तलत महमूद- ‘आता है फिर ख्याल कि ऐसा कहीं नहीं...’

Submitted by रवींद्र दत्तात्... on 17 December, 2016 - 12:22

‘ये तो नहीं कि तुमसा जहां में हसीं नहीं, इस दिल का क्या करूं जो बहलता नहीं कहीं...
कहता हूं इस दिल से और हसीं ढूंढिए कोई, आता है फिर ख्याल कि ऐसा कहीं नहीं...’

तलत महमूद नी म्हटलेली दाग ची ही गझल स्वत: तलतच्या बाबतीत देखील खरी ठरते. तलत एकमेवाद्वितीय होता. याचा प्रत्यय त्याची गीते असलेले चित्रपट बघतांना पुन्हां आला. चित्रपट होते-‘बेवफा,’ ‘बारिश’ अाणि ‘नवबहार.’ पैकी बारिश मधे एक कव्वाली हाेती, त्यांत तलत देखील एक गायक होता-

‘एक नजर में दिल भरमाए, सूरत हो तो ऐसी हो...’

तसंच ‘नवबहार’ मधे देखील त्याची एकच गझल होती-

‘किसी सूरत लगी दिल की बहल जाए तो अच्छा हो,
तमन्ना एक नए सांचे में ढल जाए तो अच्छा हो...’

पण ‘बेवफा’ सर्वस्वी तलतचाच चित्रपट होता. त्यातील

‘सर मिला आपके कदमों पे झुकाने के लिए...’

‘दिल मतवाला लाख सम्हाला फिर भी किसी पर आ ही गया...’

‘तुमको फुरसत हो मेरी जान तो इधर देख तो लो...’

‘तू आए न आए तेरी खुशी हम आस लगाए बैठे हैं...’

ही तलत ने म्हटलेली गीते पुन्हां-पुन्हां ऐकावी अशीच आहेत. छोट्या पडद्यावर ‘बेवफा’ बघतांना मला ते दिवस आठवले, जेव्हां तलतचं एक गीत मिळवण्यासाठी रेडियोला अक्षरश: कान लावून बसावं लागे. मी नववीत असतांना एके दिवशी रेडियोवर (सीलोन) सकाळी साडे सात वाजता ‘पुरानी फिल्मों के गीत’ कार्यक्रमात ‘दिले नादान’ मधील तलत महमूद चं एक गीत ऐकलं-

‘जो खुशी से चोट खाए, वो जिगर कहां से लाऊं,
किसी और को देखे, मैं वो नजर कहां से लाऊं...’

तुला सोडून दुसरयाला बघणारी ‘नजर’ मी कुठून आणूं...?

किती गोड कल्पना आहे...! या शब्दांनी, या कल्पनेनं जाणवलं की या गायकाची बात ही कुछ और है...त्यापूर्वी मी तलतची प्रचलित गीतेच ऐकली होती. पण या ‘जिगर,’ ‘नजर’ या शब्दांनी मनांत कायम घर केलं. आणि मी रेडियो सीलाेनचा नियमित श्रोता झालो. ‘त्या’ कार्यक्रमांत वाजवलं गेलेलं तलतचं एकच गीत एेकून मन आनंदाने भरून जात असे. मग तो अख्खा दिवस कसा छान जायचा. तसंच ज्या दिवशी त्या कार्यक्रमांत तलतचं गीत नसे, त्या दिवशी चुकल्या-चुकल्या सारखं वाटायचं. मुख्य म्हणजे या कार्यक्रमांत तलत ची जी गीते ऐकायला मिळायची, जी सहजासहजी इतरत्र सापडली नाही. याच दरम्यान एके दिवशी ‘एस कुमार्सची फिल्मी मुलाकात’ मधे तलतची मुलाखत ऐकली. त्यांत तलतनी त्याच्या अावडीच्या गीतांमधे ‘तस्वीर बनाता हूं...,’ ‘हमसे आया न गया...’ व ‘मुहब्बत ही न जाे समझे...’ ही गीते ऐकवली होती. या मुलाखातीमुळे देखील तलत खूप जवळचा वाटू लागला.
ते रेडियोचे दिवस, श्रवणभक्ति करण्याचे दिवस होते. त्याकाळी तलतची गीते ऐकतांना, ते शब्द लिहून घेतांना मनाला नेहमी प्रश्न पडायचा की ही इतकं सुंदर काव्य असलेली ही गीते याने कुणासाठी म्हटली असतील व यांचं चित्रण कसं काय झालं असेल...? गीते कोणती बरं...

