता येइल का? काही पोस्टर किवा इमेल असल्यास?
छानच ट्रीट आहे. कार्यशाळा हे चांगले पाउल आहे. मुले डॉकु मेटरी बन वणे, स्क्रिप्ट लिहीणे स्टे ज ला आहेत.

Don’t Tell Orhan Pamuk That His Novel Snow Is In The Film I Made About Kars

>>> इंटरेस्टिंग!!

आदुबाळ,

कार्यशाळेचा फॉर्म इथे आहे - http://imepl.net/pbworkshop/
माहितीही तिथेच मिळेल.

कार्यशाळा १३-१८ जानेवारी या काळात आहे. ती मोफत आहे.

अमा,

माझ्या समजुतीनुसार फ्लेमचा महोत्सवात सहभाग असतो. पुण्यातल्या सगळ्या कॉलेजांमध्ये महोत्सवाची माहिती पोचवली जाते. पुणे विद्यापीठ, डी, वाय. पाटील विद्यापीठ, भारती विद्यापीठ, एमआयटी अशा संस्था महोत्सवाच्या आयोजनात सहभागी असतात.

खूप छान माहिती , हि माहिती share केल्याबद्दल धन्यवाद. website वर १५वा फिल्म फेस्टिवल असं दाखवत आहेत. तुमच्या लेखात ( तेराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन ) असं आहे.

धन्यवाद. फ्लेम मध्ये माहिती पोहोचली आहे. मुले प्लॅन करत आहेत. २१-२२ जानेवारीला तिथे रजत कपुर दिग्दर्शित शेक्स्पीअर्चे प्लेज आहेत.