सवाई - उदर-श्रवण नोहे...!

Submitted by Charudutt Ramti... on 28 December, 2016 - 03:45

परवा इथेच मा. बो. वर 'सवाई' वर एक धागा पाहिला. त्या लेखाला 'धागा' असं म्हणणं हे खूपच 'सौम्य' पणाचं होईल. “खरतर सवाई वरती धागा काढला” अस म्हणण्या ऐवजी “सवाई वरती माय बोली वर 'मांजा*' काढला ” अस म्हणण श्रेयस्कर होईल इतकी त्या धाग्याला 'धार' होती.
( *मांजा - स्वत: चा पतन्ग उडवायला आणि दुसर्याचा कापायला वापरतात तो, ‘सरस’ आणि काचेचा चुरा यांचा मूलामा दिलेला जाड धागा,
सरस - एक प्रकारचा गोन्द, त्याचे साखरेच्या बत्ताश्या सारखे तुकडे, उकळत्या पाण्यात घालून साखरेच्या एकतारी पाका सारखा द्र्व निर्माण करता येतो. )

त्या धाग्यात रेखाटलेले 'सवाई' चे चित्रण, हे एका स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकेल, अशी 'क्लुप्ति' झाल्याने हा उहापोह.

सवाई गंधर्व..."हा पुण्यातील एक फार जुना खाद्य मोहोत्सव असून तिथे अधुन मधून प्रसिद्ध गायक आपली कलाही सादर करतात." हे विधान, अजुन दहा वर्षांनी आत्ता वाटते तसे अजिबात 'उपरोधिक' न होता ' अत्यंत समर्पक' ह्या सदरात जाऊन बसेल. इतका ह्या मोहोत्सवा वर ‘गान’ प्रेमींच्या पेक्षा खाद्य प्रेमींचा पगडा आहे. गाणार्या 'गळया' पेक्षा गिळायला 'मिळेल' ते गिळनार्या गळयाची इथे चलती आहे हे नक्की.

'सवाई' चे पडघम साधारण ओक्टॉबर नोवेंबर ला सुरू होतात.
"काsय मॅsग? आsहे ना ह्यावर्षी तरी?...गेल्या वर्षी येतो येतो करत शेवटी शेंड्या लावल्यान तुम्ही"
“शास्त्रीय संगीत मला कळत नाही - मी सवाई ला येणार नाही!!” ( मी शेंगदाणे खाल्ले नाहीत, मी टरफल उचलणार नाही...!! च्या धरती वर )
अस म्हणायला, अंगात जे बळ लागतं ते एकवटता 'न' आल्या मुळे ह्या वेळीही 'हा भीड भीकेचा बळी'
“हो हो येणार म्हणजे काय? येणारच!... बुवा आहेत ना ह्या वेळी, ऐकायचाय ना बुवांच गाण....खूप दिवस झाले.”
शास्त्रीय संगीतातले जाणकार, कधीही गायकाला नावाने संबोधत नाहीत. पहिले नाव, वडिलांचे नाव, आणि आडनाव ह्या स्टॅंडर्ड फॉरमॅट मधे कधीही हे जाणकार गायकाचे नाव घेणार नाहीत. नेहमी आपण त्यांच्या 'खाजगी' बैठकीत गायकाच्या धोतरला आपली पॅंट लावून त्यांच्या माजघरात बसून टोपणाने त्यांच्या ग्लासात स्कॉच ओतत कायमच राग 'दरबारी' ऐकत आलो आहोत अस भासवत जगतविख्यात गायकाला केवळ 'अण्णा' 'बुवा' 'पंत' 'खाँ साहेब' 'मियां' 'मास्तर' 'गुरुजी' अश्या खाजगी तल्या टोपण नावाने हाक मारत असतात.

