लोकरंग - लोकसत्ता रविवार पुरवणी

Submitted by सारेग on 1 January, 2017 - 08:44

दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी शनिवार-रविवारच्या पुरवण्यांमध्ये नवीन सदरे सुरु झाली आहेत. सगळ्या वर्तमानपत्रांच्या पुरवण्या वाचणं मला जमत नाही पण लोकसत्ताच्या शनिवार - रविवारच्या पुरवण्या मला आवडत असल्यामुळे वाचतेच. नवीन वर्षं आलं की आता कोणते नवीन लेखक, नवीन विषय असणार याची उत्सुकता असते, तशी ती आजही होतीच. पुरवणी चाळत असतांना मंदार भारदे यांच्या 'बघ्याची भूमिका' या सदरापाशी थांबले, त्याच्या शीर्षकाने 'क्या मेरी बात भरडे जी से हो रही है?' अंदाज आला नाही पण उत्सुकता वाटली. सदरच्या माहितीवरून हे सदर आपल्या आजूबाजूच्या असणाऱ्या व घडणाऱ्या गोष्टींवर खुसखूषीतपणे टिप्पणी करणारे सदर आहे कळल्यावर वाचायालाच घेतले आणि आहाहा! हे सदर एकदाही वाचायला चुकवायचे नाही असे ठरवले. अरे धमाल! एकदम धमाल! irritating unwanted calls हा काय विषय आहे? पण जबरदस्त मांडला आहे.
अश्या प्रकारचे लेखन वाचायला मुळात मला आवडते; अगदी ललित मधल्या 'ठणठणपाळ' पासून मी ते वाचत आले आहे. महाराष्ट्र टाइम्स मधील 'तंबी दुराई ', सकाळ मधील 'ब्रिटिश नंदी' हे ही मी जमेल तसे वाचते. या पद्धतीचं लेखन तुमच्या भोवती घडणाऱ्या घटनांवरची मार्मिक प्रतिक्रिया असते आणि वाचणाऱ्याला ती इतकी भावते की त्याला ती स्वतःचीच प्रतिक्रिया वाटावी. त्या घटनांनी तयार केलेला ताणतणाव हा क्षणात नाहीसा होतो आणि त्या घटनांकडे तुम्ही हलक्याफुलक्या नजरेने बघू शकता. ब्रिटिश नंदी यांनी सकाळ मध्ये जेव्हा पहिल्यांदा सदर सुरु केलं होतं तेव्हा त्यावेळचे अर्थमंत्री आर. आर. पाटील हे बरेचदा त्यांच्या लिखाणाचे विषय असायचे. पण त्या पदाचा मान आदर जराही कमी न करता जे काही लेखन झालं ते फारच छान होतं. अर्थात या पद्धतीच्या लेखनात एक होऊ शकतं की हे लेखन तत्कालीन घटना, घडामोडीवर असल्यामुळे नंतर काही वर्षं गेल्यानंतर ते किती ताजं वाटेल माहित नाही. जसं आर. आर. पाटलांचा कार्यकाळ पंधरा - वीस वर्ष्यानंतर मला माहीतच नसेल तर मला हे लेखन खुसखुशीत वाटेल का? असो. पण आजवर हे लेखन मला खूप आवडले. आज हा लेख लिहिताना लेखकाची जी भट्टी जमली आहे ती दर रविवारच्या लेखात जमो.
खरं तर चतुरंग आणि लोकरंग वर स्वतंत्र पणे लिहावे अश्या या दोन्ही पुरवण्या आहेत पण हा लेख वाचल्यावर राहवले नाही म्हणून आज एवढेच.