‘मेरे ख्यालों में आके गले लगा जा मुझे,
कि आज फिर मेरा जी चाहता है रोने को...’
-कुणासाठी रडणार होता हा...?

‘मुहब्बत में कशिश होगी तो इक दिन तुमको पा लेंगे,
उसी सूरत में हम बिगड़ी हुई किस्मत बना लेंगे...’
-हा दृढ विश्वास कुणा करितां होता...?

‘महलों में रहने वाली, घर है गरीब का...’
-कोण तो बिच्चारा नायक आणि ती राणी बनून गेलेली नायिका कोण बरे असेल...?

‘मान करे क्या रंग रुप का, तू कागज का फूल है,
तुझमें खुशबू ढूंढ रही है ये दुनिया की भूल है...’
-बाप रे...! काय घोडं मारलं नायिकेनं याचं की हा इतका रागावला...?

‘दुनिया बहुत बुरी है दुनिया में बसने वालों,
मेरी तरह न रोना कुछ देर हंसने वालों,
रोया हूं जिंदगी भर इक बार मुस्कुरा के...’
-हे कटु सत्य याने कुणाला बरं सांगितलं असेल...?

‘कभी तनहाइयों में इक ऐसी भी घडी आई,
बहुत रोने की कोशिश की मगर फिर भी हंसी आई...’
-एकटेपणांत असा अनुभव प्रत्येकाला कधी न कधी येतोच की..., पण याने कुणाला सांगितला असेल हा अनुभव...?,

पण...या सर्व प्रश्नांची उत्तरे सापडणं केवळ अशक्य होतं. कारण जरी आमच्या शहरांत नऊ थिएटर होते तरी, त्याकाळी सुद्धा तलतची गीते असलेले चित्रपट त्यांत लागण्याची शक्यता कमीच होती...यावर उपाय एकच होता की जेवढी मिळतील तेवढी तलतची गीते ऐकायची, लिहून ध्यायची, गुणगुणायची व मनमुराद आनंद लुटायचा. त्या गीतांमधे जी शायरी, जे काव्य आहे त्यांत बालिशपणा, उथळपणा नावाला देखील नाही. त्यातील सोपे पण गूढार्थाने भरलेले शब्द...कदाचित म्हणूूनच त्याकाळी तलतचं एक गाणं दिवसभर सोबत असायचं, ते शब्द जणू कानांत घुमत राहायचे...
ते शाळेचे भारावलेले दिवस होते. वाचनाची गोडी कळूं लागली होती, कान तयार होत होते, शास्त्रीय संगीत नुकतंच कुठं आवडूं लागले होते. तसं नाट्य संगीत जवळचं होतं म्हणां पण माणिक ताईंचा ‘भटियार’ अन त्या पाठोपाठ येणारया ‘अकेली मत जइयो राधे जमुना के तीर...’ वरुन जीव आेवाळून टाकावांसा वाटायचं...याच काळांत तलतची गीते कानावर पडली आणि मी त्याचा चाहत्यां मधे सामील झालो...

‘नमक छिडकते हैं ले-ले मजा वही आंसू,
हाय रे वही आंसू,
जो तेरे दर से मिले दिल के जख्म धोने को...’
‘गुनाह’ मधील या गीताचे संगीतकार होते स्नेहल भाटकर. किती सुंदर कल्पना आहे...

‘दरबार’ मधे तो म्हणतो-
‘मैं ऐसी कातिल नजर के सदके कि जिसने मेरा गुरुर तोडा,
जो सर कहीं भी न झुक सका था वो सर झुकाया तेरी गली में...’
-इतका प्रांजळपणा क्वचितच सापडतो...

‘न घबरा आसमां पर छाया है आज अगर बादल,
यही बादल तो चंदा के निकलने की निशानी है...’
-‘वारिस’ मधील हा आशावाद अप्रतिम असाच होता.

