पाउसकाका

Submitted by वृन्दा१ on 1 January, 2017 - 12:55

तीर्थरुप पाऊसकाका,
शिरसाष्टांग नमस्कार. पूर्वी असंच लिहिण्याची पद्धत होती ना? एकतर पत्राचा मायना काय लिहावा हाच मोठा प्रश्न होता. नुसता नमस्कार उद्धटपणा वाटला असता, हाय वगैरे तुम्हाला आवडलं नसतं आणि लव्ह यू, मिस यू, सी या, बबाय असं काही लिहिलं असतं तर तुम्ही लाल-पिवळेच झाला असतात. अर्थात त्या निमित्ताने तुम्ही आला तरी असता. पण पुन्हा गायब झाला असता म्हणजे? शिरसाष्टांग नमस्कारवरून आठवलं, आजकाल असा नमस्कार कुठं होत तरी असेल का हो? वयस्कर लोक म्हणजे नसता ताप असा विचार करणाऱ्या, हा ताप फार फार नकोसा झाल्यावर त्यांना वृद्धाश्रमात ढकलणारी माणसंही याच जगात आहेत ना पाऊसकाका. पैशाला मूल्य राहिलं नाही आणि माणसाला किंमत. आजकाल नमस्कार घातला जातो तो फक्त स्टेजवरच. नेत्यांना घातला जाणारा हा नमस्कार प्रेक्षणीय विनोद असतो हं काका. साहेबांच्या गुडघ्याजवळच्या कुडत्याला स्पर्श करण्याचा आभास तयार करायचा आणि त्याच वेळी मोबाईलनेही नमस्कार घालू नये म्हणून त्याला, पर्यायाने डाव्या खिशाला, घट्ट पकडून वाकायचं, परत फोटो चांगला येईल अशी पोझ पण त्याचवेळी द्यायची म्हणजे सराव पाहिजेच. असल्या डान्स स्टेप्सचा खेळ पाहताना मन खिन्न होतं हो पाऊसकाका. फार फार उदास वाटतं. अहो, शेतकरी आत्महत्या या विषयावर जोक मारणारे हे करंटे स्वतःचं सोडून कुणाचंच भलं करत नाहीत. नवल वाटतं की तोंड वर करून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाशी हे डोळे तरी भिडवू शकतात? त्यावर ताण म्हणजे त्यांचे खोटा खोटा शोक करण्याची पोझ घेतलेले फोटो पेपरवाले तरी का छापतात ? त्या शेतकऱ्याची विधवा टक्क कोरड्या डोळ्यांनी, रिकाम्या नजरेने या जोकर लोकांकडे पाहते त्याचे का नाही छापत? कुत्रे,माकड,डुक्कर,गाढव यांना आम्ही विनाकारण बदनाम का करतो? माणूस हा एकमेव अपवाद वगळता बाकी प्राणी त्यांच्या त्यांच्या नैसर्गिक गुणांप्रमाणेच तर वागतात. कुत्र्याच्या प्रामाणिकपणाची आणि निष्ठेची तर माणूस विचारातही बरोबरी करू शकत नाही. त्यांची भाषा आपल्याला समजत असती तर ‘माणूस कुठला...’ अशा कॉमेंटस् आपल्याला रोज हजारो वेळा ऐकाव्या लागल्या असत्या. पाऊसकाका, कुणालाच जीव देण्याची हौस नसते हो. परिस्थितीच्या झळांनी जीव कोंडल्यावर, सहनशक्तीच्या सगळ्या सीमा तुटल्यावर, मनाची रोज रोज होळी झाल्यावर, आपल्या कुटुंबाचं शेवटी होणार तरी काय या चिंतेनं डोकं फुटायला आल्यावर आणि सगळं असह्य होण्याच्या मैलोगणती पलीकडे गेल्यावरच माणूस जीव देत असेल ना. जीव कुणाला प्यारा नसतो? आणि कुटुंब? आणि तुमचं काय पाऊसकाका? हो. तुमचं काय? लेकरानं चुका केल्या तरी कुठले आईबाप त्याला मारूनच टाकतील? आई पोराला रागावेल, फार तर एखादा फटका देईल पण जरा वेळानं त्याला आपल्या हातानं जेवू घालील. बाप एकदोन शिव्या देईल,एकाऐवजी दोन फटके देईल पण कामावरून येताना पोराला खायला काहीतरी आठवणीनं आणील.
तुम्ही आमचे मायबापच आहात नं? आम्ही चुकलो आहोत, खूप खूप चुकलो आहोत. निसर्गाची आम्ही धूळदाण केली, पाण्याचं मोल आम्ही जाणलं नाही, आम्हाला जेवू घालणाऱ्या जमिनीचं आम्ही आमच्या हातांनी वाटोळं केलं, आम्ही जंगलं उजाड केली, आम्ही नदीत वाळू ठेवली नाही. आम्ही स्वार्थानं आंधळे झालो पाऊसकाका. सगळं सगळं खरं पण तुम्हाला असं नाही वाटत की चुका एकाच्या आणि शिक्षा भलत्यालाच असं झालंय? जे पाणी प्यावं तितक्या सहजतेनं परदेशात जातात त्यांना तुम्ही आलात काय आणि नाही आलात काय, काय फरक पडतो पाऊसकाका? अहो, ज्यांनी जनावरांचा चारा खाल्ला,रस्ते खाल्ले, धरणं खाल्ली, वाळू खाल्ली, नदयातला गाळसुद्धा खाल्ला, त्यांना तुमच्या असण्यानसण्यानं खरंच काय फरक पडतो? माणसाला प्रचंड मोठा भ्रम झालाय हो की तो काहीही विकत घेऊ शकतो. त्याला आपण काहीही खाऊ शकतो याचीच इतकी मस्ती आलीय की त्या बावळ्याला समजतच नाही की पैशानं सगळं नाही खरेदी करता येत. खरं तर काहीच खरेदी नाही करता येत. जाऊ दया. तुम्हाला तरी किती पीळ मारायचा? खरंतर तुम्हाला आम्हा माणसांच्या वतीनं शपथ घालायची होती पण तेही तुम्हाला पटणार नाही. डीजेला आवाज वाढव म्हणून आम्ही आईची शपथ घालतो हे तुम्हाला माहित आहेच. पाऊसकाका, तुम्हालाही माहित आहे की असंच चालत राहिलं तर येणाऱ्या पिढ्यांना पाऊस कसा असायचा हे यूट्यूबवर दाखवावं लागेल आणि ती पोरं चकित होऊन ‘ऑस्स्म... ऑस्स्म’ करत राहतील. असं करू नका पाऊसकाका. आम्हाला माफ करा. लवकर या. खूप खूप लवकर या. अजून काय लिहिणार?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वृंदावन,
लेख वाचायला सुरवात तर केली, पण थांबलो, नंतर पूर्ण वाचेनही,

पण तुम्हाला एक सुचवावेसे वाटते:
लेखात परिच्छेद आणि ओळींमध्ये योग्य ते अंतर ठेवुन संपादीत करा.

वृंदा, तुमची वरील पहिली पोस्टपण तुम्ही बदलु शकता.
तुमच्या पहिल्या पोस्टमध्ये सुरवातीला उजवीकडे "अवलोकन" आणि "संपादन" हे दिसेल.
संपादनवर क्लिक करा.
हवे ते बदल करा.

आणि सेव्ह करा.

यालाच संपादित करा असे म्हणतात.