[लेख वाचल्यावर मंदार भारदे हे मायबोलीचे सदस्य असावेत अशी दाट शंका आली ]

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जसं आर. आर. पाटलांचा कार्यकाळ पंधरा - वीस वर्ष्यानंतर मला माहीतच नसेल तर मला हे लेखन खुसखुशीत वाटेल का
>>>

या प्रकारच्या लिखाणाला ही मर्यादा असतेच. निवडक ठणठणपाळ वाचताना हे जाणवते. अर्थात त्यामुळे ह्या लिखाणाचे मूल्य कमी होत नाही.
तुम्ही कलंदर अशोक जैन विसरलात

सहमत. दोन्ही पुरवण्या वाचनीय असतात. प्रत्येक जानेवारीत नव्या सदरलेखकांबद्दल उत्सुकता असते. केवळ त्या पुरवण्यांसाठी घरी शनि-रवि ज्यादा लोकसत्ता येतो. त्या त्या दिवशी वेळ मिळाला नाही, तर साठवून वाचल्या जातात पुरवण्या.
पूर्वी मोहसिना मुकादम, अच्युत गोडबोले लिहायचे तेव्हा आवडायला लागली चतुरंग. अलिकडचं अमृता सुभाषचं सदर छान होतं. लोकरंगची गोडी अरुण टिकेकरांच्या स्थल-कालपासून लागली. दोन्हीकडे लेखकांमध्ये, विषयांमध्ये चांगलं वैविध्य राखलंय.
[सकाळने उत्तम कांबळे, संदिप वासलेकर आणि काही टिपिकल सदरांची पुनरावृत्ती का चालवली आहे, कोण जाणे.]

तंबी दुराई म्हणजे दोन फुल एक हाफ वाले ना? हे सदर लोकसत्ता मधे असायचं ना?>>>> हो आधी ते लोकसत्तामध्ये लिहीत होते. त्यावेळी ते सदर जास्त छान वाटत होतं.

त्या त्या दिवशी वेळ मिळाला नाही, तर साठवून वाचल्या जातात पुरवण्या.>>> अगदी अगदी!

त्या त्या दिवशी वेळ मिळाला नाही, तर साठवून वाचल्या जातात पुरवण्या.>> खरंच!! मी ही दोन्ही पुरवण्या डोळ्याखालून घातल्याखेरिज रद्दी च्या ठिकाणी जाउ देत नाही आणि चुकुन माकुन गेलीच तर उपसून काढते !! मला लोकसत्ता चे अग्रलेख ही आवडायचे...पण आता ते जरा एकसुरी वाटतात...

लोक्सत्ता पुरवण्या म्हणजे ट्रीट असते. फार पूर्वी राजीव खांडेकर दर शुक्रवारी 'हार्ट-टू-हार्ट' लिहायचे ज्यात मला गणितज्ज्ञ श्रीराम अभ्यंकर, लावणीकलावंत गणपत पाटील, भन्नाट कर्वे या लेखातून-आनंद कर्वे अशा अनेकांबद्दल माहिती मिळाली.

शन्वारी जनरली कौटुंबिक विषय - लहान मुलं, शाळा, बालमानसशास्त्र, स्त्री-पुरूष संवाद/ सहजीवन/ घटस्फोट/ उत्तररंग असे विषय आणि या सगळ्याचा समाजावर होणरा परिणाम, शिवाय वेगळ्या वाटांवरून जाणर्‍या व्यक्ती, सामाजिक कार्य्क्रमांबद्दल माहिती वगैरे. त्यात अजून एक म्हणजे अच्युत गोडबोलेंचं 'अर्थात' हे सदर, मग त्यांचं त्यांची बहीण सुलभा पिशवीकर (?) यांच्याबरोबर लोहिलेलं नादवेध हेही असायचं. तंबी दुराईंचं दोन फुल एक हाफ तर मस्ट रीड होतं.