चित्रपट गीते म्हटली की त्यांत नायिकेचं वर्णन येणारच की. तलत देखील याला अपवाद नाही. आपण तलत पुरताच मर्यादित विचार केला तर पुन्हां असं जाणवतं की त्याने म्हटलेल्या अशा गीतांमधे देखील एक शालीनता, मर्यादा आहे. त्या वर्णनांत अश्लीलता नाहीं. पण एक मात्र खरं की त्या गीतांमधील कल्पना, त्या अपेक्षा देखील निराळ्याच, इतरत्र कुठेहि न सापाडणारया.

‘सलाम-ए-मुहब्बत’ मधे तो नायिकेची तुलना फुलाशी करतांना म्हणतो-
‘मैं तुझको अगर एक फूल कहूं, तेरे रुतबे की तौहीन है ये,
तेरा हुस्न हमेशा कायम है, दमभर के लिए रंगीन है ये...
दिन-रात महकते रहने की कलियों ने अदा तुझसे पाई,
ये चांद जो घटता-बढता है दरअस्ल है तेरी अंगडाई...’

‘छाया’ मधील गीतांत ती मिळाल्यानंतर मिळालेल्या आनंदाला तो शब्द रूप देतो-
‘आंखों में मस्ती शराब की काली जुल्फों में रातें शवाब की,
जाने आई कहां से टूट के मेरे दामन में पंखडी गुलाब की...’

‘नकाब’ च्या एका गीतामधे नायिकेच्या बेरुखीचा देखील सुंदर वापर होता-
‘वो उनकी परदादारियां वो उनकी बेरुखी,
दिल मेरा लूटने के ये बहाने बन गए...’

वारयाने भुरभुर उडणारया तिच्या केसांकडे बघत तो ‘अनमोल रतन’ मधे म्हणतो-
‘जब किसी के रुख पे जुल्फें आ के लहराने लगीं,
हसरतें उठ-उठ के अरमानों से टकराने लगीं...’

तलत महमूद एका गैर फिल्मी हिंदी गझल मुळे प्रकाशझोतांत आला. ती गझल होती-
‘तसवीर तेरी दिल मेरा बहला न सकेगी,
ये तेरी तरह मुझसे तो शरमा न सकेगी...’
तुझा फोटो, छायाचित्र माझ्या काहीच कामाचं नाही...कारण तो फोटो मला बघून तुझ्या सारखा लाजू शकणार नाही ना...

म्हणून असेल कदाचित तसवीर या शब्दाशी तलतचं जवळचं नातं जाणवतं.

‘नादान’ मधे तिच्या तसवीर मधे त्याला आपली तकदीर दिसते-
‘आ तेरी तसवीर बना लूं, मैं अपनी तकदीर बना लूं...
दिल के कोरे कागज पर, उल्फत की लकीर बना लूं...’

‘बारादरी’ मधे तो तसवीर बनवायचा प्रयत्न करतोय,...स्वप्न तर बघितलंय, कैनवास वर त्याला आकार देता येत नाहीये...म्हणून तो अस्वस्थ आहे-
‘तसवीर बनाता हूं, तसवीर नहीं बनती,
इक ख्वाब सा देखा है, ताबीर नहीं बनती...’

तलतच्या चित्रपट गीतांमधे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की बरेचशा चित्रपटांत त्याच्या वाट्याला फक्त एकच गीत आलंय. गंमत म्हणजे त्या चित्रपटांचं नाव घेतांच सर्वात पहिले आठवतं ते तलतचंच गीत, त्यातील इतर तपशील लगेच आठवत नाहीत. या श्रेणीतील काही चित्रपट आज छोटया पडद्यावर बघतांना जाणवलं की तलतचं ते गीत त्या कथानकांत अगदी चपखल, फिट बसलंय. उदाहरणार्थ-

‘मदहोश’ नाव घेताच आठवते ही गझल-
‘मेरी याद में तुम न आंसू बहाना न जी को जलाना मुझे भूल जाना...’

‘किनारे-किनारे’ म्हणतांच आठवतं हे गीत-
‘देख ली तेरी खुदाई, बस मेरा जी भर गया...’

‘बाज’ म्हणताच आठवते ही गझल-
‘मुझे देखो हसरत की तसवीर हूं मैं...’