“मग काढा तुमच्या बरोबर माझेही सीझन तिकीट. माझे दोन काढा, एक जास्त असुदे...ऐन वेळी येत ना कुणीतरी बेळगाव धारवाड हून” … बोम्बलले...आता अडिच्से गुणिले दोन = पाचशे बोम्बलले, ह्यांच्या कडून पैसे वसूल होता होता 'सवाई गंधर्वांची' दीडशेवी पुण्यतिथी उगवणार. चार वर्षांपूर्वी एकदा असेच ह्या 'स्न्हेहींच' सीझन तिकीट काढले होते. त्याचे पैसे परत मागायल फोन केला तर चक्क 'पुढच्या वर्षी काढतो मी तुमचे तिकीट' अस आश्वासन दिल वर आणि नाही तरी ह्या वर्षी "म्हणावा तेवढा उत्साह नव्हताच कार्यक्रमाला, गायक वादक ही साधारण च होते..." - हे ऐकवल जस काही, 'अण्णा' गेल्यानंतर एक एक गायक माझ्याच पुढयात बसून मला राग ऐकवतात आणि मी त्याना 'पास' केल्यावर मगच 'कुलकर्णी' साहेब त्याना 'रंगमंचावर' पाचारण करतात. पुढच्या वर्षी 'पावसाने' कार्यक्रम पुढे गेला...की रद्द बिद्द झाला...त्या नादात...माझे पैसे परत मिळालेच नाहीत. त्या वर्षी पावसाळ्याचा 'सीझन' लांबला आणि त्या अतिवृष्टीत आमच्या सीझन तिकिटाचे पैसे बुडाले.
ह्या वर्षी 'डि मॉनिटायझेशन' चे कारण सांगावे अस विचार मनात आला, तो वर 'स्नेही' तिकडून फोन वर 'आणि हो...ऑनलाइन मिळताय का पहा...नोटबंदी आहे ना....खी: खी: खी: चला, ठेवतो..." तिकडून...फोन ठेवता ठेवता...'मन मन्दीरा...तेजा ने..उजळोन्न गे ई ई ई गा यss काsss " असे आनंदी सूर आळवल्याचे ऐकू आले.

व्हॉटसअप वर मग हे स्नेही...वातावरण निर्मिती साठी एक दिवसा आड...कुठल्या तरी गायकाची जुनी ऑडियो क्लिप पाठवतात. कॅपशन - सवाई गंधर्व एकोणीशे आठयांशी 'मोगूबाई कुर्डीकर' यांनी आळव्लेला शेवटचा 'यमन'
मी साधारण पणे २ एम. बी. च्या वरच्या क्लॅसिकल च्या क्लिप्स डाउन लोड च करत नाही. त्या न ऐकताच 'वा वा' अस टाइप करायच आणि अंगठा आणि तर्जनी ची चिमुट असलेली एक स्माइली वजा खूण 'रिप्लाय' म्हणून पाठवायची.

शेवटी ओफीस मधून हाफ डे काढून धडपडत रमण बागेत ल्या चिंचोळ्या गल्यांमधे पार्किग शोधणे हा एक मोठा प्रपंच असतो. शिस्त प्रिय पुणेकरांची 'दुसर्याने कायम काटेकोर' शिस्त पाळावी अशी एक निरव्याज अपेक्षा असते.
शिस्त न पाळणारांच्या च्या पदरी अपमान नक्की. 'संस्कृती' किंवा 'माणसांची मने' ह्या दोन्ही पैकी फक्त कोणती तरी एकच गोष्ट जपता येते, असा विश्वास उराशि बाळगणारी ही 'पेठे'तली साधी-भोळी माणस, ह्यांच्या 'मुखी' कोण लागणार? नपेक्षा गाडी रमणबागे पासून अडीच किलो मीटर लांब, नदीपात्रात लावलेली श्रेयस्कर. चुकुन आलाच मुठे-ला पूर तर निदान ओसरेल तरी... पेठे तल्या 'संस्कृती' पेक्षा मुठे-तला पाण्याचा जोर कितीतरी सोप्पा 'मॅनेज' करायला.

