स्फुट ३९ - एक अश्रू चक्क येणे

Submitted by बेफ़िकीर on 22 December, 2016 - 10:30

कोणत्याही परक्यापुढे अजीजीने उभे राहणे,
मग त्याची मर्सिडीझ असो वा सायकल,

कानांत प्राण आणून त्याचे शब्द ऐकणे
मग त्याच्या डोळ्यांत हुकुमत दिसो वा दुर्लक्ष

ऐकून मान तुकवणे
मान तुकवताना आक्रंदणे नशिबावर
मनातल्या मनात

फार घाई आहे अशी देहबोली ठेवणे

काही क्षण,
जगातील सर्वात महत्वाची व्यक्ती ठरणे
नंतर,
जगातील सर्वात विस्मरणीय व्यक्ती ठरणे

अर्वाच्य शिव्या हसर्‍या चेहर्‍याने झेलणे
स्वतःच्या स्वप्नांना फाट्यावर मारणे
वातावरणाने गुदमरलेले मन आणि चेहरा,
पचवल्याचे न दाखवून ताजे ताजे राहणे

जे स्वतः निर्मिले नाही,
ते स्वतः निर्मिल्याप्रमाणे बोलणी खाणे

माणसांचे वैभव, भव्यता, वगैरे,
पाहून थिजणे

टिचक्यांवर नाचणे

हिमोग्लोबिनची जागा लाचारीला देणे
हृदयाच्या खाणीतून नम्रतेचे पत्थर काढू देणे
मेंदूच्या जागी संत फिट करणे

रोज कापूस कांद्याची गोष्ट ऐकणे, ऐकवणे

रात्री झोपताना
अश्रू यायचे थांबले ह्या दु:खाने
एक अश्रू चक्क येणे

टिप मिळते हे सोडले तर,,,,,,,,

वेटर मित्रा

हे सगळे तू

माझ्याकडून कधी शिकलास?

=====================

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users