‘दायरा’ नाव घेतांच आठवते ही गझल-
‘आंसू तो नहीं हैं आंखों में पहलू में मगर दिल जलता है,
होठों पे लहू है हसरत का आरा सा जिगर पर चलता है...’

चित्रपटाचं नाव घेत चला, तलतचं गीत कानांत घुमूं लागतं-

‘आशियाना’-‘मैं पागल मेरा मनवा पागल, पागल मेरी प्रीत रे...’
‘छोटे बाबू’-‘दो दिन की मुहब्बत में हमने कुछ खोया है कुछ पाया है...’
‘रेशमी रुमाल’-‘जब छाए कभी सावन की घटा...’
‘टैक्सी ड्राइवर’-‘जाएं तो जाएं कहां समझेगा कौन यहां दर्द भरे दिल की जुबां...’
‘एक साल’-‘सब कुछ लुटा के होश में आए तो क्या किया...’
‘बहाना’-‘बेरहम आसमां, मेरी मंजिल बता है कहां...’
‘यास्मीन’-‘बेचैन नजर बेताब जिगर ये दिल है किसी का दीवाना...’
‘शिकस्त’-‘सपनों की सुहानी दुनिया को आंखों में बसाना मुश्किल है...’
‘एक गांव की कहानी’-‘रात ने क्या-क्या ख्वाब दिखाए...’
‘आराम’-‘शुक्रिया, ऐ प्यार तेरा शुक्रिया...’

सगळीच एकापेक्षा एक अजरामर गीते...

‘अादमी’ चित्रपटांत मुहम्मद रफी सोबत तलतचं एक द्वंद्व गीत होतं-

‘कैसी हसीन आज बहारों की रात है...’

यात तलत महमूदचा स्वर शोकाकुल प्रियकराचा आहे-

‘आई हैं वो बहारें कि नग्मे उबल पडे, ऐसी खुशी मिली है कि आंसू निकल पडे,
होठों पे हैं दुआएं मगर दिल पे हाथ है... अब किसको क्या मिला ये मुकद्दर की बात है...’

या गीताची सिचुएशन आठवून बघा. तिथे तलतचा आवाज अगदी परफेक्ट आहे...पण चित्रपट बघतांना मात्र रसभंग होतो...कारण तिथे तलत ऐवजी हे शब्द महेंद्र कपूरच्या आवाजात आहेत. मला वाटतं अशा प्रयोगांमुळेच भारतीय चित्रपट संगीताची घसरण सुरू झाली असावी. कारण याच काळांत चित्रपटांमधे नायकांचं महत्व वाढू लागलं होतं...

तलत महमूद नी काही चित्रपटांमधे अभिनय देखील केला होता. त्यातील ठळकपणे आठवतात ते ‘सोने की चिडिया,’ ‘दिल-ए-नादान,’ व ‘एक गांव की कहानी.’ पैकी ‘सोने की चिडिया’ मधे त्याच्या सोबत नूतन-बलराज साहनी होते. या दोन मातब्बर कलाकारां समोर वेगळं करण्यासारखं तलत जवळ काहीच नव्हतं. पण ‘दिल-ए-नादान’ सर्वस्वी तलतचाच चित्रपट होतां. यात पीस कंवल नायिका होती. त्यातील

‘मुहब्बत की धुन बेकरारों से पूछो...’
‘ये रात सुहानी रात नहीं ऐ चांद-सितारों सो जाओ...’
‘जो खुशी से चोट खाए मैं वो दिल कहां से लाऊं...’

ही गीते लाजवाब अशीच होती. तरी

‘जिंदगी देने वाले सुन तेरी दुनिया से दिल भर गया...’ हे गीत ऐकतांना आज देखील मन हळहळतं... हेच या गीताच्या यशाचं गमक असावं.