रमण बागेत पोचलो मांडवात तेंव्हा ऑलरेडी उत्तर पश्चिम कर्नाटकातले ( धारवाड, कुंदगोळ, हुबळी किंवा तत्समच कुठला तरी जिल्हा) ' हिंदुस्तानी शास्त्रीय संगितातल्या क्षितीजा वरचे नवोदित 'गायक' कोणती तरी 'अती मंद लयी' ( मराठीत लई स्लो स्पीड मधली ) एक बन्दिश गात होता. त्याने मधेच कोणती तरी जागा घेतली. मग प्रेक्षकागृहात एकदम टाळ्या. तो तिकडे स्टेज वर बसून 'जागा' घेत होता, मला एकडे खाली बसायला चांगली ‘जागा’ मिळत नव्हती.
तेव्हड्यात आमच्या स्नेहींनी हात वारे आणि हाका मारत आमच्या साठी पकडून ठेवलेली जागा आमच्या सूपुर्द केली. मला सवाई मधे जागा चांगली मिळाली ह्याचा अर्थ ‘गायकाच्या दोन चांगल्या जागान्मधे इतर 'ताना' सुरू असताना, मला ‘जागा' न राहवे लागता, अगदी सहज एक हलकिशी डुलकी घेता यावी या करिता लागणारा एखादा मांडवाचा खांब जवळ असावा...अशी माझी माफक अपेक्षा सवाई च्या व्यवस्थापना कडून माझी असते. पण ती माफक अपेक्षा ठेवून बरेच 'रसिक' आधीच 'खांब' धरून आपापल्या घरून आणलेली सतरंजी अंथरून स्थानापन्न झालेले असतात. असो. वेळ पळणार्या पुणेकरांना दोष देण्यात अर्थ नाही. उशीर मला झालाय. इतक्या वर्षांच्या शास्त्रीय संगीताच्या अभ्यासा नंतर हल्ली 'बीनखांबी’ तन्द्रि लागण्याची ही प्रॅक्टीस झालेली आहे.

एक दोन राग, बंदिशी आणि भजने झाली की आजु बाजूच्या रसिकांना सवाईत स्टेज वरच्या 'भजना'पेक्षा मागील बाजूस 'भाजणी' चे काय काय ह्याची उत्सुकता लागून राहिलेली असते.
दोन दोन नाट्य 'पदान्मधे' गॅप असते, तेव्हा हळूच आजूबाजूला 'कुजबुज' ऐकू यायला लागते.
सुरुवाती सुरुवातीला हे 'रसिक' ( म्हणजे साधारण सूर्यास्ताच्या आधी पर्यंत ) कुजबुजत असतात. श्वासानेच एक मेकांना विचारात 'मिसळ आणू की सुकी भेळ?'
'नको..सरळ वडा च आण...मला पाव नको हं, चटणी जरा जास्त आण'
सुरुवाती सुरुवातीला कुझबूजणारे हे 'रसिक' सूर्यास्ता नंतर जस जसा अंधार पडू लागतो तसे चांगलेच निर्ढावतात. एक तर उजेड असताना त्यांचे चेहरे स्पष्ट दिसतात त्यामुळे, खरखुर 'गाण' समजत असलेल्या आणि निव्वळ गाण ऐकण्यासाठी आलेल्या रसिकांच्या डोळे वटारुन निषेध व्यक्त करणार्या 'जिव्हारी' लागणार्या नजरा चुकवत चुकवत त्यांना त्यांच्या 'जिव्हे' चे चोचले पूरवावे लागतात. जसा अंधार पडायला सुरू होतो, तसा मग ह्यांना त्या अंधाराचा फायदा व्हायला सुरू होतो...!

‘'रsssसिsssकाsss...तुला थालीपीठावर लोणी हवय का?' हे त्या पत्र्याच्या स्टॉल वरुन आलेले उद्गार किमान पंधरा रसिकांच्या माना मागे वाळवण्यास कारणीभूत होतात.
तीन चार तरुण थालीपीठा पेक्षा ही 'रसिका' कोण आणि कशी आहे जरा न्याहाळुन पहायसाठी, स्टॉल वर कोंडाळ करतात.
रसिका, नेहमी प्रमाणे, मग मागून सातव्या आठव्या रांगेतून, उठत, स्वत:चे केस कानामागे सरकावत सरकावत , सवाई हा कार्यक्रम 'आपले सौंदर्य' किती बावन्न खाणी आहे ते इतरांना कळावे ह्या करिता दर वर्षी डिसेंबर महिन्यातल्या दुसर्या शुक्रवार, शनिवार आणि रविवारी दोन दोन सत्रात भरवला जातो, अश्या आविर्भावत, किमान चार पाच पेन्शनरांच्या करांगुल्या तिच्या पेन्सिल हिल्स सॅण्डल्स ने तुडवत तुडवत, ठुमकत ठुमकत मग स्टॉल जवळ लोण्याचा गोळा आणि थालीपीठ खायला जाते. तिकडे कलकत्ता की मेवति की ग्वाल्हेर घराण्याची कोणती तरी गायिका नुकताच एक बडा 'खयाल' संपवून एक छोटीसी ‘ठुमरी’ सादर करायच्या मार्गी असते. पण इकडे रसिक माय बाप जनता मात्र ह्या 'घार्या गोरया' रसिकाच्या ठुमरी मधे गुंग. स्टॉल वरच्या तरुण वर्गाच्या मनामधे वेगळेच 'खयाल'

