"शीशा ए दिल"

Submitted by अमेय२८०८०७ on 23 December, 2016 - 12:37

हपीसात लैच तोडफोड सुरु आहे. बाथरूम तर अशी तोडलीय की जणू गुप्तधन किंवा तेलविहीर खोदून काढणार आहेत. सोयीची जागा अशी निर्माणाधीन असल्याने प्रत्येकवेळी 'नाकाला पावडर लावण्याची भावना झाली', की लैच दूर 'जावे' लागते हा ताप आहे शिवाय दिवसभर घणघण आवाज कानात जाऊन शाळेत शिकलेला संवहनी की तत्सम बहिरेपणा येणार अशी भीतीही वाटत आहे. काम करणारा मुकादम भेटल्यावर मी माझे दुःख प्रकट करून कामात त्वरा करायची विनंती पेश केली असता त्याने "भैय्याजी ताजमहल बनाने में समय तो लगता ही है!", असे ज्ञानामृत पाजले. ताजमहाल उभारणाऱ्या कारागिरांचे हात सवडीने कलम करण्यात आले होते हे ऐतिहासिक सत्य सांगताच मात्र बेटा शिमिटातील भेसळ पकडली गेल्यासारखा लांब पळाला.

जुन्या बाथरुमात एक सुबक आरसा होता. मी (केवळ) त्यात लैच बारका दिसत असल्याने तो विशेष आवडता आहे. बाथरूमचे काम सुरु झाल्यापासून कुठे दिसत नव्हता, तो अचानक कॉरिडॉरच्या शेवटी कोपऱ्यात पडलेला दिसला. मी लगबगीने हपीस स्टाफचे मुखिया विल्सन यांना पाचारण करून," वह आईना कही स्टोअर में सेफ रखिये", अशी सूचना केली.

विल्सन मॅनेजमेन्टच्या 'डेलेगेशन थियरीचे' मास्टर आहेत, स्वतःचे काम अतितत्परतेने दुसऱ्याकडे ढकलण्याची त्यांची मेथड लवकरच आय आय एमच्या अभ्यासक्रमात शिकवली जाणार असल्याची अफवा आहे. स्वतःला काही चिकटू न देण्यात ते अळवाच्या पानासारखे पारंगत आहेत. त्यांनी माझ्यासमोरच त्यांचा नंबर टू श्री. कुंडूला बोलावून आरसा सुरक्षित ठेवण्याची आज्ञा तुरंत हस्तांतरीत केली. कुंडू थोडा पेचात पडला कारण त्याच्या चार्टर ऑफ ड्युटीजमध्ये आरसा हलवणे हे काम आहे की नाही याबद्दल तो साशंक होता. चार्टर ऑफ ड्युटीजमध्ये असेल तर हिमालय चढून जाईन पण एरवी बोटही उचलणार नाही असा करारी बाणा असल्याने त्यानेही विल्सन थियरी आजमावून पाहिली. त्याच्या हाताखाली शर्मा आणि विश्वकर्मा हे दोन नमुने असतात त्यापैकी कोण उपलब्ध आहे हे नक्की माहीत नसल्याने त्याने दोन्ही नावांचा पुकारा केला. सुदैवाने दोघेही जागी हजर असल्याने रंगा बिल्लाप्रमाणे नाचत बाहेर आले. परिस्थितीचे आकलन होताच त्यांचेही चेहरे शेंगदाण्याच्या पुडीत खवट चोर लागल्यावर होतो तसे वाईट झाले पण विश्वकर्माला अचानक हे काम वरकामे आणि सफाई करणाऱ्या आशिषच्या अखत्यारीत येते हा शोध लागला. काम कुणी करायचे (आणि आपण करायला नको) या साक्षात्कारामुळे सर्वांचे चेहरे कृतकृत्य झाले आणि,"आशिष बाहर गया है, वापस आते ही काम करवा देंगे", असे आश्वासन देऊन सर्व आपापल्या खुर्च्यांत विसावले.

मीही हपीसात आलो. अडीअडचणीला सोयीची म्हणून माझ्या आणि त्यांच्या हपीसामध्ये असलेली छोटी खिडकी उघडी असल्याने त्यांच्या गप्पा माझ्या कानावर येऊ लागल्या.