गेल्या वीस वर्षांत छोट्या पडद्यावरील निरनिराळया चैनल्समुळे तलतची बरीच गीते ‘त्या’ चित्रपटांतून बघतां आली. त्यात ‘देवदास’ चा ‘मितवा...’ व ‘किसको खबर थी किसको यकीं था ऐसे भी दिन आएंगे...’ होते. तसंच मनहर देसाई-मीना कुमारीच्या ‘मदहोश’ मधील ‘मेरी याद में तुम न आंसू बहाना...’ देखील होतं. ही गीते बघून कानां सोबतच डोळयांचं पारणं फिटलं. तलत माझ्या पीढीचा गायक नाही. तरी देखील त्याने मला वेड लावलं व आपलंसं करून घेतलं. तलतची गीते ऐकतांना वाटतं की तो आपल्याच भावनांना मूर्तरुप देताेय.
सेटमैक्स वर ‘बेपफा’ बघतांना गंमत वाटत होती की एकेकाळी मनाला भुरळ पाडणारया ‘तुमको फुरसत हो मेरी जान तो इधर देख तो लो...’ या गीतामधे नरगिस चक्क स्वीमिंग सूट घालून वावरली होती. पण रेडियावर पहिल्यांदा हे गीत ऐकलं, तेव्हां नरगिस ध्यानीमनी देखील नव्हती. मन भुललं हाेतं ते त्या आवाजातील सोप्या शब्दांवर, त्या आर्जवावर. किती आर्जव आहे तलतच्या आवाजात...तो म्हणतोय-

‘बात करने के लिए कौन तुम्हें कहता है,
ना कराे हमसे कोई बात, मगर देख तो लो...’

-माझ्याशी बोलावंच लागेल अशी सक्ती नाहीये तुझ्यावर...पण एकदा...फक्त एकदाच माझ्याकडे बघून तर घे...यावर कुणी कसं बरं रूसुं शकेल...

तलत आज नाही...पण त्याने म्हटलेली गीते अजरामर आहेत. त्याच्या गीतांकडे बघतांना शेवटी त्याच्याच शब्दांत म्हणावंसं वाटतं-

‘शुक्रिया, इस मेहरबानी का तुम्हारी शुक्रिया,
जब ख्यालों में बुलाता हूं ताे आ जाते हो तुम...’ (चित्रपट: नाजनीन).

---------------------

हा फक्त योगायोग होता कां...!

दो पहलू वाले गीत, म्हणजेच दोन निरनिराळया गायकांनी म्हटलेलं एकच गीत बरयाच चित्रपटांमधे होते. आपण फक्त तलत महमूद आणि लता मंगेशकर या दोनच गायकांचा विचार केला तर चटकन आठवतात ती ही गीते-
‘दाग’ मधील ‘ऐ मेरे दिल कहीं आैर चल...’
‘टैक्सी ड्राइवर’ मधील ‘जाएं तो जाएं कहां...’
‘एक साल’ मधील ‘सब कुछ लुटा के होश में आए तो क्या किया...’
‘बेवफा’ मधील ‘दिल मतवाला लाख संभाला फिर भी किसी पर आ ही गया...’

या पैकी ‘दाग’ ‘टैक्सी ड्राइवर’ आणि ‘एक साल’ मधील या गीतांमधे एक साम्य आहे. ते म्हणजे लता दीदींनी म्हटलेली ही तिन्हीं गीते सेड मूड मधील आहेत. पण ‘बेवफा’ मधील ‘दिल मतवाला...’ हे गीत मात्र लता दीदींनी उल्हसित मूड मधे म्हटलंय.
‘बेवफा’ बघितल्या वर मनांत सहज एक विचार आला. वर उल्लेखिलेल्या तिन्हीं चित्रपटांमधे म्हणजेच ‘दाग’ ‘टैक्सी ड्राइवर’ आणि ‘एक साल’ मधे लता दीदींनी गायलेली गीते सेड मूड मधे होती पण या चित्रपटांचा शेवट मात्र गाेड होता. उलट ‘बेवफा’ मधे लता दीदींचं गीत उल्हसित मूड मधे होतं पण या चित्रपटाचा शेवट मात्र शोकान्त होता...या चारहि चित्रपटांमधे दो पहलू वाल्या या गीतांचा दुसरा गायक नेमका तलत महमूद होता...

हा फक्त योगायाेग होता कां...!

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख मस्तच!

तलत आपला पण आवडता आहे!