“वाह वाह...क्या बात...बडिया” तब्बल जी ला दाद मिळते. गाणारा कितीही चांगला गायला तरी, पुणे कर फक्त तब्बलजीलाच मनापासून दाद देतात.
गवायला ही मधून मधून दाद देतात. पण त्या गवायाच इंटरनॅशनल स्टेटस पाहून मगच. 'लॉस अंजेलिस' ‘टोराँटो’ वगरे मधून गाण्याचे कार्यक्रम करून आलेत अस 'कुलकरण्यांन्नी' ओळख करून देताना संगितल तर, साधारण दहा मिनिटानमधून एकदा टाळ्या. भारतातल्या भारतात कार्यक्रम करत असेल गवई तर, फक्त शेवटी, महाराष्ट्र बॅंकेच्या जनरल मॅनेजर नि ‘शाल’ पांघरल्यावर एकदाच टाळ्या. फुकट आहेत म्हणून काही 'स्वस्त' नाहीत, आमच्या टाळ्या.

तुम्ही शास्त्रीय संगीताची कितीही गोडी आहे असा सांगा, शास्त्रीय संगितातल खूप कळत असलेला जाणकार जर तुमच्या शेजारी जर चुकुन माकून बसला ( तशी शक्यता फार थोडी आहे सवाईत ), तर शहाण्यान तिथून कडे कडे ने निघून दुसरा डांब पकडलेला बारा. कारण, तो जाणकार असला तरी आपण जाणकार आहोत, हे आजु बाजूला इतरांना कळण्या साठी...अतोनात प्रयत्न करत असतो. थोडक्यात म्हणजे तुम्ही त्याच्या 'रागाचा' बळी होऊ शकता. त्या पेक्षा, मला त्यातल काही काळात नाही, पण आवड खूप आहे' केटेगरी पकडा. हे लोक फारस मनावर घेत नाहीत. डिसेंबर महिन्यात रविवारी मॉल मधे फिरायला जाण्या ऐवजी रमण बागेत येतात. पण इथे येणार्यांचे 'मनोदय' ह्याहून खूप खूप वेगळे असु शकतात. ' खर सांगू का? सून घरी जाम काम लावते, निदान उरलेल्या आयुष्यातले आणि वर्षा-तले चार दिवस तरी 'निवांत' जातात' हे एका आजोबांनी चक्क बोलून दाखवलेल होत त्यांच्या एक दुसरा एक बालमित्र चाळीस वर्षांनी सवाई मधे अचानक भेटला तेंव्हा.

