नसावी अंधश्रद्धा असावे श्रद्धास्थान

Submitted by यःकश्चित on 28 December, 2016 - 10:59

नसावी अंधश्रद्धा असावे श्रद्धास्थान
===========================

असे देव किंवा नसे तो जरीही,
परी राहू दे तुला याचे भान |
तुझे बंद डोळे उघड आज वत्सा,
नसावी अंधश्रद्धा असावे श्रद्धास्थान ||

कुणाच्या शिरी वा कुण्या मंदिरासी
दुग्धगंगा सहस्त्रे घटे वाहिली,
वाहून त्यात गेली त्यांची विवेकबुद्धी
मस्तके रिकामी घटे राहिली |
कुण्या वंचिता वा कुण्या पामरासी
करोनी पाहावे यथाशक्ती दान,
तुझे बंद हस्त उघड आज वत्सा
नसावी अंधश्रद्धा असावे श्रद्धास्थान ||

भीमेच्या तीरी वा असे गोदावरी
त्यांच्या उरी भक्ती असे का खरी,
पाउले चालती हरीच्या ओढीने
तयां खाली हे भक्त कसे चेंगरी |
करा सेवाभक्तिश्च मातापित्यांची
खरे हेच आहे भगवंताचे स्थान,
तुझे दोन्ही कर हे जुळव आज वत्सा
नसावी अंधश्रद्धा असावे श्रद्धास्थान ||

कधी प्रेषितांचे कधी शोषितांचे
निमित्तमात्र करुनी मात्र संहार केला,
नसे जात कुठली नसे धर्म कुठला
माणूस माणसाच्या जीवावरती उठला |
देवास हृदय आणि हृदयात देव आहे
नको शोधू त्यासी अंतरात्म्याबाहेर,
निद्रिस्त तुझा आत्मा जागव आज वत्सा
खरा तूच आहे तुझा रे भगवान ||

- प्रतिकवी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नसे जात कुठली नसे धर्म कुठला
माणूस माणसाच्या जीवावरती उठला |
देवास हृदय आणि हृदयात देव आहे
नको शोधू त्यासी अंतरात्म्याबाहेर,
निद्रिस्त तुझा आत्मा जागव आज वत्सा खरा तूच आहे तुझा रे भगवान !!
>>>>>ह्या ओळी खूप आवडल्या ! ! !
कवितेचं नावही खूप मस्त वाटलं . ..(देवावर विश्वास असावा,अंधश्रद्धा नव्हे),
बाकी मला जास्त काही कळत नाही,पण प्रयत्न चांगला केला .
पुढील कवितेसाठी शुभेच्छा .......

खरा तूच आहे तुझा रे भगवान>>> कवितेत लिहायला काहीतरी अलंकारिक पाहिजे म्हणून काहीही लिहिले आहे. भगवान या शब्दाचा अर्थ ठाऊक आहे का आपल्याला?

नसे जात कुठली नसे धर्म कुठला>>>> हे सुद्धा काहीतरीच. महाभारतात म्हटले आहे, धर्मो हि तेषां अधिको विशेषो, धर्मेन हीन पशुभिः समान. >>> पण त्यासाठी आधी धर्म म्हणजे काय हे जाणून घेणे गरजेचे आहे. धर्मम् तू साक्षात् भगवत् प्रणीतं... (हिंदू, मुस्लिम, ई. यांना शास्त्रांनुसार धर्म म्हणता येत नाही)

पद्म,तुम्ही काय धर्मगुरू आहात का??धर्माचा एवढा पगडा बरा नव्हे ...
अहो सर सॉरी पद्म माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे(कमीत कमी मी मानते),माझ्यासाठी एखादी व्यक्ती कुठल्या धर्माची,जातीची आहे यापेक्षा ती किती समजूतदार आहे हे जास्त महत्त्वाचं..
आपल्याला आपल्या धर्माचा,जातीचा अभिमान असावा तसेच दुसऱ्याच्या धर्माचा,जातीचा आदर केला पाहिजे ..
बाकी तुमची इच्छा ! ! !देवा कृपा करा हो लेकरावर...

धन्यवाद कावेरीजी _/\_ : आपल्या सारख्यांच्या शुभेच्छा अशाच सदैव आमच्या पाठीशी असूद्यात

पद्मसाहेब - प्रतिसादाबद्दल धन्यवाद.. धर्म व शास्त्र बघता तुम्ही बरोबर आहात परंतु कावेरीयांनी जो दुसरा प्रतिसाद दिला आहे तो अर्थ इथे अभिप्रेत आहे, त्यामुळे हि शास्त्रविसंगतता

there are so many problems in the basics. << आपल्या मार्गदर्शनाचे नेहमीच स्वागत असेल _/\_