त्याची "शाम ए गम की कसम" आणि "फिर वोही शाम वोही गम" तर आपल्या playlist वरची all time favourite Happy

मस्त लेख. काहि गाणी तलत मेहमुद साठिच लिहिली+संगीतबद्ध केली असं वाटण्याइतपत रसीकांच्या पसंदिला उतरलेली. त्यातलीच काहि माझ्या प्लेलिस्ट मधली -

मै दिल हुॅं इक अरमान भरा
सीने मे सुलगते है अरमान
अंधे जहाॅं के, अंधे रास्ते
ऐ मेरे दिल कही और चल
दिल-ए-नादान तुझे हुआ क्या है
चमका चमका सुबह का तारा
जाए तो जाए कहाॅं
शाम-ए-गम कि कसम
दो दिल धडक रहे है और आवाज एक है
हम से आया ना गया
सब कुछ लुटाके
रात ने क्या क्या ख्वाब दिखाए
आॅंसु समझके क्युॅं मुझे आॅंख से तुमने गीरा दिया
देखली तेरी खुदाई
फिर वोहि शाम
तुम्हि तो मेरी पूजा हो
गम कि अंधेरी रात में
बेचैन नजर बेताब जिगर

वाह! तलत महमूद म्हणजे मखमली आवाज!! आपल्या सुदैवानं हे रत्न मदनमोहन नावाच्या हाती लागलं आणी अजरामर गझला जन्माला आल्या.

ईतना न मुझसे तू प्यार बढा, ऐ दिल मुझे ऐसी जगह ले चल पण अ‍ॅड करा त्या प्ले-लिस्ट मधे.

तलत अत्यंत आवडता आणि म्हणूनच जवळचा वाटतो.

त्याची गाणी अर्थपूर्ण होती, तर ते श्रेय त्या त्या शायरचं होतं आणि सुमधुर होती, तर ते श्रेय संगीतकाराचं. लेखामध्ये शब्दांचं आणि स्वरांचं श्रेय गायकाला दिल्यासारखं वाटलं, जे अतिशय खटकलं.

अर्थात, मला असं वाटतं की गाणं निवडताना तलतने नेहमीच शब्द व चाल ह्यांचा विचार केला आहे. कधीच त्याने थिल्लर गाणी गायली नाहीयत. त्याने स्वत:च स्वत:साठी एक मापदंड बनवलेला असणारच आणि तो अतिशय काळजीपूर्वक पाळलाही असणार. म्हणूनच खूप लौकर तो इंडस्ट्रीच्या बाहेरही गेला. इंडस्ट्रीच्या बाहेर जाण्याचा निर्णय त्याचा होता. त्याने ठरवलं की गायचं तर अमुक असंच, नाही तर नाही. लता मंगेशकर, रफी, किशोर अश्या सगळ्याच महान गायकांसारखा तो आवाजाचं भजं होईपर्यंत गायला नाही, हेही मला खूप आवडतं त्याच्या बाबतीत.

शेवटी पुन्हा एकदा, गाण्यांचा विषय असताना, गीतकार व संगीतकाराचा उल्लेखही करू नये, हे बरोबर नाही. ह्या गायक लोकांना संगीतकारांनी बनवलं, घडवलं आहे. ह्याचा विसर त्यांना स्वत:ला पडत असेल की नाही, माहित नाही. पण रसिक श्रोत्यांनी तरी ह्याचा विसर पडू देऊ नये.

धन्यवाद.

सुंदर लेख.. त्याला सर्वच सुरेख गाणी मिळाली..
पण मी साधारणपणे असे बघितलेय, कि त्याची आठवण काढताना नेहमीच दर्दभर्‍या गाण्यांचीच काढली जाते, मोजकी का होईना, त्याने आनंदी मूडमधली पण गाणी गायली आहेत... आणि तीच मला जास्त आवडतात.

तलत महमूद
तो ज्यांना आवडतो त्यांना १०० % आवडतो.
मग तो का आवडतो याचे समर्थन द्यायची गरज नाही.
त्याचे कोणतेही गाणे घ्या.
ती एका पेक्षा एक सुंदरच आहेत.
ज्यांना तो आवडत नाही
ते त्यांचे दुर्दैव

तो ज्यांना आवडतो त्यांना १०० % आवडतो.
मग तो का आवडतो याचे समर्थन द्यायची गरज नाही.

डॉक्टर साहेब, अगदी खरंय...