रविवार पुरवणीत राजकारण/ समाजकारण यावर करंट टॉपिक्सवर मुख्य लेख असत. अजूनही असतात बहुतेक. व्य्सनाधीनता-मुक्तांगण- ते सांस्कृतिक क्ष्रेत्रातल्या घडामोडी- ते अस्थिर आघाडी सरकार आणि भरडलेली जनता... असा खूप मोठा विषयांचा स्पेक्ट्रुम असायचा आणि ते वाचून अनेक दृष्टिकोनातून विचार कळायचे. पु ल गेले तेव्हांच्या सगळ्या पुरवण्या तर मी गेली अनेक वर्षं जपल्या होत्या. ३ वेळा घर बदलून झाल्यावर त्या गहाळ झाल्या

साधारण २० वर्षांपूर्वी त्यांची दर गुरूवारी युवा पुरवणी असायची जी अर्थातच युवासंवेदना विषयावर होती. मी त्यावेळी किशोर-कुमार वयाची असूनही वाचून काढायचे Wink
मग चतुरा अंक सुरू झाला होता. पेप्सोडंट मॉम ऑफ द मंथ वगैरे असायचं! पण नंतर तो फारच पेज थ्री टाईप झाला. म्हणजे अगदीच ऊठसूट मेकप टिप्स, हाय सोसायटी महिलांचं रोजचं जगणं वगैरे गप्पा झाल्या त्या मग लोकसत्ता नेच तो बंद केला.

टोटल नॉस्टॅलजिया!!

मौजेच्या दिवाळी अंकात शुभदा चौकर यांनी अरुण टिकेकरांवर लिहिले आहे. या बहुतेक पुरवण्या त्यांनीच सुरू केल्या. त्यामागचा त्यांचा विचार काय होता तेही लिहिले आहे. शुभदा चौकर उपसंपादक असणार तेव्हा.

अभिनेत्यांपैकी आतापर्यंत शुभांगी गोखलेंचं सदरच आवडलंय.
सई तांबें (सोशल वर्करची डायरी की असंच काहीतरी).
अशोक नायगावकरांचं सदरही अलाणेफलाणे शैलीत असायचं. त्यांची शाकाहारातल्या हिंसाचाराबद्दलची कविताही इथेच आधी वाचलेली.
शन्नांचं सदर या काळातलं की आधीचं ते आठवत नाही. पण त्यांचे अनेक लेख लक्षात आहेत.

ही चटकन आठवलेली. अशी अनेक आहेत.
यातल्या अनेक सदरांची पुस्तकं छापली गेलीत आणि ती मुंमग्रंथसंग्रहलायत दिसतात.

खरंय भरत, आणि शुभदा चौकर तेव्हा स्वतःसुद्धा भरपूर लिहायच्या.
शंना बहुतेक २००३ च्या आसपास लिहायचे.

मौजेचा यंदाचा दिवाळी अंक का?

शुभदा चौकरांचे लेख आवडायचे. अशोक नायगावकरांचं 'प्रिय तातूस.... ....तुझाच, अनंत अपराधी' वाचायला मजा यायची. शैलजा शेवडे, राणी दुर्वे एक सदर लिहायच्या, नाव नाही आठ्वत अत्ता. गौरी आणि महेंद्र कानेटकरांचेही लेख एके वर्षी होते शनिवार पुरवणीत.

दोन वर्षांपुर्वी मृदुला दाढे जोशी, रहे ना रहे हम.. हे संगीतकारांबद्दल अप्रतिम सदर चालवत होत्या. ते पुढे चालू रहायला हवे होते.

बिनिवालेंच्या सदराचे पुस्तक आले आहे ( न्याहारी ) पण त्यांच्या भाषाविषयक लेखनाचे आले आहे का ? सुमन बेलवलकर पण लिहित होत्या, भाषेबद्दल.

अशोक रानडे यांचे पण गायकांबद्दल सदर होते.

हो, अशा खूपशा सदरांमधून उत्तम लिखाण होतं. कलंदर आणि ठणठणपाळ ही सर्वोत्तम म्हणता येतील अशी सदरं. टांकसाळेंनी पण अशी चांगली सदरे चालवली होती (आनंद पुणेकर, मुका म्हणे, इ)

पण त्या भारदेंचा लेख अत्यंत सुमार आणि बळंचकर इनोदी वाटला. मुळात पु लं च्या 'शेजार्‍याच्या रेडिओचा त्रास करून घेण्याऐवजी माझ्यासाठीच रेडिओ लावलेला आहे असा समज करून घेतो...' अशा अर्थाचं एक (बहुदा हसवणूक मधे - चुभूद्याघ्या) वाक्य आहे त्याची री ओढून लिहिलेला आहे.