पण काही म्हणा, पुणेरी दिलखुलास श्रीमंती आणि संस्कृतिक 'जपणूक' ह्याची सवाई ही एक सुरेल मैफल आहे. लोक लांबून लांबून येतात. गाणी म्हणतात. पुणेकर मना:पासून दाद देतात अशी खरी-खोटी समजूत करून घेऊन परत आपल्या गावी जातात. पुढच्या वर्षी परत बोलावतात का पुणेकर अशी आशा लावून बसत असतील. त्यांना तरी कुठे सापडतील, पंधरा हजार प्रेक्षक 'शास्त्रीय गाण' ऐकणारे उभ्या भारतात? पाच सहाशे मिळाले तरी रगड. एक लग्न-कार्याला लागतो तेव्हडा हॉल ही धड भरत नसेल इतर गावी. पण पुणेकर...वर्षानू वर्षे गर्दीच करत आहेत सवाई ला. उडादा माजी काळे गोरे असायचेच. जसे 'तळलेले वडे शेकड्याने' विकले जातात तसे नवोदित गायकांच्या डि. वि. डी. ही तीन तीन शे रुपयांना विकल्या जातात. बोचर्या थंडीतही एकमेकांच्या सनिध्या ची ऊब पुरे आहे पुणेकरांसाठी. कुणी, मांडवात बसण्या ऐवजी सरळ, मागे लावूड स्पीकर वर, सातरीचे स्वर स्मार्ट फोन वर रेकॉर्ड करण्यात गुंग असतो. कुणी, थकले भागले म्हातारबुआ डोळे टिपत गेले 'पंचवीस' वर्षे न चुकता आलोय आता गूढगे धरतात पुर्वी सारखे नाही जमंत...पाहु पुढच्या वर्षी असलो या जगात तर परत नक्की भेटू अस म्हणत 'भैरवी' ऐकत असतात.

चारूदत्त रामतीर्थकर.
पुणे, २८ डीसे. २०१६

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> कुणी, थकले भागले म्हातारबुआ डोळे टिपत गेले 'पंचवीस' वर्षे न चुकता आलोय आता गूढगे धरतात पुर्वी सारखे नाही जमंत...पाहु पुढच्या वर्षी असलो या जगात तर परत नक्की भेटू अस म्हणत 'भैरवी' ऐकत असतात. >>>>

हे आवडले ...

पुणेरी दिलखुलास श्रीमंती आणि संस्कृतिक 'जपणूक' ह्याची सवाई ही एक सुरेल मैफल आहे. लोक लांबून लांबून येतात. गाणी म्हणतात. पुणेकर मना:पासून दाद देतात अशी खरी-खोटी समजूत करून घेऊन परत आपल्या गावी जातात.

>>> गावी परत जाऊन माबोवर स्तोम माजवल्याचे धागे पण काढतात. Lol

@ चारुदत्त, छान आहे. आवडलं. कथेमधून आपला शास्त्रीयसंगीताचा असलेला अभ्यासही दिसून येतोय. शाब्दिक कोट्या तर लई भारी!!! Biggrin

शिस्त प्रिय पुणेकरांची 'दुसर्याने कायम काटेकोर' शिस्त पाळावी अशी एक निरव्याज अपेक्षा असते.
*
स्टॉल वरच्या तरुण वर्गाच्या मनामधे वेगळेच 'खयाल'
<<
असे मस्त पंचेस जमलेत. मजा आली वाचायला.

लिहिलय चांगलं मात्र या कलांना राजाश्रय वि. लोकाश्रय वगैरे विषय फार चावून चोथा झालेत. ही थालिपीठावर लोणी टाकून खाणारी लोकं आली नाहीत तर कलाकारांना द्यायला पैसे कुठून येणार?

माहौल महत्त्वाचा.. चार पाच तासांच्या मैफिलित एखाद-दुसरा क्षणच 'आउट ऑफ द वर्ल्ड' अनुभव देणारा असतो..

लेखन शैली खूप आवडली! अजून लिहा!

अभिप्रायांबद्दल धन्यवाद.
लेख फारसा न आवडल्याचे ही अभिप्राय आहेत.
ते ही स्वीकारत आहे. पण 'काय त्रुटी आढळल्या?' हे समजले असते तर अधिक बरे वाटले असते. पुढील वेळी त्या उणीवा भरून काढता येतील.

अरेरे....किती ते अशुध्द लेखन.
त्यात शुध्द मराठी लेखणाचा अट्टाहास.

उदा. १)गाणार्या गाणाऱ्या २) गिळणार्या गिळणाऱ्या ३)मॅsग मग ४) बुवांच गाण × बुवांचं गाणं √ ५) येत× येतं √ ६) अडिच्से× अडीचशे √ ७) दिल× दिलं √ ८) मिळताय का ×
मिळतंय का?√ ९) साधी भोळी माणस× माणसं √ १०)गवायला× गवैयाला√
११)गवायाच× गवैयाचं √

अजुनही चुका आहेत. कुपा करुन सुधाराव्यात.