विल्सन (खास दक्षिणी एक्सेंटमध्ये): साब ने पयले क्या बोला समज में नही आया, आईना क्या होता है क्या मालूम, अच्चा हुवा कुंडू तुम जगापर था|

कुंडू: हा वैसे तो मिरर बोलते तो जल्दी समझते आप, शिशा भी बोल सकते हो|

शर्मा: नही नही, सिसा तो ट्रांसपेरेंट होता है| याद कीजे गाना....सिसा हो या दिल हो आखिर... रीना रॉय गजब दिखी थी, सुना है पाकिस्तानी क्रिकेटर से शादी कर ली थी|
(शर्मा लग्नाळू असल्याने सध्या लवकर हळवा होतो)

विश्वकर्मा : लेकिन अंग्रेजी में गिलास मतलब सीसा और आईना दोनो होता है| शेक्सपिअरजी के ज्युलियस सीजर नाटक का डायलॉग जानते है?
"And since you know you cannot see yourself,
so well as by reflection, I, your glass,
will modestly discover to yourself,
that of yourself which you yet know not of."
(विश्वकर्मा एक्स्टर्नल 'बी ए की एम ए इन इंग्लिश लिटरेचर' करत असल्याने जुन्या क्लासिक वाङमयाविषयी 'करंट' आहे)

विल्सन: शेक्सपिअर इतना डिफिकल्ट क्यूं लिखता था क्या मालूम, इसीलिए मैंने लिटरेचर छोड कर पॉलिटिकल सायन्स लिया था बी ए में! जाने दो |

शर्मा (बहुधा हातातला पाणी प्यायचा ग्लास दाखवत): इसका मतलब इस गिलास को सिसे का गिलास कहो तो सेम सेम डबल मिनिंग हो जाये गा, हा हा हा |

कुंडू: विल्सन सर इस की जल्दी शादी करा लो, बहुत डबल मिनिंग याद आ रहा है इस को|
(सगळे 'क्या खूब कही' अशा अर्थाने कौतुकात्मक ठोठो हसले)

या गदारोळात तो आशिष नामक नरश्रेष्ठ जिथे कुठे उलथला होता तिथून दिवस सरेस्तोवर आला नाही आणि आरसा शेवटी मीच उचलून माझ्या टेबलमागे आणून लावला हा अंदाज चाणाक्ष वाचकांनी लावला असेलच (इतरांसाठी आता सांगितलेच!)

-- अमेय

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त, खुसखुशीत Happy

मला मात्र "शीशा हो या दिल हो आखिर टूट जाता है" गाणारी लता आणि विवीधभारती आठवले Happy

लय भारी Lol

नशीब आरसा सहीसलामत राहिला ज्यात अमेय सडसडीत दिसतो. माझ्या मनात आपलं आलं की कशाला ह्याला त्याला सांगतोय, लवकर उचल तिथून नाहीतर शिशा आणि दिल (अमेयचंच) तोडतील की काय. हुश्श झालं आरसा अमेयने सुरक्षित जागी ठेवल्यावर Wink .

खल्लास !! लै भारी Rofl

आले. परिस्थितीचे आकलन होताच त्यांचेही चेहरे शेंगदाण्याच्या पुडीत खवट चोर लागल्यावर होतो तसे वाईट झाले>>>>> Proud

खल्लास !! लै भारी Rofl

आले. परिस्थितीचे आकलन होताच त्यांचेही चेहरे शेंगदाण्याच्या पुडीत खवट चोर लागल्यावर होतो तसे वाईट झाले>>>>> Proud

आवडलं लिखाण, मस्तच
पण मलाही मथळ्यातच शिशा आणि दिल हे दोन शब्द एकत्र वाचल्याने, उछालो/टूट जाता है असंच काय्काय आठवून
आरसा सहीसलामत राहतोय की नाही असेच वाटत होते शेवटी लेखकाने स्वतःच उचलून ठेवल्याने जीव भांड्यात पडला. Happy

छान! Lol

नशीब आरसा सहीसलामत राहिला ज्यात अमेय सडसडीत दिसतो. माझ्या मनात आपलं आलं की कशाला ह्याला त्याला सांगतोय, लवकर उचल तिथून नाहीतर शिशा आणि दिल (अमेयचंच) तोडतील की काय. हुश्श झालं आरसा अमेयने सुरक्षित जागी ठेवल्यावर >>>>>>>>>अंजू, Lol Lol

शीशा आणि दिल यांचा संबंध लावणारी अजून काही गाणी Happy

शीशा हो या दिल हो
शीशा ए दिल इतना ना उछालो, ही दोन वरती आहेतच.

दिल ये दिल कोई शीशा तो नही, एक चोट लगी और टूट गया
तसबीरे मोहब्बत जिसमे था वो शीशा हमने तोड दिया, दिल से नाता जोड लिया