मंदार भारद्यांनी अशाप्रकारचं लेखन का करावं, हे कळलं नाही. ते इतकं वेगळं आणि मोठं काम करतात, त्याबद्दल त्यांनी लिहिलं तरी वाचनीय होईल.

चिनूक्सशी सहमत. लोकसत्ता विविध क्षेत्रांतील लोकांना लिहितं करायचा प्रयत्न करते आहे बहुतेक. निखिल रत्नपारखींनी लिहिलेलं सदर अधून मधून वाचनात आलं होतं. तेही अगदीच सोसो होतं.

दोन वर्षांपुर्वी मृदुला दाढे जोशी, रहे ना रहे हम.. हे संगीतकारांबद्दल अप्रतिम सदर चालवत होत्या. ते पुढे चालू रहायला हवे होते.>> दिनेशदा, मृदुला दाढे जोशी ही माझी बहिण आहे. आणि ह्या सदरात प्रसिद्ध झालेल्या लेखांमध्ये भर घालून त्याचे पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे!

लोकसत्ताची लोकरंग पुरवणी ही खूप जास्त विलग (alienated) झाली आहे असं वाटतं मला. म्हणजे लोकरंगचा मुखपृष्ठावरचा लेख हा सद्य विषय सोडून कोणत्यातरी तिसऱ्याच थोड्याश्या बिनमहत्वाच्या विषयावर आहे असे बरेचदा झालेले आहे. शिवाय सदरांच्या विषयातील नाविन्य देखील कमी आहे (यंदा माहिती नाही अजून). स्मरणरंजनाकडे झुकणारे असे लेख जास्ती असतात. त्यामानाने चतुरंग अजूनही खूप वाचनीय असते. तरीही चतुरंग = रूप बदललेली चतुरा पुरवणी असं वाटतं बरेचदा.

शिवाय सदरांच्या विषयातील नाविन्य देखील कमी आहे (यंदा माहिती नाही अजून). स्मरणरंजनाकडे झुकणारे असे लेख जास्ती असतात. >>> +१

तरीही चतुरंग = रूप बदललेली चतुरा पुरवणी असं वाटतं बरेचदा. >>> +१००.

जिज्ञासा, हे पुस्तक आल्याबरोबर मला कळवा प्लीज... माझ्याकडे अजून ते लेख आहेत, त्यात त्यांनी लिहिले होते त्या परत लिहिणार आहेत, पण नंतर कधीच त्यांचे लेखन वाचायला मिळाले नाही.

फार पूर्वी चतुरंग मध्ये एक बाई australia बद्दल सदर लिहायच्या. त्यांचा मुलगा तिथे होता. फार विनोदी लेख असायचे.
२००७ च्याही आधी. प्लीज कोणाला आठवतंय का..त्यांचं पुस्तक असेल तर सांगा प्लीज!

बर्याच वर्षांपुर्वी महाराष्ट्र टाईम्स सगळ्यात जास्त वाचनीय समजला जायचा पण आता तुलनेत लोकसत्ता जास्त चांगला असतो. वैचारीकतेचा विचार करायचा तर ती कमी झाली आहे असं वाटतांंच कुणी एखादा नवा लेखक छान लिहून जातो.
एखाद्या चांगल्या सदरातला एखाद दुसरा लेख बिघडतोही. मी वर म्हणल्या प्रमाणे शाश्वत विचांरांवर कमी लिहीण्याचा भर आहे. ठणठणपाळ, राजधानीतुन आणि ब्रिटीश नंदी यातुन नीवडताना तुम्ही काय निवडता यात सगळं आलं.

गांधी आडवा येतो नाटकाचे लेखक शफाअत खान यांनीही लोकसत्ताच्या पुरवणीत उपरोधिक लेखांचं एक सदर चालविल्याचं आठवतं.